आमची थोरलीआई
जीच्या प्रेमात, मायेत कसलाही वरपांग नाही कृत्रिमता नाही अशी आमची साधीभोळी जगाच्या व्यवहाराशी काहीही देणंघेणं नसलेली थोरलीआई. खरंतर ती आमची थोरली मामी पण आजोळच आमचं गाव पण असल्याने त्याच गावात असल्यामुळे सतत आजोळातच.त्यामुळे मामांची मुलं तीला थोरलीआई म्हणतात मग आमच्या भाचे मंडळींचीही ती थोरलीआईच झाली.
तीला शब्दांत मांडणं थोडं कठीणच परंतु प्रयत्न करुन पाहतोय.
निरपेक्ष, निस्वार्थी, निर्भेळ असं सर्वांवरच सारखं प्रेम करणारी ही प्रेमळ जातकुळीतील हाडाची प्रेमळ मूर्ती. काय बोलू तीच्या विषयी.
आम्ही पाहतोय तशी आहे तशीच तीच्यात आजवर कसलाच बदल झाला नाही. वागण्या बोलण्यात आणि शरीरातही.ती जशी आहे तशीच आहे तीळमात्र बदल असा काही नाही.
आमची आई जीजी सांगायची की दादा वहीनीच्या लग्नात ती पाच सहा वर्षांची असेल.बाजूच्याच वडाचीवाडीतील तीचं माहेर.जीजी म्हणायची वहीनीनं आयुष्यभर खूप सोसलयं,खूप सहन केलयं.जीजीच्या मनात तीच्या या मोठ्या वहीनीबद्दल एक हळवा कोपरा कायमच होता.आणि थोरलीआईही जीजी असेतोवर जीजीला कधी विसरली नाही.
आमचे मोठे मामा दादा,मागे मी त्यांच्याबद्दल लिहलं होतचं.तर आमचे दादा मामा म्हणजे तापट रागीट स्वभावाचे. स्वभावाला औषध नसतं.दादांच्या स्वभावाचा व्हायचा तो परिणाम झाला या दोघांचं पटेनासं झालं.थोरलीआई बरेच दिवस आपल्या माहेरी वडाचीवाडीत राहत होती.नंतर काही दिवसांनी परत आली.
घरात थोरली सून,थोरली जाऊ आहे म्हणून कधी कसलाही बडेजाव कधीच केला नाही.सर्वांशी मिळतं जुळतं घेत आजवरचा तीचा प्रवास चालू आहे. ती कुणाशी भांडलेय हे आठवतही नाही.
असेल त्यात समाधान मानून राहत आली.कधी कसला त्रागा नाही. समाधानी आयुष्याचं परमोच्च परिमाण म्हणजे आमची थोरलीआई.
आमच्यावर तर तीनं भाचे म्हणून नाहीतर स्वतःच्या लेकरांवर करतात तसं प्रेम केलं माया लावली त्यात आजवर कसलाच बदल झाला नाही.
आमच्यावरचं नाही तर आमच्या मुलांवरही ती तितकंच प्रेम करते त्यांची माया करते.माझा मुलगा विघ्नेश तर वाडीला गेल्यावर मुक्ताआजीला भेटल्याशिवाय येत नाही. तो तीच्याकडे गेला की त्याचं मुके काय घेईल,त्याला मांडीवर घेईल काय काय करेल याचा पत्ता नाही. त्याच्या हातावर दहा वीस रुपये ठेवणार म्हणजे ठेवणारच.
एकदा मी आणि विघ्नेश तीला भेटायला गेलो. जीजी आम्हाला सोडून गेली होती. तीची आठवण काढून थोरलीआई खूप रडायला लागली.तीचं पाहून विघ्नेशही रडू लागला.तो तिला सारखा म्हणत होता आजी तू रडू नको.
आम्ही घरी गेलो की तीला भेटल्याशिवाय येतच नाही. माझी बायकोही थोरलीआईला विसरत नाही. तीला भेटल्याशिवाय येत नाही. मावशी आमच्याकडे राहयला चला असा तीला आग्रह करत असते पण ती कधी येत नसते.
जगाच्या बदलाची व्यवहाराशी हीचं कसलंच देणं घेणं नसतं.ती आपल्या आहे त्या विश्वात रमलेली असते. अशी निर्व्याज,निर्भेळ प्रेम करणारी या पिढीतील ती एक प्रतिनिधी. अशी माणसं आता होणे नाही.
मध्यंतरी योगायोगाने दोन दिवस वाईत राहिली.दोन दिवस बायको तीला काय हवं नको पाहत होती.रात्री मी घरी येईपर्यंत माझी वाट पहात थांबायची मी आल्यावरच सोबत जेवायला बसायची.मला म्हणायची लवकर येत जा घरी.
दोन दिवसांनी वडाचीवाडीला गेली.तीच्या सेवेचा दोन दिवसांचा योग जुळून आला.परत बोलवलं तर येत नाही.
तीला उदंड निरामय आयुष्य द्यावं अशी देवाकडे प्रार्थना असेल.आमचा हा मायेचा पदर आम्हाला दीर्घकाळासाठी हवायं.
बस्स ... आणि काय सांगू तीच्याबद्दल.
तीचा तो प्रेमळ स्वभाव, माया ळआणि नैसर्गिक प्रेम आम्हाला सतत लाभत राहवे ही अपेक्षा. ती व्यवहारिक जगापासून आजवर जशी दूर आहे तशीच राहू देत.
✍🏻 हिंदुराव गोळे
https://hinduraogole.blogspot.com/

0 Comments