Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

वारी संतांची --- संत नरहरी सोनार

वारी_संतांची

संत नरहरी सोनार

नाम फुकाचे फुकाचे ।
देवा पंढरीरायाचे ।।
नाम अमृत हें सार ।
हृदयी जपा निरंतर ।।
नाम संतांचे माहेर ।
प्रेम सुखाचे आगर ।।
नाम सर्वांमध्ये सार ।
नरहरी जपे निरंतर ।।

        संत नरहरी सोनार हे कट्टर शिवभक्त होते. पण वैष्णवांच्या मेळ्यात आल्यानंतर स्वानुभवानंतर इतर संतांप्रमाणे नरहरीही हरिहराचे ऐक्य  असलेल्या विठ्ठलाच्या पूर्णपणे भजनी लागले.

    नरहरी सोनार हे कुळाचाराने आलेली शिवोपासना करीतच शिवभक्तीत रममाण होते. त्यांची शिवावर अढळ अशी श्रद्धा होती. त्यांच्याबद्दल एक आख्यायिका सांगतात, एकदा एका सावकाराने पांडुरंगाला करगोटा देण्याचा नवस केला होता. तो पूर्ण करण्यासाठी करगोटा बनवण्याचे काम नरहरी सोनारांना दिले गेले. नरहरी सोनार यांनी बनवलेला करगोटा छोटा झाला, पुन्हा बनवला तो मोठा झाला. शेवटी सावकाराने सांगितले आपण मंदिरात जाऊन पांडुरंगाच्या कमरेचे माप घ्यावे. पण नरहरी कट्टर शिवभक्त इतर देवतांकडे ते पहात नसत मग ते डोळे बांधून मंदिरात गेले. माप घेऊ लागले तर पांडूरंगाच्या जागी शिवपिंडी असल्याचे त्यांना जाणवले. डोळ्यावरची पट्टी उघडली तर समोर पांडुरंग ! या घटनेमुळे संत नरहरी सोनार यांना हरिहर एकच असल्याचा साक्षात्कार झाला. त्यांच्या भक्तीला डोळसपणा आला आणि नरहरी सोनार कायावाचामनाने पूर्णपणे विठ्ठलमय झाले. टोकाचे कट्टर शिवभक्त असलेले संत नरहरी सोनार पांडुरंगाच्या चरणी लीन तल्लीन झाले. शिव-विष्णू हा भेद संपुष्टात आला. अद्वैताचा साक्षात्कार झाला.
      
     संत नरहरी सोनार हे सोनाराचा  व्यवसाय करीत. आपला व्यवसाय करत असतानाच मुखाने विठ्ठलाचे नामस्मरण सतत चालू असायचे. त्यांनी आपल्या व्यवसायालाच पारमार्थिक रूपात बांधले आहे. आपल्या वाट्याला आलेला व्यवसाय त्यांना विठ्ठलमय वाटू लागला. प्रपंच धंदा सांभाळून त्यांनी विठ्ठलभक्ती केली.  त्यांचा एकूण व्यवहारच विठ्ठलमय झालेला होता. ते म्हणतात,
देवा तुझा मी सोनार ।
तुझे नामाचा व्यवहार ।।
देह बागेसरी जाणें ।
अंतरात्मा नाम सोने ।।
त्रिगुणाची करुनी भूस ।
आंत  ओतिला ब्रह्मरस ।।
जीव शिव करुनि फुंकी ।
रात्रंदिवस ठोकाठोकी ।।
विवेक हातवडा  घेऊन ।
कामक्रोध केले चूर्ण ।।
मन बुद्धीची कातरी । 
रामनाम सोने चोरी ।।
ज्ञान ताजवा घेऊनि हाती । 
दोन्ही अक्षरे जोखिती ।।
खांद्या वाहुनि पोतडी । 
उतरला पैलथडी ।।
नरहरी सोनार हरीचा दास । 
भजन करी रात्रंदिवस ।।

     कर्म आणि भक्ती या दोन्हींचा संगम संत नरहरी सोनार यांच्या जीवनात होता तेच त्यांच्या अभंगातून जाणवते.

    सुवर्णकाराचा व्यवसाय चालू असताना या संत कवीचे काव्य अलौकिक असे फुलले होते. तुलनेने फारच कमी संख्येत उपलब्ध असलेले त्यांचे अभंग म्हणजे एक सुवर्णठेवाच आहे. त्यांनी वाग्देवीच्या अंगावर जे काही काव्य रुपी अलंकाराचे लेणे चढविले आहे  ते आकाराने लहान असले तरी त्याला बावन्नकशी सुवर्णाचा मुलामा लावलेले आहे. त्यांचे अभंग फार कमी आहेत. पण परमार्थ साधताना आपला व्यवसाय कसा चालला आहे हे त्यांच्या अभंगाच्या रूपकातून कळून येते.

    नरहरी सोनार साक्षात्कारी संत म्हणून ओळखले जातात. आपला प्रपंच त्यांनी परमार्थस्वरूप केला. निष्कामता पावलेल्या नरहरींनी विठ्ठलभक्ती, परमार्थ चिंतन हेच आपले जीवन मानले. रामनामात तल्लीन होऊन मिळालेला दुर्लभ मनुष्यजन्म सार्थकी लावला. आपले जीवन सुवर्णमय केले. त्याला सोन्याची झळाळी दिली.

     मिळालेला जन्म व्यर्थ न दवडता सार्थकी लावा असा उपदेश ते सकलजनांना करताना म्हणतात,

नरहरी म्हणे शेवटी । 
संगे न येई लंगोटी ।।

राम कृष्ण हरी 🚩🚩🚩

लेखांकन:-
ह.भ.प. हिंदुराव महाराज गोळे
सातारा जिल्हा सत्संग प्रमुख,
विश्व हिंदू परिषद

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

#निर्गुणवारी2021
#NirgunWari2021 
#वारी_संतांची

    खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻

https://hinduraogole.blogspot.com/

🙏🏻🚩🕉️🍁🌹🙏🏻🍁🕉️🚩🌹🙏🏻

Post a Comment

0 Comments