Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

बंधन मैत्रीच्या अतूट नात्याचं

बंधन मैत्रीच्या अतूट नात्याचं

   आजचा दिवस माझ्या आयुष्यातील  काही अविस्मरणीय दिवसांतील एक असाच म्हणावा लागेल. न विसरला जाणारा,कायम हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवावा असा,चिरंतन आनंद देणारा, आजच्या स्मृती नेहमी हळूवार जपून ठेवाव्यात अशाच आहेत.रक्ताच्या नात्याहूनही श्रेष्ठ असलेल्या मैत्रीचं आजचं रुप विलक्षण असंच,त्याचं वर्णन केवळ अशक्य, शब्दांत मांडणं म्हणजे भलतंच कोडं पडतं काय आणि कसं व्यक्त व्हायचं हा प्रश्न पडतोय.
     हो परवा मी माझ्या रेल्वेच्या सेवेतील मित्रांना भेटायला गेलो होतो.सकाळीच घरुन कल्याणहून दादरला निघालो.खूप दिवसांनंतर मुंबई लोकलचा प्रवास करत होतो.प्रवासाचा आनंद घेत घेत दादरला पोहचलो.आमचे मांटुग्याला बी.टी.सी.मध्ये प्रशिक्षक असणारे आदरणीय गुरुनाथ पेडणेकर सर माझी दादर स्टेशनवर वाट पाहत होते‌‌.स्टेशनच्या बाहेर आमची भेट झाली.सर आता सेवानिवृत्त झाले आहेत.सरांना आदरपूर्वक नमस्कार केला.तिथून आम्ही श्रीसिद्धिविनायक दर्शनासाठी निघालो‌.आज संकष्ट चतुर्थी होती आणि आमचे सर सध्या मंदिरात सेवेकरी म्हणून गणरायाची भक्तीभावाने सेवा करतात.सरांच्यामुळे बाप्पांचं  मनसोक्त दर्शन लाभलं.प्रसाद म्हणून पुष्पहार,दुर्वा  आणि पेढे मिळाले.तिथून पुन्हा दादरला आलो.सरांचा निरोप घेऊन माटुंग्याला रेल्वे वर्कशॉपमध्ये पोहचलो.मित्रवर्य सतीशराव तिथं माझी वाट पाहत गेटवरच उभे होते.आमची भेट झाली आणि आम्ही आतमध्ये इतर मित्रांना भेटण्यासाठी त्यांच्या त्यांच्या शाॅपमध्ये गेलो.सात आठ वर्षांनंतर मी मांटुगा वर्कशॉपमध्ये जात होतो.इथला झालेला सर्व कायापालट पाहून आश्चर्यचकित झालो.जुन्या आठवणी मनात तरळत होत्या.याच कारखान्यात आयुष्यातील तीन वर्षे काढली आहेत.ॲक्ट ट्रेड ॲप्रेंटिस म्हणून प्रशिक्षण घेतलं आहे.आणि १९९९ पासून आजपर्यंत जोडले असलेले मित्र आज खूप दिवसांनी भेटणार होते.आतुरता होती भेटीची.
      मी आणि सतीशराव त्यांच्या शाॅपमध्ये पोहचलो‌.सुट्टीची वेळ झालेली सर्वजण पंचिंगसाठी आणि घरी जाण्यासाठी तयारी करत होते.निलेश भेटला त्यानं गळाभेट घेतली.हळूहळू एक एक मित्र जमा होत गेले.रविंद्र सुराडकर, सोमनाथ अडोळे,प्रवीण,संदिप,पियुष, किशोर,प्रजापती,विजय,मनेष असे सर्व मित्र खास माझ्या भेटीसाठी एकत्र आले होते.आमचे एकत्र फोटो काढले.
      एकमेकांची प्रेमाने गळाभेट घेतली‌. १९९९ साली एकत्र आल्यावर जो धिंगाणा,मस्ती घालायचो तोच धिंगाणा सुरु झाला.इतर कामगार बंधू आमचा हा गोंधळ बघून आश्चर्य करत होते‌.छान गप्पागोष्टी झाल्या एकमेकांची विचारपूस झाली‌.
     मी येण्याआधीच माझ्या स्वागताची जंगी तयारी मित्रांनी करुन ठेवलेली‌.भरगच्च पुष्पगुच्छ प्रेमाची भेट म्हणून मला देऊन माझा सत्कार केला.मला उत्सवमूर्तीच करुन टाकलं.एक छोटासा सत्कार सोहळा साजरा झाला.खूप भावनिक झालेलो आम्ही सर्व मित्र.
    प्रत्येक जण गळ्यात पडत होता प्रेमानं भेटत होता.या गळाभेटीत होतं प्रेम,स्नेह,आपुलकी,एकमेकांबद्दलची काळजी.या मिठीच्या स्नेहगंधाच्या दरवळात मनाला जो आल्हाददायक सुगंध अनुभवायला मिळत होता त्या गंधाला इतर कोणत्याही सुवासिक धूप,अत्तराची सर नाही.जोड नाही,तोड नाही, नाही नाही या स्नेहगंधाच्या सुवासाला दुसरी उपमाच नाही.
     आम्ही सर्व मित्र २००४ सालात मध्य रेल्वेच्या सोलापूर डिविजन मध्ये कायम स्वरुपी रेल्वेच्या सेवेत रुजू झालो.तेव्हाही सर्वजण मुंबईतून एकत्र सोलापूरला गेलो होतो.एकत्र राहत होतो.भरतीपूर्व सोपस्कार पार पडल्यानंतर आम्हाला प्रत्येकाला वेगवेगळ्या स्टेशनला नोकरीवर रुजू व्हायचं होतं.सोलापूर डिविजन विस्ताराने खूप मोठं आहे.शहाबाद वाडी ते दौंड आणि दौंड ते मनमाड असं विस्तारलेलं.कोण शहाबादला,कोण मनमाडला,कोण कोपरगावला,तर कोण कुठे तर कोण कुठे . आमची एकमेकांची ताटातूट होणार होती.स्टेशनला सोडायला आल्यावर एकमेकांच्या गळ्यात गळे घालून आम्ही खूप रडलो.घरातील कोणी आपल्याला सोडून दूर परगावी जाताना कधी रडू आलं नव्हतं पण मित्रांना आपल्या पासून दूर जाताना आम्ही हमसून हमसून रडत होतो.त्याला कारणही तसंच होतं.आम्ही सर्व मुंबई सारख्या शहरात लहानाचे मोठे झालेलो, ग्रामीण भागाशी त्यातील काहीजणांचा तर दुरान्वये संबंधही आला नव्हता.आणि प्रमुख कारण म्हणजे रेल्वेनं आम्हाला तीन वर्षे मॅकॅनिकलचं प्रशिक्षण दिले होते आणि आता भरती होत असताना आम्ही सर्व इंजिनिअरिंग विभागात भरती होत होतो.दोन्ही विभाग परस्परांना विरोधी.दोन्हींची कामं वेगवेगळी.मॅकॅनिकल विभागात कारखान्यात वेगवेगळ्या ट्रेडनुसार खाती होती.फिटर,वेल्डर,कारपेंटर,पेंटर,मिलराइट,मशिनिस्ट असे आमचं ट्रेड प्रशिक्षण झालं होतं‌.आणि इंजिनिअरिंग विभाग म्हणजे रेल्वे लाइनची दुरुस्ती करणे,उन्हा तान्हात काम असतं.खूप जिकिरीचं आणि जिवाला धोका असणारं.असं सांगतात की हे काम पूर्वी इंग्रजांच्या काळात गुन्हेगारांना शिक्षा म्हणून दिलं जायचं.ते पद होतं रेल्वे ट्रॅकमन,गॅंगमनचं सध्या शैक्षणिक पात्रता म्हणजे आठवी पास आणि आम्ही सर्व पदवीधर शिवाय रेल्वेचे ट्रेड ॲप्रेंटिस.
पण शिक्षणाचा आणि या कामाचा काहीही संबंध नव्हता.आम्ही काळजीनं आणि एकमेकांच्या दुराव्यानं हतबल होऊन रडत होतो.पण पोटापाण्याचा प्रश्न होता.सर्वजण जरी सुखवस्तू घरातील असले तरी पुढच्या भविष्याचा विचार करून आम्ही संकटाला सामोरे गेलो.आणि नियोजित जागी काम करु लागलो.
सगळीच प्रतिकूल परिस्थिती असताना आम्हाला एकमेकांचा आधार होता.सोलापूर जवळ असलेले आम्ही दहा बाराजण एकत्र सोलापूरला राहत होतो.दिवसभर गधामजूरी करुन थकलेलं मन आणि शरीर रात्री किमान मित्रांच्या सोबतीत, हास्यविनोदात विसावलं जायचं.यामुळे आम्ही भावनिकदृष्ट्या खूप जवळ आलो.आता आम्हीच एकमेकांचे कुटुंब झालो.लांब असलेले मित्र सोलापूरला काही कामानिमित्त आले की आमच्याकडे राहायचे.थोडं बरं वाटायचं एकत्र आल्यावर.
    असेच दिवस जात होते.एकएक दिवस अक्षरशः मोजत होतो आम्ही सर्वजण.त्यातच आमच्यातील काहीजणांची लग्नंही झाली.कितीही नकोशी वाटत असलेली नोकरी वाढती जबाबदारी पाहता सोडू शकत नव्हतो‌.खरोखर या कामात जीवाची शाश्वती नाही कधी कुठला अपघात होऊन जीवाशी येईल याची खात्री देऊ शकत नाही.असं भयानक काम करत होतो.त्यातूनही आमच्यातील एक दोन जण अपघातात गेले ते कायमचेच आम्हाला सोडून गेले.
    बरं या कामाची वास्तविकता आमच्याशिवाय इतरांना पटायचीही नाही.लोक वेड्यात काढत.
    पण या परिस्थितीत आम्ही खूप जवळ आलो‌.आधीच तीन वर्षे एकत्र होतो आणि आता तर आम्हीच एकमेकांचे आधार होतो.एकमेकांच्या सुखदुःखात साथ देत होतो.कुटुंबातील काही बऱ्यावाईट घटनांमध्ये धाऊन जात होतो‌.मनातील वेदना ,दु:ख,आनंद घरच्यांपेक्षा आमच्या आमच्यातच अधिक मोकळेपणाने मांडत होतो‌.आमच्या प्रत्येकाचे त्यांच्या त्यांच्या घरच्यांशी अधिक जवळचं नातं जोडलं गेलं.त्यामुळे आमचं नातं अधिक दृढ,घट्ट होत गेलं.
    आमची मैत्री अशी जीवाभावाची, रक्ताच्या नात्यांच्या ही पलीकडची.विश्वासाची,आधाराची, एकमेकांच्या काळजीची.कुणी सोबत नसेल तर उगाचच हळहळ वाटणारी‌.
     बघता बघता आठ नऊ वर्षे गेली.दरम्यान काही जणांनी होणाऱ्या त्रासाला कंटाळून नोकरी सोडली,तर काही जणांनी सततच्या गैरहजेरीमुळे.मीही मणक्यांच्या त्रासाने त्रस्त होऊन २०११ ला नोकरीला कायमचा रामराम ठोकला.
   त्यानंतर काही दिवसांनी आमच्या बॅचची सततच्या लढ्यानं पुन्हा माटुंगा वर्कशॉपला बदली झाली.आता सर्व आनंदात आहेत.स्वत:च्या कुटुंबा सोबत आहेत.
   मी जरी नोकरी सोडून गावी राहत असलो तरी कायम आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत.
   काही मित्र मला भेटायला वाईला येऊनही गेले ‌.पण मला मुंबईला येता येत नाही सहसा.यापूर्वी हे सर्व बदली होऊन आल्यावर एकदा धावती भेट झाली होती ‌.
    पण परवाची भेट पाच सहा वर्षांनंतर होत होती.त्यामुळे भेटीची ओढ, आतुरता, उत्सुकता कमालीची ताणली गेली होती.
    एकमेकांचे फोन झाले होते आणि परवाचा दिवस निश्चित झाला.
     खूप दिवसांनी भेटत होतो.त्यामुळे एकमेकांच्यात झालेले शारीरिक बदल स्पष्ट दिसत होते,पोटाचा सुटलेला घेर,केसांचा रंग बदल,तर काहींच्या केसांनी डोक्याच्या छप्पराची युती तोडलेली पण मनात काहीही बदल झाला नव्हता तो फक्त शारीरिक होता.
     हा भेटीचा आनंद अवर्णनीय आहे.जीवलगांची भेट इतक्या प्रतिक्षेनंतर होत होती‌.त्यातही काहीजण दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये गेलेले,काहीजण आपापल्या गावाजवळ जवळच्या ठिकाणी बदली करून गेले आहेत त्यामुळे त्यांची भेट झाली नाही याची हूरहूर वाटली.
   खरंच आजवर शाळा,काॅलेज आणि आता व्यवसायिक मित्र खूप जोडले गेले पण आमची ही मैत्री या सर्वांहून खूप वेगळी आहे.हे ऋणानुबंध अनेक जन्मजन्मांतरीचेच असावेत असं सतत वाटत असतं.
    मन एकदम ताजेतवानं झालं.प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जात होता.आमची मैत्री ज्या विश्वासावर आणि ज्या धाग्यांनी गुंफली गेली आहे त्याचं वर्णन शब्दातीत आहे.कोणत्या शब्दांच्या कोंदणात हे नातं जोडू ते शब्दच सापडत नाहीत ‌.
    आज आमच्यातील प्रत्येकजण सुखी आनंदी आहे.प्रत्येकजण आयुष्याच्या या वळणावर स्थिरावला आहे.काळानुरुप बदल होतच असतात.प्रौढत्व, कौटुंबिक जबाबदारी याचा बदल होत असतो.पण आमची मनं मात्र आजही त्याच अतूट मैत्रीच्या नात्यात विणलेली आहेत त्यात कसलाही बदल झालेला नाही.
     असं म्हणतात एकाच आईच्या कुशीत जन्माला येणं शक्य नसतं म्हणून दुसऱ्या एका आईच्या कुशीतून जन्म घेऊन मैत्रीच्या नात्यात जोडला जातो तो मित्र.आणि असे आम्ही सारे एकमेकांचे घनिष्ठ मित्र ‌.आम्ही विशिष्ट दिवशीच मैत्री दिन साजरा करत नाही तर नेहमीच मैत्रीचा सोहळा साजरा करत असतो.
     आमचं हे प्रेम, विश्वास तहयात असंच निर्मळ,निर्भेळ, निस्वार्थी राहो माझ्या या आणि सर्वच मित्रांना उदंड निरामय आयुरारोग्य लाभावे हे भगवंताकडं मागणं मागतो आणि इथं थांबतो ‌.

Post a Comment

0 Comments