माझी लेक
तिच्या येण्यानं आमचं घर आनंदानं न्हाऊन गेलं,प्रत्येकाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आणि मी तर पुरता बेभान झालो होतो मला *काका* म्हणणारं कुणीतरी आमच्या घरात सोनपावलांनी आलं होतं. पोटी मुलगी जन्माला येणं म्हणजे भाग्यवंताचं लक्षण ...त्रिलोकीची संपत्ती जणूकाही त्याच्या पदरात घालून देव त्याला जगातील सर्वात गर्भश्रीमंत माणूस बनवतो.या लक्ष्मीच्या पावलांनी घरात सुख,समाधान, आनंद प्रवेश करत असतात.
जन्मदात्रीची उणीव भासू नये म्हणून आपल्यावर आई इतकंच निर्भेळ, निर्व्याज, प्रेम ,आपली काळजी जर दुसरं कोण करत असेल तर ती आपल्या पोटी जन्माला आलेली आपली लेक असते.
तीच्या येण्यानं आमचं घर आनंदून गेलं. घराचं गोकुळ झालं.आम्ही तीचं नाव ठेवलं क्षितिजा पण माझ्यासाठी माझं ते काळीज होतं,माझं पहिलं प्रेम होतं.कधीही जड न वाटणारं माझ्या खांद्यावरचं गोड ओझं होतं.
तीच्या कोडकौतुकासाठी जणू आमच्या सर्वांची चढाओढ चालायची.तीला कुठे ठेऊ आणि कुठे नाही असं होऊन जायचं.बाहेर गेलं तरी तीचीच आठवण यायची घरी आल्यावर पहिलं पावलं तीच्या पाळण्याकडे पडायची.तीला कवेत घेऊन घरभर फिरायचो.
वर्षभरात तीला घेऊन कल्याणला आलो.आता तीची जबाबदारी आमच्यावर होती.तीला न्हाऊमाखू घालणं,तेलानं मालीश करुन पायांवर आंघोळ घालणं ,तीट टिळा करणं ,चिऊकाऊचा घास भरवणं अशा सर्व कामात आनंद वाटायचा.
मी तेव्हा रेल्वे मध्ये अँप्रेंटीस म्हणून होतो ७०० रुपये शैक्षणिक भत्ता मिळत होता पण पगारादिवशी तीला एखादं खेळणं घेतल्याशिवाय घरी येणं होत नव्हतं.
आमची लहान बहीण आणि मी पैसे जमवून तीच्यासाठी काहीतरी नवीन खरेदी करत असू.
हळूहळू ती बोलू लागली.आणि तीच्या बोबड्या बोलांचा लळा लागला.तीच्यासाठी अंगाई गाणं,तीला कावळा चिमणीच्या गोष्टी सांगणं आता रोजचं होऊ लागलं.तीच्या पावलांनी आणि रडण्यानं आमचं घर झंकारुन गेलं.
बघता बघता तीला अंगणवाडीत घातलं आता तीच्या हाताला धरुन पाटीवर श्रीगणेशा काढताना पुन्हा एकदा बालपणात हरवून गेलो.बालवाडीला तीला गणेश विद्यामंदिर या मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला.माझ्याकडे सायकल होती.तीच्यासाठी पुढे एक छोटी सिट बसवून घेतली तीला पाय ठेवण्यासाठी स्टँड बसवला. आता माझी ही सायकलस्वारी रोज तीला शाळेत सोडायला आणि घ्यायला घर ते शाळा अशी रोजची ठरलेली.
ती चौथीत असताना मला रेल्वेत नोकरी लागली पण घर सोडून लांब सोलापूरला जावं लागणार होतं.माझं काळीज तीला सोडून जायला तयार नव्हतं पण काळजावर दगड ठेवून काळजाचा एक तुकडा घरी ठेवून जावं लागणार होतं.एक काळीज घरात आणि एक काळीज सोबत घेऊन सोलापूरला नोकरीसाठी रुजू झालो. जाताना माझा मित्र रमेशला सांगत होतो आता तुला माझ्या मुलांचा काका व्हावं लागेल आणि रमेशनं पण माझी उणीव भरुन काढताना कसलीच कमतरता ठेवली नाही कदाचित माझ्यापेक्षा मुलांना अधिक लळा त्याचाच लागला.
सोलापूरला सतत तीच्या आठवणीनं,मन हेलावून जायचं कामावरून सुटलो की पहिला घरी फोन करून तीची चौकशी करायचो.महिन्यातून एकदा घरी यायचो येताना तीच्यासाठी खेळणी ,सोलापूरमधून मऊ लोकरीची कपडे ,टॉवेल घेऊन यायचो तीच्यासाठी ब्लँकेट अशी जय्यत खरेदी असायची.
एकदा सुट्टीवर आलो पहाटे - पहाटेच घरात पोहचलो. दार उघडलं तर समोर आईच्या बाजूला ही झोपली होती.तीच्याकडं पाहिलं आणि काळजात धस्स झालं तीचा चेहरा भाजला होता चेहऱ्यावर फोड आले होते झालेल्या जखमेतून पाणी येत होतं माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या माझ्या काळजाला होणाऱ्या वेदनांनी माझं काळीज तीळ तीळ तुटत होतं.घरच्यांवर शिव्यांची लाखोली वाहिली. मला या अपघाताची कल्पना घरातल्यांनी दिली नव्हती आणि घरात आल्या आल्या मला हा धक्का बसला होता.
सकाळी उठून माझे मित्र डॉ. अंगद घुटे यांच्याकडे घेऊन गेलो डॉक्टरांनी तीच्या चेहऱ्यावरील जखम कापसाने खरवडून काढली औषधोपचार केले. मी काळजीपोटी विचारत होतो बरी होईल का.मुलगी असल्यामुळे अधिकची काळजी.डॉक्टर म्हणाले काहीही केलं तरी चेहऱ्यावर डाग राहतील जखम झालेल्या जागेवर त्वचा ओढली जावून ती जागा थोड्या प्रमाणात विद्रुप दिसेल.माझ्या काळजीत अधिक वाढ होऊ लागली.तीला घेऊन घरी आलो.तीला बघायला आमच्या शेजारचे कबीरभाऊ आले त्यांनी कल्याण पश्चिमेला डॉ. अभय कुलकर्णी यांच्याकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. वेळ न घालवता तीला लगेचच डॉ. अभय यांच्याकडे घेऊन गेलो.
डॉक्टरांनी लगेचच ऑपरेशन करण्याची तयारी केली. डॉक्टर म्हणाले वडील म्हणून आम्हाला तीच्या वडिलांची सहमतीसाठी त्यांची सही लागेल.दादा तर कामावर गेला होता डॉक्टरांना म्हटलं मी जरी तीचा प्रत्यक्ष जन्मदाता पिता नसलो तरी मी तीचा पालक म्हणून सही करतो पण तातडीने उपचार चालू करा.माझी सही घेऊन तीला पुढील उपचारासाठी घेऊन गेले. दोन तासांनी तीला बाहेर आणलं.रात्रभर तीच्या बाजूला बसून राहिलो. सकाळी सकाळी तीनं डोळे उघडले. माझ्याकडे बघून खुदकन हसली.तीच्या त्या हसण्यानं रात्रभर जागल्याचा शिणवटा कुठच्याकुठे पळून गेला.
त्या तीच्या हसण्यासाठीच एवढी धावपळ करत होतो. दैव बलवत्तर म्हणून ती यातून बरी होत होती.
माझी सुट्टी संपली आणि मला सोलापूरला जावं लागलं.पण घरातून निघताना पाय उचलत नव्हता.पण मनावर टणाचा दगड ठेवून सोलापूरला आलो.
कामावर कुणाशीही बोलायचो नाही. शांत शांत बसायचो सतत तीचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा.वरच्या खिशात ठेवलेल्या पाकिटातला ठेवलेला तीचा फोटो एकटक पाहत राहयचो.हळूच तीनं काका... म्हणून मारलेली हाक ऐकू यायची.तीच्या आठवणीनं आणि काळजीनं एकटाच रडायचो.
कसातरी आठवडा भरला आणि साप्ताहिक सुट्टीला घरी परत आलो. कधी एकदा तीला पाहतो असं झालेलं घरी पोहचलो आणि धावतचं माझं पिल्लू मला बिलगलं तीला उचलून घेतलं आणि भावनांचा बांध फुटला हमहमसून रडलो. पण आता तीचा चेहरा चांगला दिसत होता.हायसं वाटलं.
आज मी वाईत राहतो आणि ती कल्याणला पण तीचा फोन आलेला का ? कशी आहे ? अशी चौकशी केल्याशिवाय रात्रीचं जेवण होत नाही.
आताशा माझं हे पिल्लू नवीनच जॉबला लागलयं.मोठं होतयं स्वतःच्या आत्मविश्वासावर भरारी मारायला सज्ज झालयं.त्याच्या पंखात बळ येऊन ते गगनभरारी घेईल.याची मला खात्री आहे. देवा माझ्या पिल्लाच्या पंखांना बळ दे.
आता बाईसाहेब आम्हाला सूचना करु लागलेत. काका रात्रीचं जागू नका.झोपत जा. दवाखान्यात जा.एक ना दोन अशा अनेक सूचनांची यादी सुरू असते. मन सुखावले जाते आपली काळजी घेणारं आपलं कोणीतरी अशा काळजीच्या स्वरात सूचना करतं ना तेव्हा आपसूकच त्या सूचनांचं पालन केलं जातं.
माझं काळीज मला भेटायला येत्या महिन्याभरात वाईला येणार आहे. काउंटडाऊन सुरु झालयं.कधी एकदा तीला मिठीत घेतोय अशी अवस्था झालीय.
खरंच तीच्या येण्यानं आमचं घर आनंदून गेलयं.
तुझाच
काका...
https://hinduraogole.blogspot.com/

0 Comments