येसू मामा
"येसू नीट पुढं बघ माझी मिशी कातरशील लेका" हातातल्या आरशात बघत हरितात्या काहिशा रागात बोलले.तसं ,"माझं लक्ष आहे तात्या नाय तुमची मिशी कुठं जात,ती हाहेच किती" अशा विनोदी शैलीत येसू मामांनी तात्यांनाही हसू येईल असं उत्तर दिलं.
आज रविवार होता आणि आमच्या वाडीतील तालमीच्या पडवीत सकाळीच येसूमामांनी आपल्या कामाला सुरुवात केली होती.लहान मुलं,शाळकरी मुलं,तरुण आणि म्हातारी माणसं तालमीत जमा झाली होती.कुणाला केस कापून घ्यायचे होते तर कुणाला दाढी करायची होती.काही म्हातारी माणसं येसूमामाकडून नरानी घेऊन नखं काढत होती.आठवड्यातून रविवार आणि कधीतरी बुधवारी येसूमामा गावातून वाडीत यायचे.शक्यतो तालमीतच बसायचे कधी तरी खोपड्यांच्या अंगणात तर कधी मांढऱ्यांच्या पारावर येसूमामांचं दुकान चालु असायचं.ते आले की गर्दी व्हायची,कुणाला केस दाढी करायची नसली तरी तिथं जमा व्हायचे.पोतं टाकून ,काखेत अडकवलेली पिशवी समोर ठेवून त्यातील लागणारं सामान कैची,वस्तरा,साबण बाहेर काढायचं,कुणाच्या तरी घरातनंं तांब्या दोन तांबे पाणी आणलं की यांच्या कामाला सुरुवात व्हायची.
मी ज्या व्यक्तीबद्दल बोलतोय ती व्यक्ती म्हणजे आमच्या अभेपूरी गावचे यशवंत पवार यांच्याबद्दल.नाभिकाचा व्यवसाय असलेले येसूमामा म्हणजे वेगळंच रसायन.मार्मिक विनोदी शैलीत बोलणं, मिश्किल स्वभाव, हजरजबाबीपणा, गालावर छद्मी हसू,सावळ्या वर्णाचे येसूमामा अंगकाठीनं सडपातळ.अशी एकूण त्यांची छबी.समोरच्याला राग आला तरी त्याला असं काही विनोदी शैलीत उत्तर देणार की त्याचा राग जाऊन तोही हसू लागणार.असे हे विनोदी स्वभावाचे येसूमामा,मोकळ्या मनाचे.
पंधरा वीस वर्षांपूर्वी पर्यंत बलुतेदार पद्धतीने गावगाडा चालत होता.त्यामुळे वर्षाच्या बलुत्यावर अनेक व्यवसाय चालायचे,सुतार,लोहार,परीट,न्हावी यांचे काम वर्षभर चालू असायचे.
येसूमामांचे प्रत्येक घराशी जवळीक,प्रेमाचे,आपुलकीचे नातं.कुणी त्यांना काका म्हणतात पण आम्ही त्यांना मामाच म्हणतो.ते पण आमच्या आजोबांना आण्णांना मामा म्हणायचे, आमच्या आप्पांना दाजी म्हणून हाक मारायचे.आमच्या आप्पांची आणि येसूमामांचे मोठे भाऊ काळूआबा यांची मैत्री दोघे वर्गमित्र होते.आणि आमच्या आण्णांचे यांच्या पूर्ण घराशी जिव्हाळ्याचं नातं.
आमचे बापू मामा आणि येसूमामा यांचं चांगलं जमायचं.मामांबरोबर गप्पा मारत बसायचे.
आम्ही लहान असताना केसांची विशेष अशी काही स्टाईल नसायची.शाळेतली पोरं,तालमीत जाणारी पोरं यांच्या केस कापण्याची त्यावेळी खास येसूमामा स्टाईल होती.सरळ मशीन लावली जायची टाळूवर थोडीशी केसं राखली जायची बास झाली इतकी स्टाईल.फॅशन आणि स्टाईलनं कटिंग करायला तितका वेळच येसूमामांना नसायचा इतकी केस कापणाऱ्यांची,दाढी करवून घेणाऱ्यांची गर्दी असायची.पण ती स्टाईल पण आमच्या लहानपणी फेमस असायची.तिथं कसली तडजोड नसायची.म्हाताऱ्या माणसांचा वस्तऱ्याने टक्कल हमखास असायचा.
येसूमामांच्या पुढं केस कापायला बसलं की आपलं काही चालायचं नाही.ते त्यांच्या पद्धतीने त्यांचं काम करायचे.एखादा जर जास्त वळवळ करायला लागला तर हे महाशय डाव्या हातानं डोक्यात अशी काही चापट मारायचे की पोरगं गप्प बसायचं केस कापून होईस्तोवर पुन्हा कसली हालचाल व्हायची नाही.
येसूमामा वाडीत आले की त्यांच्याजवळ गर्दी व्हायची.गप्पा मारत मारत काम सुरू असायचं.हे असे काही किस्से सांगायचे की हसून हसून पोट दुखायचं.गावातील सर्व घटनांची इत्यंभूत माहिती मिळायची.मूळचाच विनोदी स्वभाव असल्यामुळे येसूमामा एखादा प्रसंग असा काही खूलवून सांगायचे की ऐकणारा सगळं विसरून त्यांच्या विनोदी कथनाला हसून दाद द्यायचयेसू मामा
"येसू नीट पुढं बघ माझी मिशी कातरशील लेका" हातातल्या आरशात बघत हरितात्या काहिशा रागात बोलले.तसं ,"माझं लक्ष आहे तात्या नाय तुमची मिशी कुठं जात,ती हाहेच किती" अशा विनोदी शैलीत येसू मामांनी तात्यांनाही हसू येईल असं उत्तर दिलं.
आज रविवार होता आणि आमच्या वाडीतील तालमीच्या पडवीत सकाळीच येसूमामांनी आपल्या कामाला सुरुवात केली होती.लहान मुलं,शाळकरी मुलं,तरुण आणि म्हातारी माणसं तालमीत जमा झाली होती.कुणाला केस कापून घ्यायचे होते तर कुणाला दाढी करायची होती.काही म्हातारी माणसं येसूमामाकडून नरानी घेऊन नखं काढत होती.आठवड्यातून रविवार आणि कधीतरी बुधवारी येसूमामा गावातून वाडीत यायचे.शक्यतो तालमीतच बसायचे कधी तरी खोपड्यांच्या अंगणात तर कधी मांढऱ्यांच्या पारावर येसूमामांचं दुकान चालु असायचं.ते आले की गर्दी व्हायची,कुणाला केस दाढी करायची नसली तरी तिथं जमा व्हायचे.पोतं टाकून ,काखेत अडकवलेली पिशवी समोर ठेवून त्यातील लागणारं सामान कैची,वस्तरा,साबण बाहेर काढायचं,कुणाच्या तरी घरातनंं तांब्या दोन तांबे पाणी आणलं की यांच्या कामाला सुरुवात व्हायची.
मी ज्या व्यक्तीबद्दल बोलतोय ती व्यक्ती म्हणजे आमच्या अभेपूरी गावचे यशवंत पवार यांच्याबद्दल.नाभिकाचा व्यवसाय असलेले येसूमामा म्हणजे वेगळंच रसायन.मार्मिक विनोदी शैलीत बोलणं, मिश्किल स्वभाव, हजरजबाबीपणा, गालावर छद्मी हसू,सावळ्या वर्णाचे येसूमामा अंगकाठीनं सडपातळ.अशी एकूण त्यांची छबी.समोरच्याला राग आला तरी त्याला असं काही विनोदी शैलीत उत्तर देणार की त्याचा राग जाऊन तोही हसू लागणार.असे हे विनोदी स्वभावाचे येसूमामा,मोकळ्या मनाचे.
पंधरा वीस वर्षांपूर्वी पर्यंत बलुतेदार पद्धतीने गावगाडा चालत होता.त्यामुळे वर्षाच्या बलुत्यावर अनेक व्यवसाय चालायचे,सुतार,लोहार,परीट,न्हावी यांचे काम वर्षभर चालू असायचे.
येसूमामांचे प्रत्येक घराशी जवळीक,प्रेमाचे,आपुलकीचे नातं.कुणी त्यांना काका म्हणतात पण आम्ही त्यांना मामाच म्हणतो.ते पण आमच्या आजोबांना आण्णांना मामा म्हणायचे, आमच्या आप्पांना दाजी म्हणून हाक मारायचे.आमच्या आप्पांची आणि येसूमामांचे मोठे भाऊ काळूआबा यांची मैत्री दोघे वर्गमित्र होते.आणि आमच्या आण्णांचे यांच्या पूर्ण घराशी जिव्हाळ्याचं नातं.
आमचे बापू मामा आणि येसूमामा यांचं चांगलं जमायचं.मामांबरोबर गप्पा मारत बसायचे.
आम्ही लहान असताना केसांची विशेष अशी काही स्टाईल नसायची.शाळेतली पोरं,तालमीत जाणारी पोरं यांच्या केस कापण्याची त्यावेळी खास येसूमामा स्टाईल होती.सरळ मशीन लावली जायची टाळूवर थोडीशी केसं राखली जायची बास झाली इतकी स्टाईल.फॅशन आणि स्टाईलनं कटिंग करायला तितका वेळच येसूमामांना नसायचा इतकी केस कापणाऱ्यांची,दाढी करवून घेणाऱ्यांची गर्दी असायची.पण ती स्टाईल पण आमच्या लहानपणी फेमस असायची.तिथं कसली तडजोड नसायची.म्हाताऱ्या माणसांचा वस्तऱ्याने टक्कल हमखास असायचा.
येसूमामांच्या पुढं केस कापायला बसलं की आपलं काही चालायचं नाही.ते त्यांच्या पद्धतीने त्यांचं काम करायचे.एखादा जर जास्त वळवळ करायला लागला तर हे महाशय डाव्या हातानं डोक्यात अशी काही चापट मारायचे की पोरगं गप्प बसायचं केस कापून होईस्तोवर पुन्हा कसली हालचाल व्हायची नाही.
येसूमामा वाडीत आले की त्यांच्याजवळ गर्दी व्हायची.गप्पा मारत मारत काम सुरू असायचं.हे असे काही किस्से सांगायचे की हसून हसून पोट दुखायचं.गावातील सर्व घटनांची इत्यंभूत माहिती मिळायची.मूळचाच विनोदी स्वभाव असल्यामुळे येसूमामा एखादा प्रसंग असा काही खूलवून सांगायचे की ऐकणारा सगळं विसरून त्यांच्या विनोदी कथनाला हसून दाद द्यायचा.
दुपारी बारा एक वाजेपर्यंत काम केल्यावर येसूमामा कुणाच्या तरी घरी दुपारच्या जेवणाला जायचे.कधी हक्कानं एखाद्या घरी जाऊन जेवायला आलोय म्हणून जेवायला बसायचे.लोकंही आग्रहानं त्यांना जेऊ घालायचे.
ड्रायव्हर आबा,बापूमामा आमचे बाजीदादा,कोंडूआबा,दगडूदादा ही मंडळी येसूमामांच्या विनोदासाठी ठरलेली गिऱ्हाईक.एकदा आमचा दगडूतात्या येसूमामांच्या पुढ्यात केस कापण्यासाठी बसलेला येसूमामा काहीतरी किस्सा आपल्या विनोदी शैलीत सांगत होते आणि अचानक दगडूतात्यानं त्यांना त्या विषयावर मध्येच टोकलं येसूमामांनी घाईत तात्याच्या अंगावरचं कापड सोडलं केस अर्धेच कापून झाले होते आता म्हणाले असाच घरी पळ मी केसांना हात लावणार नाही.सगळे हसत होते तात्या मामा माझं चुकलं कापा माझे केस म्हणत होता पण ह्यांनी त्याला तसाच पाठवला.
मी लहानपणी येसूमामा अगदीच मशीन लावून बारीक केस कापतात म्हणून कधीतरी आईकडं तक्रार करायचो मग आई गावात जायला सांगायची.गावात येसुमामांचे भाऊ गुलाबमामा यांच्याकडून केस कापून यायचो पण हे कधीतरीच नाहीतर मग आहेच आपली नेहमीची स्टाईल येसूमामा कट.
येसूमामांचं काम वर्षभर मिळेल त्या बलुत्यावर चालायचं.बलुत्यासाठी कधी त्यांनी कुणाची अडवणूक केली नाही.एवढंच पाहिजे तेवढं दिलं तर ठीक असं काही नसायचं.देतील ते असेल त्यात समाधानी.
गावात लग्न किंवा इतर काही कार्यक्रमाचं जेवण असलं की येसूमामा हक्कानं पंगतीला पाणी वाटपाचं काम प्रामाणिकपणे करायचे.लग्नात नवरदेव श्रीवंदनाला निघाला की त्याचा घोडा अडवून नवरदेवाकडून बक्षीस घ्यायचं हे प्रेमाचं मागणं येसूमामा करणार.गावातील नवरदेव असेल तर आदल्या दिवशीच येऊन त्यांची केस दाढी करुन मगच जाणार.
गावात मयत झालं की येसूमामा क्षौरविधी करण्यासाठी न बोलवता स्मशानभूमीवर हजर असतात आजही त्यांचं हे काम सुरू आहे.
आता येसूमामा हे काम करत नाहीत वय वाढलं पण त्यांच्या मुलांनी हा व्यवसाय सांभाळलाय.बलुतेदारी पद्धत काळाच्या ओघात बंद झाली.मुलांनी आता दुकानं टाकली.पण येसूमामांनी सर्वांशी जे नातं जोडलयं ते आजही अबाधित आहे.
मध्यंतरी मी खूप तणावात होतो एका सलून मध्ये जाऊन केस कापण्यासाठी खुर्चीवर बसलो आणि त्यांना सांगितले मी माझ्या येसूमामांच्या पुढ्यात बसलोय असं मला वाटतयं तुम्हाला मी सांगणार नाही केस कसे कापायचे ते तुम्हीच येसूमामा सारखे माझे केस कापा आणि येसूमामांच्या आठवणींनी माझ्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागले.
गावात येता जाता भेटतात कधीतरी आपुलकीने विचारपूस होते.
अशी माणसं आता थकलेत.त्यांनी जी व्यवसायातून नाती जोडलीत ती अजोड आहेत.रक्ताच्या नात्यांच्याही पलीकडची नाती आहेत ही.ती जपली पाहिजेत. आपणच त्यांना आवर्जून भेटावं त्यांची ख्यालीखुशाली विचारावी.परत ही पिढी हे प्रेम सध्याच्या काळात मिळणार नाही.त्यांना आणि त्या नात्यांना आपण जपलं पाहिजे.
परवाच येसूमामा भेटले त्यांचा एक फोटो मोबाईलवर घेतला.तेव्हा पण फोटो काढायला तयार नव्हते म्हणाले माझा फोटो काय पेपरात टाकणार आहेस काय.
येसूमामांना निरामय आरोग्यदायी आयुष्य लाभो ही प्रार्थना करतो आणि थांबतो.
✍🏻 हिंदुराव गोळे
येसूमामांचा हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा ही विनंती.🙏🏻
https://hinduraogole.blogspot.com/
👆🏻 कविता, पोवाडे,लेख वाचण्यासाठी आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻

0 Comments