ऐसी कळवळ्याची जाती
तीच्या प्रेमाला कसलीच आणि कुठलीच उपमा देता येत नाही. जीने आयुष्यभर सर्वांवरच फक्त आणि फक्त प्रेमच केलं जीच्या मायेच्या पदराखाली आम्ही लहानाचे मोठे झालो.केवळ प्रेमाची मूर्ती आणि मायेची सावली अशी आमची आई.आम्ही तीला जिजी म्हणायचो. तिचा स्वभाव अत्यंत मायाळू आणि प्रेमळ तीनं कधीच आमच्या भावंडांना शिक्षा म्हणून गालात एखादी चापटही मारली नसेल अशी आमची आई.
तीचं माहेर आणि सासर एकच गाव.आमच्या घरातून हाक मारली तर मामाच्या घरातले बाहेर यायचे इतकं अंतर.आमच्या वडीलांशी म्हणजे तीच्या मामाच्याच मुलाशी लग्न झालं. बहीणीची मुलगी सून म्हणून घरी आणली म्हणून आमच्या आण्णांनी म्हणजे आमच्या आजोबांनी लग्न मांडवाला सोन्याच्या छोटासा वेल बांधला होता असं ती सांगायची.उलटं नातं झालं म्हणून.आजोळच सासर आणि गावच माहेर.सासर माहेर असं दोन पिढ्यांचं नातं.आमच्या आजोबांची एकलुती एक सून आणि भाचीच असल्यामुळे तीच्यावर खूप जीव होता. आमचे वडील आप्पा नोकरीला रेल्वे पोलीसमध्ये होते पण आम्हाला चुलता नसल्यामुळे घरची शेती करणारे आजोबा एकटेच होते. आप्पांनी आईला कधीच सोबत मुंबईला नेलं नाही. आई आणि आम्ही गावालाच असायचो. आजोबांच्या पश्चात घरची शेती जिजीनं हिंमतीनं केली.पावसाळी प्रदेश असणारं आमचं गाव.प्रामुख्याने भातशेतीच जास्त. एक एक महिनाभर चिखलात भात लावणीची कामं चालतात.खूप कष्ट केले तीनं घरात आम्ही चार भावंडं आमच्या आत्याची दोन मुलं,आजी असा परिवार, आप्पा सुट्टीवर गावी यायचे. या सर्वांचं जेवणखाणं करून जिजी शेतातलं काम करत असे. गुरंढोरं म्हशींच्या धारा,वैरण सगळं एकटीने करायची.शेतीवर खूप जीव तीचा.शेवटी शेवटी ती आजारी असल्यामुळे आम्ही शेती वाट्यानं दिली पण हीचा जीव तुटायचा.तीचं मन सारखं शेतातचं गुंतलेलं असायचं. ती स्वतः शाळा शिकली नव्हती पण आमच्या शिक्षणासाठी तीनं कसलीही तडजोड केली नाही. आम्ही भरपूर शिकावं असं तीला वाटायचं.दहावीनंतर दादा व आठवीनंतर मी शाळेला मुंबईला गेलो. ती म्हणायची भरपूर शिकून मोठं व्हा.मी अडाणी राहिले पण तुम्ही चांगली शाळा शिका.
ती जरी शाळा शिकली नव्हती तरी जीवनाच्या शाळेतील ती एक हुशार विद्यार्थी होती.तीनं त्या शाळेतल्या अनेक पदव्या घेतल्या होत्या.आमच्या भावकीतील बायकांना एकत्र करून तीनं अडीअडचणीत पैशांची गरज भागवली जाईल यासाठी बायकांचा फंड सुरू केला होता.बरेचदिवस तो फंड चालू होता.थोड्याशा प्रमाणात का होईना पण लोकांच्या गरजा भागत होत्या. मला तर जणू ती बहिणाबाईच वाटायची.अनेक लोकगीतं तीची तोंडपाठ असायची.अनेक ओव्यांतून ती एखाद्या प्रसंगाचं वर्णन करायची.भावा बहिणीच्या प्रेमाच्या ओव्या तीच्याकडे खूप असायच्या.माय लेकरांच्या प्रेमावर ती ओव्या बोलून जायची.सासू सून,नणंदा भावजयी,आत्या भाची,मामा भाचा या नात्यांवर वर्णन असणाऱ्या अनेक ओव्या तीच्या संग्रही होत्या. जात्यावर काही दळायला बसली की अशा ओव्या गायची की ऐकत राहवे.आमच्या कडे एखाद्याच्या लग्नाआधी घाणा असतो.हळद जात्यावर दळतात.जिजी असल्याशिवाय घाणाच होत नसे.कुणाचाही घाणा असला कि जिजीला हमखास बोलावणं असायचं. माहेरच्या आठवणींवर ती जात्यावर दळायला बसली की अशा ओव्या गायची की तीच्या आणि ऐकणाऱ्याच्या डोळ्यांच्या कडा कधी ओल्या व्हायच्या ते कळायचं नाही.
लग्नाची वरात घरात आली की नवरानवरीचं दार आडवतात.आमच्याकडे ती प्रथा आहे. कुणाचंही लग्न असलं की जिजी दार आडवायला असायची म्हणजे तीला बोलावलं जायचं.दार आडवताना एक गाणं ती म्हणायची,रुणझुण वाजंत्री वाजती जी वाजंत्री वाजती....तीच्यामुळं लहानपणीचं मला हे गाणं तोंडपाठ झालं.आज कदाचित माझ्यात कविता, पोवाडे करण्याचा जो किंचितसा जो गुण आला तो तिच्यामुळेच आला असावा.
भात लावणीत ती भल्लऱ्या म्हणायची.ती गात असलेली गाणी म्हणत असलेल्या ओव्या लिहून ठेवण्याची बुद्धी त्यावेळी झाली नाही. पण आता असं वाटतयं आपण खूप मोठा सांस्कृतिक ठेवा जतन करण्यापासून वंचित राहिलो.साधंच गीत तशाच ओव्या पण त्यात वेगळाच आनंद होता. याचा आता खेद वाटतो. तीचं सासर आणि माहेर गावातच असल्यामुळे आमचं आजोळ आम्हाला लांब नव्हतं.आमचे मामा आमच्यावर खूप प्रेम करायचे. सारा गावच मामाचा.मामांची मुलं ,आम्ही भावंडं आणि आमच्या आत्याची मुलं आम्ही सगळे एकत्र असायचो.आमचं घर म्हणजे जसं काही गोकुळचं.आम्ही सारी भावंडं एकत्र खेळायचो.मामांचा आम्हाला खूप आधार होता.आमच्या आजोबांनंतर थोडे दिवस आमचे चुलते शंकरदादांनी आमची शेती करुन दिली. पण नंतर आमचे केसूमामा आईला शेतात लागेल ती मदत करत.मोठा पाठिंबा होता त्यांचा.दादा मामा पण आईकडे सारखे यायचे.आई नेहमी तीच्या भावांचा उल्लेख करायची.म्हणायची माझं हत्तीसारखं भाऊ माझ्या पाठीशी आहेत. मी कशाला घाबरत नाही.आम्हाला पाच मामा.
आमचे पैलवान मामा महाराष्ट्र केसरी पै.शिवाजीराव पाचपुते म्हणजे आईच्या गळ्यातील ताईत.तीच्या पेक्षा लहान ,मामांवरुन जीव ओवाळून टाकायची.तीला मामांबद्दल खूप अभिमान वाटायचा.मामा तीला भेटायला आले की तीला काय करु न काय नाही असं व्हायचं.आम्हांला नेहमी म्हणायची आपल्या मामाचं नाव खराब होईल असं कधी वागू नका.
मी लहानपणी थोडा आगाऊच होतो.खूप खोड्या करायचो घरात त्रास द्यायचो.पण जिजीनं मला कधी धोपटून काढलयं असं आठवत नाही. रागानं बोलायची कधी कधी माझ्यावर रुसायची बोलायचीच नाही, अबोला धरायची पण थोड्यावेळेपुरताच.मामांकडं माझी तक्रार करायची.
मला लहानपणी ती तालमीत जाण्यासाठी,भजनाला बसण्यासाठी,ढोल लेझीम खेळण्यासाठी पाठवायची.गावच्या मिटींगमध्ये केसूमामा बरोबर पाठवायची.ती म्हणायची पोराची भीड चेपली पाहिजे.
आम्ही लहानपणी आजारी पडलो तर रात्रभर ओव्यानं शेकत बसायची हातपाय चोळायची.माझी तर खूप आजारपणं तीनं काढली.मला म्हणायची तुझ्या आजारपणानं मी लवकर म्हातारी झाली बघ.
ती उत्तम सुगरण होती.तीच्या जेवणाला तीच्या हातचा असा विशिष्ट गुण होता.तीनं बनवलेली पोळ्याची कटाची आमटी तीच्या ंनंतर तशी परत नाही मिळाली.अनारसे तर अशी बनवायची की वर्णन करायला शब्द नाहीत.
मी रेल्वेत नोकरीला लागलो.सोलापूरला उन्हातान्हात रेल्वे रुळांवर गैंगमेन म्हणून,खूप कष्टाचं कामं.मी सारखा आजारी पडायचो माझ्यासाठी तीचा जीव तुटायचा.सारखी रडायची मला म्हणायची कुणी काहीही म्हणू दे तू सोडून ये सगळं.ती मला कामात होणारा त्रास सहन होत नव्हता. मला ती म्हणायची आज्यानं घोड्याच्या धावे इतकी शेती कमवलेय,असलं काम करण्यापेक्षा घरी येऊन शेती कर.आम्ही आहोत तोपर्यंत तुझ्या बायकापोरांना काय कमी पडू देणार नाही.दादासारखा भाऊ तुला नशीबानं मिळालाय तो काय तुला टाकणार नाही. मी पुढे त्रासामुळे नोकरी सोडली.
मी लहानपणापासून गावच्या पारायणात जायचो.मी प्रवचन करु लागलो.पुढं कीर्तन व्याख्यानं करु लागलो जिजीला माझा भारी अभिमान वाटायचा.पक्षाघात झाल्यामुळे ती बाहेर यायची नाही. तीनं माझं प्रवचन आणि व्याख्यान ऐकलं होतं पण कीर्तन ऐकलं पाहिलं नव्हतं.मला म्हणायची मला बघू तरी दे तुला फेटा बांधून कीर्तन करताना. मग एक वर्षी आमच्या वाडीतील पारायणात तीला घेऊन गेलो. माझ्या कीर्तनात तीला समोर खूर्चीवर बसवलं.तीनं कीर्तन ऐकलं मला कीर्तन करताना पाहिलं.कीर्तन झाल्यावर मी तीच्या पाया पडलो.तीच्या डोळ्यातून पाणी येत होतं ते आनंदाश्रू होते. मला मिळालेलं ते महाधन होतं.घरी आल्यावर आईच्या काळजानं माझी दृष्ट काढली.
माझे मित्र पहिल्यांदा मला भेटायला माझ्या घरी यायचे पण ते दुसऱ्यांदा यायचे ते खास जिजीला भेटायला.जिजी इतका लळा लावायची की ते जिजीला भेटण्यासाठी पुन्हा यायचे.
सुनांवर आईसारखं प्रेम केलं सासू म्हणून कधी बडेजाव दाखवला नाही. नातंवडांसाठी ती जीव ओवाळून टाकायची.
पक्षाघातानंतर पाच सहा वर्षे चांगली चालत फिरत होती.पण शेवटच्या आजारपणात तीला वाचवू नाही शकलो. रक्तदाब वाढून मेंदूत गाठी झाल्या ती कोमात गेली. या वयात दुसरा काही उपायही होत नव्हता. आजारी झाल्यावर आठ दिवसांत तीनं आमचा निरोप घेतला.
तीच्या प्रेमाला पोरके झालो.आमचा मायेचा पदर हिरावला गेला. पण ती आम्हाला सोडून गेलेय असं वाटत नाही. अदृश्यरुपाने जणुकाही ती आमच्या अवतीभवतीच आहे असं वाटत राहतं.तीची प्रेमळ नजर आमच्यावर सतत आहे असं वाटतं.
म्हणतात ना आईच्या प्रेमाची महती लिहायला शब्द अपुरे आहेत. अगदी समुद्राची शाई आणि मेरु पर्वताची लेखणी केली तरी कोणीही आईची महती वर्णन करु शकत नाही.कोणताही लेखक,कवी शब्दांत आईची महानता मांडू शकत नाही.
मी जिजीच्या प्रेमाची महती काय लिहणार ? माझे शब्द अपुरे आहेत.प्रत्येकाचीच आई आईच असते तीच्या प्रेमाची सर जगातील कुठल्याही वस्तूला नाही. ती वंद्य आहे, पूज्य आहे,थोर आहे.
आज सितानवमी आज जिजीचं तृतीय पुण्यस्मरण आजच्या या दिनी तीच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन. तुझी शिकवण तू आमच्यावर केलेली संस्कार आयुष्यभर कधीच विसरणार नाही हेच तुझ्या चरणांशी वचन देतो आणि थांबतो.
तिच्यासाठी म्हणून चार ओळी मी लिहिल्या होत्या त्या पुन्हा एकदा तीच्या चरणांशी अर्पण करतो.
माझी आई
माझी लाडाची माय माऊली
होती पदरात तीच्या प्रेमाची सावली
संकटांशी लढण्याचं मिळत होतं बळ
जेव्हा जात होतो तीच्या कुशीत एकवेळ
लाडाची न् प्रेमाची करायची ती पखरण
काळजाच्या कप्प्यातून मायेची करायची ती उधळण
अपराध माझा ती पोटात घालायची
चुकलो जर कधी तर कान ही पकडायची
सांग कसा तुला मी असा विसरु
तुझ्याविना पोरकं आहे गं तुझं कोकरु
आठवतेस तू एका दिवसात अनेकदा
येशील का गं माझ्यासाठी तू एकदा
© हिंदुराव गोळे
🌹🌹🌹🌹🌹🌹
यापूर्वीच्या कविता ,पोवाडे, लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
मला आनंदाने सांगावसं वाटतं की केवळ दोन महिन्यातच आपल्या ब्लॉगला १०,००० वाचकांनी भेट दिली. आपले सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.
https://hinduraogole.blogspot.com/

0 Comments