Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

कीर्तीरुपे उरावे !

कीर्तीरुपे उरावे !

                       चाळीस पन्नास वर्षांपूर्वी आमचं गाव म्हणजे पन्नास साठ घरांची छोटीशी वस्ती असलेली वाडी - पाचपुतेवाडी.अतिशय दुर्गम भागात डोंगरात वसलेली दुर्लक्षित वस्ती.सर्व सुखसोयींपासून वंचित असलेली,कसलाही विकास न झालेली.वीज,पाणी, रस्ता या मूलभूत सुविधांपासून वंचित असलेली ही आमची वाडी. पण या छोट्याशा वाडीत एक  असं नेतृत्व उदयाला आलं होतं की स्वतःच्या कार्यकतृत्वावर या सर्व अशक्यप्राय असणाऱ्या सुविधा त्यांनी वाडीत उपलब्ध केल्या.
 
             ते म्हणजे आमच्या वाडीचे विकासपुरुष ठरलेले स्व.कै.आनंदराव भाऊ चव्हाण.
आजही त्यांच नाव आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून आदराने घेतलं जातं.

 

                         मला त्यांना पाहण्याचा योग आला नाही. मी साधारण दोन तीन वर्षांचा असतानाच ते हे जग सोडून गेले. पण कळायला लागल्यापासून आजपर्यंत त्यांचं कार्यकतृत्व ऐकत आलोय.आणि या असामान्य व्यक्तिमत्त्वाची भुरळ कायम माझ्या मनावर आजतागायत राहिली.  आजही गावच्या विकासाच्या कामात आनंदा भाऊ सारखं स्वतःला झोकून दिलं तर विकास साधला जातो असं उदाहरण दिलं जातं. आमच्या आईवर स्वतःच्या लहान बहिणीसारखा जीव लावत.आईकडूनच लहाणपणापासून भाऊंच्या कार्याची ओळख होत गेली. घरासमोर घर असल्याने कायम भाऊ आमच्या घरी असायचे. आईला मनातील विकासाच्या नवीन योजना सर्वात आधी सांगायचे.
  तर भाऊंच्या कार्याचा सपाटाच असा होता की हाती घेतलेलं काम पूर्ण केल्याशिवाय ते उसंतच घ्यायचे नाहीत. आज आमच्या वाडीत, पाणी,वीज,रस्ता, शाळा,तालीम आणि विठ्ठल मंदिर हे सर्व भाऊंच्या प्रयत्नांमुळे आणि त्यांना ग्रामस्थांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे शक्य झाले आहे. भाऊंचा शब्द प्रमाण मानून सारं गाव त्यांच्या पाठीशी उभं राहत होतं.फारसं शिक्षण जरी झालं नव्हतं तरी भाऊंचे बुद्धीचातुर्य आणि दूरदृष्टी वाखाणण्याजोगी होती.
                      १९७० च्या आधी आमच्या वाडीत पिण्याच्या पाण्याचीही सोय नव्हती. दूरवरून एखाद्या झऱ्यावरुन पाणी आणावं लागायचं. पाण्यासाठी महिला वर्ग  कष्टी होता.उन्हाळ्यात तर या झऱ्यांचं पाणी आटून जायचं पाण्यासाठी नुसती त्रेधातिरपीट व्हायची.भाऊंच्या मनात ही सल होती. पाण्यासाठी लोकांची होणारी हालअपेष्टा त्यांना पाहवली जात नव्हती.आणि त्यांच्या डोक्यात पिण्याच्या पाण्याची पाणी पुरवठा नळ योजना घर करु लागली.
                आमच्या वाडीच्या दक्षिणेला उंच डोंगरावर वेरुळी गावच्या हद्दीत पाण्याचे जीवंत झरे डोंगराच्या कड्यात होते. भाऊंनी ग्रामस्थांना या झऱ्यांचं पाणी वाडीत आणण्याची आपली कल्पना सांगितली. झालं ठरलं कड्यातील झरे असणारी जागा प्रयत्न करुन जागा मालकाकडून गावच्या नावे विकत घेतली. चार पाच झऱ्यांचं पाणी एकत्रित करुन एका टाकीत सोडले. आणि त्या टाकीतून पाईपलाईन करून डोंगरउताराने नळाने पाणी वाडीत आणले.वाडीत एक दगडी बांधकाम असलेली टाकी बांधून पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आली.याकामी वाडीतील बायकामुलांसह सर्वजण श्रमदानाला जात असत.डोंगरात डोक्यावर वाळू,सिमेंट , लोखंडी पाईप वाहून नेत.खूप कष्टानं अथक प्रयत्नानं हे अशक्य वाटणारं काम शक्य झालं. आमच्या वाडीची पिण्याच्या पाणीची समस्या अशी सुटली. आमच्या वाडीचे 'भगीरथ' भाऊच होते. पाणी वाडीत आले त्यादिवशी घरोघरी सण साजरा केला गेला. 
 
पाणीपूजन केलं गेलं.पुरणपोळीचा नैवेद्य घराघरातून बनवला गेला. भाऊंची एक योजना फलद्रूप झाली होती.
आमच्या वाडीच्या या भगीरथामुळे गावात गंगा आली.हो हे सारे भगीरथ प्रयत्नच.
 
 
     भाऊ विकास कामासाठी वाईला सातारला सतत जात असत.पण त्यासाठी गावचा एक रुपया घेत नसत.स्वतः च्या खिशातून पदरमोड करून हे सर्व करत होते. सोबत दोनवेळचं जेवण घरूनच घेऊन जात.गावच्या विकासाची तळमळ उराशी घेऊन झपाटल्यासारखं त्यांनी स्वतःला या कामी वाहून घेतलं होतं.  आमच्या भागात पावसाळ्यात जोरदार पाऊस असतो. आतापेक्षा त्याकाळी पावसाचं प्रमाण अधिक असायचं.अभेपूरी पासून पाचपुतेवाडी पर्यंत गाडीवाट असलेला कच्चा रस्ता धूऊन जायचा.बैलगाडी शिवाय दुसरं वाहन गावात येणं शक्य नसायचं.भाऊंनी सरकार दरबारी खेपा घालून हा रस्ता करून घेतला.  भाऊंची अनेक नेत्यांशी आणि सरकारी अधिकार्यांशी चांगली ओळख होती. भाऊंच्या गावाच्या विकासाची तळमळ सर्वश्रुत होती.त्यांची प्रामाणिक तळमळ पाहून त्यांना हा वर्ग मदत करत असे. वाडीत प्राथमिक शाळाही नव्हती. मुलांना पहिलीपासून अभेपूरीत शाळेत जावं लागायचं.
आणि ही गैरसोय दूर व्हावी म्हणून भाऊंच्या कल्पनेतून शाळेची इमारत वाडीत उभी राहिली. श्रमदानातून बांधकाम झालं. अनेक शिक्षणाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन आमच्या वाडीत ही ज्ञानगंगा  आली. भाऊंचं हे स्वप्नंही साकार झाले.पावसापाण्यात शिक्षणासाठी मुलांची होणारी तांगडतोड संपली. शिक्षकांसाठी दोन खोल्या बांधल्या गेल्या.
ही सर्व कामं वाडीच्या विकास फंडातून व लोकवर्गणीतून होत होती हे विशेष!
        
 
आता भाऊंचं लक्ष्य होतं वाडीत वीज आणण्याचं.आणि ते ही लक्ष्य साध्य झालं.अभेपूरीच्या आधी पाचपुतेवाडीत वीज कनेक्शन आलं.घराघरात मीटर बसले ,रस्त्यावर दिवे लागले.अशाप्रकारे भाऊंनी आपल्या विकासाचा दिवा पेटवून गाव प्रकाशमय केलं.
 
                         कुस्तीची आवड असणारा आमचा भाग.त्यासाठी सराव करण्यासाठी गावात तालीम होणं गरजेचं होतं.भाऊंनी वाडीत तालीम बांधून घेतली. याच तालमीत कुस्ती खेळाची सुरुवात करणाऱ्या अनेक मल्लांनी पुढे राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर गावचं नाव उज्ज्वल केलं.
त्यामध्ये आमचे मामा पै.शिवाजीराव पाचपुते महाराष्ट्र केसरी झाले, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय मल्ल म्हणून नावारूपाला आले. पै.तानाजी पाचपुते, पै.सोपान खोपडे, पै.संभाजी पाचपुते, पै.हणमंत चव्हाण. हे व असे अनेक मल्ल याच तालमीत आपल्या कुस्ती क्षेत्राची सुरुवात करून नावारूपाला आले. आजही अनेक तरुण राज्य पातळीवर कुस्ती क्षेत्रात गावचं नाव गाजवत आहेत.
          भाऊंनी स्वतः पिठाची गिरणी वाडीत सुरू केली. किराणा मालाचं दुकान टाकलं.लोकांची गैरसोय होऊ नये हाच मुख्य उद्देश. पाचपुतेवाडीत विठ्ठल मंदिर असावं ही भाऊंची इच्छा होती.पण ही इच्छा पूर्ण होण्याआधीच भाऊंनी जगाचा निरोप घेतला.ग्रामस्थांनी भाऊंना श्रद्धांजली वाहताना मंदिर पूर्ण करण्याची शपथ घेतली. आणि अथक प्रयत्नातून गावात छानसं विठ्ठल मंदिर बांधण्यात आलं.१९८२ साली गावात मंदिर उभं राहिलं.भाऊंचं स्वप्न त्यांच्या पश्चात गावानं पूर्ण केलं.गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला. त्याचा परिणाम नवीन पिढीवर चांगले संस्कार होऊ लागले. यातूनच छोट्याशा वाडीत आज चार कीर्तनकार तयार झाले. हे सर्व भाऊंच्या प्रेरणेमुळेच शक्य झाले.
 
     भाऊंना अधिक आयुष्य लाभलं असतं तर कदाचित वाई तालुक्यातील एक नामांकित राजकीय नेतृत्व म्हणून ते नावारूपाला आले असते.
 
 
    एखाद्या कथा कांदबरीत अथवा सिनेमातील चरित्र अभिनेत्याची भूमिका वाटावी असं भाऊंचं व्यक्तिमत्त्व होतं.
    असा हा आमच्या वाडीचा विकासपुरुष थोडसं लवकरच आमचा निरोप घेऊन हे जग सोडून गेला.याची खंत वाटते.त्यांची स्मृती आम्हा प्रत्येकाच्या चित्तात कायम असेल.त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याचा सदैव प्रयत्न करु.परंतु त्यांची आठवण व पुढील पिढीस त्यांचा आदर्श मिळावा म्हणून वाडीत त्यांचं स्मारक व्हावं असं खूप दिवसांपासूनची माझ्या मनातील सुप्त इच्छा आहे. त्यांच्या आशिर्वादाने ती नक्कीच पूर्ण होईल.
     मरावे परि कीर्ती रुपे उरावे ! या उक्तीचे जीवंत उदाहरण म्हणजे आमच्या गावचे हे नेतृत्व.भाऊंच्या गुणांची कार्यकतृत्वाची ही अल्पशी ओळख मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. शब्दात भाऊंचं कतृत्व मांडणं तसं सोप्प नाही. त्यांच्या चरणी या भाच्याची ही शब्दसुमनांजली सादर समर्पित.

© ✍🏻 हिंदुराव गोळे

    हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा.आपल्या प्रतिक्रिया नेहमी माझा उत्साह वाढवतात. तेव्हा जरूर प्रतिक्रिया कळवा.ही विनंती.धन्यवाद.
अशीच एखादी आठवण घेऊन परत तुमच्या भेटीसाठी येईन तोपर्यंत रामराम.🙏🏻
काळजी घ्या.
   असेच काही लेख,कविता आणि पोवाडे वाचण्यासाठी आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.


Post a Comment

0 Comments