माझ्या नाटकाच्या आठवणी
अन्याय' दरोडेखोरी,लूटमार, चोऱ्या करणारा हा दरोडेखोर | माझ्या नाटकाच्या आठवणी
१९९२ ला दहावीची परीक्षा संपली होती.आणि मी मुंबईतून गावी आलो होतो. शिवजयंती जवळ आलेली. आम्ही सर्व मित्रांनी यावर्षी शिवजयंतीला आपण नाटक बसवू आणि ज्योत आणू त्यादिवशी रात्री मंदिरासमोर सादर करु असं ठरवलं..सर्वांचे एकमत झाले आणि नाटक करायचं ठरलं.
पण नाटक बसवायचं पण कोणतं बसवायचं? ऐतिहासिक, सामाजिक का विनोदी? बऱ्याच चर्चेनंतर विनोदाची झालर असलेले सामाजिक नाटक बसवू असं ठरलं. आता प्रश्न होता कोणतं नाटक,त्या नाटकाचं पुस्तक खरेदी करावं लागलं मग आमच्याकडे त्यावेळी पैसे नव्हते घरातून मिळण्याची शक्यता फारच कमी.मग सर्वांनी मला तू नाटक लिही असा आग्रह केला.
यापूर्वी मी फक्त नाटक गावातील यात्रेतून गावातील मुंबई मंडळाने सादर केलेले पाहिले होते. इतकाच काय तो नाटकाशी माझा संबंध. त्यासोबत गावच्या यात्रेतील तमाशातून सादर केलेलं वगनाट्य पाहिली होती. पण आता ठरवलय आपण तर प्रयत्न करु म्हणून मनावर घेतलं.आणि आठ दिवसात दोन तास चालेल एवढं तीन अंकांचे नाटक लिहून तयार केलं! माझ्या बुद्धीला झेपेल असं लिहून तयार केलं.
नाटकाचं नाव होतं 'सत्या दरोडेखोर अर्थात सत्याचा अन्याय' दरोडेखोरी,लूटमार, चोऱ्या करणारा हा दरोडेखोर या नाटकाचा मुख्य नायक होता.
खलनायकी छटा असलेली व्यक्तिरेखा मुख्य अभिनेता होता.सोबत त्याची पाच सहा गुंडांची टोळी असते. तो रोज चोऱ्या,खून करत असतो.त्यासोबत पोलीस हवालदार थोडी विनोदी ढंगाने मांडले होते सर्वांना मी लिहलेलं नाटक आवडल.नक्की झालं नाटक बसवायच ते.
आमच्या शाळेत नाटकाच्या तालमी होऊ लागल्या,जयवंत फाळके, सुबोध गोळे, शिवाजी खोपडे, शंकर पाचपुते आणि काही मित्र आम्ही मनापासून नाटकाच्या तालमी करत होतो. शिवजयंतीदिवशी ज्योत घेऊन आलो.पळून पळून थकलो होतो तरी नाटकासाठी स्टेज करायला सगळे जमलो मोठ्या उत्साहात होतो सगळेच.स्टेज तयार झाला. शाळेतील फळ्यांवर नाटकाची जाहिरात करुन ते फळे दोन तीन जागी सर्वांना दिसतील असे लावले होतेच.सर्वांना समजले होते आज पोरांचं नाटक आहे म्हणून. रात्री नऊ वाजता नाटकाला सुरुवात झाली. नाटकातील आमच्या सर्वांचा अभिनय चांगला झाला होता जयवंता आणि सुबोध विनोदाने सर्वांना हसवत होते.दरोडेखोरांना दाढीमिशा,धोतर,कोपरी ,खांद्यावर काळी घोंगडी आणि हातात तळपती कुर्हाड आणि कमरेला लकलक करणारा चाकू अशी वेषभूषा प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी पुरेशी होती .आम्हाला बक्षीस म्हणून त्या काळात नऊशे रुपये मिळाले होते.
लेखक आणि सत्या दरोडेखोराची मुख्य भूमिका मी निभावून नेली होती.वयाच्या पंधरा सोळाव्या वर्षी लिहलंले नाटक आणि त्याच नाटकात केलेला मुख्य पात्राचा अभिनय सर्वांना आवडला होता. यानंतर आमच्या गावातील आमच्या पेक्षा लहान असलेली मुलं आमचं हे नाटक एकत्र येऊन कुठेतरी खेळ म्हणून सादर करत असत.हेच आमच्या नाटकाचं यश आम्ही समजत होतो. आपल्याला अभिनय करता येऊ शकतो, लिहता येऊ शकते. हे त्यावेळी समजलं पण काही कारणांमुळे अभिनय आणि लेखन यापासून थोडे दिवस लांबच राहवं लागलं.
आजही त्या जुन्या आठवणी आठवू लागल्यावर मन त्या रम्य दिवसात रमून जाते आणि आपण खूप काही हरवून बसलोय असं वाटत राहतं.आता ते मित्र कधीतरी भेटतात जुन्या आठवणी निघाल्या की मन परत बालपणाची सैर करुन येतं.
@ हिंदुराव गोळे.

0 Comments