Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

हरवलेल्या बालपणीच्या रम्य आठवणी | लहानपणी आमचं गाव म्हणजे आमची वाडी

हरवलेल्या बालपणीच्या रम्य आठवणी




                               तसं पाहिलं तर आमच्या लहानपणी आमचं गाव म्हणजे आमची वाडी पन्नास साठ घरांची छोटीशी वाडी.दुर्गम डोंगराळी प्रदेशात निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं एक छोटसं खेडं. अतिशय पाऊस असायचा त्यामुळे पावसाळ्याच्या चार महिन्यांत आणि नंतर पुढचे दोन महिने वाडीत वाहन यायचे नाही.
                         पण खूप छान दिवस होते ते आमच्या लहानपणीचे ! आजही ते दिवस आठवले की आपण खूप काही हरवून बसलोय.ज्याच्या शोधात आपण दिवसरात्र धडपड करत असतो ते त्या दिवसात आपल्याकडे होते. आणि आता ते नाही याची खंत वाटते. ते म्हणजे सुख, शांती, समाधान. आहे त्यात समाधान मानन्याचे ते दिवस होते. खरोखरच रम्य ते बालपण होते ! आमच्या वाडीत पहिली ते चौथीपर्यंत एकशिक्षकी शाळा होती. पावसावर अवलंबून असलेली शेती. भरपूर प्रमाणात पाऊस पडायचा पण त्या पाण्याची साठवणूक नव्हती. महापूरानं गावच्या दोन्ही बाजूला असलेले ओढे दुथडी वाहत असायचे. पावसाळ्यात शेतीची कामं खूप असायची. घरातील सर्व मोठी माणसं शेतात असायची. त्यामुळे लहान भावंडं आपल्या सोबत दिवसभर शाळेत घेऊन येणारे अनेक विद्यार्थी शाळेत असायचे. गुरुजीही त्या लहानग्यांची काळजी घ्यायचे.




                               लहानपणीची वाडी आज आठवली की असं वाटतं आज भौतिक सुखसोयी हाताच्या बोटावर उपलब्ध आहेत पण त्यात सुख समाधान अजिबात नाही. पण भौतिक सुखसोयींपासून त्याकाळी दूर असणारं माझं गाव सुखासमाधानानं,आनंदानं,गुण्यागोविंदाने नांदत होतं.पण आज तसं दिसत नाही.
                             एखाद्याच्या बोटाला लागलं तरी सारं गाव त्याच्याभोवती जमा होत होतं. पण आता बाजूच्या घरात काही झालं तर साधं डोकावून पण बघत नाहीत. घरात कोण आजारी असेल तर सगळे आजारी माणसाला बघायला घरी यायचे. 'दुकानकरी' म्हणजे आजारी माणूस लवकर बरा व्हावा यासाठी सर्वजण उपाय सांगायचे. या दुकानकऱ्याला बघायला येताना घरातून बोंबील, सुकट किंवा खाऱ्या माशाची बोटी भाकरीवर घालून यायचे आणि आजारी माणसाला स्वतःच्या हातानं खाऊ घालायचे. शाकाहारी माणसाला शाकाहारी पदार्थ बनवून आणला जायचा.काय आणि किती प्रेम ते ? आता हे बघायला पण मिळत नाही. आम्ही ते प्रत्यक्ष अनुभवलयं.
                                 गावात कुठं लहान मुलं खेळत असतील काही चुकीचं चाललं असेल एखादा आगाऊपणा करत असेल तर कोणीही ज्येष्ठ व्यक्ती त्या मुलाला फटकवत असे.त्याबद्दल घरातल्यांची कसलीही तक्रार नसायची. उलट अजून चांगला चोप द्यायला पाहिजे होता असं म्हणायची. त्यामुळे ज्येष्ठांबद्दल आदरयुक्त भीती, धाक होता. गावातील विकासकामे एकमताने होत असतं. एकदा ठरलेला निर्णय सर्वमान्य असायचा. परत त्या विषयावर कसलीही चर्चा होत नसे. गावातील इमारती, पावसाळ्यात वाहून गेलेला रस्ता , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्या पाईपलाईनची डागडुजी सामुदायिक श्रमदानातून होत असत. जो श्रमदानाला 'खाडा' करायचा त्याला दंड बसायचा. गावापेक्षा एखादा वेगळा वागत असेल गावच्या निर्णया विरुद्ध जात असेल तर संपूर्ण गाव त्याला 'वाळीत' टाकत असे. गावच्या विकासाचा विचार करून फंड चालू केला त्या फंडातून अगदी नगण्य व्याजात ग्रामस्थांना कर्ज दिले जाते. त्या कर्जाच्या व्याजातून आजपर्यंत खूप कामं मार्गी लागली. तीस पस्तीस वर्षांपूर्वी आमच्या वाडीत लोक वर्गणीतून सुंदर असं विठ्ठल रुखमाईचं मंदिर बांधण्यात आलं. मंदिर बांधकाम करताना प्रत्येक घरातील एक व्यक्ती श्रमदान म्हणून कामाला असायची. पिण्याच्या पाण्याची सोय अशीच श्रमदानातून केली गेली आहे. वेरुळीच्या डोंगरातून उंच कड्यातून झऱ्यांचे पाणी एकत्र करुन एका ठिकाणी टाकी बांधून तिथून खाली पाईपलाईन करुन वाडीत पाणी आणलं गेलं. हे सर्व लोकसहभागातून, श्रमदानातून आणि याचा खर्च लोकवर्गणीतून.
                                 लहानपणी एक बरं होतं कोणत्याही मित्राच्या घरी त्याची आई जेवायला घालायची. जे असेल ते स्वतःच्या मुलाइतकंच आपल्यालाही प्रेमानं खाऊ घालायची मजा असायची. कुणाची कसलीही तक्रार नसायची.
 शेतीची कामं एकत्र केली जायची.सात आठ जणांचा 'वारंगुळा' असायचा. वारंगुळ्यातील सर्वजण एकमेकांच्या शेतातील कामं स्वतःच्या शेतातील काम असल्यासारखी दुसऱ्याच्याही शेतात करायचीत. श्रावण महिन्यात तालमीत ग्रंथाचे पारायण असायचे. सारं गाव रात्री जेवणं झाल्यावर ग्रंथ ऐकण्यासाठी तालमीत जमायचं. ग्रंथाच्या समाप्तीला श्री सत्यनारायणाची महापूजा असायची पंचक्रोशीतील गावांना आणि गावातील प्रत्येक घरात चूलबंद आवातनं असायचं. शिरा, भात, कटाची आमटी कधी पूरणपोळ्या असा बेत असायचा. गावात एखादी दुःखद घटना घडली, कुणाच्याही घरातील व्यक्ती मृत्यू पावली तर सर्व विधी पार पडत नाहीत तोपर्यंत गावातील एकही चूल पेटत नव्हती. सारं गाव जमा होत होतं. सुखाच्या बाबतीतही तसंच एखाद्याच्या घरातील लग्न असेल तर साऱ्या गावात लगीनघाई असायची. आपल्याच घरातलं लग्न आहे असं समजून जो तो झटत असे. आमच्या लहानपणी पाण्याची टंचाई असायची लग्न कार्य उन्हाळ्यात असायची. पाण्याची टंचाई ठरलेली.मग बैलगाडीत लोखंडी पिंप टाकून ते धोमातून भरून आणले जायचे. मग त्यासाठी चार पाच बैलगाड्या ठरलेल्या असायच्या.
                           'मांडवदळा' ची सुपारी दिली की सारं गाव लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत मांडव घालायला लगीनघरी जमा व्हायचे. नक्षीदार कागदी पताका कापून त्याच्या माळा तयार केल्या जायच्या. आम्ही लहान मुलं त्या पताका खळ लावून दोऱ्यावर चिकटवत असायचो.लग्नमंडपात आणि पूर्ण गावात ह्या पताका लावल्या जायच्या. लग्नाच्या आधी पंधरावीस दिवस वरमाई आणि वरबाप यांना आंघोळीसाठी आग्रहानं बोलावलं जायचं. रोज 'गडांगणा'चा बेत असायचा.लग्नपत्रिका वाटायला आख्खं गाव तयार असायचं. लांबच्या गावच्या पत्रिका वाटायला सायकलवर जायला लागायचे. मग ज्याच्याकडे सायकल असायची तो गावं वाटून घ्यायचा. अशी सगळी धांदल,लगबग,गडबड ,गोंधळ साऱ्या गावाचाच असायचा.लग्नाच्या दिवशी ज्येष्ठ मंडळी जेवण बनवायला चरावर असायची. भात,आमटी, मसालेभात, कधी लाडू तर कधी जिलेबी असा बेत असायचा. सारं गाव मिळून स्वयंपाक बनवण्यासाठी खपायचा. नवरदेव श्रीवंदनाला निघाला की तरुण मंडळाचा ढोल लेझीमीचा डाव पडायचा. रुकवतही असाच नाचवला जायचा. बोहलं उभं केलं जायचं.मंगलाष्टका सुरु झाल्या की, त्या न कळत्या वयात अक्षतांमध्ये बारीक खडे मिसळून एकमेकांना जोरात अक्षता मारायचो. गावातील नवरदेव असेल तर वरातीला जाम मजा असायची. रात्री ढोल लेझीम, छडीपट्टा यांचे डाव असायचे.रात्रीच्या अंधारात टेंबे आणि बत्त्या लावल्या जायच्या.
पांजी दिवशी सगळ्यांचा थकवा आणि मळमळ दूर व्हायची.आख्खं बकरं शिजायचं ! पांजी अशी धुमधडाक्यात व्हायची की लग्नात केलेल्या कष्टाचा श्रमपरिहार व्हायचा.

      आणि हल्ली उद्या लग्न असेल तर आज समजतं उद्या लग्न आहे म्हणून. किती झपाट्याने हा बदल होत गेला कळलं नाही. पण पहिली जी मजा होती ती आता राहिली नाही.

                          मुंबईवरुन एखादा रोजगारी आला तर येताना सगळ्या लहान मुलांसाठी गोळ्या,चाँकलेट, बिस्कीट आणली जायची. प्रत्येकाच्या हातावर काही ना काही पडायचेच. दिवसेंदिवस बदल होत गेले. गावही बदलला. बदलायलाही हवाच.
                       आज सर्व सुखसोयी गावात उपलब्ध आहेत. पण आमच्या लहानपणीचं आमचं गाव साधी भोळी माणसं.असेल त्यात समाधानानं जगणारी माणसं, एक दुसऱ्याच्या मदतीला धाऊन जाणारी माणसं. प्रत्येकाच्या सुख दुःखात सारं गाव सहभागी होत असे तो गाव आज राहिला नाही. आजही असं वाटतं लहानपणी गावात अनुभवलेलं 'रामराज्य' पुन्हा अनुभवता येईल का ?  मन नकारार्थी मान डोलावतं खट्टू होतं आणि काळाबरोबर चालण्याच्या ओघात गावाचं 'गावपण' न कळत कधी हरवून गेलं ते कळत नाही. आता आठवायच्या फक्त रम्य त्या आठवणी त्या आठवणींच्या हिंदोळ्यावर बसून स्वतःला त्या काळातील गावाची सैर करुन आणायची. बस्स येवढंच आपल्या हातात आहे. अशीच आठवण घेऊन मी आपल्या भेटीसाठी साठवणीतील आठवणीचं गाठोडं घेऊन येईन. पुन्हा एखादी आठवण त्या गाठोड्यातून तुमच्यासाठी बाहेर काढेन. तोपर्यंत रामराम काळजी घ्या.
                      माझी ही आठवण कशी वाटली ते जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रिया शब्दांत मांडा. आपल्या प्रतिक्रियेवर माझ्या पुढच्या आठवणीची वीण बांधली जात असते. त्यामुळे आपला अभिप्राय शब्दांत कळवा.
धन्यवाद.

@ हिंदुराव गोळे
साठवणीतील आठवणी 
🙏🏻🌹🍁🙏🏻🌹🍁🙏🏻🌹🍁

Post a Comment

0 Comments