Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

मैत्र जीवांचे

मैत्र जीवांचे

   तो नेहमी मित्रांच्या घोळक्यात दिसेल नाहीतर तरुण मुलांचा त्यांच्याभोवती गराडा पडलेला दिसेल. कधी डोंगराला वणवा लागला तर तो विझवण्यासाठी कुणी सोबत असू वा नसू एकट्याने वणवा विझवण्यासाठी धडपड करताना दिसेल.तर कधी एखादे झाड कुणी पाडत असताना ते झाड वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल.कधी वन्य पशूपक्षांच्या संरक्षणासाठी त्यांचा जीव वाचवण्यासाठी धावपळ करताना दिसेल.कधी दुर्गम भागातील समाजाच्या मदतीसाठी धावून जाताना दिसेल तर गडदुर्गांच्या पदभ्रमंतीत युवा वर्गासोबत दिसेल.

     आमचा परिचय दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगडावर पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त २००६ साली  रायगडी होणाऱ्या कार्यक्रमात झाला‌. तेव्हा मी रेल्वेत नोकरीला होतो आणि सुट्टीवर आलेलो वेळ होता आणि आवडही म्हणून या पुण्यतिथीला गेलो. तिथं गेल्यावर मला वाईतील काही शिवभक्त भेटले त्यामध्ये ह्यांचा परिचय झाला.या परिचयाचं रुपांतर मैत्रीत कधी झालं ते कळंलच नाही.

    मी ज्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलतोय ते व्यक्तिमत्त्व म्हणजे आमच्या वाईतील सामाजिक कार्यात स्वतः ची वेगळी ओळख निर्माण करणारे प्रशांत डोंगरे यांच्याबद्दल.
 
    या माणसाकडे कमालीची ऊर्जा,सकारात्मकता, आणि झपाटून काम करण्याची हातोटी आहे. स्वतः ची वेगळी अशी छाप समाजमनावर बिंबवणारा हा अवलिया.

      'हाॅटेल अंबिका' या व्यवसायाचा मालक.वाई - पाचगणी रोडवर किसनवीर महाविद्यालयाला लागून यांची स्वमालकीची जागा आहे.उत्तम दर्जाचा अल्पोपहार इथं मिळतो‌.सोबतच लाकडी घाणा आणि स्वतः चा ब्रॅंण्ड असलेला 'डोंगरे कुल्फी' चा व्यवसाय नावारूपाला आणण्यासाठी केलेला अटोकाट प्रयत्न.इथं कायम महाविद्यालयीन मुला मुलींचा राबता असतो.टेबलवर बसून घरुन आणलेला डबा खाण्यासाठी मालकांची काही हरकत नसते.टेबलवर बुद्धीबळाचा पट असतो कुणाला वाटलं तर बुद्धीबळ खेळत बसावं.त्या बरोबरच फेरफटका मारायला आलेले वाईकर थोडावेळ इथं थांबून सोबतीला असणाऱ्या मित्रांसोबत चहा किंवा गुळवेलचा काढा पीत गप्पा मारताना दिसतात.
यांच्याकडे ऐतिहासिक, धार्मिक पुस्तकांचा , मासिकांचा संग्रह वाखाण्याजोगा आहे कुणाला वाचनाची आवड असेल तर तो एखादं पुस्तक घेऊन चाळत बसतो. राहण्याची उत्तम व्यवस्था आहे  त्यासोबत घरगुती रुचकर लाकडी घाण्याच्या तेलात बनवलेलं स्वादिष्ट जेवण म्हणजे दुग्धशर्करा योगच म्हणावा.

    वाईत येणारे इतिहास संशोधक, व्याख्याते यांची निवासाची,जेवणाची व्यवस्था बहुतेकदा प्रशांतदादा कडेच केली जाते. 
   
   या माणसाची सतत समाजासाठी काहीतरी करत राहण्याची धडपड असते. राजेंद्र खरातसरांच्या सारख्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून तरुणांना सैन्य दल तसेच पोलीस दलात भरतीसाठी भरतीपूर्व प्रशिक्षण मिळावे म्हणून श्रीशिवसह्याद्री ॲकडमी वाईत सुरु करुन तरुणांना मार्गदर्शन केले जाते.यातून अनेक युवकांचे सैन्य तसेच पोलीस भरती होण्याचं स्वप्न साकार होत आहे.याच ॲकडमीच्या माध्यमातून समाजासाठी काम करण्याची सवय तरुण वयातच लागावी म्हणून तरुणांची रेस्क्यू टीम तयार केली.याकामी राजेंद्र खरात सरांचं अनमोल योगदान आहे ‌.
 
    प्रशांतदादा तसा मितभाषी स्वभावाचा माणूस.पण कमीत कमी शब्दांत अधिकाधिक आशय कसा मांडावा ते या माणसाच्या बोलण्यातून दिसून येते.हजरजबाबी, विनोदी शैलीत बोलणं ही त्यांची ओळख.एखाद्याच्या बोलण्याचे एक-दोन अर्थ निघतात पण प्रशांतदादा जे बोलतो त्याचे अनेक अर्थ निघतात.सर्वांशी समरस होऊन समाजकार्य करणाऱ्या या माणसाला स्वतः च्या नावाची, प्रसिद्धीची अजिबात आवड नाही.उलट एखादं काम पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी ही व्यक्ती पडद्यामागे राहून सर्वोतपरी धडपडत असते.त्यामागे कसलाही गाजावाजा किंवा स्वतः चं नाव होण्यासाठी कसलाही आटापिटा नसतो.

      दुर्गम डोंगरी भागात मूलभूत गरजा पोहचविण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था यांच्या माध्यमातून या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशांतदादाची तळमळ थक्क करण्याजोगी असते.मग माडेगणी सारख्या दुर्गम भागात सौर ऊर्जेचे दिवे बसवणे असो अथवा एखाद्याला उपजिवेकेसाठी छोटा व्यवसाय उभा करुन देणे असो‌ प्रशांतदादा यात स्वतः ला झोकून देऊन काम करत असतो.

     आपत्कालीन परिस्थितीत कसलीही पर्वा न करता मदतीसाठी तत्पर असणारा हा माणूस‌.

      वणव्यापासून डोंगर आणि जैवसाखळी वाचवण्यासाठी सतत याकामी प्रशांतदादा काम करत असतो. डोंगरात जाळरेषा आखून वणवा लागलाच तर अधिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाते.
सततच्या १५ ते २० वर्षांच्या प्रयत्नांतून वाईला लागून असलेला सोनजाईचा डोंगर या डोंगरेंच्या कष्टामुळे छोट्यामोठ्या झाडांमुळे हिरवागार झालेला दिसतो. उन्हाळ्यात पक्ष्यांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून ठिकठिकाणी झाडांवर रिकामे डबे कापून त्यात पाणी भरून असे पाण्याने भरलेले डबे झाडांवर टांगून पक्ष्यांच्या पाण्याची  ही सोय केली जाते.

     नवयुवकांना व्यवसायासाठी लागणारे कोणतेही मार्गदर्शन करण्यासाठी कायम तयार असणारा प्रशांतदादा अनेकांना व्यवसायात उभा करता झाला‌.

    स्वतः च्या व्यवसायात सर्व कामं स्वतःच करून कमीतकमी मनुष्यबळात व्यवसाय सांभाळत असतो‌.

     प्रशांतदादा त्यांच्या निस्वार्थी, निरपेक्ष कार्यातून समाजात ओळख निर्माण करु शकला त्यामागे त्यांचे याकार्यातील सातत्य,तळमळ, समर्पण, ध्येयासक्ती हे गुण आहेत.

     अनेक सामाजिक संस्थेकडून पुरस्कार देऊन प्रशांतदादाला गौरविण्यात आले आहे.पण याचा कधी डामडौल नाही की कसला दिखावा नाही.तो आपला आपलं काम करतच असतो.

     मला माहित आहे मी जे हे काही प्रशांतदादाबद्दल लिहिण्याचा खटाटोप केलाय तो त्या प्रसिद्धीपासून स्वतः ला खूप दूर ठेवणाऱ्या व्यक्तीला अजिबात आवडणार नाही परंतु त्याचा रोष पत्करून मी हे धाडस करत आहे.

     अशा या समाजासाठी झटणाऱ्या प्रशांतदादा यांना आणि त्यांच्या सामाजिक कार्याला माझा एक सहकारी मित्र म्हणून मानाचा मुजरा.आणि पुढील समाजसेवेचा वसा असाच कायम राहो आपल्या हातून सामाजिक कार्याचा आदर्श निर्माण व्हावा यासाठी खूप खूप शुभेच्छा.

✍🏻 हिंदुराव गोळे

https://hinduraogole.blogspot.com/
👆🏻 आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻

🙏🏻🍁🙏🏻🍁🙏🏻🍁🙏🏻🍁🙏🏻

Post a Comment

1 Comments