परवड
रिकामी झालेली भाजीची पाटी सायकलच्या कँरिअरला बांधत असताना बारकूच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. आज तो मंडईत भाजी विकायला बसला होता.एकतर भाजी णविकून चार पैसे मिळतील आणि आज पाचवडचा व्यापारी भैय्या शिंदे त्याला पैसे देणार होता.आजचा वायदा भैय्यानं केला होता.चार महिने होऊन गेले होते, बारकूचा बैल भैय्या घेऊन गेला होता.हजार दोन हजाराचा इसार त्यानं बारकूला दिला होता.राहिलेले पैसे अजूनही भैय्यानं दिले नव्हते. आज मंडईत येऊन पैसे देतो असं भैय्यानं बारकूला सांगितलं होतं.पैसे मिळतील म्हणून बारकू मंडईला आला होता.रिकामं बसण्यापेक्षा शेतातील मेथीची भाजी चांगली फुटली होती.ती एका पाटीत भरून सायकलनं बारकू मंडईला आला आणि भाजी विकायला बसला होता.पण पाच सहा पेंड्या विकल्या नसतील तोच जगू सावकार मंडईत आला.त्यानं लांबूनच बारकूला भाजी विकताना पाहिला जवळ आला आणि बारकूला रागातच विचारु लागला,"माझं पैसे कधी देणार आहे ? दोन वर्षे झाली तरी मुद्दल तर सोडा पण व्याजाची फुटकी कवडी पण आजवर दिली नाही. मला माझे पैसे पाहिजेत."
त्यावर दोन्ही हात जोडत बारकू म्हणाला,"जी सरकार आज उद्या नक्की आणून देतो, भैय्या आज मला बैलाचं पैस़ देणार हाय,त्यो आज यीलच पैसं घिऊन त्यानं दिलं की हातोहात तुम्हासनी देतो बघा." सावकार रागात होता तो रागातच बारकूला म्हणाला,"अरं दोन वर्षे झाले तू पैसे देतोयस आजपर्यंत दिले नाही आणि आज कुठून देणार आहेस."? बारकू सांगत होता ,"नाय जी तसं नाय व्हणार, आजच्याला नक्की समंदं पैसे देतो बघा.लई झालं तर उद्या हा वकुत टळून देत नाय जी." पण सावकार काही ऐकायला तयार नव्हता, त्यानं रागातच बारकूची भाजीची पाटी उचलली शेजारच्या भाजीवाल्याकडून ठिकं घेतलं आणि ती भाजी ठिक्यात भरुन सावकार निघून गेला.
बारकूच्या जीवाची तडफड होत होती.भैय्या अजूनही मंडईत आला नव्हता.भाजी विकून चार पैसे मिळतील , तेवढ्याचा बाजार घराकडं घेऊन जाता येईल.असं सगळं बारकूच ठरलं होतं.पण त्या सगळ्यावर सावकारानं पाणी टाकलं होतं.बारकू रिकामी पाटी सायकलला बांधत होता डोळ्यातून पाणी येत होतं.मनात परिस्थितीशी लढण्याचं बळ एकवटत होता.बारकू सायकलवर पाटी बांधून मंडईतून इकडे तिकडे फिरत होता.तो भैय्याचा शोध घेत होता.कुठतरी भैय्या दिसेल असं त्याला वाटत होतं पण भैय्या कुठेच दिसला नाही. बराच वेळ झाला होता बारकू घरी निघून आला.रिकामी पाटी आणि रिकामा खिसा पण मनात नाना विचार भरले होते. बारकूनं सायकल अंगणात लावली आणि घरात आला.बायकोनं पाण्याचा तांब्या बारकूला दिला.त्याचा चेहरा बघून काळजीनं तीनं विचारलं,"आला व्हता का भैय्या. दिलं का पैसं "? यावर बारकूनं घडलेली सारी हकीकत बायकोला सांगितली. तीला खूप वाईट वाटलं पण बारकूला आधार देत ती म्हणाली ,"नगा काळजी करु,व्हईल संमदं ठीक,त्या पांडूरंगाला आपली काळजी हाय,त्यो करल सगळं बयाजवार." तीनं तोपर्यंत चहा टाकला होता बारकूला चहा देत ती म्हणाली " च्या घ्या,डोकसं शांत ठिवा बघू.नका काळजी करु." बारकूची थोरली मुलगी हौसाचं लग्न दोन वर्षांपूर्वी झालं होतं.नात्यातल्याच एका जवळच्या पाहुण्यांच्या मुलाशी हौसाचं लग्न झालं होतं.मुलाकडच्यांनी कशाचीही अपेक्षा केली नव्हती. पण बारकूला वाटत होतं एकलुती एक पोरगी मोकळ्या हातानं कशी पाठवायची.त्यानं लेकीसाठी संसारोपयोगी भांडी आणि एक एक ते दीड तोळ्याचा सोन्याचा दागिना बनवला होता.पण तितकाही खर्च करण्यासाठी बारकूकडं पैसा नव्हता.तेव्हा जगू सावकाराकडून त्यानं काही पैसे व्याजानं घेतले होते. बायकोनं शेरडं करडं,कोंबडं अंडी विकून साठवलेले पैसे बारकूला दिले होते पण तेवढ्यात खर्च भागत नव्हता.म्हणून सावकाराकडून व्याजानं पैसे घ्यायचे असं दोघा नवराबायकोनं ठरवलं.
पण दोन वर्षे होऊन गेले तरी सावकाराला आजतागायत व्याजही दिलं नव्हते. सावकारानं तगादा लावला होता.आज उद्या करत करत बारकू वेळ मारुन नेत होता.पण आता सावकार चिडला होता.
सावकाराचं देणं दिलं जावं म्हणून बारकूनं एक बैल विकायचा ठरवलं.पाचवडचा व्यापारी भैय्या बारकूकडं आला.बैलाचा सौदा झाला बारकूच्या हातात दीड दोन हजाराचा इसार देत भैय्यानं आठ दिवसात उरलेले पैसे देतो म्हणून सांगितले आणि बैलाला कासरा लावला.
पण चार महिने झाले तरी भैय्या पैसे द्यायचं नाव घेत नव्हता.सावकार तर ऐकून घ्यायला तयार नव्हता.मोठा बिकट प्रसंग ओढवला होता.बारकू विचार करुन करुन हैराण झाला होता.
तशी बारकूला वाडवडिलांकडून आलेली शेती फारच कमी होती.दोन एकर शेती होती बारकूची.त्यातही एकरभर कोरडवाहू शेती. मग उरलेल्या एकरभरात बारकू आणि त्याची बायको तरकारी करायचे. घरात चार माणसं हे दोघे नवराबायको मोठी मुलगी हौसा आणि धाकटा गणा असं बारकूचं कुटुंब होतं.हातावरच पोट कष्ट करुन शेत पिकवायचं आलेलं पीक बाजारात विकायच आणि जमलेल्या पैश्यात घर चालवायचं.
बारकूची बायको मेहनती होती.ती बारकूच्या फाटक्या संसाराला ठिगळं लावण्याची पराकाष्ठा करत होती.शेरडं बकरं सांभाळून चार पैसे जमा करत होती.खुराड्यात बऱ्याच कोंबड्या होत्या ती अंडी विकायची चार पैसे मिळायचे. कधी दुसऱ्याच्या मळ्यात रोजंदारीवर कामाला जायची. बारकूला संसारात धीर देत होती.
हौसाचं लग्न ठरलं.मुलाकडच्यांनी काही मागितलं नव्हतं पण बारकूच्या बायकोनंच उचल खाल्ली आणि बारकूला भांडी आणि दागिना घ्यायला लावलं. मोकळ्या हातानं पोरीला कसं पाठवायचं ,आईचं काळीज गप्प राहत नव्हतं.केला खर्च त्यासाठी सावकाराचं कर्ज घेतलं.आता दोन वर्षे झाली. पोरगी तिकडं सासरी आनंदात होती. त्याचं समाधान दोघांनाही होतं पण ह्याची फरफट सुरू होती.
चार महिन्यापूर्वी भैय्यानं बैल विकत घेतला होता.पण बारकूला अजून पैसे मिळाले नव्हते. बर बैल परत आणावा तर भैय्यानं तो लगेच पुढच्याच बाजारात विकून टाकला होता.आता करायचं तरी काय असा प्रश्न बारकूला पडला होता.सावकाराच्या पैशानं बारकूची झोप उडाली होती.भैय्या काही पैसे देत नव्हता. सावकार आता थांबायला तयार नव्हता.
आणि बारकूनं ठरवलं कोरडवाहू एकरभर शेताचा अर्धा एकरचा तुकडा विकून टाकावा.जे पैसे येतील त्यातून सावकाराचं देणं भागवून उरलेलं बँकेत ठेवायचे असं मनाशी ठरवत बारकू झोपी गेला.
शेत विकायचा निर्णय बायकोला कसा सांगायचा याच विचारात बारकू होता. त्याला माहित होतं काही झालं तरी ती शेत विकायला तयार होणार नाही.
रात्री जेवताना बारकू बायकोला आपल्या मनातील विचार सांगू लागला.तशी ती रागानचं बारकूला म्हणाली,"आवं ती काळी आई हाय आपली आणि तीचा असा सौदा करताय व्हय.काय अक्कलबिक्कल हाय का नाय तुम्हाला.मी काय बी झालं तरी शेत विकून द्यायची नाय. नाय म्हंजी नाय." तीचा अवतार बघून बारकू पेचात पडला त्याला हेच अपेक्षित होतं.
बारकूला तरी का शेत विकावं असं वाटत होतं का.पण परिस्थितीनं हतबल झालेला तो या निर्णयावर आला होता.
सावकार काही केल्या गप्प बसणार नव्हता. भैय्या कुठं लंपास झाला होता कुणास ठाऊक.आता तर सावकारानं घरी माणसं पाठवली होती. बारकूच्या जीवाची घालमेल होत होती.बारकूचं कशातच मन लागत नव्हतं.
आजवर कितीही नाजूक परिस्थिती असली आणि काहीही बाका प्रसंग आला तरी बारकूनं कधी कुणाकडं पैशासाठी हात पसरला नव्हता. गरीबीशी लढत बारकू आणि त्याची बायको दोन मुलांसह संसार करत आले होते.पै पै जमवून काटकसरीने दिवस ढकलत होते. पण आहे त्यात समाधानी होते.
बारकूची बायको पार्वती पण बारकूला जमेल तशी हातभार लावत होती.शेरडं करडं विकलं कधी कोंबडा विकला तरी ती ते पैसे साठवत होती.कधी स्वतःची हौसमौज केली नाही.
त्यांची पोरंही समजूतदार होती.आपल्या घरच्या परिस्थितीची जाणीव त्यांना होती.कसलाही हट्ट नसायचा त्यांचा.उलट सुट्टी दिवशी ते दोघांना शेतात मदत करायचे. गुणी पोरं होती.
पोरीच्या लग्नात खर्च केला आणि बारकूवर हे दिवस आले. आताशा बारकू स्वतःच्याच विचारात गुरफटलेला असायचा.जेवणही धड करत नव्हता. पार्वतीला बारकूची ही लक्षणं बरी दिसत नव्हती. बारकूनं जर आत्महत्या वगैरे करायचा निर्णय घेतला तर खूप बिकट परिस्थिती येईल. तीलाही आता काळजीनं झोप लागत नव्हती.तीनं काळजावर दगड ठेवून बारकूला शेत विकायला परवानगी दिली.
अर्धा एकर शेत विकलं.बऱ्यापैकी पैसा आला सावकाराचं देणं भागवलं.काही पैसे बारकूनं धाकट्या बहिणीला दिले. राहिलेले बँकेत ठेवले.
पण शेत विकावं लागलं याची खंत कायम बारकूच्या मनात होती.भैय्यानं त्याला फसवलं होतं. सावकारानं डोकं खाल्लं होतं.नाइलाजाने बारकूनं वडिलोपार्जित शेतातील अर्धा एकर शेत विकलं होतं.
परिस्थिती माणसाला नको असलेले निर्णय घ्यायला भाग पाडते. आयुष्याची लढाई लढत असताना असे काही निर्णय मनाला पटत नसले तरी घ्यावेच लागतात.यात एक जमेची बाजू म्हणजे बारकूला त्याच्या बायकोची पार्वतीची खंबीर साथ होती.
ही कथा तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा.अशीच एखादी कथा किंवा आठवण घेऊन पुन्हा येईन. तोपर्यंत काळजी घ्या.
रामराम.
अशाच काही कथा, लेख,आठवणी, कविता, पोवाडे वाचण्यासाठी आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या. खालील लिंकवर जाऊन ब्लॉग पहा.
https://hinduraogole.blogspot.com/
© हिंदुराव गोळे
🙏🏻🍁🙏🏻🍁🙏🏻🍁🙏🏻🍁

0 Comments