शिवरत्न शिवाजी काशिद
नमन माझे पांडुरंगाला
आदिशक्ती मातातुळजाभवानीला
भगव्या जरीपटक्याला
अभेपूरीच्या भैरवनाथाला
संभाजीराव भिडे गुरुजींच्या गुरु चरणाला
वीर शिवरत्न शिवा काशीदांच्या ऐका बलिदानाला
जी...जी...जी...
पन्हाळ्याला वेढा पडलेला
सहा मासाचा काळ लोटला
जौहरनं गडाचं पेच आवळले
स्वराज्याच्या सूर्याला ग्रहण लागले
लाखांचा पोशिंदा वेढ्यात अडकलेला
सुटकेसाठी होता हर प्रयत्न चालला
जी...जी...जी...
रात्रीत हेरांनी मार्ग शोधला
निसटण्याचा बेत बघा ठरला
आषाढी पौर्णिमेचा दिस उजडला
पुनवंचा चंद्र होता साक्षीला
गडाखाली चोरवाटनं मावळा उतरला
वरुणराजा थैमान मांडू लागला
जी...जी..जी...
एका पालखीत राजा बसला
दुसऱ्या पालखीत शिवा काशीद बसला
दुसरी पालखी ती नव्हती सामान्य
मृत्यूशी गाठ पडणार हे होतं शिवाला मान्य
शिवा काशीद वीर तो धन्य धन्य
स्वतः बसुनी मृत्यूच्या पालखीत
चालला वीर शत्रूला चकवीत
जी..जी...जी...
नेवापूरचा वीर हा बहाद्दर
दांडपट्टा तलवारबाजीत भारी चतुर
नाभिक मायबापाचं कोवळं ते पोर
धन्य धन्य मायबाप त्याचं थोर
सिद्ध झाला शिवा मृत्यूसमोर
हुबेहूब शोभे जसा शिवाजी महाराज
शिवा चालला राजा शिवाजी होऊन मरण्यास आज
जी...जी...जी...
कैद केलं मसूदनं शिवाला
आनंद झाला भारी जौहरला
पण नीतीनं घात हो केला
फाजलनं शिवाला ओळखला
मृत्यू पाहून शिवा नाही डरला
सपासप वार शिवावर जाहले
शूर शिवाचं जीवन सार्थकी लागले
महाराज पुढे निसटून गेले
तोवर शिवानं शत्रूला झुलविले
जी...जी..जी...
शिवरत्न शिवाजी काशिद थोर
राजासाठी मृत्यूला घेतलं अंगावर
असा असामान्य शिवाचा त्याग
अमर झाले साधूनी हा कर्मयोग
महाराष्ट्र रत्नांची खाण
शिवा काशिदांचा आम्हां अभिमान
शिवा काशिद रत्न थोर
मुजरा करतो तुम्हां वारंवार
जी...जी...जी...
शिवा काशिदांच्या गायलं आज त्यागाला
संभाजीराव भिडे गुरुजींचा आशिर्वाद हो मला
वाईदेश कोथळा मावळप्रांत हिंदुराव सांगतो नावागावाला....
✍🏻 हिंदुराव गोळे
धारकरी - वारकरी
https://hinduraogole.blogspot.com/
👆🏻 कविता, पोवाडे, लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

0 Comments