#वारी_संतांची
संत कर्ममेळा
आहेसी ठाऊक मागां संतजनां ।
रिणाईत जाणा बहुतांचा ।।
घेणे ज्यांचे त्यास देणे नाही हरि ।
ऐसे हे परी जाणतसों ।।
साजतसे तुम्हा थोर थोरपणा ।
आमुचे कारण आम्हीं जाणों ।।
कर्ममेळा म्हणे पंढरीनिवासा ।
आपुला तो ठसा सांभाळावा ।।
संत चोखामेळा आणि संत सोयराबाई यांचे पुत्र म्हणजे संत कर्ममेळा. संत सोयराबाईंच्या बाळंतपणासाठी प्रत्यक्ष विठ्ठलाने चोखोबांच्या बहिणीचे, निर्मळाचे रूप घेऊन सोयराबाईंच्या बाळंतपणातील सेवा केली. हे बाळ म्हणजे संत कर्ममेळा. अशी कर्ममेळा यांच्या जन्मकाळाची आख्यायिका सांगितली जाते.
संत चोखामेळा जरी उपेक्षित समाजात जन्माला आले असले तरी त्यांची भगवंतभक्ती थोर होती.त्यांचे संपूर्ण कुटुंबच भक्तीपरंपरा जोपासणारे होते. त्यांचे पुत्र संत कर्ममेळाही या भक्तपरंपरेचा विठ्ठलभक्तीचा हा वारसा पुढे चालवत होते.
ज्ञानेश्वरांनी केलेल्या वारकरी संप्रदायातील सामाजिक क्रांतीमुळे अध्यात्माची कवाडे सर्वांसाठी खुली झाली.सर्व जातीतील, पंथातील भक्तजन या वारकरी संप्रदायाच्या अध्यात्मिक क्रांतीच्या प्रवाहात आला आणि सामाजिक बदल घडून भेदाभेद विसरून सामाजिक समरसतेतून समाज जोडला गेला. समाज सामाजिक स्तरावर एकसंघ, एकमय एकरूप झाला.
चोखोबा या ज्ञानेश्वरादी प्रभावळीतील संतांच्या सहवासातील एक संत. ते स्वतः आणि त्यांचे कुटुंबीय हीनतेचं जगणं जरी वाट्याला आलं तरी भक्तिमार्गावरून भगवंताच्याप्रति निष्ठेने जगत आलं. चोखोबाचं नव्हेतर त्यांची पत्नी सोयराबाई पुत्र कर्ममेळा हे संतपदाला पोहचले. संतांच्या मांदियाळीत या कुटुंबाला मानाचं आणि आदराचे स्थान आहे. संत साहित्यात त्यांच्या अभंगांचे वेगळे वैशिष्ट्य आहे. सामाजिक विषमतेच्या निर्मूलनाचे वारकरी सांप्रदायातील कार्याचे हे कुटुंब उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल.
चोखोबांचे पुत्र संत कर्ममेळा यांचे केवळ सत्तावीसच अभंग उपलब्ध आहेत.या अभंगातून कर्ममेळा यांचे अलौकिक व्यक्तिमत्त्व समोर येते.त्यांची बंडखोर व आक्रमकवृत्ती अभंगातून दिसून येते. त्यांच्या अभंगातून त्यांच्या संवेदनशील, बंडखोर, चौकस, प्रगल्भ, तरल व्यक्तिमत्त्वाची छटा दिसून येते.
संत कर्ममेळा प्रसंगी देवालाही धारेवर धरतात. ते म्हणतात,
कर्ममेळा म्हणे पंढरीनिवासा ।
आपुला तो ठसा सांभाळावा ।।
देवा तुझ्या वर विसंबून असणाऱ्यांचे कल्याण करणे तुला शक्य होत नसेल तर तू तुझे भक्तवत्सल हे ब्रीद सोडून दिलेले बरे. असे खडे बोल ते पंढरीनाथाला सुनावतात.
तत्कालीन समाज व्यवस्थेमुळे कर्ममेळा यांना जो त्रास झाला त्याचा संताप व्यक्त करत असतानाही त्यांनी आपला विवेक ढळू दिला नाही. कर्ममेळा यांच्या अभंगातून भक्तीकाव्य जरी प्रकट होत असले तरी समाज व्यवस्थेमुळे मिळालेली तिरस्काराची, छळवादाची वागणूक याचा उलगडा करताना ते आक्रमक भाषाशैली धारण करतात.
संत कर्ममेळा तत्कालीन लोकव्यवहार आणि आध्यात्मिक लोकशाही यांच्यातील व्यावहारिक भावनिक संघर्ष याचे निरीक्षण आपल्या अभंगातून मांडतात. ज्ञानेश्वरांनी मांडलेल्या चिद् विलासी तत्त्वज्ञानाचे सामाजिक स्तरावरील उपयोजनाचे प्रतिबिंब म्हणजे संत कर्ममेळा यांचे अभंग आहेत असं म्हणता येईल.
कर्ममेळा पांडुरंगाला म्हणतात, माझे वडील चोखोबांचा तू सांभाळ केलास. आता त्यांच्या पश्चात आमचाही सांभाळ तू करावास. आणि तो तू करीतच आहेस. तुझ्याशिवाय आता आम्हाला कोण आहे अशी ते विनवणी करतात.
तयाचियामागें आमुचा सांभाळ ।
कैसा तू दयाळ करितोसी ।।
कर्ममेळा म्हणे पंढरीरायातें ।
आता आहे आमुतें कोण सांगा ।।
राम कृष्ण हरि 🚩🚩🚩
लेखांकन:- ह.भ.प. हिंदुरावमहाराज गोळे
सातारा जिल्हा सत्संगप्रमुख,
विश्व हिंदू परिषद
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
#निर्गुणवारी2021
#NirgunWari2021
#वारी_संतांची
खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
https://hinduraogole.blogspot.com/
🙏🏻🚩🌹🍁🌹💐🍁🚩🙏🏻

0 Comments