वारी_संतांची
संत निर्मळाबाई
आनंदे वोविया तुम्हासी गाईन ।
जिवें भावें ओवाळीन पायावरी ।।
सुकुमार साजिरीं पाऊलें गोजिरी ।
ते हे मिरवलीं विटेवरी ।।
कटावरी कर धरोनी श्रीहरि ।
उभा भीमातीरी पंढरीये ।।
महाद्वारी चोखा तयाची बहिण ।
घाली लोटांगण उभयतां ।।
संत निर्मळा या संत चोखोबांच्या बहीण तसेच संत बंका यांची पत्नी. मेहुणपुरा येथे संत निर्मळा राहत असून, याच निर्मळा यांचे रुप घेऊन प्रत्यक्ष पांडुरंग चोखामेळा यांच्या पत्नी संत सोयराबाई यांच्या बाळंतपणासाठी त्यांच्या घरी आला. अशी आख्यायिका आहे.
संत निर्मळा यांचे केवळ चोवीसच अभंग उपलब्ध आहेत. पण या अभंगाच्या जोरावर संत निर्मळा वारकरी संप्रदायातील संत मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई या महिला संतांच्या प्रभावळीत शोभून दिसतात.
ज्या काळात वर्ण व्यवस्थेमुळे गावकुसाबाहेरील उपेक्षित समाजाला घुसमटीचे जीवन जगावं लागत होतं ती कोंडी फोडण्यासाठी वेगवेगळ्या संतांनी प्रयत्न केला. त्यामध्ये संत चोखोबा व त्यांचे कुटुंबीय यांचा मोठा वाटा आहे त्याच कुटुंबातील संत निर्मळा बाई.
कर्मकांडात अडकून बसलेल्या समाजाला विठ्ठलभक्ती, नामसाधनेचा सोपा मार्ग सांगून या संतांनी अनिष्ट प्रथांचा बिमोड केला. संत निर्मळा यांच्यावर संत चोखोबांचा प्रभाव दिसून येतो. त्यांना चोखोबांनी गुरुमंत्र दिला.
चोखा म्हणे निर्मळेशी । नाम गाय अहर्निशी ।।
अशा त्या म्हणतात.
भक्तीमार्गावरून चालत असताना संत निर्मळाबाईंनी अभंग लिहिले त्यात विठ्ठलमहिमा, नाममहिमा, संसार सागरातून पार होण्याची आस असे दिसून येते.आपल्या अभंगातून चोखोबांवर असलेले प्रेम प्रकट करताना बऱ्याच वेळा 'चोखोबाची बहीण' असा उल्लेख करतात.
संत ज्ञानेश्वर - नामदेव या संत मंडळीत संत चोखामेळा यांच्यासह त्यांच्या कुटुंबाने स्थान मिळवले ही छोटी गोष्ट नाही. संत निर्मळाने संत मंडळीत आपले स्थान निर्माण केले ते स्वतःच्या कर्तुत्वावर ही साधारण बाब नाही.
रात्रंदिवस मन करी तळमळ ।
बहु हळहळ वाटे जीवा ।।
काय करू आता पाऊले न दिसती ।
पडिलेसी गुंती न सुटे गळें ।।
बहु हा उबग आला संसाराचा ।
तोडा फासा याचा मायबापा ।।
निर्मळा म्हणे आतां दुजेपण ।
सोफियाची आण तुम्हा असे ।।
वरील अभंगातून त्या काळात उपेक्षितांचे जीवन वाट्याला आलेल्या समाजाची उपेक्षा दिसून येते. संत निर्मळाबाई म्हणतात, पांडुरंगाच्या चरणाचे दर्शनही आम्हाला घेता येत नाही. याची खंत माझ्या मनात आहे त्या दर्शनासाठी माझे मन रात्रंदिवस तळमळत आहे, जीवाला हळहळ वाटत आहे पांडुरंगा तू या संसाराच्या पसाऱ्यातून माझी सुटका कर. तू माझा मायबाप आहेस. चोखोबांची शपथ घालून सांगते की देवा आता हा भेदभाव संपवून टाक. या अभंगातून केवळ पारमार्थिक अर्थ न शोधता सामाजिक अर्थही शोधायला हवा.
अशा या सोपा भक्तिमार्ग सांगणार्या एकनिष्ठ विठ्ठलभक्त असणाऱ्या संत निर्मळाबाई यांची समाधी मेहुणपुरा येथील निर्मळा नदीच्या तीरावर असून, ती त्यांच्या चरित्रासारखीच अज्ञात आहे.
राम कृष्ण हरी
लेखांकन :-
ह.भ.प. हिंदुरावमहाराज गोळे
सातारा जिल्हा सत्संगप्रमुख,
विश्व हिंदू परिषद.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
#निर्गुणवारी2021
#NirgunWari2021
#वारी_संतांची
खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻
https://hinduraogole.blogspot.com/
🙏🏻🚩🍁🌹🌸🍁🌸🌹🚩🙏🏻

0 Comments