अमृतमामा
सगळ्या मामांची मुलं , मामा एकत्र येऊन ही जत्रा साजरी व्हायची
सगळ्या मामांची मुलं , मामा एकत्र येऊन ही जत्रा साजरी व्हायची
'लाभो संतती संपदा बहु तुम्हा.... लाभोतही सद्गुणा....साधोनी कर्म योग आपुला...व्हा बांधवा भूषणा....' ही मंगलाष्टका एखाद्या लग्नात ऐकू आली की समजायचं की अमृतमामा ती गात आहेत. ती मंगलाष्टका गाण्याची एक वेगळीच शैली आणि लकब ही अमृतमामांची ओळख होती.एका वेगळ्याच ताल स्वरात गायचे.
कपाळावर अष्टगंध कायम असायचा.
सर्वजण त्यांना 'बुवा' म्हणायचे. 'अमृतबुवा ' या नावाने परिचित होते. म्हणजे त्यांची ओळख एवढीच होती असं नाही. आमचे मामा अमृतमामा ,आमच्या भावंडावर खूप प्रेम करणारे, आमचा लाड करणारे विशेषतः आमची अक्का त्यांची खूप लाडकी होती. तीला लाडानं ते 'भूत्तो' म्हणायचे. तसं ते सर्वांनाच एखाद्या टोपणनावाने हाक मारायचे. त्या नावाने हाक मारण्यात त्यांचं प्रेम असायचं.लहान मुलांवर खूप प्रेम त्यांच.
तर हे आमचे मामा अत्यंत प्रेमळ स्वभावाचे होते. खूप मेहनती आणि कष्टाळू.एका पायाने थोडेसे अपंग होते. लहानपणी ते औतावर बसले होते आणि अचानक पडले औताखाली पाय आला आणि पायाला कायमचे अपंगत्व आले. हे एवढं छोटसं शारीरिक व्यंग सोडलं तर त्यांच्या मनात आणि स्वभावात कसलंही व्यंग अजिबात नव्हते. सेंट्रल रेल्वे माटुंगा वर्कशॉप मध्ये ते नोकरीला होते.सुट्टीला गावाला आले की पहिले आमच्या घरी यायचे.आप्पांनी काही पाठवून दिले असेल ते घेऊन यायचे. मुंबईतून येताना आप्पांची भेट झाली नाहीतर ते स्वतः आमच्यासाठी काही ना काही खाऊ घेऊन यायचे. मामा गावाला आले की आमची मजा असायची. दिवाळीत फटाके हमखास आणायचे.लाडानं आम्हाला जवळ घेऊन मुका घ्यायचे गोड लागला नाही बघ म्हणून परत परत घ्यायचे असे हे आमचे प्रेमळ मामा.आमच्या सर्वांचे लाडके.
आमच्या आजोळातील मामा मंडळींची शेतातील जत्रा असते. बेलजाईची जत्रा.डोंगरात बेलजाईची जत्रा असते साधारण दिवाळीनंतर भातकापणी झाली की ही जत्रा करतात. लहानपणी अमृतमामा आम्हाला घेऊन जायचे. रानात जेवण बनवून जेवण करून मग घरी यायचे. ही जत्रा म्हणजे शेताची राखण करणाऱ्या देवतांचे आभार मानन्यासाठी त्यांचं स्मरण करणं.आजही या जत्रेची आठवण होत असते. मजा यायची लहानपणी या जत्रेला.सगळ्या मामांची मुलं , मामा एकत्र येऊन ही जत्रा साजरी व्हायची आम्ही पण दरवर्षी जायचो.
आमच्या आईवर खूप जीव.आईला ते 'कासू' म्हणून हाक मारायचे.तीच्यापेक्षा मोठे होते. आई सांगायची की अमृतमामा त्यांना लहानपणी लिहायला वाचायला शिकवायचे तेव्हा आमच्या वाडीत शाळा नव्हती आणि मुलीतर शाळेत जातच नसत.अमृतमामा त्यांचे शिक्षक होते. आमचं घर आणि मामांचं घर जवळजवळच आहे. आमचं गाव आणि आजोळ एकच असल्याने आम्ही कायम आजोळात असायचो.आमची आजी पण खूप प्रेमळ होती.मी लहानपणी काही खोड्या केल्या की मामांच्या घरी लपून बसायचो.मार वाचवण्यासाठी हा सोपा पर्याय असायचा.आई शोधत यायची मग मामी आणि आजी तीची समजूत काढून माझी बाजू उचलून धरायच्या.
गावाला रजेवर मामा आले की आराम असा करायचेच नाहीत. सतत शेतात काहीतरी करत असायचे. खूप बारकावा असलेले मामा कधी शेतात ताल धरत तर कधी काही दुसरं काम करत.मुंबईला जाईपर्यंत शेतातील काम करण्यातच त्यांची रजा संपून जायची.
मुंबईत आम्ही जवळजवळ राहत होतो. आम्ही भायखळ्याला राहायचो आणि मामा डिलाईल रोडला,चिंचपोकळीचा रेल्वेचा पूल उतरला की पाचदहा मिनिटात घरी.मामा आमच्याकडे यायचे. आप्पांची आणि मामांची चांगली मैत्री होती. मामा जेवण खूप छान बनवायचे. कधी आले की स्वतः जेवण बनवायचे. पाट्यावर मसाला वाटून फक्कड भाजी बनवायचे.आप्पांचा आणि मामांचा कधीतरी विशेष बेत असायचा ! त्यांच्या हाताला भारी चव होती. कधी जेवायला थांबायचे तर कधी जेवण बनवून न जेवताच जायचे. म्हणायचे खाणावळीचा डबा वाया जाईल. मज्जातंतूला इजा होऊन ते आजारी झाले आणि त्या आजारातच ते आम्हाला सोडून गेले. खूप वाईट वाटले. मी पहिल्यांदाच एखाद्या अंत्ययात्रेला स्मशानभूमीत गेलो. लहान होतो आमचा लाडका मामा आम्हाला सोडून कायमचा चालला होता.खूप लवकर ते आम्हाला सोडून चालले होते. त्यांचं वय काही जाण्याचं नव्हतं. मामांच्या पश्चात त्यांच्या तीनही मुलांनी आमचे असलेले ऋणानुबंध कायम जपले. आजोळातलं हक्काचं मामाचं घर आमच्यासाठी आजही तेवढ्याच प्रेमानं स्वागतासाठी तयार असतं.
आजही त्यांची आठवण कायम होत असते.लग्नात मंगलाष्टका सुरु झाल्या की हमखास अमृतमामांची ती मंगलाष्टका कानावर पडते.आणि मामांच्या आठवणी जाग्या होतात.आता ती मंगलाष्टका गायला आमचे मामा नाहीत याची खंत मनाला होते.
आज सहजच मामांची आठवण झाली आणि ह्या आठवणी मांडण्याचा प्रयत्न केला. ही आठवण कशी वाटली ते जरूर कळवा.अशीच एखादी आठवण घेऊन तुमच्या भेटीला येईन तोपर्यंत रामराम.
स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. सुरक्षित रहा.
© ✍🏻 हिंदुराव गोळे

0 Comments