Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

बाजीराव दादा

बाजीराव दादा

    " बाजीदाजी बैल घेऊन जातोय जरा काम आहे जुनावन्यात परत आणून बांधतो काम झाल्यावर." जन्याबापु बैलाला खुंटीवरचा कासरा  वेसणीला लावत गोठ्यातूनच बापू आत घरात बसलेल्या दादांना ऐकू जाईल इतक्या मोठया आवाजात सांगून बैल घेऊनही गेले. असं हक्कानं दादांचा बैल  कुणीही जेव्हा दादांचं शेतात काय काम नसेल तेव्हा घेऊन जायचं.दादा म्हणजे अख्ख्या गावाचंच दाजी सध्या दादांचा हा गावदाजीचा वारसा पुढे हक्कानं आमच्या दगडू तात्याकडं आलाय.

   तर दादांचा बैल कुणी औतासाठी,गाडीसाठी तर कधी खळं खुरटायला तर कधी गुतीसाठी  बिनधास्त गोठ्यातून घेऊन जायचं.कारण दादांचा एक बैल अतिशय गरीब होता अगदी लहान मुलालाही तो कधी शिंग हालवत नसायचा, 'छब्या' नाव होतं त्याचं. पुढं या छब्याच्या नावावरनं पोरांनी एक गाणं रचलेलं ते फार प्रसिद्ध झालं होतं. दादांची नात सुजा तीला सगळे 'बाई' म्हणायचे लहानपणी. पोरं तीला चिडवताना हे गाणं म्हणत,
"बाईला माझ्या नाद छब्याचा" आणि त्याच्या पुढं काय काय जोडून गाणं वाढवलं जायचं.

     असे आमचे चुलते आम्ही 'दादा ' म्हणायचो त्यांना.
अतिशय साधं वागणं बोलणं, ओठभरुन मिशा,डोक्यावर टोपी,सदरा धोतर असा एकूण पेहराव.
    दादांचे स्वतः चे असे काही शब्द असायचे जे ते वापरत आणि त्यांचे ते शब्द पुढं अतिशय प्रसिद्ध होऊन प्रत्येकाच्या तोंडात येत.त्यातीलच काही उदाहरणादाखल देतोय ते म्हणजे 'यजमान' , 'तुझी पकीच करीन',राजू त्यांचा नातू त्याला ते प्राचार्य या अर्थाने 'पयचारी' म्हणत पुढं याच पयचारी राजू  म्हणून तो या नावानं गावात ओळखला जायचा.आजही हे सर्व आठवलं की ते लहानपणीचं आमचं घर आणि घरातील तो मोठ्या माणसांचा होणारा संवाद यात मन रमून जातं आणि किती रम्य दिवस आपण जगलो याचं कौतुक वाटतं आणि आता ते दिवस जगू शकत नाही याची खंतही.अशा निर्मळ मनाच्या वडीलधाऱ्यांच्या सोबत आपलं बालपण गेलं याचा हेवा वाटतो.

    तर असे हे आमचे बाजीराव दादा.पण दादांचं सारं आयुष्य हलाखीच्या परिस्थितीशी लढण्यातच गेलं.गरीबीशी मरेपर्यंत ताटातूट होऊ शकली नाही.संसाराच्या गोधडीला ठिगळं लावण्यात जीवाचा आटापिटा करत आयुष्य जगले. आता असं वाटतं आपण जर त्यावेळी कमावते असतो तर नक्कीच दादांना थोडाफार हातभार लावू शकलो असतो. या माणसाला मी परिस्थितीला सामोरं जाताना पाहिलयं पण कधी हतबल किंवा आपल्या आर्थिक परिस्थिती पुढे हात टेकताना पाहिलं नाही.
 
    नऊ दहा माणसांचं कुटुंब असलेलं हे घर.दादांची तीन मुलं,सुना,नातवंड आणि त्यात भरीस भर म्हणून मुलीची मुलंही सांभाळत होते.दादांची लेक सुशिला अक्का ही माहेरीच मुलांसह राहयची पण ती स्वतः काम करून दादांच्या संसाराला हातभार लावत होती. मुलांपेक्षा तीनेच आईवडीलांचा सांभाळ अधिक केला.
   
    मला आठवतयं आमच्या गावकीच्या फंडाचे कर्ज पाडव्यादिवशी व्याजासह भरायचे असते. दादांना पाडव्याआधी घेतलेल्या  कर्जाची रक्कम जमा करण्यासाठी करावी लागणारी धडपड मी पाहिलीय.कुणाकडून तरी उसणे पैसे घेऊन ते पैसे भरून पुन्हा कर्ज घेऊन त्या माणसाचे पैसे परत दिले जायचे. तर असं हे सगळं काटकसरीचं आयुष्य दुर्दैवाने त्यांच्या वाट्याला आलं.

     आमच्या दोन्ही घरात फक्त स्वयपाक घरात भिंत होती.बाकी सगळ्या ओट्या मोकळ्या होत्या. त्यामुळे त्या घरात किंवा आमच्या घरात काय चाललंय ते सगळं समजायचं.दादा, थोरलीआई आणि महादू दादा रात्री जेवणं झाल्यावर चुलीपुढं शेकत बसलेले असायचे.मग त्यांच्या गप्पा चालायच्या त्या ऐकायला मज्जा यायची.एखाद्या विषयावर जोरात वादळ उठायचं.आम्ही हे सगळं बघून, ऐकून हसायचो.पण ही वादळी चर्चा थोड्यावेळाने शांत व्हायची.आणि हे नेहमीचच असायचं.महादू दादा आमचे चुलत मामा आणि दादांचे व्याही दादांची सून संगिता वहिनी महादू दादांची मुलगी. आणि या नात्याच्याही आधी आमच्या वडीलांची आत्या महादु दादांची चुलती म्हणजे हे दुसऱ्या पिढीचं नातं.त्यामुळे बाजीदादा आणि महादू दाजी ही जोडगोळी लहाणपणापासूनचे एकमेकांचे मेहुणे त्यामुळे दोघांत थट्टामस्करी खूप चालायची.महादू दादांचा स्वभावही मिश्कील होता. हेच नातं सध्या लक्ष्मण बुवा आणि दगडू तात्या यांच्यात आहे.

    पावसाळ्यात आम्ही आमच्या माळ्यावर झोपायचो‌.घरात ढेकूण वगैरे झालेले असायचे आणि माळ्यावर भाताच्या भेळ्यांची मस्त उबदार गादी असायची‌.पावसाळ्यात भुई थंड पडायची त्यापेक्षा माळ्यावर उबदार वाटायचं‌.आम्ही तर वर लाईटचा बल्ब जोडायचो.रात्री थोरलीआई एखादी गोष्ट सांगायची मध्येच कधीतरी दादा ती गोष्ट सांगत असताना टोमणा मारायचे दोघांची भांडणं जुंपायची मग थोड्या वेळाने परत शांत होऊन पुढची गोष्ट सांगितली जायची‌.गोष्ट ऐकत ऐकत झोप लागायची.
    थोडंसं वाचायला खराब वाटेल पण क्षमा असावी.पावसाळ्यात कौलातून कुठेतरी पाणी गळायचं मग मोठी पातेली तिथं ठेवली जायची पाणी त्यात पडायचं.आमच्या बरोबर रात्री माळ्यावर झोपायला असणाऱ्या मुलांपैकी काहीजण रात्री पावसात खाली उतरून जायला कंटाळायचे कधीतरी त्या पातेल्यातच लघुशंका उरकून मोकळे व्हायचे.दुसऱ्या दिवशी ते पातेलं खाली करताना दादा आणि थोरलीआई एकमेकांना म्हणायचे पाण्याचा घाण वास कशानं येतोय काय माहीत. पण हे कृत्य कोण करतंय हे समजल्यावरही कधी ते कुणाला काही बोलत नसायचे.आणि हे बघून आम्ही एकमेकांकडे पाहत राहायचो.

   खरोखर आमचं लहानपण अशा माणसांच्या सानिध्यात जगलो याचा नक्कीच फायदा झाला.
     दादा कधीतरी एखादवेळेस थोडीशी दारु घ्यायचे. मग त्यांना त्या अवस्थेत बघायला मज्जा यायची.जाम हसत राहयचे नुसते. आम्ही मुलं त्यांना बघून हसायचो. अचानक आमची आजी रागानं उठून दादांजवळ जायची दादांना एखादी चापट मारायची. मेल्या मुडद्या म्हणून त्यांना शिव्या द्यायची.पण दादा कधी आजीला उलट बोलायचे नाहीत. तीला घाबरायचे.
 
     मी शाळेत असताना सुट्टीत दादांबरोबर शेतात जायचो.औत चालवायला,बैल हाकायला दादांमुळे शिकलो कारण दादांची बैलं गरीब होती मारत नव्हती. आमच्या गुडमात किंवा माळावर औत असलं की सोबत जायचो.

     उन्हाळ्यात आमच्या परड्यात गुरांना मांडव घातले जायचे. दादाही मांडव घालायचे, मांडवात झोपण्यासाठी माचोळी केली जायची.दादा आणि तात्या मांडवात माचोळीवर झोपायचे.
पण पोरं दिवसा माचोळीच्या मेढांना बांधलेल्या दोऱ्या, वाक कापायचे रात्री हे दोघे झोपले की हालचाल झाल्यावर माचोळी मोडायची.मग दादा दुसऱ्या दिवशी परत ती माचोळी दुरुस्त करायचे. हा प्रकार मधूअधून ठरलेला असायचा.दादा जाम चिडायचे पोरांना शिव्या द्यायचे.

      थोरलीआई आणि दादा यांचं कायम वाक् युद्ध चालायचं.थोरलीआई पण कमीपणा घ्यायची नाही मग बराचवेळ दोघांचं भांडण चालायचं.कधीतरी आमची आजी दोघांनाही दम टाकायची मग दोघेही थांबायचे.

    असे हे आमचे दादा.कधी आयुष्यात चैन केली नाही. काहीकाही गोष्टींचा सुखोपभोग ही त्यांच्यासाठी दुर्लभ होता.पण असेल त्यात समाधान मानायचं नसेल त्याची उगाच खंत करायची नाही आलेल्या दिवसाला सामोरं जात जगले. अतिशय साधा स्वभाव कधी कुणाला उलटून बोलले नाहीत.

     शेवटच्या दिवसात आजारी पडले.आणि त्या आजारपणातच कायमचे सोडून गेले.

    खरंच अशी माणसं आजच्या काळात पाहायला मिळत नाहीत. परिस्थितीशी जुळवून घेता घेता जी तारेवरची कसरत करावी लागली त्याबद्दल या माणसांनी कधी त्रागा केला नाही किंवा दुसऱ्याच्या सुबत्तेचा कधी हेवा केला नाही. आपल्या वाट्याला आलेलं आयुष्य खडतर असलं तरी न डगमगता जमेल तसं जगायचं. हेच या पिढीकडून शिकता आलं,समजता आलं.
खरोखर ही माणसं त्यांच्या त्यांच्या जागी महान होती.सर्वोत्तम होती. निराश होऊन परिस्थिती पुढे कधी हात टेकले नाहीत कधी हार मानली नाही. आयुष्याला कधी कंटाळली नाहीत. त्यांचं साधं जीवन,साधं राहणं,समाधानानं जगणं खूप काही शिकवून जातं.आणि आपल्याला मरगळ झटकून नव्यानं आयुष्यात जगायला लढायला शिकवून जातं.
गरीबीतही स्वतः चा आत्मसन्मान जपायला शिकवतात.

   अशा या दादांना माझा साष्टांग दंडवत प्रणाम.

✍🏻 हिंदुराव गोळे

https://hinduraogole.blogspot.com/
👆🏻 आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Post a Comment

0 Comments