Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

प्रेममूर्ती

प्रेममूर्ती

      देव काही माणसांना फक्त इतरांवर प्रेम करण्यासाठी, इतरांच्यासाठी संकटात धावून जावून मदत करण्यासाठीच या जगात पाठवत असतो.खरंतर ती माणसं नसून देवाचंच मानवी देहातील रुप असतात.अशीच देव माणसं म्हणजे आमचे काका आणि मावशी.हो त्यांना माणसांतील देव माणसंच म्हणावं अशी. हृदयांत अत्यंतिक प्रेम,जिव्हाळा, माया,ममता ओथंबून वाहत असलेली ही दोघेजण. रामचंद्र आणि सुभद्रा पोळ.आमचे काका-मावशी.
     
     आमची मोठी मावशी तिला आम्ही सगळेच 'ताई' म्हणायचो. तीचं सासर धोम.पण धोम धरणाच्या बांधकामात शेती या प्रकल्पात गेल्यामुळे यांना भुईंज गावच्या हद्दीत स्थलांतरित व्हावं लागलं.साधारण १९८० च्या काळात. जोशीविहीर,आणि देगावरोडला वरचे चाहूर येथे घरासाठी आणि शेतीसाठी शासनाकडून जागा मिळाली. आणि मग पुढचं सर्व आयुष्य इकडेच भुईंज परिसरात गेलं.
       
     आमचे काका दिसायला अतिशय रुपवान,गोरेपान, ऊंच,उन्हात काम करत असले की अगदी लालबुंद व्हायचे.धोतर सदरा घालायचे. शेतात काम करत असले तरी कधी कपड्यांवर डाग नसायचा.नेहमी स्वच्छ कपडे तसंच मनही स्वच्छ, निर्मळ. अतिशय प्रेमळ, सर्वांवर माया करणारे. आणि एक प्रगतशील शेतकरी.
     
     पूर्वी जेव्हा धोमला होते तेव्हा आमच्या वाडीतील सर्वांसाठी एक हक्काचं घर म्हणजे आमच्या काका मावशीचं घर.त्याकाळात कुणी आजारी पडलं तर दवाखाना आमच्या पश्चिम भागात फक्त धोममध्ये होता. मग बैलगाडीतून आजारी माणसाला धोमला दवाखान्यात आणलं जायचं. काकांचं घर गावात अगदी सुरुवातीला भैरवनाथ मंदिराच्या बाजूला होतं.त्यामुळे वाडीतील कोण आलयं हे लगेच समजायचं.दवाखान्यातून परत येताना लोकं  ताईकडं थांबूनच यायचे.
     
      धोमवरुन जेव्हा भुईंजला आले तरी धोमातील घरी येणंजाणं असायचंच.यात्रेला हमखास चार दिवस मुक्काम असायचा.
     
     चाहूरात देगावरोडला घर बांधून शेतावरच राहू लागले. सुरुवातीला स्थानिकांकडून त्रास व्हायचा.काका ताई,काकांची आई आणि ताईची जाऊ शांतामावशी असा परिवार ईकडं राहू लागला.शांता मावशी म्हणजे आमच्या मावशीची धाकटी जाऊ पण ती आमच्या मावशीची जाऊ आहे हे आम्हाला कधी वाटलंच नाही. मावशीपेक्षाही अधिक प्रेम ती आमच्यावर करायची.खूप जीव लावायची.तीनं कधी आम्हाला अंतर दिलं नाही. काका मावशी एकदम साधीभोळी होती.त्यात शांता मावशीच थोडी भिडस्त होती.खंबीरपणा स्वभावात असल्यामुळे आणि बोलण्यात परखडपणा  असल्यामुळे तीला सर्वजण वचकून असायचे.
      
    आम्ही सुट्टीत ताईकडं जायचो.आठ दिवस पंधरा दिवस राहायचो. घर जरी शेतात असलं तरी रस्ता दिवसभर चालू आणि माणसांची वर्दळ कायमचीच.काकांना सगळे अण्णा म्हणायचे. सात आठ एकर बागायती शेती,दहा बारा जाफराबादी म्हशी, दोन बैल असा सगळा बारदाणा.एवढा व्याप सांभाळणं तसं कठीणच होतं. दोन सालगडी असायचे. एक शेतातील कामासाठी आणि दुसरा गुरांचं वैरणचारा बघण्यासाठी.पण या गड्यांनाही कधी आपण या घरात कामाला आहे असं कधी वाटलं नाही काकांनी अगदी त्यांना घरातील माणसासारखं सांभाळलं, जपलं.

    संतोष म्हणून एक गडी होता.अगदी लहान वयातच काकांकडे कामाला राहिला.काकांनी पुढं त्याचं लग्न झाल्यावर त्याला इथंच घर करून दिलं.त्याच्या मुलांना अगदी स्वतःच्या नातवंडांसारखं अंगाखांद्यावर खेळवलं,त्यांना जेऊखाऊ घातलं.
       
     इतरांवर इतकं प्रेम करणारे काका आपल्या माणसांवर तर त्याहून अधिक प्रेम करायचे. काकांकडे एक सायकल असायची.काका कधीतरी सकाळी दूध घालायला सायकलवर गावात जायचे. बाजारात सायकलवर जायचे. मी अगदी लहान असतानाच तिसरी चौथीत असतानाच याच सायकलवर सायकल चालवायला शिकलो.
       
    चाहूरातील सगळ्यांसाठी हक्काचं घर म्हणजे अण्णांचं घर.टी.व्ही.बघायला संपूर्ण घर शेजाऱ्यांनी भरून जायचं. इतरवेळीही सतत माणसांनी घर भरलेलं असायचं.
      
    काका म्हणजे कुणाच्याही गरजेला धावून जाणं हे ठरलेलं.कुणाला मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी काही मदत लागली तर हमखास काकांकडे यायचे.काका नेहमी अशी मदत करायचे मग ती पैशाची असो किंवा धान्याची.
       
    सुभद्रा अक्का आणि शांता अक्का म्हणजे वस्तीतल्या बायकांच्यासाठी हक्काची जागा.कमी जास्त काही लागलं तर हक्कानं मदत मागावी अशी माणसं.
      
      लहानपणी शाळेच्या सुट्टीत आम्ही काका मावशी कडेच असायचो.खूप मजा असायची. दिवाळीत तर फटाके,फराळ सगळी मजाच असायची.
      
   काका एवढे आमचा लाड करायचे की सुट्टी संपल्यावर परत वाडीला यायला नको वाटायचं.मग परत कधीतरी रविवारी आईसोबत एक दिवसासाठी काकांकडे यायचो.
      
    काकांनी पैशाच्या श्रीमंती सोबतच मनाची श्रीमंती जपली पैशांपेक्षाही मनाची श्रीमंती खूप मोठी होती.त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे अनेक माणसं जोडली गेली. त्यांच्यासाठी त्यांच्या एका हाकेसरशी ती धावून येत.
    
     काकांना कधी कुणावर रागावताना पाहिलंच नाही. कुणाचं काही चुकलं तर त्याला अगदी प्रेमानं समजावून सांगणार. कुणाविषयी कधीच राग,द्वेष केला नाही. पण कधी एखादेवेळी त्यांना राग आलाच तर तो आवरणं कठीण.
       
    अत्यंत साधेपणाने आयुष्यभर जगले. एवढी सुबत्ता असूनही कधी कसला डामडौल केला नाही. आपल्या प्रेमळ वागण्याबोलण्यानं माणसं जोडत राहिले. माणसांवर प्रेम करत राहिले. माणसं जपत राहिले.
      
     आमच्या सर्वांसाठीच खंबीर आधार असलेले काका.सुखदुःखात कायम आश्वासक सोबत.आमचं श्रद्धास्थान असलेले काका मावशी आता आमच्यात नाहीत. त्यांची उणीव कायम भासत राहते.
     
      अशा या प्रेममूर्ती ,निस्वार्थ, निर्मळ मनाच्या वडीलधाऱ्यांचा आशिर्वाद मिळाला.त्यांच्या संस्कारात वाढलो याचा आयुष्यात खूप काही लाभ झाला. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं.
      
     अशा माणसांमध्ये खरंतर देवाचचं रुप दिसतं.त्यांच्या मायेच्या झऱ्यात मन ओलेचिंब होतं.त्यांचा आठवही मनाला आणि काळजाला पीळ पाडतो. खरंच आम्ही भाग्यवान की अशा देवमाणसांच्या सहवासात, त्यांच्या लाडाकोडात,त्यांनी केलेल्या कौतुकात लहानाचे मोठे झालो. त्यांनी मायेनं गालावरून फिरवलेल्या हातात मायेची ऊब होती, प्रेम,ममता,जिव्हाळा होता.तो स्पर्श आजही हवाहवासा वाटतो. पण आता तो हात खूप दूर गेलाय याची हुरहूर वाटते. त्यांच्या आठवणीने मन आणि जीव उतावीळ होतं,कासावीस होतं.त्यांनी ठेवलेल्या डोक्यावरच्या आशिर्वादाच्या हातात ऊर्जा होती,लढण्याचं बळ होतं. आता तो आशिर्वादाचा हात आपल्या डोईवर नाही ते मायेचं छत्र हरपलं याची खंत वाटते. मनात काहूर उठतं.वटवृक्षाच्या आधाराच्या सावलीत विसावा घ्यावा असं वाटतं पण तो आधार तो वटवृक्ष आपल्या पासून कायमचा दूर गेलाय या विचाराने मन सैरभैर होतं आणि ती मायेची सावली शोधण्यासाठी धाव घेतं.त्यांनी आभाळभर पसरलेल्या सुरक्षारुपी पंखात स्वतः ला झोकून द्यावं वाटतं.
    
    अशा या माझ्या प्रेममूर्ती काका मावशींना माझा दंडवत प्रणाम.तुमचा आशिर्वाद कायम पाठीशी असू द्या एवढंच तुमच्याकडं मागणं मागतो आणि थांबतो. तुमच्या विषयी कितीही लिहिलं व्यक्त झालं तरी ते कमीच आहे.शब्दातीत आहे.

✍🏻 हिंदुराव गोळे

https://hinduraogole.blogspot.com/
👆🏻 आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻

🍁🌹🌼🍁🌹🌼🍁🌼🌹

Post a Comment

0 Comments