इरजिक
आम्ही लहानपणी इरजिक हा शब्द अनेकदा ऐकायचो.इरजिक लावली,इरजिक लावतोस का ? हे आणि असे अनेकदा इरजिक हा शब्द कानावर पडत असे.
पूर्वी शेतातील अथवा घरातील काही कामं करताना एकमेकांना सहकार्य म्हणून एकत्र येऊन कामं केली जात याला आमच्याकडे 'वारंगुळा' तर काही ठिकाणी पायरा असं म्हणतात.एकमेकांचा वारंगुळा फेडला जायचा यासाठी रोज म्हणून पैसे न देता दुसऱ्याच्याकडे एक दिवस काम केले जायचे. मग या सर्वांना जेवणाला बोलवलं जायचं या जेवणाला इरजिक असं म्हणतात.
ही इरजिक कोणकोणत्या कामासाठी लावली जायची त्याचा उल्लेख् करणं क्रमप्राप्त आहे. तर एखाद्याचं भात बडवून द्यायचं असेल.पूर्वी आमच्याकडे साध्य कौलांची घरं असायची ती घरं पावसाळ्यापूर्वी शेकारली जायची.शेकारणी म्हणजे आहेत ती कौल नीट लावून वळचणीतून पावसाचं पाणी पडलं पाहिजे. त्यासाठी शेकारणी करणं आवश्यक असतं.त्यासाठी कळकाच्या लहान लहान काटक्या,मसराडाच्या काटक्या घराच्या छताच्या वाश्यांवर व बँटींगवर अंधरुण त्याच्यावर ही साधी कौल व्यवस्थित लावली जात.यालाच घर शेकारणी असं म्हणतात.
कुणाचं भात झोडायचं असेल तर अशी इरजिक लावली जायची.त्यासाठी त्याच्या खळ्यावर भात झोडणीला सुरुवात व्हायची. भात झोडून,वावडीवर वाऱ्याला देऊन, गुत काढुन भेळं बांधून राशीला पडलेलं भात पोत्यात भरुन घरपोच केलं जायच. कामगतीची गाणी गायली जायची.अशा भातझोडणीच्या इरजिका आम्ही पण लावलेल्या आठवतात.
एखाद्याचा भूईमूग, भात कोळपणीसाठी देखील इरजिक लावली जायची. तसेच उन्हाळ्यात शेणकीतील शेणखत शेतात टाकायची इरजिक लावली जायची.आता सध्या दावणीला गुरंच राहिली नाहीत तसेच साध्या कौलांची घरंच राहिली नाहीत त्यामुळे या दोन इरजिका सध्या लावल्या जात नाहीत.
मग या कामाचा श्रमपरिहार म्हणून ज्याच्या घरचं काम असेल त्याच्याघरी जेवणाचा बेत ठरायचा. मग कुणाकडे पुरणपोळी, कुणाकडे घावण,कुणाकडे आंब्याचा रस आणि पुरी असा बेत ठरायचा.
पंगत बसायची ,या जेवणात पण शर्यत लागायची कोण अधिक पुरणपोळ्या खातोय किंवा कोण अधिक घावण खातोय याची स्पर्धा लागायची.जेवणावर आडवा हात मारला जायचा.त्या घरची गृहिणी देखील हात आखडता न घेता भरभरून जेवण वाढायची.
सध्या आमच्याकडे भात झोडणीची कामं सुरु आहेत. पूर्वी सारखी आता इरजिक लागत नाही.त्या स्पर्धेच्या पंगती आता उठत नाहीत. कदाचित यंत्रांमुळे शेत कामं अधिक सोपी आणि कमी वेळात होऊ लागली.माणसाला एकमेकांची गरज राहिली नाही. त्यामुळे इरजिक लावून हसतखेळत कामं आवरायची जुनी पद्धत आता राहिली नाही.
आता फक्त गेलेल्या दिवसांच्या आठवणींचा कप्पा उघडायचा आणि एक जक आठवण आठवत राहायचे बस्स.
आम्ही लहानपणी 'इरजिक' हा शब्द अनेकदा ऐकायचो.....
✍️ © *लेखन :- हिंदुराव गोळे*
या आणि अशा इतर लेखांसाठी आणि कविता, पोवाडे तसेच माझ्या काही साठवणीतल्या आठवणी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर अवश्य भेट द्या.
https://hinduraogole.blogspot.com/
🙏🏻🍁🙏🏻🍁🙏🏻🍁🙏🏻🍁🙏🏻

0 Comments