माझे अध्यात्मिक गुरु
आज मी जे काही कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याता म्हणून बोलत आहे त्यामागे माझे अध्यात्मिक गुरु ह.भ.प.वसंतमहाराज चव्हाण यांचा आशिर्वाद आहे. मी जे काही मोडकं तोडकं माझ्या बुद्धीला पेलेल असं बोलतोय त्यात त्यांचा वाटा अधिक आहे. कारण त्यांनी जर मला प्रोत्साहन दिले नसते तर कदाचित मी वक्ता म्हणून तयार झालो नसतो. ही सर्व त्यांची पुण्याई आहे.
मला आठवतयं मी नववीत होतो, आमच्या परीक्षा संपल्या होत्या.गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या पाचपुतेवाडीचे पारायण सुरू होते. मी पारायणात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पारायणासाठी बसलो होतो. पारायणात एक दिवशी नियोजित प्रवचनकार काही कारणास्तव येऊ शकले नाहीत. वसंत महाराज मला म्हणाले,"महाराज आजचं प्रवचन तुम्हाला करायचं आहे." मी हडबडलोच मी महाराजांना म्हणालो ,"महाराज अहो हे कसं शक्य आहे ? मला कसं जमेल? माझा एवढा अभ्यासही नाही,मी प्रवचन नाही करु शकत"." पण वसंत महाराज काही ऐकायला तयार नव्हते त्यांनी मला विश्वास दिला म्हणाले,"तुम्ही बसातर प्रवचनाला.बोलविता धनी तो पंढरीश परमात्मा श्री पांडुरंग आहे सर्व काही निभावून नेईल." आणि मी आढेवेढे घेत कसाबसा प्रवचन करण्यासाठी तयार झालो.
प्रवचनासाठी कसलीही तयारी केली नव्हती. पण आजपर्यंत कीर्तनं आणि प्रवचनं अनेकदा ऐकली होती.त्यामुळे काय बोलायचं याचा मनाशी सांगाडा बांधत होतो. आणि प्रवचनाला सुरुवात झाली. मी 'मज पामरा हे काय थोरपण । पायचि वहाण पायी बरी ।।' यावर बोलायला सुरुवात केली. अर्धातास बोललो. माझा चुलतभाऊ बाळूकाका माझं प्रवचन ऐकायला माझ्या समोर बसला होता.माझं बोलणं ऐकून तो रडायला लागला.यथामती यथाशक्ती प्रवचनसेवा यथासांग संपन्न झाली होती.वसंत महाराजांना नमस्कार केला. त्यांनी शाबासकीची थाप पाठीवर टाकली.वारकरी सांप्रदायातील माझी पहिलीच प्रवचनसेवा वसंत महाराजांच्या आशिर्वादाने अशारीतीने पार पडली.त्यानंतर दरवर्षी माझं प्रवचन आमच्या पाचपुतेवाडीच्या अखंड हरिनाम सप्ताहात होऊ लागलं.
तर असे हे माझे सांप्रदायातील गुरु वसंत महाराज चव्हाण. आमच्याच गावातील, घरासमोर घर असलेले नात्यानं माझे मामा लागतात. वसंत महाराज मुंबईतील एका कापड गिरणीत कामाला होते. पण गिरणी कामगारांचा संप झाला त्यात त्यांची गिरणी बंद पडली आणि महाराज गावाला शेती करु लागले. पण हाडाचा कलाकार असणारा हा माणूस. गिरणी कामगारांच्या नाटक, भारुडातून अभिनय केलेला,ही अभिनयाची आवड आणि कला त्यांनी गावी राहिल्यावरही जोपासली. ते तरुण मुलांना सोबत घेऊन आमच्या वाडीत भारुड सादर करायचे. त्यात ते पेंद्याचं पात्र करायचे.आणि भारुडात महत्त्वाचा रोल करायचे. मला आजही 'हरिश्चंद्र - तारामती' हे भारुडातील कथानक आठवतयं वसंत महाराज जबरदस्त अभिनय करायचे. आमच्या वाडीत कुणाच्या घरी पूजा असेल,बारसं असेल तर वसंत महाराजांचं हे भारुड मंडळ रात्री भारुड सादर करायचं .
संकल्पना, दिग्दर्शन वसंत महाराजांचं असायचं.भारुडासाठी स्त्री पात्र करणाऱ्या मुलांसाठी वाडीतील महिलांकडून साड्या जमवायचं काम ते स्वतः करायचे. पोरं भारुड संपलं की तोंडाचा मेकअप त्या साडीलाच पुसायचे.वसंत महाराज स्वतः त्या साड्या धूऊन ज्यांच्या असायच्या त्यांना परत करायचे.
आमच्या लहानपणी आमचं ढोल लेझीम पथक होतं.गावातील लग्नात,वरातीत, इतर गावच्या यात्रेत किंवा परगावच्या वरातीची सुपारी मिळायची. वसंत महाराज आम्हाला ढोल लेझीमचा डाव खेळायला शिकवायचे. त्यांच्याशिवाय ढोल लेझीमचा डाव रंगतच नसायचा. असे हे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू असणारे वसंत महाराज . नोकरी गेल्यावर घरची शंभर सव्वाशे बकरी होती त्यांचा सांभाळ करत होते. पण दुर्दैवाने एके दिवशी डोंगरात चरायला सोडलेली बकरी चोरीला गेली.
वसंत महाराज परिस्तिथीपुढे कधी हतबल झाले नाहीत. मिळेल ते काम करायची त्यांची हिम्मत कायम असायची.लग्न समारंभातील , छोट्याशा कार्यक्रमातील जेवण ते बनवायचे.जिलेबी,लाडू ,शिरा,पुलाव असे सर्व पदार्थ ते उत्तम पद्धतीने बनवतात. आमच्या गावात सत्यनारायणाच्या पूजेला ब्राह्मण मिळत नाही मग वसंत महाराजच सत्यनारायणाची पूजा सांगतात. मलाही त्यांनी पूजा सांगायला शिकवले.गणपतीत गणपतीची प्राणप्रतिष्ठापना महाराजच करतात.
गावातील ऐखाद्याच्या लग्नाची सुपारी असो लग्न असो महाराज पुढे लागून सर्व विधी पार पाडतात.
अगदी गावातील अंत्यविधीही महाराज पुढे लागून पार पाडतात. आमच्या पाचपुतेवाडीचे पारायणाचे नियोजन आणि व्यासपीठ वसंत महाराजांकडेच अनेक वर्षांपासून चालत आले आहे. सात दिवस महाराज पायाला भिंगरी लागल्यासारखे काकड्यापासून ते रात्रीच्या जागराच्या भजनापर्यंत सर्व व्यवस्था लावतात.कीर्तनकार,प्रवचनकार, गायक, आळंदीकर महाराज मंडळी यांच्या राहण्याची, चहापानाची,जेवणाची सर्व व्यवस्था महाराजांकडेच असते.त्यांच्याशिवाय पारायणात मजाच नाही. असे हे आमचे वसंत महाराज बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्व. आषाढी आणि कार्तिकी वारी नेमाने अनेक वर्षांपासून सातत्याने करणारे निष्ठावंत वारकरी. आमच्या कडे प्रमुख पीक म्हणजे भात.आणि भातलावणी नेमकी वारीच्या काळात चालू होते. पण वसंत महाराज बैलं ,लावणी सर्व टाकून वारीला जाणार.पांडूरंगालाच काळजी असल्यासारखं महाराजांची बैलं कुणीतरी सांभाळतं आणि लावणी ही निर्विघ्नपणे पार पडते.
मी लहाणपणापासून वसंतमामाच्या मागे मागे असायचो.श्रावणात एखाद्या ग्रंथाचे पारायण असायचे. वसंतमामा पारायणात ग्रंथाचे वाचन आणि निरुपण करायचे. गावातील पारायणात कीर्तन करायचे. पंचक्रोशीतील पारायणात महाराजांचं कीर्तन अजूनही असते. मी त्यांच्याकडून बरंच काही शिकलो. माझी अध्यात्मिक बैठक त्यांच्यामुळेच बसली.वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन आणि मौलिक सल्ला मला लाभत गेला.म्हणून आजवर इथपर्यंत पोहोचलो. मी एकदा शिवजयंती निमित्त गावात चार दिवसांची शिवचरित्रावर व्याख्यानमाला आयोजित केली.चार दिवसांत एक दिवस शाहाजी महाराज, एक दिवस आऊसाहेब,एक दिवस समर्थ रामदास स्वामी आणि एक दिवस पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर विषय ठेवून वक्तेही ठरवले पण पहिल्या दिवशीचे वक्ते सोडले तर इतर तीन दिवसांचे तिन्हीही वक्ते काही कारणास्तव येऊ शकले नाहीत. पर्यायाने तीन्हीही दिवस मलाच शाहाजी महाराज, आऊसाहेब,छत्रपती श्री शिवाजी महाराज,धर्मवीर श्री संभाजी महाराज यांचं चरित्र सांगावं लागलं.महाराजांच्या सहकार्याने आणि पाठिंब्यावर हे शक्य झालं. पण महाराजांना खूप आनंद झाला. माझं बोलणं त्यांना खूप आवडलं.मला म्हणाले खूप समाधान वाटतयं तुम्हाला असं बोलताना पाहून. अभ्यास करा आणि असंच बोलतं रहा.
मी एकदा आजारी पडलो.त्या आजारात मी , माझा दादा ,बुवानाना वसंत महाराजांना सोबत घेऊन पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट,गाणगापूर अशी तीर्थयात्रा केली. वसंत महाराजांकडून तुळशीची माळ घालून घेतली.त्यांना माझे गुरु म्हणून स्थान दिले. माझं पहिलं कीर्तन मोहाट,ता.जावळी इथं होतं.वसंत महाराजांना कीर्तनाला सोबत घेऊन गेलो. जवळ कुठे कीर्तनसेवा असेल तर महाराजांना सोबत घेऊन जातो. लांब असेल तर त्यांना येणं शक्य नसतं पण त्यांचा आशिर्वाद नक्कीच घेतो.
मी प्रामाणिकपणे असं मानतो की , मी आज जे काही कीर्तनातून व्याख्यानातून बोलतो ते सर्व वसंतमहाराजांनी पाठीवर हात ठेवल्यामुळेच.थोडक्यात
जे काही आहे ते त्यांचंच आहे माझं असं काहीही नाही.
ज्ञानदेव म्हणे मी चाडें । सद्गुरुंनी केलें कोडें । माथा हात ठेविला ते फुडें । बीजचि वाइले ।।
ज्ञानेश्वर माऊलींच्या या ओवीप्रमाणे माऊली म्हणतात त्याप्रमाणे श्रोते हो , मला या पेरणीच्या कामी सद्गुरुंनी कौतुकाने चाडे करुन माझ्या मस्तकावर हात ठेवून माझ्या आत उघड उघड ज्ञानबीज घातले आहे.
वसंत महाराजांनी माझ्या मस्तकावर हात ठेवून त्याचं चाडं केलं आणि जे बोल माझ्या मुखातुन बोळतात ते त्यांनी दिलेलं ज्ञान आहे. बस्स माझं काही नाही.
अशा माझ्या या आध्यात्मिक गुरुंना उदंड आयुरारोग्य लाभावे.तसेच त्यांचा वारीचा नेम अखंड चालू रहावा.त्यासाठी पंढरीश परमात्मा श्री पांडूरंगाचरणी तसेच माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी विनम्र प्रार्थना. माझ्या या आठवणीवर आपला अभिप्राय जरूर जरूर कळवा. मी त्याची वाट पहात आहे. पुढील भेटीसाठी लवकरच येईन तोपर्यंत रामराम.काळजी घ्या.
धन्यवाद.
© हिंदुराव गोळे
🙏🏻🍁🌹🙏🏻🍁🌹🙏🏻🍁🌹

0 Comments