तानाजी मालुसरे यांचा पोवाडा
नमन माझे शंभूमहादेवाला
पंढरीच्या पांडूरंगाला
तुळजापूरच्या भवानीमातेला
अभेपूरीच्या भैरीनाथाला
रायगडीच्या श्री शिवाजीराजाला
तानाजी मालुसरेच्या गातो पराक्रमाला ...जी...जी...जी...
महाराष्ट्र रत्नांची खाण
साधूसंत गुणीजन
पराक्रमी बघा तो सुभेदार...
धन्य धन्य तानाजी वीर
पराक्रमी शोभे नरवीर
वीर मराठा असा झुंझार
स्वामी कार्याशी जो तत्पर
झुंजात नरकेसरी हा उग्र
असा शोभला हा नरव्याघ्र
जी...जी..जी..
लग्नाचं आवतान देण्या राजाला
ताना निघाला संगे घेऊन मामाला
लवून मुजरा राजगडी केला राजाला
लग्नाचा विडा त्यानं राजाला दिला
राजाचा चेहरा पडलेला
विचारलं काय झाल्या प्रकाराला
कोंढाणा किल्ला घेण्याला
ठरवलं आहे मनसुब्याला
नाही येऊ शकत लग्नाला..
जी...जी...जी...
आम्ही असता राजानं जावं
आम्ही वरबाप म्हणून कसं मिरवावं
रायबाच्या सोडून लग्नाला
तानाजीनं धाव घेतली गडाला
शेलारमामा,सूर्याजीबंधू सोबतीला...
जी...जी..जी...
उदयभान आला समोर
युद्ध जाहले बघा घनघोर
सपासप पडती तलवारीचे वार
कोण घेईना बघा माघार
वारावर झेलती बघा वार...
जी...जी...जी...
मर्दाची तुटली बघा ढाल
बांधून शेला हाताला केली त्यानं ढाल
झेलितो वार बघा शेल्यावर
रक्तानं झालं शरीर लालेलाल
जो तो पाहतोय तानाजीची कमाल
मागे हटना वीर झुंझार ..
जी..जी..जी..
उदयभानाच्या वर्मी वाराला
तानाजी धारातीर्थी कोसळला
शेलारमामा धावून सामोरी आला
सूर्याजी पुढं सरसावला
कोंढाणा किल्ला घेण्याला..
कोंढाणा फत्ते जाहला
भगवा आसमानी डोलला
गड बघा कोंढाणा तो आला
पण पराक्रमी सिंह सोडून गेला
झुंझार तानाजी वीर शोभला.. जी..जी..जी...
तानाजीच्या पराक्रमाला
सिंहगड नाव ठेवलं गडाला
राजांचा मनाचा बांध फुटला
ढसढसा रडला राजा समयाला
असा मर्द मराठा मावळा
नरव्याघ्र तानाजी आदर्श ज्याला
पराक्रमाची गाथा गाण्याला
भाग्यं लागत नशीबाला...
तानाजीचा पोवाडा गायला
जीव धन्य बघा जाहला
वंदन त्या पराक्रमाला
नरवीर तानाजी मालुसरेला...जी...जी..जी...
@ हिंदुराव गोळे
अध्यक्ष:- सरनौबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य.
🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
🍁🍁🍁🍁🍁🍁


0 Comments