Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

वारी संताची _ संत जनाबाई

#वारी_संतांची

संत जनाबाई


नाम विठोबाचे घ्यावे ।मग पाऊल टाकावे ।।
नाम तारक हे थोर । नामे तारील अपार ।।
अजामेळ उद्धरिला । चोखामेळा मुक्तीस नेला ।।
नाम दळणी कांडणी । म्हणे नामयाची जनी ।।


    गोदावरीच्या तीरी गंगाखेड हे संत जनाबाईंचे जन्मगाव.दमा हे त्यांचे वडील व आईचे नाव करुंड. जनाबाई पाच सहा वर्षाची असताना त्यांची आई मृत्यू पावली.दमाने नामदेवांचे वडील दामाशेट्टी यांच्याकडे जनाबाईला स्वाधीन केले. संत नामदेवां पेक्षा किमान दहा-बारा वर्षांनी मोठी असलेली जनाबाई पुढे मात्र नामदेवांना गुरुस्थानी मानून अभंग रचना करून विठ्ठल भक्तीत दंग होते.

      स्त्रीसुलभ मनाचे दर्शन जनाबाईच्या अभंगातून दिसून येते .उपेक्षित समजल्या जाणाऱ्या कुळात जन्माला आलेली, दामाशेट्टींच्या घरी दासी म्हणून काम करत असलेली जनाबाई विठ्ठल भक्तांच्या मांदियाळीत स्त्री संत म्हणून ओळखली जाते.

     ज्या नामदेवांना अंगाखांद्यावर खेळविले त्याच 'नामयाची दासी जनी' म्हणून ती वावरली. दामाशेट्टी यांच्या घरातील विठ्ठलभक्तीची परंपरा अपरंपार होती. हाच भक्तीचा ठेवा जनाबाईलाही लाभला. तिथेच विठ्ठलभक्ती त्यांच्या भावकोमल हृदयात रुजली. विठ्ठलभक्तीचा ध्यास लागलेली जनाबाई म्हणते, दळीता कांडिता ।तुज गाईन अनंता ।।

   स्त्रीच्या दैनंदिन कामातही जनाबाईच्या अभंगातून विठ्ठल भक्ती प्रकट होत असते. दैनंदिन कामात सतत गुंतलेली जनाबाई गोवऱ्या थापणारी ,दळणकांडण करणारी, धुणीभांडी करणारी, नामदेवांच्या घरी काबाडकष्ट करणारी जनाबाई आपल्या जीवनातील दुःख वेदना ती पांडुरंगाला सांगत असताना तिच्या अभंगातून दिसून येते.

    जनाबाईचे अभंग भावोत्कट असे आहेत.तसेच ते वास्तवादी देखील आहेत. जनाबाईंचे अभंगात विठ्ठल प्रेमाबरोबरच उपदेशही आहे.तिचे मनोविश्व विठ्ठलमय होऊन गेले आहे. त्यामुळे त्यांच्या मनाची अवस्थाही तशीच आहे. त्या अवस्थेचे दर्शन त्यांच्या काव्यात घडते. असा स्त्रीच्या वात्सल्य,कोमल ऋतुजा, समर्पण त्यागी वृत्तीचे स्त्रीसुलभ भावनांचे दर्शन जनाबाईंच्या काव्यातून दिसून येते. त्यांचे जागृत स्त्री मन एक स्वतंत्र भाषेचे प्रतिनिधित्व करते . स्त्रीपण त्यांच्या परमार्थाच्या आड येत नाही.वारकरी संप्रदायात सामाजिक स्तरावर भेदाभेद ,लिंगभेद मानला जात नव्हता. ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतील संतांचा सहवास लाभलेल्या जनाबाईंचा आध्यात्मिक अधिकार मोठा होता इतका मोठा की प्रत्यक्ष पांडुरंगाला जनाबाईनी शिव्या घालाव्यात. अर्थात त्याच्या मागचा भाव हृदयस्पर्शी आहे.

    नामदेवांप्रमाणे जनाबाईंनी ही विठ्ठल महात्म्य आपल्या अभंगातून गायले.कृष्णजन्म, बालक्रीडा, पाळणा ,काला, हरिश्चंद्राख्यान हे विषयही जनाबाईंनी आपल्या अभंगातून मांडले.
    
     जनाबाईंनी विठ्ठलाशी नाते जोडले होते.प्रत्यक्ष विठ्ठल तिला तिच्या कामात मदत करीत असे अशी आख्यायिका आहे. आत्मसाक्षात्काराची ग्वाही देताना जनाबाई म्हणतात,
डोळे झाकून पाहे ।पुढे गोपाळ उभा राहे ।।
अनु रेणू चक्रपाणी। खूण झाली दासी जनी ।।
   अशा असामान्य स्त्री संत जनाबाईना असामान्यत्व गाठताना खूप मोठा लढा द्यावा लागला. आषाढ वद्य शके १२७२ ला त्या पांडुरंगाचरणी विलीन झाल्या.

 नामदेव जनाबाई ।।
नामदेव जनाबाई ।।

लेखांकन:-
ह.भ.प.हिंदुरावमहाराज 
सातारा जिल्हा सत्संगप्रमुख,
विश्व हिंदू परिषद

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

#निर्गुणवारी2021
#NirgunWari2021
#वारी_संतांची

   खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

https://hinduraogole.blogspot.com/

🙏🏻🌹🍁🌸🙏🏻🌹🍁🌸🙏🏻

Post a Comment

0 Comments