वारी_संतांची
संत सावता माळी
आमुची माळियाची जात ।
शेत लावू बागाईत ।।
आम्हा हाती मोट नाडा ।
पाणी जाते फुलझाडा ।।
शांती शेवंती फुलली ।
प्रेम जाई जुई व्याली ।।
स्वकर्मात व्हावे रत ।
मोक्ष मिळे हातोहात ।।
सावताने केला मळा ।
विठ्ठल देखियला डोळा ।।
अरण या गावी संत सावता माळी यांचा जन्म शके ११७२ ला झाला. संस्कारक्षम कुटुंबातील वातावरणात सावतोबा लहानाचे मोठे झाले. लहानपणापासूनच ईश्वरभक्ती, विठ्ठलभक्तीची ओढ त्यांच्या मनात सतत लागली होती. विठ्ठलनामाची गोडी, निर्मळ भक्तिभाव आणि उत्कट प्रेमभावना मनीमानसी जपणारे सावतामाळी अलौकिक संत म्हणून ओळखले जातात.
संत सावतामाळी यांचे पंचवीसेक अभंग उपलब्ध आहेत. आपल्या शेतातील मळ्यात काम करता करता आपला मळाच विठ्ठल आहे अशी त्यांची भावना झाली होती. त्यांना मळ्यातील भाजीत विठ्ठलाचे रूप दिसत होते म्हणूनच ते म्हणतात,
कांदा मुळा भाजी ।
अवघी विठाई माझी ।।
लसूण मिरची कोथिंबिरी ।
अवघा झाला माझा हरी ।।
मोट नाडा विहीर दोरी ।
अवघी व्यापिली पंढरी ।।
सावत्याने केला मळा ।
विठ्ठल पायी गोविला ।।
शेतात आपण करीत असलेले काम मळ्याची राखण, देखभाल, काळजी घेणे, कष्ट करून तो छान फुलवणे हे विठ्ठलाचे काम आहे, ही विठ्ठलाची सेवा चाकरी करणे आहे असे संत सावतामाळी मानीत होते. तसेच विठ्ठलाच्या पायाशी माझा मळा गुंतलेला आहे असे ते मानत होते.
मळ्यात काम करता करता विठ्ठलाचे नामस्मरण करणाऱ्या सावतोबांचा पारमार्थिक अधिकार एवढा मोठा होता की त्यांच्या भक्तिभावाला भूलून प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटायला त्यांच्या मळ्यात आला.
प्रपंचातील अनासक्ती, विरक्ती, 'प्रपंच हाच परमार्थ' ही वृत्ती, कष्टाळू प्रेमळ ऋजू स्वभाव, विठ्ठलभेटीची अनावर ओढ पण तरीही आपला काम धंदा व्यवसाय सोडून न जाणे. उलट आपल्या दैनंदिन कामातून सावतोबांनी विठ्ठलभक्तीचा आदर्श निर्माण केला. ज्ञानदेव नामदेवांप्रमाणे आत्मानुभव अनुभवला.
देवाने भक्ताचा भाव ओळखून पंढरीतून सावतोबाच्या मळ्यात त्यांच्या भेटीसाठी आला. वारी नंतर परत जाताना पालखी अरण येथे सावता माळी यांना भेटायला जाते. ही सावतोबांची त्यांच्या भक्तीची थोरवी आहे.
आपल्या कर्मासच भक्तीरूप मानणारे संत सावता माळी यांना विठ्ठल भक्तीत स्वतःची सुखदुःखे, प्रपंच, मानापमान या साऱ्याचाच विसर पडला कर्तव्यकर्मे निष्ठेने करणे हाच स्वधर्म मानून सतत कामात राहणे, संतसंगतीत राहणे, नामजपात राहणे हाच सावतोबांचा स्थायीभाव झाला होता.
आषाढ वद्य चतुर्दशी शके १२१७ ला अरणभेंडी येथे संत सावतामाळी अनंतात विलीन झाले.
संत सावता माळी यांच्या विषयी संत एकनाथ गौरवोद्गार काढतात,
माळीयाचे वंशी सावता जन्मला ।।
पावन तो केला वंश त्याचा ।।
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
लेखांकन :-
ह.भ.प. हिंदुरावमहाराज गोळे
सातारा जिल्हा सत्संगप्रमुख,
विश्व हिंदू परिषद.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
#निर्गुणवारी2021
#NirgunWari2021
#वारी_संतांची
खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻
https://hinduraogole.blogspot.com/
🙏🏻🚩🍁🌹🙏🏻🚩🍁🌹🙏🏻

0 Comments