Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

तुकाराम महाराजांची रामभक्ती

मनोजवं मारुततुल्यवेगम्* *जितेंद्रियम् बुध्दी मताम् वरिष्ठम् ।
वातात्मजम् वानरयुथंमुख्यम्* *श्रीराम दूतं शरणम् प्रप्द्ये।।


               सर्व रामभक्तांमध्ये श्रेष्ठ असणाया आदर्श भक्ताला जगद्गुरू श्रीसंत तुकोबाराय भक्तीच्या वाटा विचारतात.

काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा।।
शूर आणि धीर । स्वामीकाजी तूं सादर ।।
तुका म्हणे रुद्रा । अंजनीचिया कुमरा ।।


     रामभक्त हनुमान स्वामीकार्यात सादर असणारा,शूर,धीर आणि रुद्रावतार होता असे सांगून ईश्वराच्या,दुष्टांचा विनाश आणि सज्जनांचे संरक्षण करून धर्मसंस्थापना करण्याच्या कार्यात त्याच्या भक्तांनी शौर्याने आणि धैर्याने कसे सहाय्य केले पाहिजे हे सूचविल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात,


हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ।।
तया माझा नमस्कार।वारंवार निरंतर।।
करोनी उड्डाण । केले लंकेचे शोधन ।
जाळियेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका ।।


                     दुबळ्या भागवतधर्माचे तुकोबाराय हे दुबळे प्रतिनिधी आहेत असे म्हणणार्या लोकांनी या अभंगाचे नीट निरीक्षण करावे. म्हणजे  दुर्जनासि पंचानन' असणार्या या थोर भगवद् भक्ताचे व भागवतधर्माचे स्वरुप त्यांच्या लक्षात येईल.भावार्थरामायणात  रावणें फुंकिता हुताशन । भडका एकसें उठोन । जालें दहन दाढीमिशी।।' असे नाथांनीही म्हटले आहे.
                 ज्या हनुमंतरायाला तुकोबाराय नमस्कार करीत आहेत त्या हनुमंतरायांच्या दोन विशिष्ट गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत.पहिली गोष्ट म्हणजे हनुमंतराय महाबळी,अत्यंत बलिष्ठ आहेत. इतके बलिष्ठ की रामासारख्या सर्वांना भारी झालेल्या रावणाची दाढी त्यांनी जाळली.अशा हनुमंताला एकदाच नव्हे तर वारंवार आणि निरंतर नमस्कार असो असे तुकाराम महाराज म्हणतात. हनुमंतरायांना महान शक्ती होती आणि त्या शक्तीचा त्यांनी उपयोग केला ही त्यांना वारंवार नमस्कार करण्याची तुकोबारायांची कारणे आहेत. तुकाराम महाराजांना आणि त्यांच्या भागवतधर्माला या गोष्टी जर मान्य नसत्या तर त्यांनी हनुमंताला वारंवार नमस्कार केला नसता.एवढेच नव्हे तर रावणाची दाढी जाळल्याबद्दल त्याची समतेच्या आणि सदयतेच्या नावावर निर्भत्सना केली असती.पण सज्जनांना व दुर्जनांना एकाच मापाने मोजण्याचा अविवेक भागवतधर्माने केला नाही.
                               महाराज पुढे म्हणतात की,आकाशात उड्डाण करुन सीतामातेला ज्या ठिकाणी बंधनात ठेवले होते ती लंका शोधून काढली,आणि शत्रूचे आश्रयस्थान असलेली लंका हनुमंतरायाने जाळून टाकली अन्यायी,परस्त्रीचे अपहरण करणार्या शत्रूवर आक्रमण करुन त्याचे आश्रयस्थान जाळल्याबद्दल तुकाराम महाराजांनी हनुमंतांचा *'धन्य धन्य'* म्हणून गौरव केला आहे. दुर्जनांसी रामभक्तांनी कसे वागावे याविषयीचा दृष्टिकोन तुकोबारायांनी या अभंगात स्पष्ट केला आहे.
                   समर्थ रामदास स्वामींनी रामभक्त हनुमंताची स्थापना व उपासना का प्रसृत केली याची कारणे तुकाराम महाराजांच्या या अभंगात सापडतात.वज्रदेही हनुमंताची स्तोत्रे गाऊन समर्थांनीही ती स्पष्ट केली आहेत.
      लंकेवर आक्रमण करून रावणवध केल्याबद्दल संतांनी रामाची स्तुतीच केली आहे. बापाला कैदेत टाकणारा,बालहत्या करणारा कंस,जरासंध,नरकासुर यांचा वध केल्याबद्दल किंवा करविल्याबद्दल भगवान श्रीकृष्णाचा संतांनी गौरवच केला आहे. रामकृष्ण ही भागवतधर्माची आराध्यदैवते आहेत आणि युद्धाची अपरिहार्यता सांगणारी भगवद्गीता  हा भागवतधर्माचा प्रमाण ग्रंथ आहे या गोष्टींकडे संतांच्या टीकाकारांचे लक्ष गेलेले नाही.
  समाजामध्ये ऐक्य टिकावे म्हणून केलेल्या शांतीदयाक्षमा या तत्वांचा टीकाकारांनी विपर्यास केला आहे. पण या तत्वांचे परिपालन ,सज्जन व दुर्जन हा भेद लक्षात घेऊन केले पाहिजे असे संतांचे सांगणे आहे.

@ ह.भ.प.हिंदुराव गोळे


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩

Post a Comment

0 Comments