गावाशी नाळ तुटंना
शहरातील रस्ते आहेत गजबजलेले
माणसांच्या लोंढ्यांनं गच्च भरलेले
शेतातील वाटनं पाऊल हटंना
काही केल्या गावाशी ही नाळ तुटंना
मजल्यावर मजले इथं रचलेले
माणसांनी सारे खुराडे भरलेले
कौलारू घराची हौस फिटंना
काही केल्या गावाशी ही नाळ तुटंना
शेजारी इथला कुणाशी बोलंना
कोण कुठं राहतो कुणाला कळंना
गजबजल्या अंगणाची सवय सुटंना
काही केल्या गावाशी ही नाळ तुटंना
बोलताना इथं शब्दांना जपताना
एकमेकांशी बोलणं बघतो टाळताना
पारावरल्या गप्पांची मैफल ऊठंना
काही केल्या गावाशी ही नाळ तुटंना
झोपेमध्ये पलंगावर कूस बदलताना
सारी सारी रात्र घुसमटून जागताना
ओटीवरल्या भुईची ती ऊब सुटंना
काही केल्या गावाशी ही नाळ तुटंना
पुरणपोळीचीही गोडी लागंना
पाण्याचीही इथल्या चव ही कळंना
कांदा भाकरीचा तो झटका जाईना
काही केल्या गावाशी ही नाळ तुटंना
✍🏻 हिंदुराव गोळे
https://hinduraogole.blogspot.com/
👆🏻 आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻

0 Comments