Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

आमचा आधारवड आमचे मामा

आमचे आधारवड-आमचे मामा
 

                     आमच्या कुटुंबाचे कुटुंबप्रमुख आम्हा सर्वांचे आधारवड म्हणजे माझे मामा.मला माझी ओळख महाराष्ट्र केसरी पैलवान श्री शिवाजीराव पाचपुते यांचा भाचा अशी सांगताना अभिमान वाटतो असे माझे मामा.        एका ध्येयानं प्रेरित होऊन सातत्याने ते ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करुन ते ध्येय प्राप्त करणे याचे उत्तम उदाहरण म्हणजे माझे मामा महाराष्ट्र केसरी पै.शिवाजीराव पाचपुते.  छोट्याशा वाडीवस्तीतील लाल मातीच्या आखाड्यात आपल्या कुस्ती क्षेत्राची सुरुवात करुन पुढे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून आपल्या खेळाची चमक दाखवून क्रीडा क्षेत्रातील अनेक पुरस्कार प्राप्त करणारे असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणजे माझे मामा.
                         मामांच्या कुस्तीची सुरुवात लहानपणी पाचपुतेवाडीसारख्या छोट्याशा गावातून झाली. लहानपणी पंचक्रोशीतील गावातील यात्रेतून कुस्तीच्या फडात आपली खेळातील चमक दाखवणारे मामा पुढे महाराष्ट्रातील एक नामवंत मल्ल म्हणून स्वतःची ओळख तयार करु शकले ते जिद्द आणि चिकाटी तसेच मेहनतीच्या जोरावर. तसं पाहिलं गेलं तर कुस्ती खेळासाठी ,खुराकासाठी खूप खर्च येतो. एका गरीब कुटुंबातील माझे मामा पण आमच्या मोठ्या मामांनी ,सुभेदार दादांनी मामांची खेळातील गती आणि आवड बघून त्यांना मुंबईला लालबहाद्दुर शास्त्री व्यायाम शाळेत घेऊन गेले. दादा एका कापड गिरणीत कामाला होते.
 
      घरची परिस्थिती गरीबीची होती.मामांचे आई आणि वडील दोघेही हयात नव्हते. कुटुंब मोठं होतं अशावेळी कुस्ती खेळासाठी लागणारा खर्च परवडणारा नव्हता. पण आमच्या मोठ्या मामांनी ही जबाबदारी घेतली. आणि मामांना मुंबईला घेऊन आले.
 
      
                                    लालबहाद्दुर शास्त्री व्यायामशाळेत महाराष्ट्रातील नामांकित मल्ल आपला कुस्तीचा सराव करायचे.तिथे सेंट्रल रेल्वेचे मल्ल सराव करायचे. पांडेसाहेब सर्व व्यवस्था पाहयचे.शिवछत्रपती पुरस्कार विजेते नामांकित पैलवान श्री शिवाजीराव म्हस्के एक आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक कुस्तीचे धडे द्यायचे.अनेक नामांकित मल्ल होते. त्याकाळी कुस्तीक्षेत्रात आपल्या खेळाने दबदबा निर्माण केलेले अनेक पैलवान लालबहाद्दुर शास्त्री व्यायामशाळेत घाम गाळत होते. त्यामध्ये पै.शिवाजीराव म्हस्के,पै.मदार नदाफ,पै.रंगा चव्हाण, पै.बापू लोखंडे, पै.संपत साळुंखे, हे आणि असे बरेच पैलवान तिथं होते. मामाही आता तिथं आपल्या खेळाचा सराव करु लागले.
 मामांची कुस्तीची आवड आणि खेळातील गती पाहून पांडे साहेबांनी मामांना सेंट्रल रेल्वे वर्कशॉप माटूंगा येथे कुस्ती खेळाडू म्हणून नोकरीत घेतले.आर्थिक प्रश्न काही अंशी सुटला. रेल्वे कडून खेळताना मामांनी अनेक स्पर्धेतून चमकदार कामगिरी करुन दाखवली.
 
     मामा मुंबई शहर तालीम संघातून मुंबई संघाचं प्रतिनिधित्व करायचे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सलग पहिल्या क्रमांकाने विजेते होत होते. महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल कामगिरीबद्दल दिला जाणारा श्रीशिवछत्रपती पुरस्कार मामांना देऊन गौरविण्यात आलं.
 
                  महाराष्ट्र केसरी वजनी गटातून मामा फायनल पर्यंत पोहचले पण अंतिम फेरीतील सामन्यात गुडघ्याला दुखापत झाली आणि खेळ सोडावा लागला.पण पुढच्या वर्षभरात गुडघ्याच्या दुखण्यावर यशस्वी मात करुन कसून मेहनत आणि सराव करुन पुढच्याच वर्षी पुन्हा महाराष्ट्र केसरी गटात अंतिम फेरीत मजल मारुन महाराष्ट्र केसरी किताबाचे मानकरी ठरले. महाराष्ट्र केसरी पैलवान शिवाजीराव पाचपुते.महाराष्ट्र केसरीची गदा आणि पुरस्कार मिळवणारे आमचे मामा वाई तालुक्यातील पहिले आणि एकमेव कुस्तीगीर. हा क्षण आनंदाचा होता,हर्षाचा होता.केलेल्या कष्टाचं फळ मिळालं होतं.पण हे यश सहजासहजी मिळत नसतं त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. चार चार तास कसून सराव करावा लागतो.घाम गाळावा लागतो.मामांनी कठोर परिश्रम करून हे यश प्राप्त केले होते.
                     महाराष्ट्र केसरी किताब मिळाल्यानंतर मामांचे अनेक ठिकाणी सत्कार होत होते. आमच्या वाई तालुक्याने त्यावेळी मामांचा खूप मोठा जंगी नागरीसत्कार केला होता. ऐतिहासिक वाई नगरीतून मामांची मिरवणूक आयोजित केली होती.ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक निघाली होती.  मामा पुढे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून भारताचे प्रतिनिधित्व करु लागले.रशियासारख्या देशात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन विजेते झाले.
                   
                    मुंबईत मोठ मोठे कुस्तीचे मैदान भरायचे. त्या मैदानात मामांची क्रमांक एकची कुस्ती असायची.मोठमोठी बक्षीसे असायची.अशी मैदान मामांनी गाजवून विजेते झाले. सेंट्रल रेल्वेमध्ये कुस्तीतील यशाने मामांची पदोन्नती होत होती. मामांची मुंबई शहर तालीम संघाच्या सेक्रेटरी पदी नियुक्ती झाली. आपल्या नेतृत्वाखाली मुंबई शहर तालीम संघाला उर्जितावस्था प्राप्त करुन दिली.पुढे महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर परिषदेवर मामांची निवड झाली. सध्या मामा आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेवर सेक्रेटरी आहेत. हे आणि असे अनेक मानाची पदे मामांना मिळाली.
       अनेक होतकरू मल्लांना रेल्वे आणि मुंबई पोलीसमध्ये खेळाडू म्हणून नोकरीला लावले.   रेल्वेतून मामांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि भुईंजला जोशीविहीर येथे स्वतःच्या हॉटेल व्यवसायात लक्ष घालू लागले.हॉटेल रायगड इन हे मामांचे राष्ट्रीय महामार्गावर जोशीविहीर इथं असणारं एक प्रसिद्ध हॉटेल.  माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी मामांनी खूप काही केलं आहे. मला अनेक आजारातून मामांनी वाचवलं आहे.आमच्या वडीलांच्या सेवानिवृत्ती नंतर आमचा सांभाळ मामांनीच केला.दादाला नोकरी लावली.मलाही  हॉटेलवर घेतलं.आईवडीलांनंतर आमची जबाबदारी मामांनीच घेतली आहे.
                   आमच्या मामांना उदंड आयुरारोग्य लाभावे ही पांडूरंगाचरणी प्रार्थना. आमचा ह्या आधारवडाची सावली आमच्यावर सदैव राहावी ही प्रार्थना.  मामांचं वर्णन करायला माझ्याकडे एवढी शब्दसंपदा नाहीये. पण जमेल तसं थोडक्यात मामा शब्दबध्द करण्याचा प्रयत्न केलाय.तो कसा जमलाय ते जरूर कळवा.
                    अशीच एखादी आठवण घेऊन पुन्हा आपल्या भेटीसि येईन तोपर्यंत रामराम.काळजी घ्या.
धन्यवाद.
 अशाच आठवणी वाचण्यासाठी आपल्या ब्लॉगला भेट द्या. खालील लिंकवर जाऊन कविता व लेख अवश्य वाचा ही विनंती.


✍🏻  © हिंदुराव गोळे

Post a Comment

0 Comments