पंढरीची वारी
पंढरीचे वारकरी ।
ते आधिकारी मोक्षाचे ।।
पुंडलिका दिला वर।
करुणाकरें विठ्ठलें ।।
मुढ पापी जैसे तैसे ।
उतरीं कासे लावूनि ।।
तुका म्हणे खरें झालें ।
एका बोले संतांच्या ।।
पंढरपूरचा वारकरी हा मोक्षाचा अधिकारी आहे असा भक्त पुंडलिकाला करुणाकारी विठ्ठलाने वर दिला होता. तुकाराम महाराज म्हणतात ,भक्त पुंडलीकाला दिलेले वचन पांडुरंगाने खरे केले आहे.
वारी करतो तो वारकरी. दर महिन्याच्या शुध्द एकादशीला, आषाढी ,कार्तिकी,चैत्री,माघी या वारीत पंढरपूरला जातो तो वारकरी.
वारी ही सामूहिक भक्ती आहे. वारी म्हणजे धर्मजागरण आहे.हा धर्म विठ्ठल माऊली वर असलेले प्रेम,भक्ती यांचे प्रतीक आहे. 'कोणाही जीवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचे ।।
हा वारीचा वसा आहे.जात-पात हा भेद विसरून वारीमध्ये वारकरी एकादिलाने ,एकरूप,एकमय होऊन चालत असतो. तिथे भेदाभेद उरलेलाच नसतो. 'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ।।'
वारकरी संप्रदायाने वारीच्या माध्यमातून सामाजिक बंधूभाव जोपासला सांस्कृतिक वारसा समृद्ध केला वारी करणार्यामध्ये मानसिक तसेच भावनिक स्तरावर खूप बदल झालेला असतो. आत्मोद्धार, आत्मोन्नती यापेक्षाही त्याच्यासाठी वारीमध्ये चालताना विठ्ठलभेटीसाठी लागलेली ओढ,त्याच्या नामाचा गजर याचा आनंद खूप मोठा असतो.
वारीमध्ये चालत असताना आपोआपच सोबत चालणाऱ्या वारकऱ्यांबरोबर प्रेम ,आपुलकी, जिव्हाळा वाढत जातो. एकमेकांविषयी सहानुभूती सद्भावना यामुळे वारकऱ्यांची मने विशाल बनतात .वेगवेगळ्या जाती जमातीतुन एकत्र आलेल्या वारकऱ्यांमध्ये समाजमन एकसंघ असल्याचे सुखद दर्शन वारीमध्ये घडते.
पंढरपूर हे संतांचे माहेर आहे.पंढरीश परमात्मा विठ्ठल ही वारकर्यांची
'विठाई माऊली । कृपेची सावली ।।'
आहे. वारकरी संप्रदाय हा विठ्ठल भक्ती आणि वारी या एका धाग्याने विशाल कुटुंबासारखा बांधलेला आहे. वारकरी हा प्रत्येक वारकऱ्यांमध्ये विठ्ठलाचे रूप पाहत असतो म्हणूनच 'माऊली' म्हणून त्याच्या पायावर डोके ठेवतो. 'गुरुबंधू' किंवा 'गुरुभगिनी' म्हणून एकमेकांशी नाते जोडतो.
वारकरी संप्रदायात विठ्ठलभक्ती इतकेच महत्त्वाचे स्थान पंढरपूर आणि चंद्रभागा यांनाही आहे.
अवघेचि तीर्थे घडली एक वेळा ।
चंद्रभागा डोळा देखिलिया ।।
अवघीच पापी गेली दिगंतरी ।
वैकुंठ पंढरी देखिलिया ।।
संत तुकाराम महाराजांची ही अनुभूती वारकरी अनुभवत असतो. आधुनिक युगातही वारीतील लोकसंवादातून लोकशिक्षण घडून ढासळत चाललेला नैतिकमूल्यांना सहज सावरून धरले जाऊ शकते.
आजच्या देवशयनी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा.
हीच व्हावी माझी आस।
जन्मोजन्मी तुझा दास ।।
पंढरीचा वारकरी ।
वारी चुको नेदी हरी ।।
लेखांकन:-
ह.भ.प.हिंदुरावमहाराज गोळे
सातारा जिल्हा सत्संगप्रमुख,
विश्व हिंदू परिषद.
🙏🏻🚩🚩🙏🏻🚩🙏🏻🚩

0 Comments