Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

वारी संतांची --- संतशिरोमणी श्रीसंत सेना महाराज

वारी_संतांची

संत सेना महाराज

आम्ही वारीक वारीक ।
करु हजामत बारीक ।।
विवेक दर्पण आयना दावू । 
वैराग्य चिमटा हाळवू ।।
उदक शांती डोई घोळू ।
अहंकाराची शेंडी पिळू ।।
भावार्थाच्या बगला झाडू । 
काम क्रोध नखे काढू ।।
चौवर्णा देऊनि हात ।
सेना राहिला निवांत ।।


    संत ज्ञानदेव - नामदेव यांच्या नेतृत्वाखाली वारकरी संप्रदायातील अध्यात्मिक लोकशाहीचा पाया रचला गेला. त्यांनी अठरा पगड जातीतील सर्व संतांना विठ्ठलभक्तीच्या एका धाग्यात एकत्र आणून चंद्रभागेच्या वाळवंटात सामाजिक समता, बंधुता, सामाजिक समरसता समाजात निर्माण केली.
       या ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतील संतांमध्ये संत सेना महाराज यांचा समावेश होतो. संत सेना महाराज यांचा जन्म उत्तर हिंदुस्थानातील मध्यप्रदेशातील 'बांधवगड' येथे झाला. नाभिक समाजात जन्माला आलेल्या सेना महाराजांनी आपल्या वाट्याला आलेल्या व्यवसायालाच परमार्थात बांधून भक्तिभावाने व्यवसाय आणि परमार्थ केला.
       वारकरी संप्रदायातील वेगवेगळ्या जातीत जन्माला आलेल्या संतांनी आपल्या जातीची ओळख आपल्या अभंगातून करून दिली. त्यात त्यांना कसलाही न्यूनगंड वाटला नाही. संत सावतामाळी म्हणतात, 'आमची माळीयाची जात', संत गोरा कुंभार आपल्या व्यवसायाची ओळख अभंगातून करून देतात, नरहरी सोनार म्हणतात,' देवा तुझा मी सोनार', तर सेना महाराजांनी , 
'आम्ही वारीक वारीक। करू हजामत बारीक ।'
या अभंगातून आपला व्यवसाय सांगितला. संतांना जर त्यांच्या जातीचा उल्लेख करताना संकोच वाटत नव्हता तर आजकाल जातीच्या नावावरून संतांची विभागणी का केली जात असेल ? आम्हाला संत किती कळाले ?
     संत सेना महाराजांचे सुमारे दीडशे अभंग उपलब्ध आहेत. त्यांचे काही अभंग हिंदी भाषेतही आहेत. संत नामदेवांप्रमाणे संत सेना महाराज यांनी उत्तर हिंदुस्थानात वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान पोहोचवले.
    सेना महाराजांच्या आई वडिलांचे नाव देविदास आणि प्रेमकुंवर. वडिलांच्या सहवासात सेना महाराजांवर ईश्वरभक्तीचे संस्कार झाले. भजन-कीर्तन आणि श्रवणभक्तीतून त्यांची ज्ञानसाधना सुरू झाली. रामानंद स्वामी हे देविदास यांचे गुरु होते. याच रामानंद स्वामींनी संत सेना महाराजांना उपदेश केला. त्यांना रामनामाचा मंत्र दिला.
       वडिलांचा व्यवसाय पुढे सेना महाराजांकडे आला. सेना महाराजांचे जीवन नेमस्त होते. आपली धोकटी घेवुन आपल्या व्यवसायासाठी प्रसन्न मनाने जाणे, देवपूजा, सत्संग, संतसेवा आणि नामस्मरण यामध्ये ते नित्य काया वाचा मनाने रमून जात. विठ्ठलभक्ती प्रमाणेच ते आपला व्यवसाय ही मनापासून करीत. सेना महाराज राजदरबारातही राजाच्या सेवेसाठी जात असत.
सेना महाराजांबाबत एक कथा सांगितली जाते, एकदा सेना महाराज भजनात गुंग होऊन राजदरबारात जाण्याचे विसरून गेले. तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंगाने सेना महाराजांचे रुप घेऊन राजवाड्यात जाऊन सेना महाराजांचे काम केले.
जनाबाई या प्रसंगाचे वर्णन करताना म्हणतात,

रूप पालटोनि गेला । 
सेना न्हावी विठ्ठल झाला ।।
काखे घेऊनी धोकटी । 
गेला राजियाचे भेटी ।।
आपुले हात भार घाली । 
राजियाची सेवा केली ।।
विसर तो पडला रामा । 
काय करू मेघश्यामा ।।
       उत्तरेतून महाराष्ट्रात आलेले संत सेना महाराज पंढरपुरात संतांच्या मांदियाळीत रमले.विठ्ठलभक्तीत तल्लीन झाले. त्यांनी जनसामान्यांना दिलेले विचार मौलिक आहेत. साधकावस्थेतून सिद्धावस्थेत पोहोचलेले संत सेना महाराज म्हणतात, दंभ नसावा, अहंकार नसावा, आपले कर्म भगवंताचेच आहे भगवंतासाठीच आहे, निरपेक्षभावाने मनापासून आपले कर्म करावे, कोणतेही काम हलके समजू नये, जात, पंथ, धर्म असा कोणताही भेद नाही असे ते सांगत.
      सेना महाराजांना मानणारा, त्यांचा उपदेश आचरणात आणणारा मोठा अनुयायी वर्ग तयार झाला होता. मारवाड, राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश अशा प्रांतात सेना महाराजांचा नावलौकिक गेला सामाजिक समरसता जपत रामभक्तीची चळवळ सेना महाराजांनी महाराष्ट्राबरोबरच इतर प्रांतातही उभी केली.
      सेना महाराजांचे अभंग मौलिक आहेत. पंढरपुरात पांडुरंगाच्या भक्तीत रममाण झालेले संत सेना महाराज म्हणतात, तुम्ही जिथे असाल तिथे भगवंताच्या नामाचे चिंतन करा यापेक्षा अन्य चांगले साधन नाही.

असाल तेथे नामाचे चिंतन । 
याहून साधन आणिक नाही ।।
    
      अशा थोर भगवंत भक्ताचा गौरव करताना संत म्हणतात,
सेना न्हावी भक्त भला ।
तेणे देव भुलविला ।।
   
      संत सेना महाराज श्रावण वद्य द्वादशीला देहभान विसरून नामस्मरण करू लागले. नामस्मरण करता करता ते समाधी अवस्थेतच अनंतात विलीन झाले.

माझे झाले स्वहित ।
तुम्हा सांगतो निश्चित ।।
करा हरिचे चिंतन ।
गावे उत्तम हे गुण ।।
श्रावण वद्य द्वादशी ।
सेना समाप्त त्यादिवशी ।।

राम कृष्ण हरी🚩🚩🚩

लेखांकन :-
ह.भ.प. हिंदुरावमहाराज गोळे
सातारा जिल्हा सत्संगप्रमुख,
विश्व हिंदू परिषद.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

#निर्गुणवारी2021
#NirgunWari2021
#वारी_संतांची 

    खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻

https://hinduraogole.blogspot.com/

🙏🏻🚩🕉️🍁🙏🏻🚩🕉️🍁🙏🏻

Post a Comment

0 Comments