सदूभाऊ
त्यानं एखादा विनोद केला तर ऐकणारा कितीही दुःखी,नाराज असला,कितीही टेन्शनमध्ये असला तरी खळाळून हसल्याशिवाय राहत नसे.हजरजबाबीपणा आणि समयसूचकता या दोन्ही गुणांमुळे त्यानं केलेला विनोद हा हमखास हास्याचा फवारा उडवत असे.व्यक्ती आणि वल्लीमधील अनेक पात्रांचा समुच्चयाने समावेश असलेला आमचा सदूभाऊ म्हणजे आमच्यासाठी खरोखरच विनोदाचं चालतंबोलत एक विद्यापीठच होतं जणू.आपल्या विनोदी आणि मिश्कील स्वभावामुळे तो सर्वांचाच आवडता होता. तर असा हा आमचा सदूभाऊ.उंचपूरा सावळा वर्ण ,नाकीडोळी नीटस असणाऱ्या सदूभाऊची समोरच्यावर छाप पडायची. आमच्या दादाची आणि त्याची जिवश्चकंठश्च मैत्री.अगदी घराला लागून घर मध्ये फक्त एक पाच फुटांचं अंतर.त्यामुळे एकमेकांच्या घरी येणंजाणं नित्याचं.
पण विनोदी स्वभाव असला तरी अत्यंत हुशार,समंजस असलेला सदूभाऊ शालेयशिक्षणातही हूशार होता.त्याचं शिक्षण बी.कॉम.पर्यंत झालेलं.सुंदर हस्ताक्षर हे ही एक त्याचं वैशिष्ट्य होतं.क्रिकेटची आवड असलेला सदूभाऊ उत्तम क्रिकेट खेळायचा. सदूभाऊ सोबत असेल तर वेळ कसा निघून जात असे ते कळत नसायचं.जुन्या आठवणी सांगताना त्यातील विनोद इतका खुमासदारपणे सांगायचा की हसूनहसून ऐकणाऱ्यांच्या पोटात दुखायचं.
आमची आई त्याला काशिनाथ फाळके म्हणायची,काशिनाथ आबा सदूभाऊचे धाकटे चुलते.ह्याचा स्वभाव अगदी आबांसारखा होता. आमच्या तालमीत पूर्वी मुलं झोपायला असायची.रात्री अभ्यास करुन नंतर झोपत असत.सदूभाऊ पण तालमीत असायचा. घरासमोरचं तालीम होती.ह्याच्या विनोदानं सर्वांचं मनोरंजन व्हायचं.एखाद्याची हुबेहूब नकल करायचा आणि सर्वांना पोट धरून हसवायचा.वेळ कसा जायचा ते कळायचं नाही द्रूपा अक्काची मुलगी लहान होती.सुवर्णा तीचं नाव.सदूभाऊकडं थोडावेळ सांभाळायला दिली की हा तीला हळूच चिमटा काढायचा मग ती रडायची ती रडतेय म्हणून घरी सोडून यायचा असा हा आमचा सदूभाऊ. सर्वांचा आवडता.
सदूभाऊ सिनियर कॉलेजला होता त्यावेळी मी पाचवीत होतो. त्याला वाईला जावं लागायचं आणि मला शाळेसाठी धोमला.आमची सकाळची शाळा असायची.सात वाजता शाळा भरायची.आमची पाचपुतेवाडी ते धोम साधारण तीन किलोमीटरचे अंतर.त्यावेळात आमच्याकडे एस.टी.बस नसायची,सदूभाऊलाही कॉलेजला सकाळी लवकर जावं लागायचं.अभेपूरी फाट्यावर एस.टी.बस असायची त्या बसनं तो वाईला जायचा. त्याच्याकडे एक सायकल होती.मला डबलसीट फाट्यापर्यंत घेऊन जायचा मग तिथून मी सायकल घेऊन शाळेत जायचो आणि शाळा सुटल्यावर परत घरी घेऊन यायचो.तेव्हा आमचा दादा कॉलेजला अकरावीत मुंबईला होता.सदूभाऊचे आणि त्याचे पत्रव्यवहार चालायचे.सदूभाऊ मला इंग्रजी आणि गणित शिकवायचा.माझ्यावर अगदी लहानभावाइतकचं प्रेम करायचा.पाचवीपासून त्याची सायकल वापरत होतो त्यामुळे कदाचित माझी उंची बऱ्यापैकी वाढली असेलही.
सदूभाऊनं कॉलेजला असताना घरी दुकान टाकलं होतं.दुकान बऱ्यापैकी चालायचं.
एकदा काय झालं ह्यानं एक रेडिओ आणला घरात आप्पांनी विचारलं सदोबा कुणाचा आहे रेडिओ. ह्यानं सांगितले मित्रानं दिलाय वापरायला.ह्याला क्रिकेट कॉमेंट्री ऐकण्याची आवड होती.बरेच दिवस झाले तरी रेडिओ घरात आहे म्हटल्यावर आप्पा म्हणाले असा कोण मित्र आहे इतक्या दिवस तुला रेडिओ देतोय.तेव्हा सदूभाऊ म्हणाला अहो आप्पा मीच विकत आणलाय. पुढे शिक्षण संपल्यावर सदूभाऊ नोकरीसाठी मुंबईला गेला.आणि मी पण आठवीत असताना शाळेसाठी मुंबईला गेलो. सदूभाऊ दादरला एक्सप्रेस ट्रान्सपोर्ट मध्ये अकाऊंटंट म्हणून नोकरीला लागला.आम्ही भायखळ्याला राहत होतो आणि तो कुर्ल्याला.नेहमी भायखळ्याला येणंजाणं असायचं त्याला सुट्टी असली की आदल्यादिवशीच मुक्कामी यायचा.दोन दिवस आम्ही एकत्र असायचो.मस्त दोन दिवस हसतखेळत जायचे. मुंबईच्या दंगलीत सदूभाऊ आमच्याकडे आला होता आम्ही एकत्रच होतो. दंगल संपल्यावर मग तो कुर्ल्याला गेला.नंतर काही दिवसातच सदूभाऊ बृहन्मुंबई महानगरपालिकेत अन्न भेसळ निरीक्षक म्हणून नोकरीला लागला.चांगला पगार आणि अधिकारी पद होतं.दिवस मजेत चालले होते.
सदूभाऊचे वडील आप्पा मिलमध्ये होते. कापड गिरणी संपात मिल बंद पडली आणि गावाला आले.मोठा भाऊ बाळूभाऊ लार्सन अँड टूब्रो मध्ये नोकरीला.घरची परिस्थिती तशी बेताचीच.पण तरीही सदूभाऊनं पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करुन चांगली नोकरी मिळवली. मला आठवतयं एक वर्षी वडाचीवाडीच्या ऐतिहासिक नाटकात सदूभाऊनं संताजी घोरपडे यांची भूमिका केली होती.त्याच्या तालमी कुर्ल्याला व्हायच्या.भायखळ्याला आला की एखाद्या प्रवेशाची तालीम करायचा.त्याचं पाठांतर वाखाणण्याजोगं होतं.नाटकातील त्याची भूमिका चांगलीच गाजली होती. पण नियतीला हे आनंदी दिवस मान्य नव्हते. सदूभाऊचा रेल्वे अपघात झाला. अपघातात उजवा हात कायमचा गमावला.डोक्याला मार लागला.
लोकांना हसवणारा,आपल्या नर्म विनोदी स्वभावानं हशा पिकवणारा सदूभाऊ पूर्णपणे बदलला.दुःखाचं सावट घरावर आणि आम्हा सर्वांवर पसरलं.जमेची बाजू एवढीच की एवढ्या अपघातातही जीव वाचला. त्याच्या कामाचं स्वरूप बदललं.सदूभाऊ प्रयत्नाने डाव्या हाताने लिहायला शिकला.
गावी बरेच दिवस होता.मी त्याच्या सोबत कायम असायचो.काही दिवसांनी पुन्हा नोकरीवर रुजू झाला. आता सदूभाऊचं लग्नही झालं होतं.पण पूर्वीचा हसताखेळता लोकांना हसवणारा सदूभाऊ कुठेतरी हरवून गेला होता.त्याच्या मनात सतत काहीतरी चालू असायचं पण कधी व्यक्त नाही झाला.अपघातात डोक्याला मार लागलेला असल्याने कधीतरी वेगळंच काहीतरी बडबडायचा.आपल्याच विश्वात असायचा. लग्न झाल्याच्या दोन वर्षांतच सदूभाऊनं या जगाचा अखेरचा निरोप घेतला.सर्व संपलं.देवही इतका कठोर झाला की आमचा सदूभाऊ आमच्यापासून कायमचा हिरावून घेऊन गेला. अतिशय दुःख झालं.घरावर शोककळा पसरली.त्याच्या जाण्यानं आयुष्यात एक कधीही भरून न येणारी पोकळी कायमचीच निर्माण झाली.
सदूभाऊ तुझं वय आम्हाला सोडून जाण्याचं नव्हतं रे.असं काळजाला चटका लावून नसतं रे जायचं आणि तुझ्या मुळच्या विनोदी स्वभावाला हे बिलकुल शोभत नाही. पुन्हा ये ,तुझ्या विनोदानं आम्हाला खळाळून हसवायला ये. असा एकही दिवस जात नाही की त्या दिवशी सदूभाऊची आठवण होत नाही. सदूभाऊ कुठही असशील तिथं आनंदी रहा. आणि हो तुझ्या विनोदानं तू सोबत असणाऱ्यांना हसवत तर असशीलच.
माझ्याकडून तूला विनम्र आदरांजली.🙏🏻🍁🌹
© ✍🏻 हिंदुराव गोळे
संपर्क:- ७७७४९२१२७३
माझी ही सदूभाऊची आठवण तुमच्याही मनाला नक्कीच हूरहूर लावून जाईल.माझी ही आठवण कशी वाटली ते प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा.तुमच्या प्रतिक्रिया मला लिहायला बळ देतात, ऊर्जा देतात.अनेकजण मला फोन करून लेख आवडल्याचं कळवतात.बरं वाटतं. अशीच एखादी आठवण घेऊन आपल्या भेटीसाठी येतच राहिन.तोपर्यंत रामराम.🙏🏻
आपली आणि आपल्या कुटूंबाची काळजी घ्या. सुरक्षित रहा.
धन्यवाद.🙏🏻
अशाच काही साठवणीतील आठवणी,काही लेख,कविता आणि पोवाडे वाचण्यासाठी खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻
https://hinduraogole.blogspot.com/

0 Comments