Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

वारी संतांची -- संत सोयराबाई

#वारी_संतांची

संत सोयराबाई


चोखोबाची बहीण झाला शाड़ंगधर ।
वहिनी उघडा दार हाका मारी ।।


ज्यांनी पांडुरंगाला ही स्वतःच्या भक्तिभावाने भेटीची भुरळ पाडली अशा संत चोखामेळा यांच्या पत्नी म्हणजे संत सोयराबाई. संत चोखामेळा यांचे संपूर्ण कुटुंबच विठ्ठलभक्तीत रममाण झाले होते. त्यांचे पुत्र कर्ममेळा, चोखोबांची बहीण निर्मळा, आणि स्वतः सोयराबाई यांचे अभंग उपलब्ध आहेत. संत सोयराबाई यांचे बासष्ठ अभंग उपलब्ध असून 'चोख्याची महारी' असा स्वतःचा उल्लेख त्या करतात. सोयरा हे नाव त्यांनी खूपच कमी अभंगातून वापरले आहे.

सोयराबाई आपल्या पतीच्या म्हणजेच संत चोखामेळा यांच्या सेवेत दक्ष होत्या. संत चोखोबांना संत मंडळीत मान होता. त्या काळात उपेक्षित समजल्या जाणाऱ्या 'महार' जातीत जन्मलेल्या चोखोबांना समाजाकडून हीनतेची वागणूक मिळाली. परंतु ज्ञानेश्वरांच्या संप्रदायातील समानतेच्या, समतेच्या, समरसतेच्या प्रवाहातील संतांनी चोखामेळा यांचा नेहमीच आदरच केला. चोखोबांची राहणी अतिशय स्वच्छ होती. आपल्या वाट्याला आलेले जातीकर्म आटोपून ते पांडुरंगाची भक्ती करीत. सोयराबाई आपल्या पतीच्या सेवेत धन्यता मानीत. सोयराबाई पारमार्थिक वृत्तीच्या होत्या.

पंढरपुरातील बडव्यांनी चोखोबांचा खूप छळ केला. चोखोबांनीही हा छळ निमूटपणे सहन केला. पंढरपुरातील पांडुरंगाच्या मंदिराच्या महाद्वाराच्या पायरीवरून उभे राहून चोखोबा दर्शन घेत असताना, 'चोखोबा महाराने शिवाशीव केली', म्हणून चोखोबांना मारहाण झाली. अंगावर घाव पडत होते तरी चोखोबा मुखाने विठ्ठलाचे नाव घेत होते. सोयराबाईंनी पदर पसरला काकुळतीने विनवणी केली तरीही चोखोबांना मारहाण होत होती. असे अत्याचार, उपेक्षा होत असूनही चोखोबा आणि सोयराबाई यांनी विठ्ठलभक्ती सोडली नाही.

अशी आख्यायिका आहे की, सोयराबाईंच्या बाळंतपणासाठी स्वतः पांडुरंग चोखोबांच्या बहिणीचे रूप घेऊन सोयराबाईंच्या सेवेसाठी त्यांच्या घरी आला. सोयराबाई आपल्या अभंगात आपल्या मुलाचे म्हणजे कर्ममेळ्याचे बारसे स्वतः पांडुरंगाने केले असे म्हणतात. हा कर्ममेळा आपल्या आई-वडिलांप्रमाणेच भगवंत भक्त होता. त्याचेही अभंग उपलब्ध आहेत.

संत सोयराबाईचे अभंग सोप्या भाषेत असून रसाळ आहेत. आपल्या रसाळ वाणीतून सोयराबाईंनी पांडुरंगा समोर आपले उपेक्षित जीवन मांडले आहे. प्रसंगी त्या विठ्ठलाशी भांडायला ही उठतात.

सोयराबाईंच्या अभंगातून विठ्ठलभक्तीचे दर्शन घडते. त्यांना जरी मंदिरात प्रवेश नव्हता तरी कधीतरी त्या विठ्ठलाच्या मंदिरात गेल्या असाव्यात पांडुरंगाचे मुख दर्शन घेतले असावे असे त्यांच्या अभंगातील विठ्ठलाचे वर्णन पाहून सतत वाटत राहते.

चोखोबांच्या सहचारिणी, कर्तव्यदक्ष धर्मपत्नी, एक श्रेष्ठ स्त्री संत कवी म्हणून संत सोयराबाईंच्या उल्लेख संतसाहित्यात आढळतो.

संत सोयराबाईंचा एक अत्यंत लोकप्रिय अभंग आहे.तो अभंग आपणास अतीव आनंद प्रदान करतो. त्यात त्या म्हणतात ,
माझा देव श्रीरंग भजन रंगात रंगलेला आहे त्यामुळे अवघा रंग एकच झाला आहे .अद्वैत भावाने काम आणि क्रोध लयाला गेले असून विदेही झाल्यामुळे पांडुरंगाच्या दर्शनाने समाधी अवस्था लाभते. पाहणारा आणि जे पाहायचे आहे त्यातील भेदच लोपला आहे.

अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ।।
मी तूं पण गेलें वाया । पाहता पंढरीच्या राया ।।
नाही भेदाचें तें काम । पळून गेले क्रोध काम ।।
देहीं असूनी विदेही । सदा समाधिस्थ पाहीं ।।
पाहते पाहणें गेलें दुरी । म्हणे चोख्याची महारी ।।

राम कृष्ण हरि 🚩🚩🚩

लेखांकन:-
ह.भ.प. हिंदुरावमहाराज गोळे
सातारा जिल्हा सत्संगप्रमुख,
विश्व हिंदू परिषद

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

#निर्गुणवारी2021
#NirgunWari2021
#वारी_संतांची

    खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

https://hinduraogole.blogspot.com/

🙏🏻🚩🌹🍁🌸🚩🌹🍁🙏🏻

Post a Comment

0 Comments