आई
तशी ती माझी नात्याने मामी लागत होती पण आम्ही सर्व भावंडं तीला आईच म्हणत असू. हो मामी असून माझ्यावर आईसारखं प्रेम करणारी माझी आई....
आईच्या मायेला,प्रेमाला उपमा नसते हे खरंच तंतोतंत खरं आहे. अशी ही आई आमच्या भावंडावर जीवापाड आईची माया लावणारी आमची मामी तानुबाई म्हणजे माझी आई.मामीला आई म्हणून हाक मारणारं माझ्या ऐकण्यात आणि पाहण्यातही आजवर कुणी भेटलं नाही.कदाचित आम्ही भावंडं एकमेव असू जी स्वतःच्या मामीला आई अशी हाक मारत होतो असं मला वाटतं माझ्या तरी असं पाहण्यात आलं नाही.
अशी ही आमची आई नाव तानुबाई. मध्यम उंचीची रंगाने सावळी .गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ.बोलायला थोडी फटकळच होती. पण आमची आवडती आई.
माझं गाव आणि आजोळ एकाच गावात असल्याने मी लहानपणापासून मामा मामींचा लाडका होतो. मी मागे माझे मामा केसूबापू यांच्यावर लिहिण्याचा प्रयत्न केला होता.त्या मामांची ही पत्नी असणारी आमची मामी.
आमच्या घरापासून हाकेच्या अंतरावर मामाचं घर अगदी दारात उभं राहून हाक मारली तरी मामा आणि आई बाहेर येत इतकं दोन्ही घरांमध्ये अंतर होतं.
मी लहाणपणापासून माझ्या आईपेक्षा माझी चुलती अणूआई आणि मामी तानूआई या दोन आयांकडेच जास्त असायचो. मी तसा भगवान श्रीकृष्णापेक्षाही भाग्यवान मला दोन यशोदा माता मिळाल्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या,माझे लाड करणाऱ्या,मला प्रेमाने खाऊपिऊ घालणाऱ्या, माझ्यासाठी इतरांशी भांडणाऱ्या अशा या माझ्या यशोदा मैय्याच जणू.
मला आठवतं लहानपणी मी या आईसोबतच असायचो.तीच्या कुशीत झोपायचो.मला लहानपणी सर्वजण चिडवण्यासाठी म्हणायचे, तुझ्या तानुआईला पळवून नेलं किंवा कुणी म्हणायचं तीला लाईटच्या खांबावर लटकवलं मी दोन्ही हातानं बोंब मारुन रडायचो आणि चिडवणाऱ्याला शिव्या द्यायचो.तसाच पळत खालच्या घरी जायचो आणि आईला बिलगून रडायचोअसं माझं भाबडं प्रेम या माझ्या आईवर होतं आणि तीचंही तितकंच प्रेम माझ्यावर होतं.
माझी आई आजारी पडली किंवा कुठे मुक्कामी गेली की आम्ही तानुआईकडेच असायचो.
तानुआईचं माझ्यावर किती आणि कसं प्रेम होतं हे मी शब्दांत नाही मांडू शकत तितकं शब्द सामर्थ्य माझ्याकडे नक्कीच नाही. मला आठवतयं लहानपणी मला दूध पिण्यासाठी आईनं माझ्यासाठी एक कप आणला होता त्याच कपाने मी दूध पीत असे.मी मोठा होईपर्यत तो कप तसाच होता फुटला नव्हता.
आमचे मामा नेहमी काही सापडलं नाही किंवा काही चुकलं की आईला रागवायचे तिच्याशी भांडायचे.मला वाईट वाटायचं मी मामांशी भांडायचो.
शेतात जाताना आईबरोबर जायचो तीच्या डोक्यावर काही तरी असायचचं कधी मामांसाठी जेवण तर कधी दुसरं काही. मी तीच्या मागोमाग चालायचो.खळ्यावर माचोळीवर झोपायला मामांबरोबर जाताना, गावच्या मिटिंगला मामांबरोबर जाताना आई मला चादरीची खोळ करुन अंगावर द्यायची.
आई आणि मामानं माझा इतका लाड केला की मी जर घरात काही केलं तर माझी आई म्हणायची तानुबाईनं आणि बापूनं पोरगं बिघडवलं.अती लाड केलाय त्याचा अशी म्हणायची.
स्वयंपाक करताना मी आईच्या पाठीवर असायचो मी तीला सोडून जायचोच नाही.
अशी आई आजारी पडली तीचं कसलंतरी ऑपरेशन झालं .
ती हॉस्पिटलमधून येईपर्यंत तीच्या भेटीची ओढ लागली होती.
ती घरी आल्यावर तीला सोडून कुठेच जात नव्हतो.तीच्याजवळच असायचो .
पण काही दिवसांनंतर माझी जागा माझ्या छोट्या बहीणीनी घेतली.आईची ती ही माझ्याइतकीच लाडकी होती.आईनं घरात काही बनवलं तर आम्हाला सोडून कधी खाल्लं नाही.मी सातवीनंतर शाळेला मुंबईला गेलो आता दुरावा वाढला पण मुंबईला जाताना आणि आल्यावर पहिलं आईला भेटायचो.
आता तीचं वय झालं होतं कधी मुंबईला कधी गावाला ती राहत होती.मी वाडीत गेलो की मला हाक मारायची.कसा आहेस काय करतोस चौकशी करायची.मी ही तीला डावलून कधी येत नव्हतो.
चार वर्षांपूर्वी आई आम्हाला सोडून गेली.घरीच खूप रडलो तीच्या आठवणींनी जीव खालीवर होत होता.आजही असा एकही दिवस जात ज्या दिवशी तीची आठवण होत नाही. नाही विसरु शकत मी तीला.
काही व्यक्ती आपल्या आयुष्यात येऊन आपलं आयुष्यचं बदलतात.त्यांच्या बद्दल आपल्या मनात एक वेगळं असं स्थान असतं.अशीच माझी ही माऊली होती.तीच्या बद्दल लिहिण्यासारखं खूप काही आहे पण तीच्या आठवणींनी मी पुढे लिहू शकत नाही. तूर्तास इतकंच....
अशा या माऊलीला माझा साष्टांग दंडवत प्रणाम.
✍️ © हिंदुराव गोळे
या आणि अशाच इतर लेखांसाठी आणि कविता, पोवाडे वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
https://hinduraogole.blogspot.com/
🙏🏻🍁🙏🏻🍁🙏🏻🍁🙏🏻🍁🙏🏻

0 Comments