Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

आमच्या गावातील तालीम म्हणजे आमच्या आठवणीच विद्यापीठ



आमच्या गावातील तालीम म्हणजे आमच्या आठवणीच विद्यापीठ 





गावाच्या कला,क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय वाटचालींची उगमस्थान म्हणजे आमच्या गावातील न्यू हनुमान व्यायामशाळा म्हणजेच आमची तालीम


होय एक अशी वास्तू जी अनेक आठवणींची साक्षीदार आहे. या वास्तूत अनेकांच्या सुखदु्ःखाच्या आठवणींच्या साठवणी भरभरून ठेवल्या आहेत.आमचं गाव म्हणजे त्याकाळी पन्नास साठ घरांची वस्ती असणारी छोटीसी वाडी - पाचपुतेवाडी.
गावातील सामुदायिक फंडाच्या निधीतून त्याकाळीआमच्या गावचे नेतृत्व आनंदाभाऊ आणि मंडळींनी घेतलेला तालमीच्या बांधकामाचा निर्णय. मध्यवर्ती ठिकाणी सर्वांच्या सोयीसाठी गावाने बांधलेली ही मंगल वास्तू.हीचं बांधकाम कधी झालं हे मला सांगता येणार नाही. पण माझ्या जन्मापूर्वीपासून ही तालीम उभी आहे.
त्याकाळी गावातील सर्वांचं एकत्र येण्याचं उठण्या बसण्याचं, हक्काचं सार्वजनिक जणू दुसरं घरच.
पाच खणांची,दोन घाई आणि पुढे पडवी असलेली ही इमारत.खाली सिमेंटचा गुळगुळीत कोबा, भिंतींना मातीनं केलेला गिलावा म्हणजे त्याकाळचा प्लास्टर. पडवीला हवा खेळती राहण्यासाठी लाकडी चौकटीवर लोखंडी गज लावलेले.छतावर पत्रा टाकलेला,आतल्या बाजूला लाल मातीचा कुस्तीचा आखाडा होता. ऐसपैस असलेली ही आमच्या वाडीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली टुमदार इमारत.आमच्या वाडीचं हेरिटेजच म्हणाना.
तर या तालमीच्या अनेक आठवणी आजही मनात कायम ताज्या आहेत.आणि कायम राहतीलही .त्याकाळी *'तालमीपुढं',* *'तालमीत',* हा प्रत्येकाच्या तोंडचा परवलीचा शब्दप्रयोग!
या तालमीनं महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला अनेक नामवंत मल्ल दिले.याच तालमीतील लाल मातीत कुस्तीचे प्राथमिक धडे घेतलेले आमचे मामा पैलवान श्री.शिवाजीराव पाचपुते पुढे वाई तालुक्यातील पहिले *'महाराष्ट्र केसरी'* झाले. शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नामांकित मल्ल म्हणून त्यांची ख्याती आहे.आमच्या पाचपुतेवाडीचे वैभव!
पुढे तानाआप्पा,कांताआबा,सोपानआण्णा,संभादाजी,हणमामामा आणि असे अनेक पैलवान याच तालमीतील लाल मातीच्या आखाड्यात तयार होऊन पाचपुतेवाडीच्या क्रीडा क्षेत्रातील वैभवाचे शिल्पकार ठरले. आजही ओंकार पाचपुते,सोन्या पाचपुते,बल्या करे ही मुलं हा वारसा जोपासताना मेहनत घेत आहेत.या सर्व वाटचालीची साक्षीदार आमची ही तालीम.
मला अजूनही चांगलं आठवतयं आमच्या लहानपणी श्रावण महिन्यात याच तालमीत एखाद्या धार्मिक ग्रंथाचे महिनाभर पारायण चालू असायचे. माझ्या लहानपणी मी या वास्तूत अनेक धार्मिक ग्रंथांचे पारायण ऐकले आहे. पांडव प्रताप,हरिविजय,भक्तीविजय,नवनाथांची कथा,श्री संत तुकाराम महाराजांचे चरित्र हे आणि असे अनेक ग्रंथ लहानपणी कानावर पडलेत.त्याचा आजही माझ्या जीवनात उपयोग होत आहे. रात्रीची जेवणं झाल्यावर तालमीत ग्रंथाची पोथी वाचली जायची सारी वाडी लहान मुलं,म्हातारी माणसंं,महिला सर्वजण तालमीत पोथी ऐकण्यासाठी दररोज येत असत.शेतातील कामानं थकलेल्या शरीर आणि मनाला नवी उभारी यायची,विरंगुळा व्हायचा.भैरुदादा ओवीबद्ध असलेल्या ग्रंथाचा सरळ मराठी अर्थ सोप्या शब्दात सांगायचे. सर्वांगाचे कान करुन एकाग्रतेने सर्वजण ते मनापासून ऐकायचे. ग्रंथाच्या समाप्ती दिवशी श्री सत्यनारायणाची पूजा ठरलेली असायची.
गावातील प्रत्येक घरातून महिला लोखंडी चूल,पोळपाट - लाटणं घेऊन पुरणपोळी बनवण्यासाठी येत.तालमीत पुरण वाटण्यासाठी एक लाकडी यंत्र होतं पुरुष मंडळी आणि तरुण हे पुरण वाटायचं काम पार पाडत. पुरणपोळी,कटाची आमटी आणि भात असा बेत! सारं गाव आणि आसपासच्या गावातील लोकं प्रसादासाठी तालमीत पंगतीला बसलेली असायची.जेवताना खड्या आवाजात अनेक श्लोक म्हटले जायचे, श्लोक म्हणण्यात अमृतमामा,मारुतीभाऊ,शंकरदाजी तरबेज!कधी कधी कलगीतुरा लागल्यासारखा श्लोकांचा जणू सामनाच सुरु असायचा,एखाद्यानं रामाचं वर्णन असलेला श्लोक म्हटला तर दुसरा रावणाची महती सांगणारा श्लोक म्हणणार हे असं द्वंद्व बराच वेळ चालायचे कोणीतरी ज्येष्ठ हस्तक्षेप करायचे आणि हे श्लोकांचे युद्ध थांबवायचे .
दर शनिवारी तालमीत भजन व्हायचं.धोंडूभाऊ,कोंडू पाटील ,शंकरदादा,गवंडीबुवा यांनी गायलेले अभंग आणि गौळणी,त्यांच्या चाली आजही आठवतात.मलाही भजनाची आवड इथंच लागली.माळकरी होऊन वारकरी कीर्तनकार झालो त्याची बीजं तालमीतचं रुजलेली आहेत. त्यामुळे माझ्या साठी तालमीचं विशेष असं महत्त्व आहे. अशी ही आमच्या वाडीतील सांस्कृतिक, धार्मिक, अध्यात्मिक जडणघडण ठरलेली शुभ वास्तू.
आमच्या लहानपणी वाडीत भारुडं लावली जायची.या भारुडाची तालीम याच तालमीत व्हायची.वसंत महाराज आम्हा लहान मुलांना या भारुडात कृष्ण,बलराम, सुदामा,पेंद्या अशा पात्रात भूमिका द्यायचे. तालमीपुढे रात्री मंडप टाकून भारुडं सादर केली जायची.अशी ही सांस्कृतिक वारसा सांगणारी आमची तालीम.
गोपाळकाल्या दिवशी तालमीपुढं दंहीहंडी बांधली जायची.आम्ही वाडीतील सगळी मुलं तालमीपुढं एकत्र जमायचो.
'एक दोन तीन चार शिवाकाकाची पोरं हुशार ,एक दोन तीन चार पाचपुतेवाडीची पोरं हुशार.' असं एकमेकांच्या हातात हात घालून मोठ्या आवाजात म्हणत साऱ्या वाडीतून फिरुन येऊन मग हंडी फोडायचो.मज्जा असायची.दगडूआप्पा आम्हाला गोळ्या बिस्कीटं द्यायचे.
वाडीतील ज्येष्ठ माणसं,तरुण पोरं आणि आम्ही लहानमुलं रात्री तालमीतच झोपायला असायचो.शाळेतील मुलं वह्या पुस्तकं घेऊन रात्री तालमीत अभ्यास करत असत. प्रौढ शिक्षणाचे वर्गही तालमीत भरले जायचे.आई,काकू,काका,मामा अशा मंडळींना पाटीवर मुळाक्षरं लिहायला शिकवायचो.ह्या मंडळींना शिकताना बघून हसायला यायचं.आमच्या गावाची शाळेची इमारत होण्यापूर्वी आमच्या वाडीची शाळा तालमीच भरायची.अनेकांच्या शैक्षणिक जीवनाचा श्रीगणेशा तालमीतच झालेला.आजही जुनी माणसं खालची शाळा म्हणून तालमीचा उल्लेख करत.अशी ही शैक्षणिक वारसा सांगणारी आमची तालीम.
संध्याकाळी मुलं तालमीत व्यायाम आणि कुस्तीचा सराव करण्यासाठी येत.गुलबाआबा आम्हाला व्यायाम आणि कुस्तीचं प्रशिक्षण द्यायचा.मी ही या मातीत खेळलोय.व्यायाम झाला की,टाकीवर जाऊन आंघोळ करायचो.
तालमीत एका कपाटात रेडिओ होता.रेडिओचा कर्णा तालमीच्या कोपऱ्यात असलेल्या लाईटच्या खांबावर बांधलेला.दररोज बातम्या ऐकण्यासाठी लोकं तालमीत जमायचे. आम्हा लहानमुलांना रेडिओला हातही लावण्याची परवानगी नसायची.कपाटाला कुलूप लावलेलं असायचं आत रेडिओ सुरक्षित राहील याची सर्वोपतरी काळजी घेतली जायची.
रविवारी केस कापायला येसूमामा आमच्या गावातून, अभेपूरीतून वाडीत तालमीत पडवीत बसायचे. आमच्या लहान मुलांचा गांधीकट ठरलेला असायचा.मोठी माणसं दाढी बनवून घ्यायला नंबर लावून बसायची गप्पांच्या रंगात येसूमामाचं हे केसकर्तनालय तालमीत पोतं टाकून सुरु असायचं.येसूमामा फार विनोदी स्वभावाची व्यक्ती. पण आम्ही लहान मुलं आमचा टक्कल केला जाणार म्हणून नाराज असायचो.
आमच्या गावची बैठकही तालमीतच असायची.गावच्या विकासासाठी,एखाद्या नवीन योजनेसाठी घेतले जाणारे निर्णय तालमीतच ठरत.लग्नाची बैठकही तालमीपुढं होत असे.लग्नाचा मंडपही तालमीपुढंच.याच जागेत आनेकजणांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात झालेली आहे. ही तालीम त्याची साक्षीदार आहे.
लग्नाच्या वरातीत ढोल लेझीमचा डाव तालमीपुढं रंगात यायचा.छडीपट्टा,दांडपट्टा यांची प्रात्यक्षिके आमचे चुलते नथूबापू तालमीपुढं सादर करायचे. नवीन मुलांनाही प्रशिक्षण द्यायचे.
सुगीच्या दिवसात तालमीपुढं वाळवणं टाकली जायची.तालमीच्या पत्र्यावरही वाळवणं असत.कुरडया, पापड,भातवडी महिलामंडळी इथंच उन्हाला ठेवत.
लोहार,सुतार यांची शाळा तालमीपुढंच मांडली जायची.शेतीची अनेक औजारे,बैलगाड्या बनवताना कुशल कारागीरांना तालमीपुढं राबताना पाहिलयं.
रविवारी आणि सुट्टी दिवशी आम्ही खेळायला तालमीतच असायचो.तालमीपुढं कबड्डी, गोट्या, लंगडी,लगोऱ्या अशा खेळांचा डाव पडलेला असायचा.
रात्री झोपताना गप्पांचा फड जमून यायचा.अनेक घडामोडी माहिती पडायच्या.कोंडूआबांना मुद्दाम मुलं त्रास द्यायची.ते झोपले की त्यांचा बिछाना ओढायची,आबा चिडायचे मग पोरं हसत हसत झोपून जायची.
कालोघात ही तालमीची इमारत जुनी झाली. पत्रा गळायला लागला,भिंती कमकुवत होऊन पडायला आलेल्या. गावानं तालमीचं नूतनीकरण करायचं ठरवलं.जुनी तालमी पाडून आता त्या जागी दुमजली तालीम उभी आहे.
पण जुन्या तालमीची आठवण आजही हृदयाच्या कप्प्यात साठवून आहे. मीच नाही तर आमच्या गावातील अनेकांना या तालमीच्या आठवणीत रममाण व्हायला आजही आवडतं.
एखाद्या वास्तूचं महत्त्व आपल्या सर्वांगीण जडणघडणीत विशेष असं असतं.तेच महत्त्व आमची तालीम आमच्यासाठी आहे.
माझ्या या तालमीच्या आठवणी आपल्याला कशा वाटल्या ते जरूर कळवा.अशीच आठवणींच्या पोतडीतील एखादी आठवण घेऊन ती सांगायला परत आपल्या भेठीसाठी नक्की येईन.तोपर्यंत नमस्कार, काळजी घ्या. धन्यवाद.

@ हिंदुराव गोळे.

Post a Comment

0 Comments