Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

मामाच्या गावाला जायचयं म्हणून हट्ट करण्याचं भाग्य काही आमच्या नशीबी नव्हतं | माझा लाडका मामा

माझा आवडता मामा

मामाच्या गावाला जायचयं म्हणून हट्ट करण्याचं भाग्य काही आमच्या नशीबी नव्हतं



        माझं गाव आणि आजोळ हे एकच गाव असल्यामुळे माझ्या मामाचं गाव हे माझचं गाव आहे. लहानपणी सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावाला जायचयं म्हणून हट्ट करण्याचं भाग्य काही आमच्या नशीबी नव्हतं.त्यामुळे शाळेला सुट्ट्या लागल्या तरी आम्ही आपलं  गावातचं.नाही म्हणायला भुंईजला ताईकडं म्हणजे आमच्या मावशीकडे सुट्टीत जायचो.

       आमचं घर आणि मामाचं घर अगदी हाकेच्या अंतरावर आमच्या घराच्या उंबरठ्यात बसलं की मामाचं घर दिसतं इतकं जवळ .

        मी लहानपणी थोडा 'आगाऊ' होतो. घरात कुणाचचं ऐकत नसायचो,दादा,अक्का,अर्चना यांच्याशी भांडत असायचो.दादावर तर मी लहान असून माझीच 'दादागिरी'करायचो.घरातले आणि वाडीतले म्हणायचे केसूबापूच्या लाडामुळे कार्ट बिघडलयं,अति लाड केलाय बापूनी.

        तर केसूबापू म्हणजे माझा दोन नंबरचा मामा.मला पाच मामा आणि एक मावशी.पण माझा लाडाचा आणि हक्काचा मामा म्हणजे केसूमामा! माझ्या आगाऊपणाला पाठीशी घालणारा माझा मामा.

     आमची अक्का आणि दादा मामाला बापूच म्हणत पण मी आणि अर्चना त्यांना मामा म्हणायचो.
केसूमामा पंचक्रोशीत 'बापू' म्हणून प्रसिद्ध होते.

      व्यायामानं कमावलेली दणकट शरीरयष्टी, उंच ,लालबुंदचेहरा आणि अंगकांती ,तरतरीत नाक असलेला  आमचा मामा.पांढरा शुभ्र  सदरा आणि धोतर, पायात चामड्याची चप्पल असा पेहराव असायचा मामाचा.मनानं हळवा आणि विनोदी स्वभाव.कोपरीत कायम पानाची चंची असायची नेहमी तोंडात पान असायचे.

        मामा अहमदाबादला काही वर्षे दादांबरोबर म्हणजे आमच्या मोठ्या मामांबरोबर एका कापडाच्या मिलमध्ये कामाला होता.पण गावाला शेती करायला घरातलं कोण नव्हतं म्हणून मामा नोकरी सोडून गावी राहिला.मामाची बैलं म्हणजे हत्तीच जणू.धिप्पाड, उंच बैलांच्या मागे आमचा धिप्पाड मामा शोभून दिसायचा.उत्तम शेतकरी असलेला मामा गावात प्रसिद्ध होता.
   
       गावचा पुढारी असलेला आमचा मामा प्रत्येकाच्या मदतीसाठी धावून यायचा.एखादं लग्न ठरवताना,लग्नाची सुपारी फोडताना मामाला 'वजन'असायचं.कुणाचा भांडणतंटा मिटवायचा असेल तर मामाला 'पंच' म्हणून बोलवले जायचे.

       आमचे वडील नोकरीला मुंबईला असायचे त्यामुळे आमच्या घरात काय हवं नको त्यासाठी मामा हजर ! आमच्या हक्काचा असा हा मामा!
 
       मी लहान असल्यापासून खालच्या घरीच म्हणजे मामाच्या घरी जास्त असायचो.आंघोळीपासून ते झोपेपर्यंत मामाकडचं.मला आठवतयं मी लहान असताना मामानं आणि आईनं म्हणजे माझ्या मामीनं माझा प्रत्येक लाड पुरवलाय.मामाला तीन मुलं होती माझ्यापेक्षा मोठी आबा,नाना आणि दिलीप दाजी पण ते तीघेही माझा खूप लाड करायचे.
   
     मामा सोमवारी वाईला बाजारासाठी  सायकलवर जायचा.मामाची सायकलवर बसायची ती 'स्टाईल' अजूनही आठवते.येताना बाजारातून मामा आमच्यासाठी खाऊ आणायचा.जिलेबी ठरलेली असायचीच मामालाही जिलेबी खूप आवडायची.मला मामानं दूध आणि चहा पिण्यासाठी एक छोटीशी कपबशी आणली होती.मी मोठा झालो तरी ती कपबशी टिकून होती.

      गावाच्या सुरुवातीलाच पहिलचं घर मामाचं , त्यामुळे कुणीही आला तरी मामाच्या घरात थांबणार मगच पुढे जाणार. मामा पण दारात बसला असला की आग्रहानं गावात येणाऱ्या पाव्हुण्याला चहापाण्यासाठी घरात आग्रहाने बोलवणारच.चहा पिताना गप्पा व्हायच्या, ख्यालीखुशाली विचारली जायची.पान तंबाखू देऊन मगच मामा एखाद्याला जाऊ देत असे.

     मला आठवतयं वेलंगला किंवा एकसरला बैलांचा बाजार असला की बैलगाडीतून मामासोबत बाजाराला जायचो.नवीन बैल खरेदी करायचा असेल तर मामाला व्यवहाराला घेतल्याशिवाय व्यवहार होत नसे.व्यापारी आणि ओळखीचे शेतकरी मामाचा शब्द पाळायचे.
बैलबाजारात मिठाईची दुकानं लागलेली असायची.मामा आम्हाला फरसाण आणि जिलेबी खाऊ घालायचा.दिवसभर बाजारात बैलं बघून आम्ही संध्याकाळी घरी परत यायचो.

           मी सकाळपासून मामाबरोबरच शेतात,औताकडं असायचो.रात्री खळ्यावर मांडवात माचोळीवर मामाच्या पुढ्यात झोपायचो.

         आता मी पाच वर्षांचा झालो होतो,  मला शाळेत टाकलं पण मी काय शाळेत जायला तयार नसायचो.सकाळीच मामा जिथं औत घेऊन असेल तिथं धूम ठोकायचो.मग काय शाळेला सुट्टीच.सगळे म्हणायचे बापूच्या लाडानं पोरगं बिघडलयं हा काय शाळा शिकणार नाही.मग एक दिवस मामाच स्वतः मला घेऊन शाळेत दिवसभर बसला.असं लागोपाठ दोन तीन दिवस तो शाळेत बसायचा.मग मला शाळेची सवय होत गेली. गुरुजींना दम द्यायचो त्यांना म्हणायचो मला छडी मारायची नाही मी केसूबापूचा चेला आहे. मामाला तुमचं नाव सांगेन . पवार गुरुजी हसायचे पण मला कधी त्यांनी शिक्षा केली नाही. मला वाटायचं मामाला घाबरून गुरुजी मला मारत नसावेत.
 
      भात लावणीत मामा भल्लरी छान म्हणायचा."भानू का रुसली समजावितो हरी...किंवा माळ्याच्या मळ्यामंदी पाणी चाललं..." ह्या दोन भल्लऱ्या मामा कायम म्हणायचा.संध्याकाळी चिखलानं भरलेली बैलं ओढ्यात धूऊन घरी आल्यावर मामा परत बैलांना गरम पाण्यानं धुवायचा.वाळकी वैरण आणि पेंढ बैलांना द्यायचा.मला बैलांची हौस मामामुळेच लागली. औतावर असल्यावर बैलांचे कासरे माझ्या हातात द्यावेत म्हणून मामाकडं हट्ट धरायचो पण बैल अवखळ असल्यामुळं आणि काय ते जमणार नसल्यामुळे मामा मला काही औत हाणून द्यायचा नाही.पण बैलगाडी जुंपली की मामा माझ्या हातात कासरे द्यायचा.लई भारी वाटायचं मज्जा यायची.बैलांना पाण्यावर घेऊन जाताना दोन्ही बैलांच्या मध्ये मामासोबत एका बैलाचा कासरा धरुन मी असायचो.

     मोठा होत गेलो.शाळेला मुंबईला गेलो.पण मला मामा,मामाची बैलं यांची सारखी आठवण व्हायची.घरी पत्र पाठवलं की मामाच्या बैलांची चौकशी करायचो.सुट्टीत आलो की मामाला सोडायचो नाही.

      मामाचं वय वाढलं मामा आजारी पडला.ऐवढा दणकट माणूस पण दवाखान्यात जायला घाबरायचा मामा.मेंदूत कसली गाठ फुटली आणि मामा आजारी झाला.औषधोपचारानंतर काहीसा बरा झाला. हातात काठी घेऊन चालू फिरु लागला.

      माझं लग्न झाले. पण माझ्या लग्नात लिंबू धरायला माझा लाडका मामा आजारी असल्याने येऊ शकला नाही. मला खूप वाईट वाटतं होतं.लग्नाच्या पूजे दिवशी मामाला जेवायला घरी घेऊन आलो.उभयतांनी मामाच्या पायांवर डोकं ठेवून त्याचा आशिर्वाद घेतला.मामाला जेऊ घातलं.मामा त्यादिवशी खूप रडला मी पण मामाच्या गळ्यात पडून रडलो.करारी स्वभाव काहीही करण्याची धमक,लाथ मारेल तिथं पाणी काढण्याची धमक असलेला माझा मामा वयामानाने आणि आजारपणामुळे थकला होता.
   
    माझ्या लग्नानंतर पाच सहा महिन्यांत मामा आम्हाला कायमचा सोडून गेला.मामाच्या आठवणींनी खूप रडलो.मामा अजून काही दिवस आपल्या सोबत हवा होता असं वाटायचं.

        मी नंतर कीर्तन करु लागलो .माझं पहिलं कीर्तन आमच्या वाडीत झालं तेव्हा मामाची खूप आठवण होत होती.समोरच्या लोकांमध्ये जणू मामा बसून मला ऐकत असावा असं वाटत होतं.लहानपणी मामाच्या अतिलाडांमुळे बिघडलेला त्यांचा भाचा कीर्तन करतोय हे बघताना मामाला कोण आनंद झाला असता.पण ते माझ्या नशीबी नव्हतं.



     


ज्याच्या अंगाखांद्यावर खेळत ,घासातला घास खात मोठा झालो माझ्या चुकांवर पांघरूण घालून मला पोटाशी धरणारा माझा मामा मला नेहमी आठवतो.आजही हे लिहीत असताना मामाच्या आठवणींनी डोळ्यातून पाणी वाहतयं.

      खरचं मामानं खूप जीव लावला आम्हा भाच्यांवर माझ्यावर तर विशेषच.आजही मामाची आठवण होत नाही असा दिवस जात नाही.

   माझ्या मामाच्या आठवणी खूप आहेत. त्याचा तो विनोदी स्वभाव, कुणालाही आपला वाटावा असं त्याचं बोलणं,एखाद्याच्या मदतीला धावून जाण्याची त्याची सवय.सारं  सारं आठवलं की असं वाटतं पुन्हा लहान व्हावं आणि मामाच्या अंगाखांद्यावर बागडत राहवं.

      माझ्या आठवणींच्या पोतडीची गाठ सोडून एक एक आठवण तुमच्या समोर मांडत आहे. माझी आठवण कशी वाटली ते जरूर सांगा.तुमच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत कायम असेन.अशीच एखादी आठवण सांगायला पुन्हा तुमच्या भेटीसाठी येईन तोपर्यंत रामराम.काळजी घ्या.धन्यवाद.

@ हिंदुराव गोळे

🍁🍁🍁🍁🍁

Post a Comment

0 Comments