माझा देश
जगातील सर्वोच्च संस्कृती असलेला
माझा भारत देश विविधतेने नटलेला
विविधतेतही नांदते इथे एकता
जपली जाते नित्य इथे विश्वबंधुता
मिळाली आम्हांस इथे संस्कारांची शिदोरी
भारत देश आमुचा जगी वंद्य आहे खरोखरी
गर्जुनी सांगते पवित्र माती आमुचा इतिहास
मनगटावर आपुल्या सदा ठेवा दृढविश्वास
गंगा यमुना सरस्वती नाहीत केवळ नद्या
काठावर त्यांच्या समृद्ध झाल्या कित्येक पिढ्या
इथल्या कणांकणांत पूजतो आम्ही शंकर भगवान
दिव्य संस्कृतीचा आम्हा आहे सार्थ अभिमान
मार्ग दावितो आम्हा राम कृष्णांचा आदर्श
बळ देतात आम्हा ते करण्या जीवनी संघर्ष
स्त्रियांचा आदर नित्यआम्ही राखतो
कृष्णा आधी राधा रामा आधी सितेला पूजतो
देशाला आमुच्या आम्ही मानितो आमुची माता
जगामध्ये वंद्य आम्हाला आमुची भारतमाता
पितृवचनासाठी रामही वनवास भोगितो
मित्रप्रेमासाठी कृष्ण पोहे कोरडेचि खातो
अनेक साधूसंत महंत जन्मले याच भूमीवरी
मार्ग दाऊनी गेले ते दयानिधी करुणाकारी
इथेच जन्मले महाराणा नि शिवभूपती
पराक्रमाची किर्ती त्यांच्या गाजत आहे जगती
तिरंगी ध्वज आमुचा झळकतो उंच हिमालयावरी
मानाचा मुजरा आमुचा पूज्य आम्हा प्राणापरी
शत्रूच्या मनात भीतीने तेव्हा थरकाप उडे
भारतमातेच्या रक्षणार्थ जेव्हा निघतात वीर जवान फाकडे
रक्षणार्थ भारतमातेच्या तरुणांच्या फौजा दौडती
वीरश्रीने मग इथे पहा कडाडतात नौबती
।। भारतमाता की जय ।।
© ✍🏻 हिंदुराव गोळे
यापूर्वीच्या कविता, पोवाडे आणि लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.🙏🏻
https://hinduraogole.blogspot.com/

0 Comments