Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

सुवासिनीच्या भरल्या मळवटाने ती आम्हाला सोडून - आईचं दुसरं रुप अणूआई

                                                            
                     सुवासिनीच्या भरल्या मळवटाने ती आम्हाला सोडून - आईचं दुसरं रुप अणूआई






                                             लहानपणी आजारी असल्यावर जिच्या कुशीत झोपल्यावर आजार गायब होऊन निवांत झोप लागायची ती म्हणजे आमची चुलती आमच्या सर्वांची लाडकी 'अणूआई'.लहानपणी मी तीला सोडून राहत नव्हतो. आमच्या इकडच्या नात्यानं ती माझी चुलती लागत होती आणि आईकडच्या नात्यानं माझ्या मावसभावाची म्हणजे आईच्या चुलत बहीणीच्या मुलाची पत्नी म्हणजे माझी वहिनी ,हे नातं होतं आमचं पण आजोळचं नातं आम्ही कधीच लावलं नाही. हो कधीतरी अणूआई मला मस्करीत 'भावजी'म्हणायची मग मी पण काय म्हणताय 'व्हंजी' असं म्हणायचो, घरातले सगळे हसायचे.
                       गावातील सगळे तीला अणूआईच म्हणायचे. गोरीपान, उंच गौरीसारखी दिसायची आमची अणूआई.प्रेमळ स्वभावाची,थोडासा भित्रा स्वभाव असलेली आम्हा सगळ्या भावंडांची काळजी घेणारी, कुठल्याही मुलाला कधी ती रागावली नाही की कधी तीनं कुणाला मारलं नाही.घरात काही कार्यक्रम असला लग्न, पूजा किंवा इतर काय कार्यक्रम असला की अणूआईच्या सल्ला घेतल्याशिवाय जीजी काही करायची नाही.अणूआई जातीनं सर्व पार पाडायची.काय नको काय हवं याची ती काळजी घ्यायची.ती सारखी आजारी असायची थंडी ताप असा आजार असायचा.त्यामुळे तीला शेतीच्या कामाला जाता येत नसे ती आजारी असली की घरीच असायची.ओटीवर अंथरुणावर झोपलेली असायची पण घरातल्यांचे जेवण बनवून कुणाजवळ तरी शेतात जिथं काम चालू असेल तिथं पोहच करायची .आम्हाला तीची खूप काळजी वाटायची.अणूआई आजारी पडू नये असं सारखं वाटायचं.त्यावेळी पवार डॉक्टर आठवड्यातून एकदा धोमवरुन आमच्या वाडीत यायचे.मग कधी अचानक तीला थंडी वाजून आली तर तीच्या दंडात घट्ट आवळून काय तरी दोऱ्यात बांधायचे डॉक्टर येईपर्यंत. त्या प्रकाराला 'थंडी बांधली' असं म्हणत.आमचे एक चुलत मामा म्हादूदादा कसल्या तरी झाडाच्या मुळीचा तुकडा दोऱ्यात बांधून दंडावर घट्ट आवळून बांधायचे त्याला थंडी बांधली असं म्हणायचे. अशी थंडी कायमच आणूआईच्या दंडावर बांधलेली असायची. हा गावठी उपाय आता बंद झाला.
                 अणूआई घरीच असल्यामुळे आम्ही मुलं तीच्या भोवतीच असायचो.आमची जेवणं झाली का नाही याची काळजी घ्यायची.ती अंथरुणावर पडून मला गोष्टी सांगायची .दिवसभरातला जास्तीत जास्त वेळ तीच्या बरोबरच जायचा .मला आठवतयं लहानपणी मी आजारी पडलो की मला आणूआईच्या पुढ्यात झोपायचं असायचं तीच्या पुढ्यात झोपलं की छान झोप लागायची.अशी आमची सगळ्याच भावंडांची सवय होती.पहिलीत असताना एकदा मी खूप आजारी पडलो.मला वाईला दवाखान्यात ऍडमिट केलं होतं.पंधरा दिवस मी दवाखान्यात होतो. जीजीसोबत म्हणजे माझ्या आईसोबत आणूआई पंधरा दिवस माझ्यासाठी दवाखान्यात राहिली होती. आईपेक्षा जास्त तीच माझी काळजी घ्यायची.घरी आल्यावर मी तीच्याजवळच असायचो मी आजारपणात इतका अशक्त झालो होतो की मला हातात काठी घेऊन चालाय लागायचे.त्यावेळी अणूआईच माझी काळजी घेत होती.

                              लहानपणी काही खोड्या केल्या आता घरातल्यांचा मार बसणार अशी परिस्थिती आली की,अणूआईकडं धूम ठोकायची.तीच्या पदरात जाऊन लपायचो मार वाचायचा.सातवीनंतर शाळेला मुंबई ला गेलो.मुंबईला जाताना अणूआईला बिलगून खूप रडायचो.सुट्टीत गावाला आलो की एस.टी.तून उतरलो की पळत सुटायचो आणि पहिला अणूआईच्या गळ्यात पडायचो.ती पण लाडानं मुका घ्यायची.बराचवेळ तीच्या कुशीत बिलगून राहयचो.अशी ही आमची अणूआई म्हणजे माझी प्रत्यक्ष जन्मदाती नसली तरी तीच्याहून कमी नसलेली माझी दुसरी आईच जणू.खूप प्रेम करायची,खूप लाड करायची माझा.मोठा झाल्यावर नोकरीला सोलापूरला राहिलो.अणूआईची खूप आठवण व्हायची माझ्या आईपेक्षा तीचीच जास्त आठवण यायची.माझ्या स्वप्नात यायची ती मग मी वाडीला कुणाच्या तरी मोबाईलवर फोन करुन तीच्याशी बोलत राहयचो.तीच्या तब्बेतीची विचारपूस करायचो.मला म्हणायची तुझी स्वतःची काळजी घे,एकटा आहेस तिकडं,खात पीत जा वेळेवर.सुट्टीवर आला की वाडीला ये.तेव्हा जीजीआप्पा दादाकडे कल्याणला असायचे. मी सुट्टीत कल्याणला जायचो.पण कधीतरी गावालाही अणूआईला भेटायला जायचो.
                             माझ्या लग्नात ती आजारी असल्यामुळे येऊ शकली नाही याची खंत कायम माझ्या मनात राहिलं.माझ्या पत्नीला ती म्हणायची माझ्या लाडक्या लेकाची बायको आहे ही.मी मेल्यावर पुन्हा तुमच्या पोटाला मुलगी होऊन येईन.केवढं प्रेम करत होती! सोलापूरला असताना एकदा जीजीसाठी मी इरकलीची साडी आणली होती.अणूआई म्हणाली होती मला पण इरकल आण सोलापूरवरुन येताना.पण माझं नशीब इतकं वाईट की तीची इच्छा मी पूर्ण करु शकलो नाही. त्याची सल सतत माझ्या मनात राहील.नंतर मी सोलापूर सोडलं होतं.पण तीच्या साठी इरकल आणू शकलो नाही ही खंत मनात कायम राहीली. घरातच चालताना तोल जाऊन अणूआई पडली.मांडीचं हाड मोडलं होतं.डॉक्टरांकडे घेऊन गेलो पण ते म्हणाले ह्या वयात सर्जरी अवघड आहे. घरातच त्यांची काळजी घ्या.घरी आणली एका जागेवर पडून होती.खूप त्रास ,खूप वेदना व्हायच्या तीला.मी वाईतून तीला बघायला वाडीला दोन दिवसातून एकदा जायचोच.मी तीला म्हणायचो माझ्याबरोबर चल वाईला.ती म्हणायची नको रे बाबा आधीच तुझ्या मागं जीजीआप्पांचं आजारपण आहे. त्यांची काळजी घेशील का माझी.मी इथंच बरी आहे. आण्णा,वहीनी काकाची पोरं घेतात काळजी माझी.
                         आमच्या गावाचं पारायण सुरु झाले होते. पहिलाच दिवस होता.विनापूजन झालं आणि ज्ञानेश्वरीच्या पारायणाला सुरुवात झाली होती.मी मंदिरातच होतो आणि कोण तरी लहान मुलगा अणूआई गेली म्हणून सांगत आला.मी पळतच घरी आलो तीला पाहिलं.वसंत महाराजांनी तीला मांडी घालून बसवलं.मी ओक्साबोक्शी रडत होतो. तीच्याच बाजूला बसून राहिलो. सुवासिनीच्या भरल्या मळवटाने ती आम्हाला सोडून चालली होती.गावात नामसप्ताह सुरु होता अणूआई माळकरी होती.तीनं शेवट गोड केला होता.एक एक आठवण येत होती तसंतसं अधिकच रडू येत होतं.हक्काचा मायेचा पदर,मायेची पखरण करणारी आमची अणूआई आम्हाला सोडून कायमची चालली होती.जीच्या प्रेमपान्ह्यात लहानाचा मोठा झालो तो पान्हा आज आटला होता.तिचा चेहरा डोळ्यासमोरुन जात नव्हता.सतत तीचं ते बोल कायम आठवतात मी तुझी मुलगी होऊन पुन्हा येईन.प्रेमाची,मायेची,वात्सल्याची मूर्ती आम्हाला पोरकं करुन गेली.अणूआई तू जिथं असशील तिथं सुखी राहा.स्वतःची काळजी घे ,आजारी पडू नको तिथं तुझी काळजी घेणारं कुणी नाही. अणूआई मी तुला कधीच विसरु शकत नाही. चुलती होतीस तरी आईच्या लाडानं आणि प्रेमानं आम्हाला सांभाळलसं आमच्यावर आई इतकाच किंबहुना त्याहूनही जास्त जीव लावलास,लळा लावलास.तुला कसं विसरु शकतो.अजूनही तुझी आठवण आली की असं वाटतं पळत जाऊन तुझ्या कुशीत शिरावं.तुझ्या मायेच्या उबीत पडून राहवं.
                                मित्रांनो माझी ही अणूआईची आठवण तुमच्यासमोर मांडतांना तीची खूप आठवण होतेयं. तुम्हीही तुमच्या अशाच एखाद्या आणूआईला जपा,तीची काळजी घ्या.
पुन्हा येईनच एखादी साठवणीतील आठवण सांगायला.तोपर्यंत नमस्कार काळजी घ्या.आपली प्रतिक्रिया जरुर कळवा.
धन्यवाद.
@ हिंदुराव गोळे.

Post a Comment

0 Comments