गाव माझं
साधी माणसं साधी घरं गाव माझं साधंभोळं
जोडली आहे मातीशी तिथल्या माझी नाळ
नाहीत बंगले नाहीत वाडे इथली साधी घरं
अंगणात बालगोपाळ गोठ्यात गाईगुरं
नाही कसला थाटमाट आहे साधीच राहणी
नाही डामडौल कसला रक्तं इथलं इमानी
विठूरायाच्या मंदिरात गजर होतो पुंडलिक वरदा
भक्तिरसात आनंदाने न्हातो भाविकजन सर्वदा
लाल मातीत घाम गाळते इथली तरुणाई
काळ्या मातीत राबती हात ही इथली अपुर्वाई
सुख दुःखात धाऊन येतो प्रत्येकजण
नाही कसला स्वार्थ मत्सर ना कुणा अभिमान
असेल त्यात सुखी राहणं हेच इथलं जगणं
सुखी ठेव सर्वांना हेच देवाकडं त्यांचं मागणं
देवा माझ्या गावाचा नको बदलू चेहरामोहरा
असाच राहू दे गाव माझा सदा आनंदी अन् हसरा
व्यसनांना कधी नको देऊ गावात माझ्या थारा
अहंकाराचा कदापि नको लागू देऊ वारा
गुण्यागोविंदाने एकादिलाने नांदू दे गाव माझं
नाही विसरणार देवा मी तुझ्या उपकाराचं ओझं
✍🏻 हिंदुराव गोळे
https://hinduraogole.blogspot.com/
👆🏻 कविता, पोवाडे,लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

0 Comments