Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

लढत

लढत
 

                               वस्ताद हिम्मतला कानमंत्र देत होते. हिम्मत सर्वांगाचं कान करुन वस्तादांच्या बोलण्याकडं ध्यान देऊन एकाग्र चित्तानं ऐकत होता.वस्ताद बारकावे सांगत होते. शह - प्रतिशह , डाव - प्रतिडाव यांवर वस्ताद भीमाआण्णा हिम्मतला समजावत होते. कारणही तसंच महत्त्वाचं आणि सर्वांच्या भावनांनाच हात घालणारं होतं.आखाड्यातील इतर पैलवान रोजचा सराव करून हिम्मतच्या बाजूला बसून वस्ताद भीमाआण्णा काय सांगताहेत याकडे लक्ष देऊन ऐकत होते. उद्या अभेपूरीच्या फडात हिम्मतची आणि पैलवान रावसाहबची तिसऱ्या वर्षाची निर्णायक अंतिम लढत होणार होती.विजेत्या मल्लास ढाल आणि मानाची चांदीची गदा तसेच  रुपये २५,००० रोख इनाम बक्षीस म्हणून मिळणार होतं.त्यामुळे उद्याच्या हिम्मतच्या कुस्तीकडं सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं.उद्या काय होणार याची उत्सुकता लागली होती.काळभैरवनाथ कुणाच्या पदरात विजयी माळ घालणार याची उत्कंठा शिगेला पोहचली होती.
                  तीन वर्षांपूर्वी हिम्मतची आणि कोल्हापूरच्या नावाजलेल्या तालमीत कुस्तीचा सराव करत असलेल्या बाजूच्या फलटण तालुक्यातील नामांकित पैलवान रावसाहब याची अभेपूरीच्या जत्रेच्या फडात ढाल,चांदीची गदा आणि रोख इनामावर कुस्ती ठरली होती. पण अट अशी होती की,सलग तीन वर्षे दोन्ही पैलवानांची कुस्ती फडात होईल आणि जो दोनवेळा जिंकणार तो विजेता म्हणून इनामाचा मानकरी ठरणार होता.
                                   हिम्मत उंचपूरा आणि व्यायामानं आणि कुस्तीच्या सरावानं घडीव रेखीव शरीरसंपदा लाभलेला बिजली मल्ल.आपल्या पैलवान मामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कुस्तीविद्या आत्मसात करत होता.हिम्मचा मामा एकेकाळचा नामांकित मल्ल..गावातल्याच तालमीत वस्ताद भीमाआण्णांकडं कुस्तीचं धडं घेत होता.तर रावसाहब कोल्हापूरच्या तालीम सराव करत होता.अनेक मैदानं गाजवून रावसाहब नामांकित पैलवान म्हणून नावारूपाला आलेला.तीन वर्षांपूर्वी दोघांची कुस्ती अभेपूरीच्या फडावर तीन वर्षांच्या निर्णायक लढतीवर लागली होती. अजूनही चांगलसं आठवतयं तीन वर्षांपूर्वी हिम्मत आणि रावसाहबची कुस्ती अभेपूरीच्या फडात लागली होती.दोघांच्या कुस्तीनं फडाचा मोड होणार होता.वस्तादांनी कुस्ती पुकारली लागलेलं इनाम सांगितलं त्यासोबतच कुस्ती सलग तीन वर्षे होईल.निर्णायक लढतीत विजेता पैलवान ढाल,गदा आणि रोख इनामाचा मानकरी होईल हे सर्व सांगून कुस्तीला सुरुवात झाली. दोघांनीही सलामी दिली शड्डू ठोकला आणि खेळाला सुरुवात झाली. थोडावेळ खडाखडी कुस्ती चालू होती.एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेण्यात काही काळ गेला.आणि पापणी लवण्याच्या आत हिम्मत रावसाहबच्या एका बगलतनं बाहेर येत उजव्या पायानं रावसाहबच्या डाव्या पायावर टांग लावून रावसाहबला चितपट केलं.सगळ्यांनी शिट्ट्या आणि टाळ्या वाजवून हिम्मतचं अभिनंदन केलं.तालमीतल्या पोरांनी हिम्मतला खांद्यावर घेऊन सगळ्या फडातनं फिरवला.अनेकांनी हिम्मतच्या हातात पैसे ठेवले.बरंच बक्षीस मिळालं.फड मोडला.आता सर्वांना उत्सुकता होती पुढच्या वर्षी काय होईल याची.
                               दुसऱ्या वर्षी अभेपूरीच्या फडात परत हिम्मत आणि रावसाहबची लढत सुरू झाली. पण ह्या वेळी ही लढत रावसाहबनं जिंकली. दोघांच्याही पारड्यात समान यश पडलं होतं.आता अंतिम तिसऱ्या वर्षाच्या लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं.अंतिम लढतीत विजयी पैलवान विजयाचा मानकरी होणार होता.आणि यावर्षी ती अंतिम लढत उद्याच होणार होती.
 
 
        भीमाआण्णा वस्ताद हिम्मतला समजावत असताना हिम्मतच्याच पारड्यात यश पडावं असं मनोमन बजरंग बलीला मागणं मागत होते.
 
 
      हिम्मतनं वर्षभर कसून सराव केला होता.व्यायामातही वाढ केली होती. त्याच्या आबांनी हिम्मतच्या खुराकाची पूरेपूर काळजी घेतली होती. अधिक सराव व्हावा म्हणून हिम्मत मधनंअधनं सांगलीच्या तालमीत आठ आठ दिवस सरावासाठी जाऊन येत असे. वर्षभर हिम्मतनं खूप मनापासुन तयारी केली होती.आणि यंदाही पंचक्रोशीतील जत्रांच्या फडावर त्यानं नेत्रदीपक कुस्त्या केल्या होत्या. सर्वांना वाटत होतं यंदा हिम्मत ढाल आणि गदा जिंकणारच.हिम्मतचाही आत्मविश्वास वाढला होता.वर्षभर सतत दोन तीन तास तो आखाड्यात घाम गाळत होता.भीमाआण्णा वस्ताद काय बारकावे सांगताहेत ते आत्मसात करत होता.पहाटे मैदानावर जाऊन खडी पी.टी.,शूटआऊट,रनिंग यासोबतच दंड,बैठका, सपाटे,दोर चढणे,आखाडा फावड्यानं दोन दोन वेळा खोदत होता.आखाड्यात सरावासाठी एकामागं एक असा दोघांशी लढत होता.नदीवर रोज पोहायला जात होता.कधी कधी एखाद्या दिवशी दहा दहा किलोमीटर सायकलवर रपेट मारत होता.खुराकही वेळच्या वेळी घेत होता.बाकी मौजमस्ती सोडून जास्तीत जास्त वेळ सरावाकडं देत होता.
                        गावातीलच नाही तर हिम्मतची कुस्ती पाहिलेल्या प्रत्येकालाच या वर्षीच्या हिम्मतच्या अभेपूरीच्या फडातील कुस्तीकडं लक्ष लागलं होतं.हिम्मत वर्षभर घेत असलेली मेहनत करत असलेले कष्ट सर्वजण पाहत होते. सर्वांना वाटतं होतं यंदा हिम्मतच जिंकणार !  हिम्मतच्या घरातही काहीसं असंच वातावरण होतं.हिम्मतच्या आईनं वर्षभर हिम्मतला लागेल ते  दिलं होतं.आबांनीही हिम्मतच्या सरावाकडं जातीनं लक्ष दिलं होतं.त्याचा मोठा भाऊ दादा खास आठ दिवसांची सुट्टी घेऊन मुंबईवरुन गावाला आला होता.हिम्मतच्या कुस्तीकडं सर्वांचचं लक्ष लागलं होतं.जो तो हिम्मतच जिंकावा यासाठी देवाकडं प्रार्थना करत होता.   तसा रावसाहबही एक उत्कृष्ट कुस्तीगीर होता.त्यानंही वर्षभर मेहनत घेतली होती.विजयाची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी त्यानंही वर्षभर रक्ताचं पाणी केलं होतं.जोरदार तयारीनिशी तो ही हिम्मतशी दोन हात करायला आखाड्यात उतरला होता.
 
     जय पराजय हा भाग वेगळा.हिम्मतची आई हिम्मतला नेहमी म्हणायची, "आरं कुस्ती म्हणजी दोन पायाची भित एकीकडनं जोर अधिक लागला की कुणीकडं तरी एकीकडं पडायचीच." 
 
 
    आणि आज तो दिवस उजाडला.आज अभेपूरीच्या यात्रेचा फड होता.दिवसभराचा हिम्मतचा वेळ पाहुण्यांच्या उठबस ,जेवणखाण करण्यात कसा गेला ते कळलं नाही. फडाची वेळ झाली तसा हिम्मत तालमीतल्या पोरांबरोबर फडाकडं गेला.  यंदा फडावर गर्दी दरवर्षी पेक्षा अधिक होती.आखाड्याचं पूजन मान्यवरांच्या हस्ते झालं.नारळ वाढवून पूजा झाली. शिंगांच्या आवाजानं फडावर वीरश्री संचारली. हलगी आणि डफावर थाप पडली.झांजा वाजू लागल्या. वातावरण निर्मिती छान झाली होती.पैलवानांना स्फूरण चढत होतं.दंडाच्या बेडक्या टरटरुन फुगत होत्या. शड्डूच्या आवाजानं फड खणखणत होता.यावर्षी माईकवरुन समालोचन होत होतं.समालोचक आवेशपूर्ण उत्साहवर्धक आवाजात चाललेल्या कुस्तीचं रोमांचकारी वर्णन करत होते.पैलवानांचा उत्साह वाढवत होते. विजयी मल्लासाठी टाळ्या वाजत होत्या. शिट्ट्या वाजत होत्या. बघता बघता लहान मोठ्या कुस्त्या संपल्या.आणि आता हिम्मत आणि रावसाहब यांची फडात कुस्ती होणार होती.दोन्ही पैलवान तयार झाले होते.  माईकवर समालोचक होणाऱ्या कुस्तीची माहिती सांगत होते. दोन वर्षे दोघांनीही एकएकदा समोरच्याला पराभूत केलं होतं.आणि यावर्षी जो विजयी ठरणार होता त्याला ढाल,चांदीची गदा आणि रोख रक्कम इनाम म्हणून मिळणार होतं.
                            समालोचकांनी दोघांच्याही नावाचा पुकारा केला.दोन्ही मल्ल आखाड्यात उतरले. वस्तादांनी दोघांनाही काही सूचना केल्या. खास या कुस्तीसाठी वेळात वेळ काढून तालुक्याचे आमदार काही वेळापूर्वी आले होते. आमदारांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली.आमदारांनी या कुस्तीसाठी वैयक्तिक पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केलं.आणि कुस्तीला सुरुवात झाले.
 
                             सलामी दिली गेली.दोघांनीही शड्डू ठोकले.खडाखडी कुस्ती सुरु झाली. काही वेळा ताकद अजमावण्यात गेला.आणि रावसाहबनं हिम्मतच्या मानेवर असा फटका मारला की हिम्मत खाली पडला. आता रावसाहब हिम्मतला खाली घेऊन कमरेवर एक हात ठेवून दुसऱ्या हातानं हिम्मतचा एक पाय पकडून झोळी बांधण्याचा प्रयत्न करत होता.सगळ्यांचा श्वास रोखला गेला.समालोचक लढतीची रंगत वाढावी म्हणून अलंकारिक भाषेत कुस्तीचं वर्णन करत होते. इतक्यात चित्याच्या चपळतेने हिम्मत रावसाहबच्या मिठीतून जोर लावून उभा राहिला.पुन्हा खडाखडी कुस्ती सूरु झाली. वस्ताद दोन्ही पैलवानांच्या अंगावर माती टाकत होते. घामाघूम शरीरं झाली होती. हलगी वाजत होती.डफावर थाप पडत होती. शिंग वाजत होतं.प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहचली होती. आणि इतक्यात टाळी झाली. हिम्मतनं आपल्या हुकमी डावावर टांग लावून रावसाहबला चीतपट केलं होतं.आख्खा फड उठून टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून हिम्मतचं अभिनंदन करत होता.भीमाआण्णा वस्तादांच्या डोळ्यात आनंदअश्रू तरळत होते. हिम्मतच्या आबांची छाती आनंदानं फुगली.दादा तर हिम्मतकडं पळतच सुटला.तालमील्या पोरांनी हिम्मतला खांद्यावर उचलून घेतलं सगळ्या फडातनं फिरवून आणलं.
                            हिम्मतला आणि रावसाहब दोघांनाही फेटा बांधला गेला.हिम्मतला ढाल,चांदीची गदा आणि रोख इनामी रक्कम आमदारांच्या हस्ते देण्यात आली.रावसाहबनंही चांगली लढत दिली होती त्याचंही कौतुक होत होतं.रावसाहबला पंधरा हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आलं.फड संपल.  तालमीतल्या पोरांनी हिम्मतची मिरवणूक काढली.एका हातात ढाल आणि दुसऱ्या हातानं एका खांद्यावर मिळवलेली चांदीची गदा घेऊन डोक्यावर फेटा असलेला हिम्मत गाडीत रुबाबदार दिसत होता.पोरं गुलाल उधळत होती.हिम्मतचं चौका चौकात औक्षण होत होतं.
                           मिरवणूक हिम्मतच्या वाड्यावर पोहचली. हिम्मतच्या आईनं आणि वहिनींनी हिम्मतचं औक्षण केलं.आईनं भाकरीचा तुकडा आणि भाताचा मुटका हिम्मतवरुन ओवाळून टाकला.भरलेला पाण्याचा तांब्या रिता केला.  सगळ्यांना जणू आनंदाचं भरतं आलं होतं.हिम्मतही मनोमन सर्वांचं आभार मानत होता.हात जोडत होता.
                               अशा प्रकारे सर्वांना लागलेल्या उत्सुकतेचा शेवट असा गोड झाला.परातभर पेढे वाटले गेले. हिम्मतचा विजय म्हणजे आपलाच विजय असा भाव प्रत्येकाच्या मनात होता आणि तसा चेहऱ्यावर दिसतही होता.
वर्षभर हिम्मतनं घेतलेल्या कष्टाचं फळ देवानं हिम्मतच्या पारड्यात टाकलं होतं.पण रावसाहबनंही चांगली टक्कर दिली होती.एका क्षणाला तर तोच जिंकत आला होता पण हिम्मतनं मोठ्या हिमतीनं कौल स्वतः च्या बाजूनं पाडून घेतला होता.

    आपणास ही कथा कशी वाटली ते जरूर कळवा.आपल्या अभिप्रायाची वाट पहात असतो.
   ही आणि अशाच काही आठवणी, कविता, पोवाडे वाचण्यासाठी आपल्या ब्लॉगला भेट द्या. ही विनंती. खाली दिलेल्या लिंकवर जाऊन ब्लॉगला एकदा अवश्य भेट द्या.
 

✍🏻 © हिंदुराव गोळे

 

Post a Comment

0 Comments