वाकळ
काल एका मित्राच्या घरी त्याला भेटायला गेलो होतो.तिथं वाकळ शिवताना काही मायमाऊलींना पाहिलं.आणि काही दहा पंधरा वर्षांपूर्वीच्या आठवणी डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या.वाकळ म्हणजे गोधडी,लेपाटं आमच्या भागात 'वाकळ' म्हणतात.अंथरुण पांघरुणासाठी वापरतात.
तर अशा वाकळा शिवणे म्हणजे एक कला आहे. पूर्वी आमच्याकडे शेतातील कामं संपली की ह्या वाकळ शिवण्याच्या कामाकडे महिलावर्गाचा मोर्चा वळायचा.साधारण एप्रिल मे महिन्यात हे काम असायचं.
घरातील जुनी कपडे धुवून आणली जायची.मग ती कापून त्याच्या चिंध्या केल्या जायच्या. चौकोनी, आयताकृती आकाराच्या या चिंध्या वाकळ शिवण्यासाठीची पूर्वतयारी असायची.त्या सोबतच खास वाकळ शिवण्यासाठीचा दोरा आणला जायचा.मग हा दोरा घरातील आजी इंग्रजी वाय आकारासारख्या असणाऱ्या बोटभर जाडीच्या लाकडाला व्यवस्थित गुंडाळून ठेवायची.त्याला 'कुक्कड' म्हणतात.
जुनी पण बऱ्यापैकी चांगली असणारी अथवा वापरात नसणारी साडी वाकळला खाली आणि वर घालण्यासाठी वापरली जायची.त्या वरच्या बाजूला घातलेल्या साडीला 'पाल' म्हणतात. अशी सगळी तयारी झाली की मग प्रत्यक्ष शिवणकामाला सुरुवात व्हायची.
या शिवणकामाचा पाच सहा जणींचा गट असायचा.एकत्र एकमेकींच्या वाकळा शिवण्यासाठी ते सोयीचं असायचं.आमच्या वाडीत असे चारपाच गट आपापसात असायचे.अशा एकमेकींचा 'वारंगुळा' असायचा.काही ठिकाणी याला 'पायरा' असंही म्हणतात.
जीची वाकळ शिवायचीय तीच्या घरी ओटीवर शिवणकामाला सुरुवात व्हायची.
सुरुवातीला तयार करुन ठेवलेल्या चिंध्या, खाली चांगल्यातली एखादी नऊवार अथवा सहावार साडी अंथरली जायची.वाकळंची लांबीरुंदी कोपरावर ठरवायची .अशी सहा हात,पाच हात लांबीरुंदी ठरवून त्याप्रमाणे रचना केली जायची. मग त्याच्यावर लांब रुंद आकाराच्या जुन्या कापडाच्या चिंध्या व्यवस्थित अंथरल्या जायच्या कमी जास्त पाहिलं जायचं सगळीकडं समान जाडी येईल याची काळजी घेतली जायची.हे काम थोडं जिकिरीचं असायचं यात अनुभवी मातामाऊल्या पुढाकार घ्यायच्या. मनासारख्या मापात चिंध्या पसरवून झाल्या की त्यावर वरच्या बाजूचं पाल टाकलं जायचं. याला 'वाकळ भरणे' म्हटलं जायचं. मग अशी वाकळ भरुन झाली की प्रत्यक्ष शिवणकामाला सुरुवात व्हायची चारी बाजूला नऊवार साडीची रुंद किनार लावली जायची .पहिल्यांदा जी शिलाई व्हायची त्याला 'किनार मोड' म्हणत.अशी वाकळ किमान पाच फूट रुंद आणि सहा फूट लांब असायची. दोन दोन फुटाच्या अंतरावर एक जण बसून सुईदोऱ्यानं शिवणकाम सुरु असायचं.याकामी वापरली जाणारी सुई चांगल्या दर्जाची असायची टोकदार पातळ पण शिवताना वाकणारी नसावी अशी असावी असा कयास.हे शिवणकाम करताना टाकला जाणारा'टाका' नाजूक असावा हा दंडक,एका सरळ रेषेत दोन टाक्यातील अंतर अगदी कमी असायचं ती हातशिलाई एकसारखी दिसायची. स्वतः चा टाका बरोबर ओळखण्याची जाण प्रत्येकीला असायची.
गप्पाटप्पा मारत हे शिवणकाम सुरू असायचं.चेष्टा मस्करीत तर कधी इकडच्या तिकडच्या गप्पात वाकळ शिवणं सुरू असायचं.दुपारी जेवणाला सुट्टी व्हायची. जेवणासाठी घरी किंवा बहुतेकदा ज्या घरी वाकळ शिवण असायचं तिथंच घरुन जेवणाचं ताट भरुन आणून एकत्र जेवणं व्हायची. संध्याकाळी वाकळच्या मालकीणीकडून चहा व्हायचा. त्याकाळच्या बायकांना मिशरी लावायची सवय असायची मग थोडं थांबून तळहातावर डबीतली मिशरी घेऊन चार बोटं भरली जायची .अशी मिशरीची तल्लफ दोनचार वेळा दिवसभरात यायची. संध्याकाळ होत आली की शिवायला घेतलेली वाकळ मुसळ मधे ठेवून व्यवस्थित आतल्या चिंध्या विस्कटल्या जाणार नाहीत याची घेत गुंडाळून ठेवली जायची.
चारपाच दिवसात वाकळ पूर्ण होत असे. मधेमधे किनारी वापरल्या जायच्या. पूर्वी निवडणूकांच्या जाहिराती कापडी बोर्डावर असायच्या कुणाकुणाकडं हे कापड असायचं मग तेही त्या वाकळत शिवायला घेतलं जायचं.जुन्या वाकळांवर अशी पक्षचिन्ह दिसायची.
शेवटी चार पाच वीत लांबरुंद चौकोन शिल्लक राहिला की वाकळंचं 'पोट भरणे' केलं जायचं. हळदीकुंकू वाहत सगळ्याजणी पूजन करायच्या एकमेकींना हळदीकुंकू लावायच्या. त्या वाकळंच्या पोटात छोटासा गुळाचा खडा ठेवून ते पोट शिवलं जायचं. मग वाकळ शिवून पूर्ण व्हायची.
अशी ही वाकळ ज्यात चिंध्या म्हणून आईची,आजीची जुनी साडी,वडीलांचा,आजोबांचा एखादा सदरा धोतर,पायजमा असायचा.
या वाकळला जी ऊब असायची ती मायेची.त्यामध्ये असणारी ही जुनी कपडे त्या माणसांच्या मायेची आठवण करून द्यायची.आजीआजोबा गेले तरी त्यांच्या आठवणी या वाकळंतील त्यांनी अंगावर वापरलेल्या कपड्यांच्या रुपात असायची. जणू ती वाकळ अंगावर पांघरूण घेतली की आपण आजीआजोबांच्या कुशीतच झोपलोय असा भास व्हायचा. पूर्वी घरात अशा वाकळा ठेवण्यासाठी लाकडाची शिडी असायची किंवा इंग्रजी यु आकाराची लाकडी वलण असायची.किमान दहाबारा तरी वाकळा घरात असायच्याच.
काळानुसार बदल होत असतो आता या वाकळा घरातून हद्दपार झाल्या.त्यांची जागा गादी,रजई,ब्लॅकेट,चादरींनी घेतली. अशा वाकळा वापरणे मागासलेपण वाटू लागले.
पण या वाकळात जी मायेची ऊब होती ती कशात नाही. पावसाळ्यात हिवाळ्यात या वाकळांनी मायेचं पांघरूण घातलं हे कधी विसरु शकत नाही.
गेले ते दिवस राहिल्या त्या रम्य आठवणी. तो घराच्या ओसरीवरचा वाकळा शिवणाऱ्या मायमाऊलींचा गलबला,वारंगुळा आता दिसत नाही.केसांच्या अंबाड्यात आडवी खोचलेली सुई असणारी एखादी मायमाऊली आता दिसत नाही.तो गप्पांचा फड,ती तळहातावर रिकामी होणारी मिशरीची डबी आता दिसत नाही.सगळं काळाच्या पडद्याआड गेलं.
मित्राच्या घरुन परत येत असताना या वरील आठवणी आठवत घरापर्यंत कधी पोहचलो कळलं नाही.
✍🏻 © हिंदुराव गोळे
https://hinduraogole.blogspot.com/
👆🏻
या लिंकवरआपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻

0 Comments