लहानपणीचे खेळ
काल मुलांना भोवरा खेळताना पाहिलं आणि मन बालपणातील खेळात हरवून गेलं.एका एका खेळात रमून आठवणी जाग्या करुन गेलं.आणि आपण खेळत असलेल्या खेळांपैकी कैक खेळ आज कालबाह्य झालेत ह्याची खंत वाटली.
खरोखरच आम्ही लहानपणी जे खेळ खेळत होतो ते खेळ आताच्या मुलांना माहीत देखील नाहीत. आमचं बालपण आनंदात,मजेत गेलं ते या खेळांमुळेच.आमच्या लहानपणी आता आहेत तशी करमणूकीची साधनं फार कमी होती,अगदी नगण्यच. गावात एखाद्या घरात दूरदर्शन संच असायचा,एक दोघांकडे रेडिओ असायचा.घरात बसून खेळायचे खेळ आमच्या लहानपणी नव्हतेच.
आम्ही लहानपणी खेळलेलो खेळ म्हणजे कबड्डी, कुस्ती, खो-खो,लगोऱ्या,गोट्या,विटीदांडू, सायळ,कांदा फोडी,लंगडी,आंधळी कोशिंबीर,डोंगरपाणी,काचपाणी,चोर पोलीस,चंपल,बाटारफ्रेश,करंट,लोखंडी मेख रोवणे,शेत करणे,चक्र फिरवणे ही काही खेळांची नावं आजही आठवणीत आहेत. आणि ते कसे खेळायचे,त्याचे नियम व अटी आठवतात.
या खेळांनी आमचं विशेषतः खेड्यातील मुलांचं बालपण रम्य केलं, सुसह्य केलं,आनंदी केलं.
बालपणी खेळलेलो हे खेळ आठवले की त्या दिवसांची,त्या मित्रांची आठवण होते आणि आपण बरेच काही हरवून बसलोय याची मनाला हूरहूर लागते.आपण उगीच मोठे झालो असं वाटतं.ते निरागस बालपण जसंच्या तसं डोळ्यासमोर ऊभं राहतं.खेळात झालेली मित्रांबरोबरची भांडणं,वाद, सारं विसरून खेळ संपला की मित्राच्या खांद्यावर हात टाकून त्याच्या घरापर्यंत त्याला सोडायला जायचो.ही किमया आता साध्य झाली असती तर अनेक तुटणारी नाती कधीच तुटली नसती.
असो तर मी ज्या खेळांचा उल्लेख केला त्यातील कबड्डी, कुस्ती, खो-खो हे खेळ सर्वांनाच माहीत आहेत. आम्हीही हे खेळ खूप खेळलो.आमच्या वाडीतील तालमीपुढे आमचा कबड्डी, खो खो चा डाव पडायचा.
लगोऱ्या हा खेळ म्हणजे जुन्या कौलाचे नऊ गोलाकार तुकडे करायचे,ते एका गोल रिंगणात एकावर एक मांडायचे आणि लांबून आम्ही 'फज्जा' म्हणायचो त्या फज्ज्यावरुन त्या लगोऱ्या चेंडूनं पाडायच्या.लगोऱ्या पडल्या की ज्याच्यावर 'राज्य'असेल त्यानं दूरवर लांब टाकलेला चेंडू घेऊन यायचं.तो येईपर्यंत बाकीच्यांनी त्या लगोऱ्या एकावर एक मांडायच्या.तो येईपर्यंत मांडून नाही झाल्या तर दुसऱ्यावर 'राज्य'यायचं.तो यायच्या आत लगोऱ्या मांडून झाल्या की 'चहा' चढायचा.चहा पाजला,चहा पाजला म्हणून सगळे आनंदाने उड्या मारायचे.असा 'चहा' पाजायला भारी मजा यायची.
तर असा हा आमचा लगोऱ्यांचा खेळ.
दुसरा एक आवडीचा खेळ म्हणजे गोट्या. काचेच्या गोट्या आणि आमच्या लहानपणी हाडक्या गोट्या मिळायच्या.काचेच्या गोट्या वेगवेगळ्या रंगाचा तर हाडकी गोटी पांढरी असायची,बहुतेक सिमेंट पासून बनवत असावीत.काचेच्या गोट्यांनी नापानापी खेळ खेळायचो.म्हणजे रिंगणात गोट्या टाकायच्या फज्यावरुन प्रतिस्पर्धी सांगेल ती गोटी उडवायची.गलीत आलेल्रा गोट्याही आपल्याला मिळायच्या.नापलेल्या गोट्या घरी डब्यात जमा करुन ठेवून द्यायच्या.
हाडक्या गोट्यांनी नरमादी तसेच सांगण्या हा खेळ खेळता येत असे. विशेषतः सांगण्या खेळ आमचा आवडीचा होता.
दोन गटात विभागून हा खेळ खेळता येत असे. चार किंवा पाच गडी प्रत्येक गटात असायचे.दोन मुख्य खेळाडू आपला संघ निवडायचे.दोघा दोघांनी जाऊन नावं पाडून यायचं मग या दोघांना नावं सांगायची ज्याला पाहिजे ते नावं घ्यायचं ज्याचं नावं असेल त्यानं मागणाऱ्याच्या टीममध्ये जायचं.ओली सुखी होऊन,रिंगग करुन सरळ रेषेत गोट्या ठेवल्या जायच्या.दुसऱ्या टीमनं फज्जावरुन गोट्या रिंगणाकडं कचायच्या मग रिंगणातील गोट्या बाहेर काढायच्या.नाही काढता आल्या तर त्यांचा डाव संपून दुसऱ्या संघाचा डाव सुरू व्हायचा.
गोट्या रिंगणाबाहेर काढल्या की त्या मारत मारत म्हणजे आमच्या भाषेत 'पिदलत'न्यायच्या.लांबपर्यंत खेळत खेळत जायचो.मग जेव्हा नेम चुकेल तेव्हा डाव संपायचा.ज्याची गोटी असेल त्यानं एका हातानं कान पकडून दुसऱ्या हातानं खुरटत खुरटत गोटी रिंगणापर्यंत आणायची.कधी कधी खुरटणाऱ्याच्या हातातून दगड लागून रक्त यायचं..बराचवेळ हा डाव चालत असे.
यातील प्रचलित शब्द म्हणजे, सर्व,कायनो,चम्मू,गुडगील असे होते. तर असा हा गोट्यांचा खेळ आनंद देऊन जायचा.
विटीदांडू हा एक आवडीचा खेळ. लाकडी विटी आणि दांडू प्रत्येकाच्या घरी असायचे.एक दोन विट्या अधिक असायच्या, एखादी विटी हरवली,फुटली किंवा कुणाच्या घरावर अडकली तर पर्यायी दुसरी विटी तयार असायची.
गोल रिंगणात विटी ठेवून दांडूनं लांब टोलवायची.ती जिथं जाईल तिथंपर्यंत रिंगणापासून दांडूनं मोजत जायचं.वीस दांडू भरले की एक 'खंडी' व्हायची.एकाचवेळी दोनदा विटी मारली की डबल म्हणजे एक दांडू म्हणजे दोन मोजायचे. समोरच्यानं विटी झेलली तर मारणारा बाद होत असे.ज्याच्यावर राज्य असे त्याने विटी कानात अडकवून रिंगणापर्यंत न पाडता आणायची असे.
अबक,दुबक तसे कोना नाही असे शब्द ह्या डावात प्रसिद्ध होते. असा हा विटीदांडूचा खेळ.कधी कधी खेळताना विटी लागून जखमाही व्हायच्या.
सायळ खेळात आधी पाच,सात जणात सुटासुटी व्हायची.जो शेवट राहिल त्याच्यावर राज्य असायचं.त्यानं पायानं पळणाऱ्याला शिवायचं.घोट्याच्या खाली पाय लागला की दुसऱ्यावर राज्य यायचं.
कांदाफोडी हा कसरतीचा खेळप्रकार होता. ज्याच्यावर राज्य येईल त्यानं खाली बसून एक पाय पुढे करायचा मग सर्वांनी त्यावरून उडी मारून पलीकडे जायचं त्यानंतर एका पायावर दुसरा पाय पुन्हा उडी मारुन इतरांनी पलिकडे जायचं.मग दोन पायावर एक वीत मग दुसरी वीत मग ओणवा व्हायचा तो इतरांना उडी मारुन पलिकडं जावं लागायचं. अस करत करत तो सरळ उभा होईपर्यत त्याच्या डोक्यावरून उडी मारुन पलिकडं जावं लागायचं.आणि उडी मारताना जर त्याला पाय लागला की उडी मारणारा बाद होई मग त्याच्यावर राज्य.असा हा कांदा फोडीचा खेळ.
लंगडी पण आम्ही खूप खेळायचो.एका पायाने लंगडी घालत समोरच्या पळणाऱ्याला पकडून बाद करायचे. आंधळी कोशिंबीर म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून समोरच्या भिडूंना पकडायचे.समोरचा कोणी पकडला गेला की तो बाद होत असे.
डोंगरपाणी खेळ म्हणजे थोडं उंच सपाट भाग असणाऱ्या ठिकाणी खेळला जायचा.उंच भाग डोंगर आणि सपाट पाणी.राज्य येईल तो दोन्ही पैकी एक भाग मागायचा.त्याने जर पाणी मागितलं तर इतरांनी पाण्यात यायचं नाही. आणि आल्यावर पकडला गेला तर तो बाद होत असे.
काचपाणी आणि चंपल हा खेळ विशेषतः मुलींचा पण आम्ही उन्हात खेळायला जाऊ नये म्हणून आई किंवा ताई हा खेळ खेळायला बसवत. काचपाणी म्हणजे मातीचा एक वंड म्हणजे छोटासा बांध घालून त्यात काचेचे तुकडे लपवायचे आणि दुसऱ्याने ते हात ठेवून शोधायचे.हाता खालच्या मातीत काच सापडली की ती आपल्या कडे जमा करायची.असं करत करत सर्व काचा शोधायच्या.
चंपल म्हणजे दोन चिंचोके फोडून त्याच्या पाकळ्या हातात फिरवून दान टाकायचं एक,दोन तीन ते आठ पर्यंत दान पडत असे. समोर एक पंचवीस चौकोनाचा चौकोन आखलेला असे.आपल्या घरातून आपली सोंगटी मधल्या मुख्य घरात न्यावी लागे चार सोंगट्या असायच्या. आताच्या लुडोसारखा हा खेळ.
बाटारफ्रेश खेळात एक गोल रिंगण आखलं जायचं त्यात बाटा म्हणून आंब्याची कोय अथवा एखादी छोटी वस्तू ठेवली जायची.रिंगणातून तो बाटा लांब फेकायचा मग ज्याच्यावर राज्य असेल त्यानं आणून तो रिंगणात ठेवायचा. आणि तोपर्यंत लपलेले इतर भिडू शोधायचे. पण बाटा कुणी रिंगणातून बाहेर काढला नाही पाहिजे याच्यावरही ध्यान ठेवायचे. जो दिसेल त्याचं नाव घेऊन बाटारफ्रेश म्हणायचं. उदाहरणार्थ संतोष बाटारफ्रेश असं.आणि जर कोणी त्याचा डोळा चुकवून रिंगणातील बाटा पायानं आल्लयं.... म्हणून उडवला की पुन्हा राज्य घ्यावं लागायचं.
चोर पोलिस खेळात चोरांना पकडण्याचं काम पोलीसांवर असायचं. चोर कुठेही लपून बसायचे.एकदा तर माझा मित्र जयवंत आणि मी गाढवेवाडीपर्यंत लपायला गेलो होतो. मग आम्हाला शोधायला खेळातील पोलीस मित्रांबरोबर घरातलेही बाहेर पडले होते.
करंट हा खेळ म्हणजे पकडापडीचा असे. राज्य असलेल्याने एखाद्याला पकडले की त्यानं जाग्यावर न हलता उभं राहयचं.असं करत करत सर्वांना पकडायचं पण दुसऱ्या एखाद्यानं त्याला पकडलं जायच्या आत पकडला गेला असेल त्याला स्पर्श केला की तो परत जीवंत होऊन खेळू लागे.यालाच करंट म्हणायचं.
उन्हाळ्यात एखादा पाऊस झाला की आम्ही लोखंडी मेख जमीनीत रोवण्याचा खेळ खेळत असू.मेख रोवत रोवत पुढे जायचं .मेख रोवली गेली नाही की तो बाद तिथून दुसरा मेख रोवत असे. मग सर्व गडी संपले की,जिथपर्यंत मेख रोवत गेली असेल तिथून रिंगणापर्यंत राज्य असणारा लंगडी घालत येत असे.
गावाकडं सुतार,लोहार,घिसाडी हे शेतीच्या औजारांची दुरुस्ती करण्यासाठी येत असत.आम्ही त्यांच्याकडून छोटी छोटी औतं बनवून घेत असू.मग या औतांच्या मदतीने आम्ही छोटी छोटी शेतं बनवून त्यात नांगरणी,कुळवणी,पेरणी करत असू.शेवटी शेतकऱ्यांच्या पोरांना असलाच मातीतला खेळ आवडणारच ना .
लोखंडी तवा खराब झाला की त्याची किनार छिन्नी हातोडीनं कापून त्याचं गोलाकार चक्र बनावायचं.छत्रीच्या जुन्या काडीची तार बनवून चक्र फिरवत पळत सुटायच़ हा एक खेळ आम्ही खेळायचो.मजा यायची
हे काही आठवणीतील खेळ आज अचानक मुलांना भोवरा
खेळताना आठवले आणि मन लहानपणीचे खेळ खेळून आले.
यातील काही खेळ थोड्याफार फरकाने आपणही लहानपणी खेळला असालच.याची नावं कदाचित तुमच्याकडे वेगळी असतील.
माझ्या या लहानपणीच्या खेळांच्या आठवणी कशा वाटल्या ते जरूर कळवा.अशीच एखादी आठवण घेऊन मी आपल्याला भेटायला परत येईन.तोपर्यंत रामराम.स्वतःची आणि कुटूंबाची काळजी घ्या.
घरात रहा,सुरक्षित रहा.
धन्यवाद.
© ✍🏻 हिंदुराव गोळे
यापूर्वीच्या काही कविता, पोवाडे आणि अशाच काही साठवणीतील आठवणी वाचण्यासाठी खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻
https://hinduraogole.blogspot.com/

0 Comments