एक असामान्य व्यक्तिमत्त्व
वयाच्या नव्वदीतही आवाजात तोच भारदस्तपणा , तल्लख बुद्धी आणि समाजसेवेबद्दल असलेली बांधिलकी मामांच्या भेटीत दिसून आली.
मी बोलत आहे वाई तालुक्याचे वैभव असणारे अस्थि विशारद मा.श्री.मामा वलखाडे यांच्याविषयी. परवा अचानक आमचे मित्र स्वराज अँग्रो टूरिझम चे मालक सचिन पाटील यांच्यासोबत वरखडवाडीत मामांना भेटायला गेलो. निमित्त होतं काय तर मामांना सचिन पाटलांच्या मुलाला स्वराजला एक पेन भेट द्यायचं होतं.मामांनी स्वराजपुढे दोन अठरा कँरेट सोन्याचे पेन ठेवले. त्यातला एक पेन शाईचा होता तर दुसरा बाँलपेन.त्यांनी स्वराजला तुला आवडेल तो एक घे म्हणून सांगितले. क्राँस पेन होते ते.स्वराजनं त्यातला बाँलपेन घेतला.मामांनी बाहेरच्या देशातून आणलेले पेन होते ते.आपल्या मित्राच्या नातवाला ही भेट देण्याची त्यांची इच्छा होती ती पूर्ण झाली.
बोलता बोलता मामांशी अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यांचा व्यवसाय, समाजसेवा,परदेश वाऱ्या,कुस्ती आणि महत्त्वाचे म्हणजे हिंदुहृदयसम्राट स्व.मा.बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेले त्यांचे घरोब्याचे नाते.प्रत्येक विषयावर मामा दिलखुलास बोलत होते. आणि मामांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडत होते.
जगावेगळे व्हायचे असेल तर जगा वेगळे ! याची प्रचिती मामांच्या भेटीत गप्पा मारताना आली.एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा ते जगप्रसिद्ध हाडवैद्य हा मामांचा प्रवास थक्क करणारा आहे.
मुंबईत मामांचे वडील स्व.रावजी वलखाडे हमाली करायचे. पण हमाली करता करता ते हाडवैद्य म्हणूनही प्रसिद्ध होते. चुटकीसरशी लोकांना वेदनामुक्त करण्यात ते हातखंडा होते. मामांना वडिलांकडून हाडवैद्यकीचा वारसा वंशपरंपरागत कलेने मिळाला.
मामाही हाडवैद्य म्हणून मुंबईत समाजसेवक, रुग्णसेवा करु लागले. चांगलं नाव झालं.
एकदा माहिमला व्यायामशाळेत व्यायाम करत असताना त्यांचे एक मित्र मामांना म्हणाले, बाळासाहेबांच्या वडिलांना प्रबोधनकार ठाकरे यांना पाठीत चमक भरली आहे. डॉक्टरांनी खूप उपचार केले पण काही फरक पडत नाही. तुम्ही एकदा बघाल का काय आहे ते.आणि मामा मित्रासोबत दादरला बाळासाहेबांच्या घरी गेले. मामा ही आठवण सांगताना हसून म्हणाले प्रबोधनकार मला पाहून मित्राला म्हणाले मला मारायला राक्षस घेऊन आलाय का? त्यावेळी मामांची शरीरयष्टी व्यायामामुळे धिप्पाड होती.बलदंड शरीराचे उंचपुरे मामा पाहून कोणाला तसं वाटणं साहजिकच होतं असं मामा स्वतः म्हणाले.
थोड्याफार विनंती वरुन प्रबोधनकारांनी मामांना उपचार करण्यासाठी संमती दिली. मामांनी गुडघ्यात हात घालून काही नसा मोकळ्या केल्या. प्रबोधनकारांना त्यापूर्वी खोकला आला तरी प्रचंड वेदना होत असत त्या वेदना पूर्णपणे लगेच बंद झाल्या. त्यांनी मामांचं कौतुक केलं.काही दिवसांच्या उपचारानंतर प्रबोधनकार अगदी ठणठणीत बरे झाले. आणि हे नातं घरोब्याचं झालं.प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना सांगितलं की मामा तुमच्या कामाचा माणूस आहे.त्याला सोडू नका. आणि मग बाळासाहेब आणि मामा यांची मैत्री झाली. बाळासाहेबांनी मामांना शरीरशास्त्र, शरीररचनाशास्त्र यावरील अनेक पुस्तकं भेट दिली. मामांनी ती पुस्तकं चाळून काढली.अभ्यास केला.त्याचा त्यांना त्यांच्या कामात खूप उपयोग झाला. मामा हे सांगताना बाळासाहेबांचे आभार मानायला विसरत नाहीत. बाळासाहेबांमुळेच मी नावा रुपाला आलो त्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर असं मामा सांगत होते.
पुढे बाळासाहेबांनी मामांना त्यांच्या ओळखीच्या मित्रांच्या उपचारासाठी विदेशात पाठवले. मामा आजपर्यंत पाच सहा देशात उपचार करण्यासाठी जाऊन आलेत.त्यात मलेशिया, हाँगकाँग वगैरे असे देश आहेत जिथं मामांचे पेशंट आहेत.
मामांकडे बाळासाहेब पहिल्यांदा जेव्हा आले तेव्हा मामांच्या घराबाहेर चप्पलांचा ढीग लागला होता अनेक पेशंट उपचारासाठी मामांकडे आले होते. जेव्हा बाळासाहेब मामांना भेटले तेव्हा मामांना म्हणाले तुमची सर्वात मोठी संपत्ती काय असेल तर तुमच्या घराबाहेर असलेला त्या चप्पलांचा ढीग.ही खरी संपत्ती आहे ती जपा वाढवा.
आजवर मामांनी ही संपत्ती जपली आहे ती वाढवली आहे.
शिवसेनेच्या स्थापनेपासून मामा बाळासाहेबांच्या सोबत होते. लोकं मामांना बाळासाहेबांचेच मामा म्हणून ओळखत होते. बाळासाहेबांनी मामांच्या उपचार पद्धतीचे पुस्तक छापून ते वितरित केले. त्यामुळे मामांच्या व्यवसायाला भरभराटी आली.तरीही मामा त्याकडे व्यवसाय म्हणून कधी पाहत नव्हते. समाजसेवा म्हणूनच ते लोकांची सेवा आजही करत आहेत. कधी एखाद्याकडे पैसे नसतील तर पेशांअभावी मामांनी त्याचे उपचार थांबवले नाहीत.
मामा बोलताना अनेकदा म्हणत होते. माझ्या यशात माझ्या आईवडिलांचा आशिर्वाद त्यांची पुण्याई आणि बाळासाहेबांनी केलेली मदत यांवर मी इथंवर पोहचलो. आपल्यावर केलेल्या उपकाराबद्दल पराकोटीची कृतज्ञता मामांच्या बोलण्यातून दिसत होती.कदाचित याच जोरावर मामांना हे यश मिळालं असेल आणि ते यश अबाधित राहिलं असावं.खूप वेळा त्यांनी आईवडील आणि बाळासाहेब यांचं आभार मानलं.कितीहा मनाचा मोठेपणा !
मामांनी काही दिवस म्हणजे दोन महिने रेल्वेत नोकरीही केली. पण त्यांनी रेल्वेत काम केलं नाही. पांडेसाहेब स्वतः घरी येऊन मामांना दोन महीने पगार देत होते.
पांडेसाहेब हे रेल्वेतील एक उच्चपदस्थ अधिकारी होते. मामांची आणि त्यांची मैत्री. एकदा विष्णू सावर्डेकरांची कुस्ती बघायला मामा पांडेसाहेबांना घेऊन गेले. तीन तास चाललेली कुस्ती पाहून पांडेसाहेब थक्क झाले. त्यांनी मामांना सांगितले आपण रेल्वेची तालीम काढू अनेक मल्लांना कुस्ती खेळाडू म्हणून रेल्वेत नोकरी देऊ आणि त्यातून मांटूगा वर्कशॉपच्या बाजूला लालबहाद्दुर शास्त्री व्यायामशाळा तयार झाली. अनेक मल्ल या आखाड्यात सराव करु लागले. अनेकांना रेल्वेत नोकरी लागली. या तालमीतून अनेक आंतरराष्ट्रीय ,राष्ट्रीय खेळाडू घडले.पाच सहा पैलवान महाराष्ट्र केसरी झाले. आजही ही परंपरा कायम आहे.
मामा जरी मुंबईत असले तरी त्यांना गावची ओढ होती. व्यवसायामुळे अनेक राजकीय नेत्यांशी मामांची ओळख झाली. मामांनी १९६५ साली वरखडवाडीत वीज कनेक्शन आणले. धोम धरणात धोम गावचे पुर्नवसन वरखडवाडीच्या शेतात होणार होते. बरीचशी पिकाऊ शेती जात होती. मामांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांशी बोलून वरखडवाडीत धोम गावचं होणारं पुर्नवसन दुसरीकडे करायला लावले.
शेतीसाठी कायम स्वरुपी पाणी मिळावं म्हणून पाणीपुरवठा योजना आखली. पण काही कारणाने ती पूर्णत्वास गेली नाही.
भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. मुकाई देवीला चांदीचा वज्रलेप केला.अशी बरीच गावच्या विकासाची कामं मामांनी आजवर केली. पण त्याचं श्रेय मामा कधी घेत नाहीत.
मामांना कुस्तीची फार आवड.वरखडवाडीच्याच नाहीतर कुठल्याही गावच्या जत्रेच्या फडात मामा पैलवानांना बक्षीसांची उधळण करतात.विजयी पैलवानाबरोबरच पराभव झालेल्या पैलवानालाही मामा बक्षीस देतात. कुलदैवत चवणेश्वराच्या यात्रे निमित्त मामा वरखडवाडीत स्वतंत्र आखाडा भरवत होते.
मामा सांगत होते. म्हणाले माझे वडील सांगायचे लोकांना मदतच करायची असेल तर एखाद्या गावात मंदिर बांधत असतील तर त्या गावात देवांच्या मूर्त्या भेट दे.आजवर मामांनी बऱ्याच गावातील मंदिरात देवांच्या मूर्त्या दिलेल्या आहेत.छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अनेक मूर्त्या मामांनी भेट दिलेल्या आहेत. मामा म्हणतात लोकांच्या भावनेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. परमेश्वर मला देतोय मी परतफेड करण्याचा प्रयत्न करतोय.
आजवर मामांनी अनेक प्रसिद्ध अभिनेते,खेळाडू, राजकीय नेते यांच्यावर उपचार केले आहेत. त्यामध्ये माजी राष्ट्रपती श्री. शंकरदयाळ शर्मा,माजी पंतप्रधान इंदिरा गांधी,माजी पंतप्रधान अटलजी ,सचिन तेंडुलकर ही व अशी बरीच मंडळी मामांच्या उपचाराने बरी झाली आहेत.
मामांचा 'वलखाडे लेप आणि तेल' जगप्रसिद्ध आहे.
मामांनी समाजसेवेचा हा वसा कायम सेवाभावानं जोपासला.देश विदेशात मामांचं नाव झालं.अनेक सन्मान ,पुरस्कार मिळाले. पण याचा गर्व कधी झाला नाही.
मामांना सध्याच्या कुस्ती खेळाबद्दल खंत वाटते. ते म्हणाले पूर्वी आमच्या वाडीत पाच पन्नास पोरं आखाड्यात घाम गाळत होती.कुस्तीचा सराव करत होती पण आता संख्या फार कमी झाली आहे. शरीरसंपदा हे फार मोठं धन आहे. ती शरीरसंपदा आणि आरोग्य जतन केलं पाहिजे.
बाळासाहेबांनी काही काळासाठी राजकीय सन्यास घेतला होता. तेव्हा बाळासाहेबांची मनधरणी करून त्यांना विनंती करून मामांनी पुन्हा सक्रिय राजकारणात आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. हे कोणाला माहीत नसेल.
मामांचा वारसा त्यांची दोन्हीही मुलं निष्ठेने जपत आहेत. पुढे चालवत आहेत. दोघेही अगदी विदेशातही उपचारासाठी जात असतात.
मामा आता वयोपरत्वे शरीरानं थकले आहेत पण मनानं नाही. वरखडवाडी रावजी पर्णकुटीत मामा सध्या वास्तव्यास आहेत. आजही फक्त मामांकडूनच उपचार घ्यायचा आहे म्हणून पुणे, मुंबईच नाही तर इतर राज्यातून पेशंट खास मामांकडे वरखडवाडीला येतात.
मामांशी गप्पा मारतच राहवं असं वाटतं होतं.पण त्यांच्या जेवणाची वेळ होऊन गेलेली.आम्ही मामांचा आशिर्वाद घेऊन निघालो. जाताजाता मामांना म्हटलं मामा,मी पण हाडवैद्याचं काम करत आहे.तुमचा आशिर्वाद असू द्या. चांगलं आहे, मामा म्हणाले. आणि आम्ही मामांची रजा घेतली.
वाईचा नावलौकिक सध्याच्या काळात सातासमुद्रापार गाजवणाऱ्या व्यक्तींमध्ये शाहीर साबळे, उद्योजक बी.जी.शिर्के यांच्यासोबत मामा वलखाडे हे ही नाव नक्कीच घेतले जाईल.
आज मामांनी वलखाडे किंवा वरखडे या नावाला वलयांकित केलं आहे मामांकडून प्रेरणा घेऊन वरखडवाडीतील अनेकजण हाडवैद्य म्हणून कार्यरत आहेत.
इतका मोठा माणूस कतृत्वाने यश मिळवून नावारूपाला आलेला पण कसलाही अभिमान, गर्व,ताठा मामांच्या वागण्या बोलण्यात किंचितही दिसला नाही.
एका आदर्श व्यक्तिमत्वाची भेट आणि त्यांच्या अनुभवांची, विचारांची शिदोरी आज मला मिळाली होती.पुन्हा भेटीचा शब्द देऊन मामांचं घर सोडलं.सोबत बरचं काही घेऊन बाहेर पडत होतो.
मामांना उत्तम आरोग्य लाभो ही परमेश्वराकडे प्रार्थना.
© हिंदुराव गोळे.
असेच काही लेख , कविता, पोवाडे तसेच माझ्या साठवणीतील आठवणी वाचण्यासाठी कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

0 Comments