Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

कुल्फी घ्या कुल्फी गारेगार कुल्फी | नामा कुल्फीवाला

  कुल्फी घ्या कुल्फी...गारेगार कुल्फी - नामा कुल्फीवाला




उंच ,गोरापान, घारे डोळे ,दाढीचे खुंट वाढलेले,अंगातपांढरा सदरा आणि पायजमा,नामाच्या पायात कधीच चप्पल नसायची तेव्हा रस्ता डांबरी नव्हता ,पण रस्त्यावर फुफाटा इतका असायचा की तो तापून उघड्या पायांना चटका बसायचा. हा नामा एवढ्या रणरणत्या उन्हात अनवाणी पायाने सगळ्या गावोगावी कुल्फी विकत फिरत असायचा,डोक्यात टोपी आणि त्यावर टॉवेल गुंडाळलेला.गोल चुंबळीवर गोलाकार लाकडी उभ्या पट्या असलेला गोलाकार डबा त्याच्या आत पत्र्याचा कुल्फीचा डबा,डबा आणि लाकडी पट्ट्यांच्या मध्ये पोकळ जागा असायची त्यात बर्फ टाकलेला असायचा बाहेरून बर्फ असल्यामुळे डब्यातील कुल्फी थंड असायची हा डबा घेऊन नामा भर उन्हात दुपारी "कुल्फी घ्या, कुल्फी...गारगार कुल्फी...कुल्फीवाले...कुल्फी sss...अशी आरोळी देत नामाचा गावात प्रवेश व्हायचा.आणि मग आम्ही लहान मुलं जिथं असू तिथून तालमीपुढे भेंडीच्या झाडाखाली नामा कुल्फी घेऊन बसलेला असे तिथं जमा होत असू.
नामाचं , कुल्फी घ्या...कुल्फी...गारेगार कुल्फी ...हे एका वेगळ्या उच्च रवात चालू असायचं.आम्ही सगळी मित्रमंडळी नामाभोवती गोलाकार कडं करुन उभे असायचो.वाट पाहत असायचो की नामा आज कुणाला भेंडीची पानं आणायला सांगतोय.आपला नंबर यायला हवा असा विचार मनात चालू असायचा.आणि यदाकदाचित आपलं नाव आलंच तर जोरात भेंडीच्या झाडाकडे पळत जाऊन शक्य तितकी भेंडीची पानं जमा करून आणायची आणि नामाला द्यायची.भेंडी म्हणजे आम्ही लहानपणी त्या पानाची गोलाकार पिपाणी करुन ती तोंडात धरुन वाजवत असू ती भेंडी, भाजीची भेंडी नव्हे.
मग त्याबदल्यात नामा आम्हाला त्या भेंडीच्या पानावर आपल्या कुल्फीच्या डब्यातून भातवाडी सारखा एक चमचा असायचा तो त्या आतल्या पत्र्याच्या डब्यात एका विशिष्ट आवाजात घासून एक छोटासा कुल्फीचा गोळा पानावर ठेवायचा आणि आम्हाला द्यायचा तोही फुकट.


तो भेंडीच्या पानावर कुल्फी द्यायचा,त्याच्याकडे कोन नसायचा.त्यावेळी पाच पैसे ,दहा पैसे अशी कुल्फीची किंमत असायची.

 

तर हा नामा भोर तालुक्यातील कुठल्यातरी गावातला होता.स्वभावाने खूप प्रेमळ.दिवाळीनंतर ते उन्हाळा संपेपर्यंत नामा आणि त्याचे काही गावातील मित्र कुल्फी विकण्यासाठी वाईला येऊन राहयचे.वाईतून मग रोज वेगवेगळ्या गावात आपल्या व्यवसायासाठी कुल्फी घेऊन फिरत असत.
कधी गुलाबी रंगाची तर कधी पिस्ता रंग असलेली तर कधी पिवळ्या रंगाची कुल्फी नामाच्या डब्यात असायची.घट्ट ,गोड,थंडगार कुल्फी खायला मजा यायची.
नामाचा आवाज ऐकून लहानमुलं घरात कुल्फीसाठी हट्ट धरायचीआणि नाही मिळाली तर रडत बसायची.आजी, आजोबा ,आई कडून पाच पैसे मिळाले की कोण आनंद व्हायचा !.धूम ठोकत हाताच्या मुठीत पाच पैसे धरून नामाकडं धाव घ्यायची.नामाला पैसे द्यायचे आणि कुल्फी घ्यायची.पण जर एखाद्या लहान मुलाकडं पैसे नसतील तर नामानं कधी त्या मुलाला नाराज केलं नाही. त्याला तो कुल्फी पैसे न मागता द्यायचा.त्यामुळे नामा आम्हा बालचमूमध्ये आवडता होता.
उन्हातून डोक्यावर कुल्फीचा डबा घेऊन अनवाणी पायाने नामा गावोगावी फिरायचा.दुपारच्या जेवणाची वेळ असेल तर कुणीही त्याला आपल्या घरी जेवणासाठी घेऊन जायचे.नामा आमच्या गावात इतका लोकप्रिय होता की कुणीही त्याला आग्रहाने जेवण खाऊ घालायचे. जेवण झाल्यावर घरातील सर्वांना नामा कुल्फी द्यायचा. बरेच वर्षे नामा आमच्या गावात कुल्फी विकायला येत असे. आमचं बालपण संपून आता आम्ही मोठे झालो होतो.आमच्यातील कोणी नोकरीसाठी,शिक्षणासाठी मुंबईला गेले होते. पण गावाला आल्यावर नामा भेटला की आस्थेनं तब्बेतीची चौकशी करायचा. दहा बारा वर्षांपूर्वी नामा कुठल्यातरी आजाराने हे जग सोडून गेला. मुंबईत असताना ही दुःखद बातमी आम्हाला समजली.ऐकून खूप वाईट वाटले.नामाच्या कुल्फीची आणि प्रेमळ स्वभावाच्या नामाची खूप आठवण यायची.
आता गावात आइस्क्रीम विकायला कोणी आला की तो आइस्क्रीमवाले आइस्क्रीम... असा आवाज देतो.तेव्हा कानात लहानपणी ऐकलेला नामाचा कुल्फी घ्या कुल्फी...गारगार कुल्फी...कुल्फी ...कुल्फी ...हा आवाज ऐकू येतो आणि मन पुन्हा लहानपणीच्या आणि नामाच्या आठवणीत जातं. आमच्या लहानपणी असे व्यवसायासाठी गावोगावी फिरणारे विक्रेते खूप असायचे. कोणी मासे विकायला यायचा,कोणी सकाळी सकाळी पाव विकायला यायचा.टोस्ट,बटर,खारी विकणारे गावात फिरायचे. पण या सर्वात *नामा कुल्फीवाला* कायम आठवणीत राहिला तो त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि पैशांपेक्षा माणुसकीला महत्त्व देणाऱ्या त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे.
माझी ही आठवण तुम्हाला कशी वाटली ते जरुर कळवा.तुमच्या प्रतिक्रेयेवर माझ्या पुढच्या आठवणीची साठवण सुरु असते. तेव्हा अभिप्राय जरूर कळवा.
अशीच एखादी आठवण घेऊन मी आपल्या भेटीला येतच राहणार आहे. तोपर्यंत नमस्कार.
धन्यवाद.
@ हिंदुराव गोळे

Post a Comment

0 Comments