Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

ध्येयवेडा

ध्येयवेडा 

        तसं पाहिलं तर हा माणूस एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक शेतकरी, कष्टकरी मुलगा. वडील गिरणी कामगार जी संपात बंद झाली. शेती करुन मिळेल त्यात समाधानानं जगण्याची सवय.कमी आहे त्याची खंत नाही आणि अधिक असावं याची हाव नाही.

     बरं शैक्षणिक पार्श्वभूमी म्हणावी तितक्याही उंचीची नाही.जेमतेम दहावी पास. पण व्यायामाची आवड लाल मातीशी जन्मताच नाळ जोडली असल्याने कुस्तीची आवड.व्यायामानं आणि शेतातील अंगमेहनतीच्या कष्टानं कमावलेलं शरीर.घरात दुधदुभतं असल्याने दुध,तूप खाऊन चेहऱ्यावर असलेलं तेज.चार माणसात उठून दिसणारं व्यक्तिमत्त्व.

       त्याच बरोबर वारकरी सांप्रदायाचा वारसा घरातूनच मिळाल्यामुळे वागण्या बोलण्यात नम्रता,इतरांबद्दल आदरार्थी वर्तन,देवा,धर्माची आवड असल्याने माळकरी नसला तरी पंढरीची वारी करणारा विठ्ठलावर श्रद्धा असणारा एक भक्तीमार्गावर चालणारा सरळमार्गी जीवन जगणारा माणूस.

     मी बोलतोय आमचे वर्गमित्र वरखडवाडी गावचे सुपुत्र आणि आता उद्योजक झालेले वाई वुडस् या ठिकाणी  'स्वराज  ऍग्रो टुरिझम ' या फर्मचे मालक सचिन पाटील यांच्याविषयी.

      तसे आम्ही एका वर्गात शिक्षण घेतलेले वर्गमित्र, समवयस्क. शाळेत अभ्यासात जेमतेम असणारा हा विद्यार्थी. पण शालेय शिक्षणापेक्षा व्यावहारिक शिक्षणात प्रगती करुन आपला विकास करून आज एक व्यावसायिक म्हणून नावारूपाला येतोय याचा आम्हा सर्व वर्गमित्रांना अभिमान वाटतो. शेतकरी कुटुंबातील तरुणांना एक आदर्श घालून देणारा एक धडपड्या .

     दहा बारा वर्षापूर्वी गावातील ,तालुक्यातील राजकारणात सक्रिय असणारा कार्यकर्ता.उदरनिर्वाहासाठी झाडं तोडण्याचा व्यवसाय त्याचबरोबर टँकर.पण वरखडवाडी गावाच्या वर आणि पांडवगडाच्या पायथ्याशी स्वमालकीची जमीन. दहा बारा वर्षांपूर्वी आजूबाजूच्या जागा पुण्यातील लोकांनी विकत घेतल्या पण यानं आपली जागा विकली नाही. जागा विकण्यासाठी अनेक पद्धतीने दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला पण हा खमक्या गडी कुणाच्या दबावाला भीक न घालता ठाम राहिला.खंबीर राहिला.

      जागा अशा ठिकाणी होती की त्या जागेबद्दल अनेक दंतकथा पसरल्या होत्या. रात्री तिथं जायला लोकं घाबरत.हा माणूस घरदार सोडून याठिकाणी राहू लागला. हळूहळू बाजूच्या विकल्या गेलेल्या जागा विकसित होऊ लागल्या. बांधकाम सुरू झाले. मग तिथं कामासाठी येणारी लोकं याच्याकडे येवू लागली. निर्मनुष्य जागेत हा भूतासारखा रात्रीचा झोपायला असायचा.मग ही लोकं याच्याकडे येवून चहा पाणी यांची मागणी करु लागली हा ही दगडाची चूल मांडून स्वतःबरोबर इतरांनाही चहा बनवून द्यायचा.असं करता करता याच्या मनात विचार येऊ लागले आपण या जागेत अशा लोकांच्या जेवणाखाण्याची सोय करु शकतो. गाठीला चार पैसेही मिळतील आणि यांचीही सोय होईल.या विचारातून आजचा हा ऍग्रो टूरिझमचा व्यवसाय मनात उभा राहू लागला.

    दांडगी इच्छाशक्ती आणि पडेल ते काम करायची खूणगाठ मनाशी बांधून उद्याच्या व्यवसायाची स्वप्न उराशी बांधून मग हा कामाला लागला.गावातील घर सोडून, राजकारण, नको त्या उठाठेवी सोडून यानं आपला लवाजमा रानात आणला.बायकामुलं, गुरंढोरं , यांचा मोर्चा इकडे वळवला.आणि आपल्या स्वप्नाला मूर्त स्वरूप देण्यासाठी सज्ज झाला.

        स्वतःच्या कल्पनेतून एक एक वीट रचू लागला.बायकामुलांचीही साथ मिळत गेली. हळूहळू पैसे मिळतील तसंतसं एक एक बांधकाम करून घेत प्रवास चालू ठेवला.

     अक्षरशः हा माणूस जगापासून लांब राहून स्वतःला या जागेत कोंडून घेत काबाडकष्ट करत होता.स्वतःच बांधकामात कामगार म्हणून झिजत होता.

       एक छोटीशी दुमजली इमारत उभी राहिली.आता डोक्यावर छत आणि निवारा तयार झाला. इथंच संसार थाटला.हळूहळू लोक जेवण,नाष्टा करण्यासाठी यायला सुरुवात झाली.

     एक एक बांधकाम होत होत गेलं.कुठलाही इंजिनिअर नाही की आर्किटेक्ट नाही. याच्या कल्पनेतून साकार होत असलेला प्रकल्प पूर्णत्वास आला .

    लग्न समारंभ, साखरपुडा यासाठी सुसज्ज असा हाँल उभा राहिला.वधूवरांसाठी एक छोटीशी दुमजली इमारत झाली. जेवणासाठी डायनिंग हाँल, किचन सर्व आवश्यक गोष्टी तयार झाल्या.

    मार्च महिन्यात पाटलांनी आपल्या या व्यवसायाचं उद्घाटन मोठ्या थाटामाटात केलं.

     आम्ही सर्व मित्र या आमच्या मित्राच्या स्वप्नपूर्तीच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलो. मित्र आणि हा कार्यक्रम आमचाच होता.मित्राचा होत असलेला उत्कर्ष पाहून आनंद होत होता.

    आता हळूहळू या व्यावसायाला गती मिळतेय. कार्यक्रम होतायत,कुणाचं लग्न,साखरपुडा, बारसं,अशा कार्यक्रमासाठी मागणी वाढतेय.

      निसर्गाच्या सानिध्यात ,सह्याद्रीच्या कुशीत असलेलं हे  ऍग्रो टुरिझम इथं परत परत येण्यासाठी लोकांना भुरळ घालतयं.सुंदर असं निसर्ग सौंदर्य लाभले असल्यामुळे लोकांची पावलं इकडं पडतायेत.समोर पाचगणी, महाबळेश्वरच्या पर्वतरांगा, धोम धरणाच्या जलाशयाचा विस्तीर्ण देखावा इथून दिसतो. मनाला मोहून टाकणारा हा निसर्गाचा सुंदर नजराणा इथं पाहावयास मिळतो. सोबतच अस्सल सातारी बाज असलेला जेवणाचा बेत.मनमुराद आनंद घेत तृप्त होऊन येणारा समाधान पावतो.

    तर असा हा आमचा मित्र अत्यंत प्रेमळ,जीवाला जीव देणारा, मित्रांसाठी काहीही करायची तयारी ठेवणारा.आणि अजूनही जमीनीवर पाय असलेला एक नव व्यावसायिक.पण हा प्रवास खडतर होता,अशक्य वाटणारा होता पण प्रबळ आत्मविश्वास आणि कष्ट उपसण्याची तयारी या जोरावर पाटील उद्योजक होत आहेत. आपली स्वप्न साकार करण्यासाठी आजवर केलेली धडपड फलश्रुत होतेय याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं.

     तरुणांना यातून एक संदेश मिळतो की असेल त्या परिस्थितीत संकटांना सामोरं जाण्याची तयारी ठेवली तर यशाची किल्ली तुमच्या हातात मिळतेच पण विश्वास ठेवून एका ध्येयानं न थकता,न थांबता वाटचाल करत राहिला तर यशाची कवाडं तुमच्या स्वागतासाठी सताड उघडली जातात.याचं जीवंत उदाहरण म्हणजे आमचे मित्र सचिन पाटील.

    पाटील तुमच्या व्यवसायाला आणि पुढील यशाला आमच्या सर्व मित्र परिवाराकडून शुभेच्छा.

✍🏻 हिंदुराव गोळे

https://hinduraogole.blogspot.com/

   👆🏻 आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Post a Comment

0 Comments