ध्येयवेडा-दुर्गमहर्षी
खरंतर मी हे कालच लिहिणार होतो पण काल इतर कामांमुळे लिहायचं राहून गेलं.काल शुभेच्छा दिल्या पण सविस्तर लिहायला जमलं नाही.
एका ध्येयाने झपाटून त्या ध्येयाप्रती सातत्याने प्रयत्नपूर्वक वाटचाल करत एक फार मोठी उंची गाठणं काय असतं हे आमच्या आबांकडे पाहिल्यावर कळतं आणि आपल्याला एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा नक्कीच मिळते. आपणही आपलं ध्येय गाठण्यासाठी प्रेरित होतो. असं हे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे आमचे बंधू पै.मारुतीआबा गोळे.
पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे पायदळप्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे १४ वे वंशज.लाल मातीतला हा रांगडा गडी वकीलीचे शिक्षण घेऊनही रमला ते फक्त गडकोटांच्या ,सह्याद्रीच्या गिरीशिखरात.आणि हो फक्त सह्याद्रीच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानातील गडकोटांबरोबरच देश विदेशातील इतर १४ विदेशातील गडकोटांची अभ्यास मोहीमा पूर्ण करुनही आजही त्यांची भटकंती सुरुच आहे. आजवर ११०० हून अधिक गडकोटांना भेट देऊन अभ्यास मोहिमा पूर्ण करणारा हा अवलिया म्हणजे एक वेगळंच रसायन आहे.आजवर दुर्गांची सहस्त्रावरी उड्डाण केलेला हा मारुतीराय म्हणजे आमच्या गळ्यातील ताईत आहे.
हजारी मन्सबदार असलेले आमचे आबा म्हणजे आमच्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्त्व. जातील त्या गडावर पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा हा मावळा परमपवित्र भगवा ध्वज डौलानं फडकवून येतो अगदी विदेशातील गडकोटांवरही आबा भगवा ध्वज लावून येतात.
'रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी' या ओळी आपसूकच आबांकडे पाहिल्यावर आपल्या ओठांवर येतात.२०१७ ला शिवप्रभूंच्या ऐतिहासिक प्रसिद्ध आग्रा भेटीला ३५१ वर्षे पूर्ण झाली त्यावेळी पायदळाच्या वारसदारांना शोभेल अशी व महाराजांना मानवंदना म्हणून आबांनी आग्रा ते राजगड हा १२५३ किलोमीटरचा पायी प्रवास एकट्याने पूर्ण करुन महाराजांना एक अनोखी मानवंदना दिली. आणि एक नवा विक्रम प्रस्थापित करून आग्रावीर हा बहुमान मिळविला.
आबांनी आजवर देशविदेशातील सुमारे ११०० हून अधिक गडकोटांना भेटी दिलेल्या आहेत. सिंहगड ५१० वेळा,राजगड १२५ वेळा तर सिंहगड-तोरणा-लिंगाणा-रायगड हे अंतर १७ तासात चालत पार करणारे आबा म्हणजे नवीन दुर्गभटकंती करणाऱ्यांसाठी एक आदर्शच.सिंहगड-राजगड-तोरणा तसेच सिंहगड-राजगड-तोरणा-रायगड अनेकदा करून दुर्गभटकंती क्षेत्रातील नवतरुणांना स्फूर्ती ठरणारा हा मावळा दुर्गभटकंती क्षेत्रात अनेक विक्रमांना गवसणी घालून पराक्रमी ठरलेला सरनौबत.
सिंहगडाचा धारकरी, राजगडाचा वारकरी आणि शिवप्रभूंचा सेवेकरी असलेले आबा एक उत्तम राष्ट्रीय कुस्ती खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याच बरोबर व्यावसायाने वकील.परंतु वकीलीपेक्षा आबांचं मन गडकोटांच्या सान्निध्यात अधिक रमते. ते नेहमी म्हणतात मी बरा आणि माझी भटकंती बरी.ऊन,वारा,पाऊस याची कसलीही तमा न बाळगता आबांच्या दुर्ग मोहिमा चालूच असतात. विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर असतं तसं आबांचं भटकंतीसाठी लागणारं साहित्य सोबत असतं.रात्री तंबू टाकून सह्याद्रीच्या कुशीत झोपी जाणारे आबा रमतात ते गडकोटांच्या मातीत.स्वतःच्या जेवणाची स्वतः सोय करतात त्यासाठी लागणारे साहित्य सोबत असते.
आजवर आबांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अनेक संस्थावर आबा मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.अनेक पदांनी आबा सन्मानित आहेत.
आपल्या सानिध्यात जो येईल त्याला व्यायामाची आवड लावणारे आबा एक आरोग्यदूत आहेत. 'आरोग्यम् धनसंपदा ' हे पटवून प्रत्येकाला आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रवृत्त करणारे हे आमचे बंधू.स्वतः बरोबर इतरांनाही व्यायामाची व दुर्गभटकंतीची आवड लावतात.
आमच्या गोळे घराण्यासाठी तर आबा म्हणजे एक अनमोल हिराच.संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे १६५ हून अधिक गावातील गोळे परिवाराला एकत्र आणणारे आमचे लाडके बंधू.
सरनौबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठानचे संस्थापक,सर्वेसर्वा आमचे मार्गदर्शक आणि खंबीर आधारस्तंभ म्हणजे आमचे आबा.आज प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमचा गोळे परिवार एकत्र जोडला गेला याचं सर्व श्रेय आबांनाच जातं.महाराष्ट्रात कुठेही कधीही कसलीही अडचण आली तरी आमचे बंधू एकमेकांच्या मदतीसाठी धावून येतात.महाराष्ट्रभर हे जाळं विणणारे आमचे बंधू आबा म्हणजे आमच्यासाठी जीव की प्राण आहेत.
आज प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक,शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जातात.
आबा एक उत्तम लेखक आणि उत्तम वक्ते आहेत.अनेक व्यासपीठावर आबांना मावळ्यांचा वंशज म्हणून बोलावलं जातं.मान सन्मान होतो पण आबा त्यानं कधीही हूरळून गेले नाहीत. त्यांच्या वागण्या बोलण्यात सरनौबतांचा वंशज म्हणून कसलाही बडेजाव नसतो.
सर्वांच्या मदतीसाठी धाव घेणारे आबा एक आदर्श व्यक्ती म्हणून आमच्यासाठी कायम राहतील.
गडकोट अभ्यास मोहीमेंचं वर्णन,तिथं आलेलं अनुभव ,तिथं जाण्यासाठी असणारे मार्ग, तिथं उपलब्ध असणारी साधनसामुग्री याची इत्यंभूत माहिती आबा रोजच्या रोज न चुकता लिहीत असतात.कितीही कंटाळा आला तरी आबा भटकंतीची दैनंदिन माहिती समाजमाध्यमातून मांडत असतात.दुर्गमहर्षी ठरलेले आमचे आबा आमचा अभिमान आहेत.
कालच आबांचा वाढदिवस झाला. आमच्या परिवारासाठी आबांचा वाढदिवस म्हणजे उत्सवच असतो. आबांना या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.आपणास उदंड आयुरारोग्य लाभो ही माता तुळजाभवानी चरणी प्रार्थना.
आबांसारखा भाऊ मिळायला खरंच नशीब लागतं.आमच्या नशीबानं तुमच्यासारखा भाऊ मिळाला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
आबांच्या स्वभावगुणांचं वर्णन छोट्याशा लेखात करणं शक्य नाही तरी मी तो प्रयत्न केलाय.
माझा हा व्यक्तिविशेष लेख कसा वाटला ते जरूर कळवा.
अशीच एखादी आठवण घेऊन मी आपल्या भेटीसाठी येत राहीन तोपर्यंत रामराम.आपण आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. कोरोनाच्या या भयानक परिस्तिथीत घरात रहा.सुरक्षित रहा.
धन्यवाद.
© ✍🏻 हिंदुराव गोळे
यापूर्वीच्या कविता, पोवाडे आणि माझ्या साठवणीतील आठवणी वाचण्यासाठी खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
https://hinduraogole.blogspot.com/

0 Comments