Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

बिकट वाट वहिवाट नसावी

'वाट'

    लहानपणी ज्या 'वाटा' पायाखाली सातत्याने आल्या ज्या 'वाटां'नी दिशा दाखवली.ज्या 'वाटां'वर कधी कधी ठेचा लागल्या ,रक्त सांडलं, कधी गुडघा, डोकं कोपर ढोपर फुटलं पण या 'वाटां'नीच चांगल्या 'वाटे'वर चालणं शिकवलं.चुकूनही वाईट 'वाटे'च्या 'वाटे'लाही जायचं नाही अन्यथा आयुष्याची  'वाट' लागल्याशिवाय राहत नाही.मग कितीही चांगल्या 'वाटे'वर यावं असं जरी 'वाट'लं तरी चांगली  'वाट' सापडत नाही.मग जीवनात उरतात तडजोडी म्हणजेच आयुष्य जगण्यासाठी केलेल्या 'वाटा'घाटी.
    तर अशी ही 'वाट'!. या 'वाट' ह्या शब्दाच्या प्रेमात साधूसंतही पडले.बोलीभाषेत 'वाट' ह्या शब्दावरुन अनेक वाक्यप्रचार तयार झाले.
   साधूसंत म्हणतात, "उजळावया आलो 'वाटा' ,
'वाट पाहे उभा भेटीची आवडी',
'कृष्णा वाट माझी सोड',
    तसेच रोजच्या बोलण्यात, 'वाट'या शब्दावर वाक्यप्रचार तर खूप वापरात येतात.
'तुझी 'वाट' लावतो'
'माझ्या 'वाटं'ला लागू नको',

'वाटे'कडे डोळे लावून बसणे '
'वाट' बघ', एखाद्याला निरोप देण्यासाठी 'वाटं लावायला जाणे' असा काही भागात शब्दप्रयोग केला जातो.
इत्यादी आणि अशा बऱ्याच वेळा ' वाट' या शब्दाचा वापर केला जातो.
   तसेच नाभी सरकणे याला आमच्याकडे 'वाट सरकणे' असं म्हणतात.
    अनेक कवीही 'वाटे'च्या प्रेमात पडले.
'घाटातली 'वाट' काय तीचा थाट'
'ही 'वाट' दूर जाते'
'जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी 'वाट' पाहाते.
     अशा बऱ्याच कविता आजवर 'वाट' या शब्दाचा वापर करून केल्या गेल्या आहेत.
     'वाट' याचा अर्थ मार्ग, रस्ता,पथ,संधी असा होतो पण कधी कधी एखाद्याचा काटा काढणे या अर्थाने किंवा फजिती होणे यासाठी 'वाट' लावतो', 
'वाट' लागली 'असा वाक्य प्रयोग केला जातो.

         तर आज हे 'वाट' पुराण मांडावं असं 'वाट'लं म्हणून काहीतरी लिहावंस 'वाट'लं,जे 'वाट'लं ते लिहीलं.येईल तसं आलं तसं.तुम्हाला कसं 'वाट'लं ते जरुर कळवा मी 'वाट' पहात आहे.
     जीवनात चांगल्या 'वाटे'वर चालण्यासाठी जी 'वाट'चाल करायची असते त्यासाठी एखादा चांगला 'वाटा'ड्या लाभणं खरं भाग्याचं लक्षण.
      ठीक आहे आता या 'वाट' या प्रकरणाच्या 'वाटे'वर इथंच थोडासा विसावा घेतो‌.
    नवीन काही लिही पर्यंत माझी 'वाट' पहा.तोपर्यंत रामराम.धन्यवाद.
    'मार्ग दावून गेले आधी , दयानिधी संत ते',
'येणेंचि पंथ जावे'
किंवा 
  'झाडू संतांचे मारग'
   या आणि अशाच संतवचनांवर विश्वास ठेवून जीवनात चांगल्या 'वाटे'नं चालण्याचा प्रयत्न करुया‌.
    जे काही इथं पर्यंत लिहीलं गेलं त्यात माझं असं काही नाही संतांचा 'वाटा' मोठा आहे.तुमच्या सारख्या थोरामोठ्यांच्या आशिर्वादाने आजवरचा जीवन प्रवास सुखाच्या 'वाटे'वर चालू आहे.
     असेच प्रेम राहो त्यात वृद्धी झाली तर अजूनच चांगलं आहे.
    असेच मला 'वाट' दाखवण्याचं काम करा मी नक्कीच चांगल्या 'वाटे'नं चालत राहीन.
     राम कृष्ण हरि 🙏🏻 

✍🏻© हिंदुराव गोळे 
इथं मागे मी एक कविता केली होती ती टाकण्याचा मोह आवरत नाही.

*शेतातील वाट*

शेतातली वाट काय तीचा थाट
अवघड वळणांचाच जणू काही घाट

काटेरी बोरी बाभळी चहूकडे
एक एक पाऊल जपून टाका पुढे

नागमोडी वळणांची जराशी ही वाकडी
रुंदीला आहे ती खूपच तोकडी

उंचच उंच जाई घेई आकाशाला कवेत
मजा येते चालताना हवेतल्या हवेत

सपकन उंचावरून थेट खाली उतरते
नीट चाला नाहीतर धापदिशी पाडते

रानातल्या वाटेच्या खूप आहेत आठवणी
आठवता आनंद होतो खूप मनोमनी

©  हिंदुराव गोळे

🙏🏻🍁🌹🙏🏻🍁🌹🙏🏻🍁🌹

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Post a Comment

0 Comments