Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

।। श्री तुकोबाराय ।।

।।श्री तुकोबाराय।।

जया पुजिलें आदरे पांडूरंगे ।
विमानस्थ केले प्रयाणप्रसंगे ।।
तनु मानवी दिव्य रुपीच केली ।
न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली।। 
     ज्यांचे अभंग वाचले असता, गायले असता देहाचा देहू आणि इंद्रियांची इंद्रायणी झाल्याशिवाय राहत नाही .त्यांचे अभंग कालातीत आहेत. त्या काळातही आणि आजच्या काळातही आपणास ते मार्गदर्शक ठरतात. जीवनातील अशी कोणतीही समस्या नाही ज्याचे समाधान तुकाराम महाराजांच्या गाथेत होत नाही. प्रत्येक समस्येवर समाधान आहेच ! प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळतेच. त्यांचा गाथा हा पाचवा वेद आहे .
      तत्कालीन परिस्थितीत लोकांच्या दुःखावर आपल्या अभंगांनी  हळुवार मोरपीसासारखी फुंकर घालून त्यांचे दुःख दूर करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज हे अद्वितीयच!
     पांडुरंगावरील भक्ती ही तुकाराम महाराजांची जीवननिष्ठा होती.आत्मज्ञानानंतर आमरण त्यांनी भक्तीयोगाचे आचरण केले. ईश्वरी साक्षात्कारानंतर त्यांनी जी उत्फूणर्त अभंगरचना केली ती भक्तीरसाने ओतप्रोत होती. त्यांची अभंगगाथा भक्तीगाथाच झाली आहे.
      त्यांच्या भक्ती योगाचे विवेचन हे केवळ तात्विक व तार्किक नाही तर ते अनुभवावर आधारलेले आहे. भक्तीयोगाच्या मार्गाने ते स्वतः गेले आणि त्यांना जे अनुभव आले तेच अनुभव त्यांनी आपल्या अभंगातून आत्मविश्वासाने व्यक्त केले. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ।
देह कष्टविती परोपकारे ।।
या पंक्तीतील तुकाराम महाराज असल्यामुळे त्यांनी आपले भक्तीयोगाचे अनुभव जगाच्या कल्याणासाठी सांगितले 
'अनुभव आले अंगा ' तेच त्यांनी जगाला सांगितले. 
      तुकोबाराय हे भगवद्भक्त असले तरी युक्ती पेक्षा भक्तीकडे त्यांचा अधिक कल असला तरी महाराष्ट्रातील भागवत धर्माचे अद्वैत तत्त्वज्ञान त्यांनी आत्मसात केले होते  जो भगवंत त्यांचा 'सखा' झाला होता आणि ज्याची  वाणी त्यांच्या मुखावाटे  अभंगरूपाने प्रकट होत होती . त्या भगवंताच्या मुळ स्वरूपाविषयी आणि जीवन जगताविषयी त्यांचे विचार काय होते ते अभ्यासून पाहिले पाहिजे. 

सर्वपक्षी हरी साहेसखा झाला।
  ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला ।।
 सहज चाली चालतां पायवाटे ।
चिंतामणीसमान होती गोटे ।।
तुका तरी सहज बोले वाणी । त्याचे घरी वेदांत वाहे पाणी ।। 
       
      श्रीहरी सर्व तऱ्हेने ज्याला सहाय्य करणारा सखा झाला त्याला काय कमी आहे ? त्याच्या ओल्या अंगणातील वेली या त्याला कल्पलता होतात आणि मार्गाने सहज चालत असताना पायांना लागणारे गोटे चिंतामणी होतात. म्हणून तुकाराम महाराज जरी सहज बोलत असले तरी त्यांच्या अभंगात वेदांत पाणी भरत आहे.
यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।।।
परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम् ।
 धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे ।।
हे गीतेतील श्लोक महाराजांच्या समोर आहेत. साधूंचे संरक्षण आणि दुष्कृत्ये करताना दुष्टांचा विनाश करून ज्या धर्माच्या स्थापनेकरिता ईश्वर अवतार घेतो त्याच धर्माच्या रक्षणासाठी तुकाराम महाराजांनी आपले जीवन वाहिले आहे.
 दया तिचे नाव भूतांचे पाळण । आणिक निर्दाळन कंटकांचें ।। 
        आपल्या भागाला आलेली कर्मे  स्वार्थनिरपेक्ष बुद्धीने फलासक्ती न ठेवता प्रामाणिकपणे सर्व समाजाला हितकारक होतील अशी करणे हाच खरा धर्म व हीच खरी भक्ती. नामदेवरायांनी 
 आम्हाला सापडले वर्म ।
करू भागवत धर्म ।।
 म्हणून या धर्माचा प्रचार व प्रसार केला आणि 'नामाचा तुका ' म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुकाराम महाराजांनी याच धर्माच्या रक्षणासाठी जीवन अर्पण केले. नामदेवराय, तुकोबाराय आदि संतांनी आपल्या अभंगांनी व कीर्तनांनी हेच धर्मकार्य केले म्हणून स्वधर्म टिकला व स्वराज्याला अर्थ व आधार मिळाला. हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
     आपल्या प्रयाणप्रसंगी तुकाराम महाराज सदेह वैकुंठास गेले.धर्माचे रक्षण व्हावे म्हणून सज्जनांची पीडा नष्ट होऊन, ती पीडा करणाऱ्या दुष्टांचे निर्दालन व्हावे, समाजातील खोटेपणा नाहीसा होऊन सत्तेचा व्यवहार व्हावा म्हणून तुकाराम महाराजांनी अभंगरचना केली. ज्याने ही धर्मरक्षणासाठी आटापिटा करण्याची प्रेरणा दिली त्या ईश्वराची आज्ञा घेऊन येथून निघून जात आहे असे तुकोबाराय म्हणतात.
 जातो आता आज्ञा घेऊनिया स्वामी ।
काळक्षेप आम्ही करू कोठे ।।  आणि तुकाराम महाराज इहलोकीची यात्रा इथेच थांबवून निघून गेले.
 आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी ।
 सकळा सांगावी विनंती माझी ।। वाढवेळ झाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बोलावितो ।।अंतकाळी विठो आम्हांसी पावला ।
कुडीसहित जाला गुप्त तुका ।।  
       जगद्गुरु  संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा निरोप घेण्यापूर्वी त्यांनी देवाला केलेली प्रार्थना आपणही केली पाहिजे.
" महाराज ईश्वरी साक्षात्कारानंतर धर्मरक्षणाकरिता आपण वैकुंठाहूनी आल्याची जाणीव झाल्यापासून एका क्षणाचीही विश्रांती न घेता आणि स्वतःच्या शरीराकडे व संसाराकडे लक्ष न देता आपण धर्मरक्षणाचे कार्य आमरण चालविले म्हणून आम्हाला स्वराज्य दिसले. आपण ज्ञानदेवांची योग्यता संपादन करून भागवत धर्ममंदिराचे कळस झालात असे आपले स्मरण महाराष्ट्र आजपर्यंत करीत  आला. यापुढेही आपला व आपल्या उपदेशाचा विसर आम्हाला पडू देऊ नका."
 हेचि दान देगा देवा ।
 तुझा विसर न व्हावा ।। 
गुण गाईन आवडी ।
हीच माझी सर्व जोडी ।।
न लगे मुक्ति धन संपदा ।
 संत संग देई सदा ।। 
तुका म्हणे गर्भवासी ।
सुखे घालावे आम्हासी ।।

संकलन:- ह.भ.प.हिंदुराव गोळे
सातारा जिल्हा सत्संगप्रमुख,
विश्व हिंदू परिषद,बजरंग दल.

🙏🏻🚩🍁🙏🏻🚩🍁🙏🏻🚩🍁

Post a Comment

0 Comments