आठवणीतील बेंदूर
शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा सण म्हणजे 'बेंदूर'.वर्षभर शेतात कष्ट करणाऱ्या बैलांचं या सणादिवशी कोडकौतुक केलं जातं त्यांच्या कष्टाच्या ऋणातून शेतकऱ्यांना थोडंफार उतराई होण्याचा आजचा हा दिवस. आज बेंदूर सण मन लहानपणी मी अनुभवलेल्या बेंदूर सणाच्या आठवणीत रमून गेलं.आणि पुन्हा एकदा मनाने तो त्यावेळी जसा बेंदूर सण साजरा व्हायचा तसा साजरा केला. एक एक आठवणीचं पान चाळत असताना लहानपणी बेंदूर सणाला केलेली मजा डोळ्यासमोर उभी राहू लागली.
तसं आमचं गाव म्हणजे छोटीशी वाडी.पण आमच्या लहानपणी प्रत्येकाच्या घरात बैलजोडी, गाई,म्हशी असायच्याच बैलजोडी जरी नसली तरी किमान प्रत्येकाच्या घरात एक तरी बैल असायचाच.
शेतकऱ्यासाठी बैल म्हणजे पोटच्या मुलासारखा जिव्हाळ्याचा विषय.शेतकऱ्याचा बैलांवर आणि बैलांचा आपल्या धन्यावर जीव असणारच. आमच्या लहानपणी आमच्याकडे एक बैल होता त्याचं नाव गरुड.आणि आमच्या चुलत्यांकडे एक बैल होता रतन नावाचा.रतन रंगाने पांढरा पण गरुड काळा होता.बेंदराला रंग लावताना गरुडच्या अंगावर रंग उठायचाच नाही. मग त्याला भिवडी लावून थोडासा पिवळा रंग दिसायचा.काळ्या रंगामुळे त्याच्या अंगावर इतर रंग उठायचाच नाही. आम्ही नाराज व्हायचो मग त्याच्या अंगावर मिरवणूकीच्यावेळी नक्षीदार झूल टाकून घेऊन जायचो.त्यामुळे मी आमचा बैल सोडून आमच्या मामांच्या बैलांना रंगवायला जायचो.आमच्या मामांकडे दोन बैल असायचे दोन्हीही पांढऱ्या रंगाचे.मग काय दिवसभर मी मामांच्या बैलांच्या भोवती असायचो.
पण या बेंदूर सणाच्या अगोदर आठवडाभर खरी मजा यायची ती मातीचे बैल बनवताना. शाळा सुटली किंवा शनिवार, रविवार असला की आम्ही जिथं वारुळ असेल तिथं जायचो.वारुळाची माती गोळा करायचो.ही माती चिकट असते आणि त्या मातीत दगड,खडे नसतात.अशी माती बैल बनवण्यासाठी चांगली म्हणून वारुळाची माती बैल बनवण्यासाठी वापरायची.
हे मातीचे बैल बनवण्याचे काम कलाकौशल्याचं असायचं,माती भिजवून त्याचा गोळा करायचा,तो एखाद्या दगडावर चांगला मळून एकजीव करावा लागायचा.ती माती पातळ होता कामा नये याची काळजी घ्यावी लागायची. चिकट मातीचा गोळा तयार झाला की बैल बनवण्याची कसरत सुरु व्हायची.मातीचा लांब गोलाकार गोळा करून त्याच्या दोन्ही बाजूला काडीनं काप देऊन बैलाचे पाय तयार केले जायचे.मग बैलाचं तोंड,शिंगं बनवली जायची.शिंगाचा आकार टोकदार झाला पाहिजे याकडे लक्ष देऊन तशा आकाराची शिंग बनवली जायची.बैलाची शेपटी,वशिंड,गळ्याखालची पोळी व्यवस्थित बनवली जायची त्याला मनासारखा आकार येत नाही तोपर्यंत काम चालू असायचं.अशा पद्धतीने बैल बनवून झाला की मोठा आनंद व्हायचा.पण या खटाटोपीत आमच्या कपड्यांवर मातीचे,चिखलाचे डाग पडायचे त्यासाठी आई किंवा घरातील इतरांची बोलणी खावी लागायची
पण बैल बनवण्याच्या आनंदापुढे ही बोलणी किरकोळ वाटायची.
एखाद्याच्या बैलाचा आकार बिघडला की सगळे त्याच्यावर हसायचे,त्याला चिडवायचे. कधीतरी अशा आकाराचा बनवलेला बैल रागाने तो मोडून द्यायचा परत नवीन बनवला जायचा. बैलांचीजोडी तयार करून बेंदराच्या आधी चारपाच दिवस चांगली सुकली की मग बेंदरादिवशी या मातीच्या बैलांनाही रंगवून त्यांच्या गळ्यात गोंडा बांधून पाटावर पूजलं जायचं.एखादा बैल मेल्यावर शेतात जिथं पुरलेला असेल त्या जागेवरही असाच एक मातीचा बैल ठेवला जायचा.त्या बैलाची आठवण म्हणून.पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून मगच सर्वजण जेवायला बसायचे. बेंदूर झाला की मग आमची ही मातीची बैलजोडी आम्ही खेळायला घ्यायचो.खोटं खोटं शेत करुन,भौसापासून औत तयार करून या औताला ही बैलं जोडली जायची.मग पेरणीसाठी आमच्या शेतात,कुळव,पाभार,गुठ्या ही औतं चालायची.मजा यायची ही शेतं करायला.आता हे सारं आठवलं की,हसू येतं पण शेतकऱ्यांच्या मुलाला शेताभाताची,बैलांची,औतांची आवड ही अशीच असणारच मग ती अशी खेळातून दिसते. शेती हेच त्यांचं विश्वं मग त्यांचे खेळही तसेच असणार यात शंकाच नाही.
बेंदराचा बाजार करण्यासाठी वाईला जावं लागायचं. बाजारातून रंग,फुगे,बाशिंगं जे बैलांना सजवण्यासाठी आवश्यक असायचं त्याची खरेदी केली जायची.बेंदराच्या बाजाराचं वेगळं असं आकर्षण असायचं. बेंदराच्या आदल्यादिवशी घरातील बैलांना गरम पाण्यानं धुतलं जायचं.त्यांची शिंग घोळून घेतली जायची,शेपटीचा गोंडा छान आकारात कात्रीने कातरुन घ्यायचा.त्या रात्री त्यांचा खांद तेल आणि हळदीनं मळून घेतला जाई.बेंदरादिवशी पुन्हा बैलांना धुतलं जायचं,गोठ्यात बांधल्यावर त्यांना खाली बसू द्यायचं नाही कारण त्यांचं अंग मळलं नाही पाहिजे याची दक्षता घेतली जायची. बैल धुतल्यावर चांगले सुकले की मग त्यांच्या अंगावर पिवळ्या रंगाची भिवडी पाण्यात कालवून चोळली जायची.मग पिवळसर रंग आला की त्याच्यावर वेगवेगळ्या नक्षीचे लाकडी छाप वेगवेगळ्या रंगात भिजवून बैलाच्या अंगावर उठवले जायचे. ह्या छापांमध्ये मोर,बदक,बैल अशी नक्षी असायची.बैलांच्या शिंगांना रंग किंवा हिंगूळ लावून त्याच्यावर बेगडाच्या पट्ट्या चिकटवल्या जात.शिंगात शेंब्या घालून दोन्ही शिंगांच्यामध्ये रंगीत फुगे बांधायचे.कपाळावर बाशिंग बांधलं जायचं.मग अशा सजवलेल्या बैलांना मिरवणूकसाठी बाहेर घेऊन जायचं.मी निदान आपल्याला मिरवणुकीत बैलांचा कासरा हातात धरायला मिळेल या आशेनं आमच्या मामाचा मुलगा जे सांगलं ते ते काम करायचो पण लहान असल्यामुळे आम्हाला काही कासरा धरायला मिळायचा नाही.
बेंदराची मजा आमच्या लहानपणी आम्ही अनुभवलीय तशी आता नाही. आमच्या लहानपणी बेंदरादिवशी बैलांची मिरवणूक निघायची त्याची वेगळीच मजा आसायची.पंचवीस तीस बैलजोड्या,लहान खोंडं एकामागोमाग एक अशी रांगेत चालत.मुंबईला नोकरीनिमित्त असणारी गावातील लोकं बेंदरासाठी गावाला यायचे.ढोल लेझीमीचा डाव बैलांच्या मिरवणुकी पुढे चालू असायचा.कधी कधी सनईवाले मिरवणुकीत बोलवले जायचे.मिरवणुकीचा आनंद द्विगुणित व्हायचा.एखाद्याचा बैल ढोलाच्या आवाजानं बुजला जायचा मग त्याला आवरताना त्याच्या मालकाची तारांबळ उडायची.थोडावेळ आवाजाची सवय झाली की मग तो बैल शांत व्हायचा.आम्ही लहान मुलं बैलांच्या शिंगात अडकवलेले फुगे मोठ्या माणसांचा डोळा चुकवून मिठाचा खडा टाकून फोडायचो.त्यावेळी त्याची मजा यायची. मिरवणूक वाडीच्या खाली भैरोबाच्या देवळापासून फिरुन परत वरती अकरापर्यंत जायची.अकरावर एकमेकांना गुलाल लावला जायचा,नारळ फोडून, बैलांवरुन लिंबू उतरवून टाकले जायचे.नारळाचा प्रसाद वाटला जायचा.मग ही मिरवणूक परत फिरायची.परत येताना ज्याचं घर येईल त्याच्या घरी त्याची बैलं जायची. घराच्या दारात मिरवणुकीतून परत आलेल्या बैलांची पूजा केली जायची.आजही बेंदरादिवशी घरातील स्त्रिया मिरवणुकीत परत आलेल्या बैलांच्या पायांवर गरम पाणी घालून हळदीकुकवांने बैलांचे पाय पुजतात.कपाळावर हळदीकुंकू वाहून निरांजनानं ओवाळलं जातं.बैलाच्या मालकाला गंध लावला जातो. भाताचा मुटका बैलांवरुन ओवाळून टाकतात.पुरणपोळीचा नैवेद्य त्यांना चारतात आणि मग घरात घेतात.
असा हा बेंदूर सण प्रत्येक शेतकऱ्यासाठी, त्याच्या कुटुंबासाठी आनंदाचा असतो. वर्षभर शेतात काबाडकष्ट करणाऱ्या बैलांप्रती असलेला प्रेमभाव व्यक्त होणारा सण. शेतकरी कुटुंबासाठी बैलं म्हणजे जणूकाही कुटुंबातील सदस्यच असल्यासारखे असतात.त्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं जातं.बैलजोडी म्हणजे सर्वस्व असतं.हा सण मुळाचा सण म्हणून आमच्याकडे ओळखला जातो. आमची आई या सणावर अनेक ओव्या सांगायची. मातीला महत्त्व असणारे आपले सण मग त्यात बेंदूर असेल,मकरसंक्रांत, दहीहंडी यासारख्या सणांमध्ये मातीपासून बनवलेल्या वस्तूंना महत्त्व दिलेलं आहे.शेवटी हा देह मातीतच मिळणार आहे.आणि शेतकऱ्याची मातीशी नाळ त्याच्या जन्मापासूनच जोडलेली असते. काळी माती ही त्याच्यासाठी दुसरी आईच असते.शेतकऱ्याचं मातीशी असं नातं जोडलेलं आहे.
आम्हाला अभिमान आहे अशा शेतकरी कुटुंबात जन्माला आलो त्याचा.आमचं काळ्या मातीवर आणि गोठ्यातील मुक्या प्राण्यांवर तितकंच़ प्रेम असतं जितकं घरातील माणसांवर असतं. आज बेंदूर या सणानिमित्त लहानपणी अनुभवलेल्या बेंदूर सणाच्या आठवणींना उजाळा मिळाला आणि मन परत बालपणातील आठवणीत हरवून गेलं.आताच्या मुलांना आम्ही जे अनुभवलं ते अनुभवता येत नाही.म्हणून थोडसं लिहलं.
माझी आठवण आपल्याला कशी वाटली ते नक्की प्रतिक्रियेतून सांगा. आपल्या सर्वांना बेंदूर सणाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद.
अशाच काही साठवणीतील आठवणी,कविता, पोवाडे आणि लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉगला एकदा अवश्य भेट द्या.
https://hinduraogole.blogspot.com/
🙏🏻🌹🍁🌸🌺🌸🍁🌹🙏🏻

0 Comments