वारी_संतांची
संत बंका महाराज
नाही प्रेमभाव नकळे मान्यता ।
सलगी बोलतां सुखवाटे ।।
अखंड नामावळी गाईन वेळोवेळीं ।
नित्य ती दिवाळी आम्हां घरीं ।।
संत समागम वैष्णवांचा हाट ।
पंढरीये पेठ दुमदुमली ।।
बंका म्हणे सुख तयांचे संगती ।
बैसेन पंगती हरिदांसा ।।
संत बंका महाराज हे संत चोखामेळा यांचे मेव्हणे तर संत सोयराबाईंचे भाऊ तसेच चोखामेळा यांची बहीण निर्मळा यांचे पती. असे नातेसंबंध असणारे हे कुटुंब. चोखा-निर्मळा आणि सोयरा - बंका या बहिण भावांना संतमंडळीत मानाचे स्थान आहे.
या दोन्ही घरात विठ्ठलभक्तीची परंपरा होती. चोखामेळा यांची पत्नी संत सोयराबाई, मुलगा कर्ममेळा, बहीण निर्मळा आणि मेव्हणे बंका यांचे अभंग प्रसिद्ध आहेत.
स्पृश्य अस्पृश्यत्तेच्या समाजातील मानसिक अवस्थेत हे कुटुंब विठ्ठल भक्तीत रममाण होते. संत ज्ञानेश्वरांच्या वारकरी संप्रदायातील सामाजिक समरसतेच्या कार्यातील सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे हे कुटुंब.
आपल्या वाट्याला आलेले उपेक्षित जीणं,लोकांकडून होणारा छळ, विटंबना या त्रासाने बंका कधीही विचलित झाले नाहीत. त्यांची विठ्ठलभक्ती दृढनिश्चयी होती. विठ्ठलावर त्यांची अपार श्रद्धा होती. म्हणूनच ते म्हणतात, पांडुरंगा वाचून दुसरा कोणी सखा सोबती नाही. निर्वाणी पावणारा असा मायबाप म्हणजे पांडुरंग. त्याचे नामस्मरण करणाऱ्याचा तो उद्धार करतो. असा चार युगी दुसरा कोण आहे ? त्याने गणिका, गजेंद्र अजमेळा यांचा केवळ ते त्याचे नामस्मरण करीत होते म्हणून उद्धार केला.
पांडुरंग वाचोनी दुजा कोण सखा ।
निर्वाणीचा देखा मायबाप ।।
तारीतसे एका नावांसाठी जगा ।
ऐसा हा पै गा श्रेष्ठा चार ।।
गणिका गजेंद्र यांसी उद्धरिले ।
प्रत्यक्ष तारीलें अजामेळा ।।
बंका म्हणे आहे हा भरवंसा ।
मज तव सर्वेशा विठोबाचा ।।
संत बंका यांचे संत चोखामेळा हे गुरु आहेत. चोखोबांच्याच मार्गावर चालत संत बंका यांनी भक्तीची वाट धरली.
बंका म्हणे माझा चोखा गुरुमाऊली ।
तयाचे पाऊली लोटांगण ।।
संत मंडळीत संत बंका महाराज यांचे स्थान आघाडीवर होते. संत नामदेव संत बंकांचे स्थान कसे आघाडीवर होते हे सांगताना म्हणतात,
गर्जती विठ्ठल पवाडे।
बंका काढीला पुढे ।।
जनाबाईंच्या अभंगात विठ्ठलाने बंका यांना कडेवर उचलून घेतलेले आहे याचे वर्णन आहे.
संत मंडळीत मानाचे स्थान असले तरी अस्पृश्य म्हणून समाजाकडून होणारा त्रास संत बंका यांना चुकला नव्हता. या वागणुकीचा त्रास मनात होणारी घुसमट ते अभंगातून व्यक्त करतात.
हीन याती दीन पतित आगळा ।
म्हणोनी कळवळा नये माझा ।।
या संत बंका महाराजांची व त्यांची पत्नी संत निर्मळा यांची समाधी 'मेहुणपुरा' या बुलढाणा जिल्ह्यातील गावात निर्मळा नदीच्या पात्रात शिवलिंग स्वरूपात आहे.
राम कृष्ण हरि🚩🚩🚩
लेखांकन :-
ह भ.प. हिंदुराव महाराज गोळे
सातारा जिल्हा सत्संगप्रमुख
विश्व हिंदू परिषद
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
#निर्गुणवारी2021
#NirgunWari2021
#वारी_संतांची
खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻
https://hinduraogole.blogspot.com/

0 Comments