वीर हुतात्मा आमचा सोमा
लहानपणापासून काहीतरी वेगळं करण्याची धडपड आणि जिद्दीने सैन्यभरती झालेले सोमनाथ अरविंद तांगडे यांना दिनांक १६ एप्रिल रोजी सिक्कीम येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. आणि एका जिद्दी, साहसी तितकाच प्रेमळ स्वभाव असणाऱ्या सैनिकाची धडपड कायमची थंडावली.
सोमनाथ म्हणजे आमच्या वहिनीचा धाकटा भाऊ,नात्यानं मेव्हणा,खरंतर दादाचा मेव्हणा पण माझ्याशी इतकी जवळीक आणि प्रेमाचं नातं की मला कधी वाटलंच नाही की हा दादाचा मेव्हणा आहे म्हणून. दादा इतकचं माझ्यावर प्रेम करणारा, माझा आदर करणारा हा मनमिळाऊ स्वभाव असलेला माणूस आपल्या प्रेमळ स्वभावाने आणि वागण्या बोलण्याने कोणालाही आपलसं करणारा मायाळू माणूस. आमचं नातं खूप घट्ट झालं हे कधी झालं कळलंच नाही.
सुट्टीवर आल्यावर घरी भेटायला हमखास येणार आणि परत ड्युटीवर जातानाही भेटल्याशिवाय जाणार नाही. आमची वहिनी मुंबईला असते पण सोमनाथ माझ्या पत्नीवर व मुलावर वहीनी इतकंच प्रेम करायचे.रक्षाबंधन, भाऊबीजेला गावी असल्यावर घरी नक्की येणार. पदवीधर असलेला सोमनाथ २००३ साली भारतीय सैन्यदलात सिग्नल अँड टेलिकॉम विभागात नोकरीला लागला.वैद्यकीय चाचणीत नाकाचं हाड वाढलेलं आढळून आल्यावर गावाला येऊन त्याचं आँपरेशन करून घेतलं व पुन्हा वैद्यकीय चाचणी देऊन भरती झाला. काहीही झालं तरी भरती व्हायचचं ही जिद्द मनाशी ठाम होती. लहानपणापासून थोडासा हट्टी स्वभाव असलेला सोमनाथ इतरांपेक्षा वेगळा होता.घरची वंशपरंपरागत बागायती शेती आहे. शेतातील कामाची आवड होतीच.पण सैन्यात भरती होण्याची जिद्द कायम उराशी बाळगून असलेला सोमनाथ नेहमी म्हणायचा सगळ्यांनीच शेती केली तर देशसेवा कुणी करायची.जय जवान जय किसान या ब्रीदाला अनुसरून नेहमी आयुष्य जगत आला.
लहानपणापासून खेळाची आवड असलेला सोमनाथ खो खो आणि क्रिकेट उत्तम खेळायचा. विशेषतः क्रिकेट खेळावर त्याची उत्तम पकड होती.ओझर्डे गावात टेनिस बाँल क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात.त्यांच्या संघाचा कर्णधार असलेला सोमा उत्तम खेळाडू होता.आपल्या फटकेबाजीने त्याने संघाला अनेकवेळा एकहाती विजय मिळवून दिलेत.आजही त्याच्या धडाकेबाज शैलीची आठवण काढली जाते. त्यांच्या क्रांतिसिंह नानासाहेब पाटील मंडळाचा धडाडीचा कार्यकर्ता म्हणून परिचित असणारा सोमनाथ मंडळाच्या विविध उपक्रमात झोकून देऊन कार्य करत असे.आज मंडळाचा आधारस्तंभ हरपल्याचं दुःख मंडळातील त्याच्या मित्रांना होत आहे.
सैन्यात भरती झाल्यापासून आपल्या उत्तम कामगिरीवर व अंतर्गत परीक्षा देऊन तो हवालदार या पदावर पोहचला.त्याला दोन तीन वेळा गौरवास्पद कामगिरी म्हणून सन्मानार्थ पदक देऊन गौरविण्यात आलं आहे.
सुट्टीवर गावी आल्यावर सगळ्या नातेवाईकांना, मित्रांना भेटणं हा त्यांचा आवडीचा छंद.
साधं राहणीमान असलेला हा आमचा मेहुणा.त्यांच्या वागण्या बोलण्यात कधीही कसला बडेजाव नसायचा.घरी आल्यावर मांडी घालून आपल्या जवळ बसून तासनतास गप्पा मारणार.काय चाललयं काय नाही याची आस्थेनं आणि आपुलकीनं चौकशी करणार.
गावातील तरुणांना सैन्यभरतीसाठी मार्गदर्शन करुन त्यांना त्यासाठी कायम प्रोत्साहन देत असत.तरुणांचा सोमादादा आवडता होता. देशसेवेचं व्रत घेतलेला हा जवान इतरांनाही देशसेवेचा वसा देत असे.
दोन महिन्यापूर्वी त्यांच्या वडीलांचे दुर्दैवी निधन झाले. त्यावेळी गावी आलेला सोमनाथ महिन्याभरापूर्वी कर्तव्यावर हजर झाला. सिक्कीम येथे ९ एप्रिल रोजी ड्युटीवर असताना रात्री जोरदार वादळ आणि पाऊस सुरू झाले. त्या वादळाच्या तडाख्यात ह्यांचा तंबू उडुन गेला. आणि सोमनाथ बर्फावर पडला. बेशुद्ध झाला काही तासांनंतर उपचार सुरू झाले. थंडीमुळे मेंदूच्या रक्तवाहिन्यात रक्ताच्या गाठी झालेल्या. उपचार सुरू होते एक शस्त्रक्रियाही झाली. पण सर्व प्रयत्न अपयशी ठरले. शस्त्रक्रिया झाली पण शुद्ध हरपली आणि त्यातच दिनांक १६ एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.मृत्यूलाही आव्हान देणारा हा जवान अखेर शांत झाला. ही बातमी समजली आणि धक्का बसला.सोमनाथच्या आठवणींनी भावनांचा बांध फूटून डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या.त्यांच्या कुटुंबावर हा फार मोठा आघात होता.कुटुंबावर शोककळा पसरली.जो तो सोमाच्या आठवणींनी व्याकूळ होत होता.
शनिवारी १७ एप्रिल रोजी सोमनाथ यांचे पार्थिव शरीर घरी आले. सोमनाथच्या जाण्यानं कुटुंबावर व गावावर शोककळा पसरली. जो तो सोमनाथच्या आठवणींनी व्याकूळ होऊन रडत होता.महिना भरापूर्वी गेलेला सोमनाथ असा आकस्मिक आपल्यातून निघून जाईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. या वीर जवानाच्या जाण्याचं दुःख होतंच पण देशसेवेचं कर्तव्य बजावत असताना आलेलं वीर मरण याचाही अभिमान होता.गावातील तरुणांनी संपूर्ण गावात रांगोळी काढून रस्त्यावर फुलांचा सडा टाकला होता.स्मशानभूमीत चबुतरा तयार करून त्याला फुलांची आरास केली होती. घरासमोर व्यासपीठ तयार करून त्याला फुलांचे हार बांधले होते. सोमनाथचा मृतदेह रात्री दहा वाजता गावात आला.अंतिम दर्शनासाठी उभारलेल्या व्यासपीठावर ठेवण्यात आला.आणि कुटुंबातील आणि गावातील लोकांच्या भावनेचा बांध फुटला जो तो रडू लागला.सर्वांचा लाडका सोमा तिरंगा अंगावर घेऊन गावात आला होता,कायमचा निरोप घेण्यासाठी.हृदय हेलावून टाकणाराच हा प्रसंग. सैन्यदल व पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली.फुलांनी सजवलेल्या रथात सोमनाथचा देह ठेवून संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली.
रात्री सुमारे साडेअकरा वाजता स्मशानभूमीत ही रथ यात्रा पोहचली. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव ध्यानात घेऊन पोलीसांनी बंदोबस्त ठेवला होता.गर्दी करायला परवानगी नव्हती तरीसुद्धा जनसमुदाय आपल्या या थोर देशभक्ताला अखेरचा निरोप देण्यासाठी गोळा झाला होता. गार्ड आँफ हाँनर म्हणून सोमनाथला मानवंदना देण्यात आली.आणि या वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यात आला. काहीतरी वेगळं करुन दाखवण्याची जिद्द असलेल्या सोमनाथ यांनी जगावेगळं काही तरी करून दाखवलं होतं.असं हे जगावेगळं करणं कोणाच्याही नशीबी नसतं भाग्यवानाला हे मिरतं.भारतमातेच्या सेवेत असताना वीर मरण येणं हे भाग्याचंच लक्षण.आणि हे भाग्य सोमनाथला लाभलं होतं.काहीतरी नाही खूप वेगळं करून दाखवलं.
तुमचं हे हौतात्म्य येणाऱ्या नवीन पिढीला वेगळा आत्मविश्वास,ऊर्जा, देशभक्तीची आस देईल यात शंकाच नाही. आपलं,आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करुन हा जवान आपल्यातून निघून गेला. त्यांचा झालेला गौरव,सन्मान खरंच अभिमानास्पद आहे.
पण या जगाचा निरोप घेण्याचं तुमचं वय नव्हतं. पाव्हणं मनाला चटका लावून गेलात ! मनाला एक न भरुन येणारी जखम केलीत.
तुमच्या स्मृती कायम आमच्या सोबत असतील.कधीही विसरणार नाही असा तुमचा स्वभाव कायम ध्यानात राहील. तुमच्या जाण्यानं आमच्या आयुष्यात एक फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशा या भारतमातेच्या सुपूत्रास माझा मानाचा मुजरा. त्यांना उत्तम सद्गती प्राप्त होओ ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या या हौताम्याचं स्मरण म्हणून गावात एक स्मारक व्हावं ही इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.मानाचा त्रिवार मुजरा !
वीर जवान तुझे सलाम !!!
सोमनाथ तांगडे अमर रहे !!!
🙏🏻🇮🇳🇮🇳🇮🇳🌹🌹🌹
© ✍🏻 हिंदुराव गोळे

0 Comments