Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

जत्रा | काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं !

आठवणीतील जत्रा

                            काल परवा आमची अभेपूरी गावची श्री काळभैरवनाथाची यात्रा झाली. मन लहानपणी अनुभवलेल्या जत्रेच्या आठवणीत हरवून गेलं.सर्रकन पंधरा वीस वर्षांपूर्वीच्या काळात हरवून गेलो.त्याकाळात छोट्या छोट्या गोष्टीतही किती मोठा आनंदाचा साठा होता.हे सर्व आठवून आता आपण बरच काही हरवून बसलोय याची मनात खंत वाटते. खरचं म्हणतात ना बालपणीचा काळ सुखाचा हे तंतोतंत अगदी सत्य आहे. त्या निरागस वयात कसलीही चिंता नव्हती, कसली स्पर्धा नव्हती. होतं ते केवळ निरागस भाबडं बाळपण!
                                     तर अशी ही जत्रा आमच्या लहानपणीच्या जत्रेच्या आठवणी काहीशा वेगळ्या आहेत. आत्ताच्या पिढीला त्या अनुभवताही येणार नाहीत.जत्रेच्या आधीच पंधरा वीस दिवस जत्रेच्या तयारीची गडबड सुरु असायची.घरातील मोठ्या मंडळींची धांदल असायची,धावपळ असायची. आमच्याकडे भात हे मुख्य पीक.हे भात दिवाळीत काढून खळ्यावर बुचाड लावून रचून ठेवलेले असायचे. जत्रेच्या आधी सर्वजण भात झोडून घ्यायचे.सगळीकडे खळ्यावर भात झोडणीची लगबग सुरू असायची.भात झोडून घरात कणगी भरुन ठेवल्या जायच्या.  घरातील महिला वर्गांना जत्रेच्या तयारीची जोरदार तयारी करावी लागायची. पूर्वीची घरं दगड मातीच्या भिंती असलेली असायची.'पांढरीची माती' चाळून जमा करुन आणली जायची.मग दोघी तीघी महिला एकत्र येऊन त्यांच्यात 'वारगुंळा' करत आणि मग एकमेकींची घरं सारवून घेत असत.बादलीत ती आणलेली पांढरीची माती कालवून फाटक्या पोत्याचा बोळा बनवून त्या बोळ्याने बादलीतील कालवलेल्या मातीनं भींती सारवून घेतल्या जायच्या.मस्त पांढऱ्याशुभ्र भींती दिसू लागायच्या.सगळी घरं कशी हसतीखेळती साजश्रुंगार केल्या सारखी दिसायची. घरातील सर्व अंथरुण,पांघरुण,वाकळा ओढ्यावर किंवा धरणावर स्वच्छ धुतल्या जायच्या.घरातील भांडी घासूनपुसून घेतली जायची.त्याकाळी तांब्या पितळची भांडी अधिक असायची.छान चमक यायची भांड्यांना.तर अशी ही जत्रेची पूर्वतयारी थोडीशी गडबडीची काम उरकण्याची असायची.  आणि मग ताज्या जत्रेचा दिवस मोठ्या आनंदाने उजाडायचा.सर्वांना लवकर उठवलं जायचं आंघोळी उरकल्या जायच्या. गोठ्यातील गुरांना बैलांना स्वच्छ धुतलं जायचं त्यांच्या अंगावर गुलाल टाकला जायचा.
                      माहेरवाशीण मुली माहेरच्या यात्रेसाठी माहेरी आलेल्या असायच्या. नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई पुण्याला असणारे ग्रामस्थ बायकामुलांसह यात्रेला गावी आलेले असायचं.गाव कसं भरलं भरल्यासारखे वाटायचं.सगळ्यांच्या भेटीगाठी व्हायच्या.तब्बेतीची कामाची मुलाबाळांची चौकशी व्हायची. ताज्या यात्रे दिवशी देवाला पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जायचा.पुरणपोळी, कटाची आमटी,भात,भजी,कुरडया, पापड असा जेवणाचा बेत असायचा.घरातील बायका स्वयपाक बनवण्यात दंग असायच्या. संध्याकाळी पाच वाजता गावात देवाच्या पाया पडायला महिला वर्ग एका ताटात नैवेद्य घेऊन निघायच्या. लहान मुलं सोबत असायची. नवीन कपडे घालून नटूनथटून सर्वजण देवदर्शनासाठी अभेपूरीत जायचे.
                       गावात अनेक दुकान लागलेली असायची. मिठाई, खेळणी,गुलाल,नारळ,गोंडा अशा सर्वांची विक्रीसाठी दुकानं सज्ज असायची. नारळ,गुलाल,हळदकुंकू, अगरबत्ती, गोंडा घेऊन मंदिरात जायचं.कुणाचा नवस असेल तर तांब्याची घंटा देवाला अर्पण करतात.मंदिरात देवदर्शनासाठी महिलांची आणि लहानमुलांची गर्दी असायची. गर्दीतून मंदिरात प्रवेश मिळाला की देवाचं दर्शन घ्यायचं .देवाला आडजूड यायचं,मुलाबाळांना,गुराढोरांना चांगलं ठेव म्हणून त्याला साकडं घातलं जायचं.पुजाऱ्याला नैवेद्य दिला जायचा.आणलेला नारळ वाहून ,गुलाल वाहिला जायचा. अंगारा एका पुडीत बांधून घेतला जायचा.तृप्त मनानं आणि समाधानानं देवदर्शन घेऊन महिला घरी येत.त्याकाळी महिला आमच्या काळभैरवनाथाच्या मंदिरात फक्त यात्रेदिवशीच जात असत.
                 घरी येताना पेढे,बर्फी आणि लाह्यांचा प्रसाद घेतला जायचा.पाहुण्यारावळ्यांना देण्यासाठी प्रसाद घेऊन , लहान मुलांना खेळणी,कुल्फी घेतली जायची.घरी यायला उशीर व्हायचा.मग रात्री पुरणपोळीच्या जेवणाची पंगत बसायची.असा हा जत्रेचा पहिला दिवस महिलांसाठी आनंदाचा,उत्साहाचा आणि कामाच्या गडबडीत पार पडायचा.
 रात्री पुरुष मंडळी मंदिरात जमायचे.देवाला गुलाल वाहिला की एकमेकांच्या कपाळावर गुलाल लावायचा.रात्री देवाची पालखी निघायची.त्यापूर्वी मंदिरात कौल लावला जायचा.ज्यांच्या अंगात देवाचं वारं यायचं ते काळभैरीच्या नावानं चांगभलं अशा किंकाळ्या देत गरम लालबुंद विस्तवात नाचत असायचे. पालखीत देव ठेवले जायचे आणि मग पालखी प्रदक्षिणेसाठी देवळातून बाहेर पडायची.सगळ्या गावातून वाजतगाजत देवाची पालखीतून मिरवणूक निघायची.गुलाल उधळला जायच ''काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं ! चांगभलं म्हणा चांगभलं !' अशा आरोळ्या दिल्या जायच्या. ढोल आणि झांझांच्या आवाजानं सारा परिसर दणाणून जायचा.चावडीपुढे परगावातून आलेल्या ढोल लेझीम पथकाचे डाव पडायचे.
                  आम्हीही आमचा ढोल लेझीमचा डाव काढायचो.लहान मोठी माणसं डावात सामील व्हायची.अर्धा पाऊणतास डाव चालायचा मनसोक्त नाचायचो. पालखी सर्व गावात फिरुन मंदिरात जायची.पहाटे पाच वाजताच तमाशा उभा राहयचा.गणगौळणी,गणेशवंदना सुरू असायची. आमच्या गावात शंकर डवरी यांचा बहुरंगी तमाशा कायमच असायचा.त्यानं म्हणे आमच्या देवाचा अंगारा खाल्लेला.जोपर्यंत जीवंत आहे तोपर्यंत तमाशातून तुझी सेवा करीन असा पण केलेला. त्याचाच तमाशा आमच्या लहानपणी आमच्या गावात असायचा. शिळ्या जत्रेची धांदल चालू झालेली असायची. पाहुणे मंडळी सकाळपासूनच आलेली असायची.कुणी चालत,कुणी सायकलवर तर कुणाकडं मोटारसायकल असेल तर त्यानं प्रवास करून आलेली असायची.गप्पांच्या फड जमायचा. मग जेवणासाठी आग्रह व्हायचा.पंगती बसायच्या. एका मागून एक पंगत उठायची.पान तंबाखू दिली जायची.त्यांच्या यात्रेला येण्याचं निमंत्रण दिलं जायचं.दिवसभर अशा पंगती चालूच असायच्या.
                      आम्ही बच्चे कंपनी सकाळी जेवण करून नवीन कपडे घालून गावात जायचो.जत्रेत खाऊ घेण्यासाठी ,खेळणी घेण्यासाठी घरातील मोठ्या माणसांकडून पैसे मिळायचे.हातात पडलेले पैसे खिशात टाकून गावात जायचं. कुणी एक रूपया द्यायचे, कुणी अगदी पन्नास पैसे, पंचवीस पैसे हातावर ठेवायचे. जत्रेत खेळणी घेतली जायची.कुल्फी, गारेगार आळीपाळीने खाल्लं जायचं आमच्या लहानपणी एक चौकोनी डब्यात नट नट्यांची,नेत्यांची चित्रं बघायला मिळायची.पाच किंवा दहा पैशात दाखवली जायची तो डब्बेवाला सूरात म्हणायचा हेमामालिनी बघम्...इंदिरा गांधी बघम... चौकोनी डब्ब्याला एक गोल काचेचं छिद्र असायचं त्याच्यावर एक डोळा ठेवून एक डोळा बंद करून आतलं चित्र बघायचं.डब्बेवाला एक एक नाव घ्यायचा ते ते चित्र दिसायचं.पंधरावीस चित्रं असायची.ही गर्दी जमायची.आम्हाला लहानपणी चित्र बघण्यापेक्षा तो डब्बेवाला ज्या सूरात अमिताभ बच्चन बघम....असं जे म्हणायचा त्याचंच जास्त आकर्षण असायचे. 
                            इकडं चावडीवर तमाशा रंगात आलेला असायचा.राजा,प्रधान, शिपाई असं काहीतरी चालेलं असायचं.शिपाई विनोद करायचे राजा हातातील चाबकाचे फटाके शिपायांवर ओढायचा भीती वाटायची लहानपणी.नंतर तमाशाचं मुख्य आकर्षण म्हणजे 'वगनाट्य' सुरू व्हायचं.एखाद्या ऐतिहासिक अथवा सामाजिक आशय असलेल्या विषयावर वग असायचा.तमाशातील हे कलाकार आपली कला सादर करायचे. काय जीवंत अभिनय असायचा एकऐकाचा.मजा यायची.त्याकाळी करमणूकीची अशी संधी जत्रेतून अशा तमाशातून मिळायची.
     तमाशा संपला की कुस्त्यांचा फड गावाच्या बाहेर एखाद्या शेतात असायचा.नारळ फोडून आणि आखाड्याची पूजा करून कुस्त्यांना सुरुवात व्हायची.एक नारळ फेकला जायचा मग आमच्यातील लहान पैलवान तो नारळ घेण्यासाठी पळत जायची ज्या दोघांना पहिला नारळ मिळेल त्यांची त्या नारळावर कुस्ती लागायची.विजयी मल्लाला तो नारळ दिला जायचा.एका रांगेत लहानमुलांना पैसे दिले जायचे.
                               लहान पैलवानांच्या कुस्त्या झाल्या की मग मोठ्या कुस्त्यांना सुरुवात व्हायची.वस्ताद दोन हातात दोन पैलवान घेऊन फडात फिरायचे, जोड लागायचा आणि कुस्तीला सुरुवात व्हायची.शड्डू ठोकला जायचा.सलामी देऊन कुस्तीला सुरुवात व्हायची. विजयी मल्ल दोन्ही हात वर करून एक पाय वर करुन आपला आनंद साजरा करायचा.आमक्या तमक्या वस्तादाचा आवडता पठ्ठा आहे बघ..  आल्यं ..असं जोरात म्हणत आपल्या माणसांकड पळत सुटायघा कुणीतरी मग त्याला दोन्ही हातांवर उचलून त्याला शाबासकी द्यायचा .फडात ढालीवर कुस्ती असायची दोन पैलवानात सलग तीन वर्षे कुस्ती लागायची जो अधिकवेळा जिंकेल त्याला ढाल आणि इनामी रक्कम दिली जायची.वर्षभर त्यासाठी लाल मातीत घाम गाळून तयारी केली जायची.  विजयी पैलवानाची वाजतगाजत मिरवणूक काढली जायची.गुलाल ढोल लेझीम असा सरंजाम असायचा.
 
        अंधार पडता पडता कुस्त्या संपल्या जायच्या मग घराकडं यायचं.फडावर कुस्तीत जिंकलेले पैसे घरातल्यांना द्यायचे. त्यावेळी दहा रुपये म्हणजे खूप मोठं इनाम वाटायचं.मजा असायची.

 

                  दोन दिवस धामधुमीत जत्रा पार पडायची. घरी आलेली पाहुणे, नोकरीसाठी बाहेरगावी असणारी मंडळी परत जायला निघायचे. आत्या,मामाची मुलं जत्रेसाठी दोन दिवस आलेली असायची. दोन दिवस धम्माल, मस्ती,धिंगाणा एकत्र घातलेला असायचा.ते परत जाताना डोळ्यांच्या कडा ओल्या व्हायच्या गळाभेट व्हायची आणि ते त्यांच्या गावाला जाण्यासाठी निघायचे.लांबपर्यंत जोपर्यंत दिसायचे तोपर्यंत हात वर करायचा.दिसेनासे झाले की जड पावलांनी घरी यायचं.दोन दिवस हसतंखेळतं असलेल घर एकदम सुनंसुनं होऊन जायचं.करमायचं नाही. आठवण व्हायची.पुढच्या वर्षीच्या यात्रेची वाट पहात पहात दिवस जात.

   माझी जत्रेची आठवण पुढील कवितेत मांडण्याचा प्रयत्न करतोय.
 
जत्रा
 
वर्षभर वाट पाहून एकदाची येते जत्रा
धावपळ नुसतीच कामं असतात सतरा

घरांना रंगरंगोटी केले जाते सारवण
जत्रेची असते मनात अशी एक एक आठवण

रात्री छबिना सकाळी तमाशा
दिवसभर नुसता जेवणावर फडशा

भैरवनाथाच्या नावानं चांगभलं
उधळला जातो मानाचा गुलाल

छबिन्यात गुलालानं होते अंग सारं लाल
सगळ्यांचीच असते पुरती धमाल

ढोल लेझीमीचा डाव रात्रभर रंगतो
जो तो आनंदाने धुंद होऊन नाचतो


बच्चे कंपनी खेळण्यात दंग
आनंदाच्या त्यांच्या वेगळाच रंग

आकाश पाळण्यात बसायची असते त्यांना घाई
जमीनीवरुन पाळणा उंचच उंच आकाशात जाई

कुस्त्यांचा फडांचा असतो वेगळाच ढंग
मातीत पैलवानांचं होई लाल अंग

कुणी जिंकतो ढाल कुणी जिंकतो गदा
लाल मातीतल्या मर्दानी खेळाची वेगळीच अदा

महिलांची कामाने उडते नुसतीच गडबड
ओसरीवर जमून मग येतो गप्पांचा फड

सासुरवाशीण लेकी जत्रेला माहेरी येतात
आठवणींच्या हिंदोळ्यावर हरवून जातात

दोन दिवस जीवलगांच्या होतात गाठीभेटी
जड पावलांनी परत जायचं यायचं पुन्हा भेटीसाठी

सुखदुःखांची होते विचारपूस
मौज मस्ती आणि होते हौस

वर्षभर वाट पाहतो कधी येईल जत्रा
हवीहवीशी वाटते आम्हाला आमची जत्रा |

                         अशाप्रकारे आमच्या लहानपणी आमच्या गावची जत्रा साजरी व्हायची.मजा असायची.आता तशी मजा राहिली नाही. आता खिशात पैसे असतात पण त्यावेळी मोठ्यांकडून रुपया,दोन रुपये मिळायचे त्यात सगळी जत्रा आम्हा लहानग्यांची साजरी व्हायची.कुस्त्या, तमाशा सगळी मजाच मजा असायची. आता ते दिवस पुन्हा येणार नाहीत. हल्ली जत्रेचं स्वरूप बदलत चाललयं.काळानूरुप बदल होणारच.पण आमच्या लहानपणी जी साधेपणाने जत्रा साजरी व्हायची त्यात वेगळाच आनंद मिळायचा.आता धामधुमीत खूप धुमधडाक्यात आणि खूप खर्च करून जत्रा साजरी होते. पण पंधरावीस वर्षापूर्वीची मजा आता राहिली नाही.

   माझी ही जत्रा तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा.तोपर्यंत रामराम . काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं ! काळजी घ्या.

धन्यवाद.

© हिंदुराव गोळे

 

Post a Comment

0 Comments