Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

आनंदाची वारी

वारी एक आनंद सोहळा

    वारी करून घरी आलोय पण मन अजूनही वारीतच आहे. वारीतच रमलयं‌.इतकंच काय पण वारीमध्ये गर्दीत माऊली, माऊली...म्हणायची इतकी सवय झाली होती की काल परवा मंडईत भाजीला गेलो होतो तर गर्दीत नकळत तोंडातून नकळत माऊली... माऊली...असे शब्द आले.आणि आपण आणि आपले मन अजूनही वारीतच आहे याची खात्री झाली.

      पंढरपूर क्षेत्राची,पंढरीची,विठ्ठलाची आणि वारीची महती आपण आजवर ऐकत आलोय त्याबद्दल मी काही इथं बोलणार नाही. पण वारीबद्दल ,वारीतील मिळालेल्या आनंदाबद्दल नक्कीच व्यक्त व्हावं असं वाटतयं.

     महाराष्ट्रातील असं घर नाही की ज्या घरात विठ्ठल भक्तीची परंपरा नाही प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती पंढरपूरची पायी वारी करतोच.सध्या नाहीतरी आपल्या आधीच्या पिढीतील लोकांनी वारी ही केलेलीच आहे. ही आपली परंपरा आहे, कुळाचार, कुळधर्म म्हणूनही वारी करणारे अनेक आहेत.

      यावर्षी वारीला संख्याही दरवर्षी पेक्षा जास्त होती. दोन वर्षे कोरोना काळात आणि नंतर गर्दीत नको जायला म्हणून वारीला न येऊ शकलेले यावर्षी वारीला आले.

      वारकरी संप्रदायाचे मुक्त विद्यापीठ म्हणजे पायी वारी,शरीराला आणि मनाला ऊर्जा देणारी वारी इतकंच नाही तर व्यक्तिमत्त्व विकास साधण्यासाठी वारी हे एक उत्तम साधन आहे. असं मला वाटतं.

    इथं भेदाभेद अमंगळ आहे, जातपात, पंथ सांप्रदाय,गरीब श्रीमंत, लहान मोठा हे भेदाभेद नाहीतच मुळात.माऊली...माऊली...राम कृष्ण हरि...विठ्ठल.. विठ्ठल...भजनात जो तो दंग होऊन भक्तीत तल्लीन झालेला असतो. हा आनंद अवर्णनीय विलक्षण आहे तो शब्दांत मांडणे केवळ अशक्य. तो अनुभवायचाच असतो. तेव्हाच कळतो जसं साखर गोड आहे पण ते सांगून नाहीतर खाल्ल्यावरच कळते तसं वारीतील आनंद पायी वारी केल्यानेच अनुभवता येतो.

     आम्ही संतपरिक्षक संतशिरोमणी श्रीसंत गोरोबाकाका पायी पालखी सोहळ्यात कैवल्यचक्र साम्राज्यवर्ती श्री ज्ञानोबारायांसमवेत माऊलींच्या सोहळ्यामागे चालत होतो. आमच्या गोरोबाकाकांच्या सोहळ्यात महाराष्ट्रातील प्रयेक जिल्ह्यातीलच नाहीतर कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातीलही वारकरी सोबत होते.

     दिंडीच्या मुक्कामाला दररोज प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आणि सकाळी काकडा होत असे. महाराष्ट्रातील नामवंत,गुणवंत कीर्तनकार, प्रवचनकार, गायक,वादक दिंडीत असल्याने रोजच्या या भक्तीसोहळ्याचा आनंद द्विगुणित होत असे.

     रथामध्ये पादुका, गोरोबाकाकांची मूर्ती पालखीत विराजमान असायची, दौंडकरांची बैलजोडी आमच्या रथाचं सारथ्य करते.धिप्पाड आणि रुबाबदार बैलजोडी.  सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. रथापुढे विणेकरी,तुळस,भजनी मंडळी पुढे वारकरी आणि त्यापुढे पताका खांद्यावर घेऊन राम कृष्ण हरिच्या गजरात  पंढरीच्या दिशेने चाललेली आमची दिंडी.

    ज्येष्ठ वारकरी, महिला वारकरी, बाल आणि युवा वारकरी अशा सर्व वयोगटातील वारकरी आमच्या दिंडीत आहेत.आणि या सर्वांची एकत्रित मोट बांधली ती या सोहळ्याचे मालक अखिल वारकरी संघाचे अध्यक्ष ह.भ.प.मच्छिंद्रनाथ महाराज कुंभार धानेपकर यांनी.कुशल संघटक,कतृत्व,नेतृत्व आणि वक्तृत्व या तिन्ही आघाडीवर वर्चस्व असणारी ही व्यक्ती हा सोहळ्याचा डामडौल समर्थ आणि सक्षमपणे सांभाळत असते.लाघवी स्वभाव, कुणालाही आपलंस करण्याची कला आणि स्वतः एक नामवंत कीर्तनकार असूनही सर्वांशी आपुलकीने वागणं ही त्यांची ओळख.गेली अठरा वर्षांपासून हा सोहळा साजरा करत आहे. पस्तीस वारकऱ्यांपासून सुरुवात झालीली ही दिंडी आज दिड दोन हजार वारकऱ्यांच्या संख्येने चालत आहे.

     वारीत मनमुराद आनंद घेता आला तो सोबत असणाऱ्या वारकरी बंधूंमुळे.तंड्या वारकरी, आमचा सातबारा म्हणजे जाधव माऊली, सातबारा अनवाणी पायाने चाळीस वर्षे वारी करणारा वारकरी,धिंडले भाऊ आणि नानी,महाजन बापू तसेच पन्नास पेक्षा जास्त वारी केलेले कुंभार महाराज आम्ही त्यांना तांब्या महाराज म्हणतो. असा आमचा सातबारा तंबू आणि त्या तंबूतील आम्ही तंड्या वारकरी म्हणून दिंडीत ओळख.

    धिंडले भाऊ आणि नानी यांचं तर काय वर्णन करु.दोघे नवराबायको वारी करतात. एकमेकांची वारीत काळजी घेतात. भाऊ नानीला लक्ष्मे...अशी जी आर्त हाक मारतात ती ऐकून त्यांच्या एकमेकांच्या प्रेमाची  ओळख  कळते.

     आम्ही सकाळी लवकरच चालायला सुरुवात करायचो.दुपारपर्यंत दिंडीत चालल्यावर आम्ही मी,तंड्या वारकरी म्हणजे आमची गणेश माऊली आणि कधीतरी बालाजी मागं राहयचो.इतर दिंडीतील मित्र परिवाराची भेट घ्यायचो.चालताना कुणी लंगडताना दिसलं तर त्याची विचारपूस करायची, पाय मुरगळा असेल ,दुखत असेल तर त्यांची तेलाने मसाज करायची. खांद्यावरच्या शबनममध्ये तेल ,बाम,आयोडेक्स असायचे. तेवढीच माऊलीची सेवा म्हणून निरपेक्ष भावनेने ही दैनंदिन सेवा चालू होती.

     कधीतरी खूप दिवसांनी एखादी जीवाभावाची व्यक्ती वारीत चालताना भेटायची मग सोबत चहा व्हायचा.असे कितीतरी वारकरी मित्र भेटत.चालत असताना नवीन वारकरी मित्र झाले.

     वारीत चालत असताना घरदार, बायकामुलं, नोकरी व्यवसाय, शेती भाती, गुरं ढोरं कशा कशाचीच आठवण होत नसायची.माऊली...माऊली...करत वाट चालायची एवढंच मनात.

    गर्दी, विठूनामाचा गजर,स्वयंशिस्तीत चाललेली प्रत्येक दिंडी रस्त्याच्या कडेला लागलेली दुकानं या साऱ्याची इतकी सवय लागली की घरी आल्यावर आपण कुठेतरी अपरिचित ठिकाणी आलोय असं वाटतयं.

    नवीनच ओळख झालेली आणि त्यातून प्रेमानं केलेली एक कप चहाची सोबत,नावगाव याची झालेली विचारपूस सारं सारं विलक्षण,अवर्णनीय.

   यावर्षी वारी मार्गाचं सुरु असलेलं काम त्यामुळे रस्त्याच्या कडेला असणारी बरीच झाडं तोडली आहेत. सावलीसाठी झाडच नाही. उन्हाचा तडाखा आणि पाऊस अजिबात नाही. पण माळशिरसला जोरात पाऊस झाला. आज आम्हाला तंबू टाकता येणार नव्हते कारण पाऊसच तितका पडत होता. पण माऊली धाऊन आली पलंगे म्हणून एक जण भेटले त्यांनी आम्हाला त्यांची इमारत निवासासाठी उपलब्ध करून दिली. खूप उपकार त्यांचे आमच्यावर झाले. शेवटी माऊलीला आपली काळजी असतेच.

   वारीचा आनंद घेत. रिंगण सोहळा आवर्जून पहात आम्ही वाखरीला पोहचलो. वाखरीतील रिंगण सोहळा पाहून आम्ही पंढरपूरला पोहचलो. रात्रीचे आठ वाजले होते. आणि एक माऊली आम्हाला म्हणाली मी दिंडीतून चुकलेय मला माझ्या दिंडीत सोडा. साधारण पासष्ट वर्षांची ती माय होती. नांदेड जिल्ह्यातील .तीला कुणाचा मोबाईल माहीत नव्हता फक्त दिंडी क्रमांक माहीत होता.आता कसं करायचं असा प्रश्न पडला.मग आमच्या तंड्यानं माऊली संस्थानशी संपर्क करून त्या दिंडी चालकाचा संपर्क मिळवला.त्या क्रमांकावर संपर्क करून त्यांना माहिती दिली. ते म्हणाले आम्ही येतो दहा पंधरा मिनिटात. त्यांचा मुक्काम वाखरीला होता.त्यांनी ज्याला माऊलीला घ्यायला पाठवलं होतं त्यांच्याकडे मोबाईल नव्हता. आता त्यांना कसा संपर्क करायचा ही समस्या नव्यानंच आमच्यासमोर होती. पण त्यांनी दुसऱ्याच्या मोबाईल वरून आमच्याशी संपर्क केला दिंडी चालकानं आमचा नंबर त्यांना लिहून दिला होता.आमचा जीव भांड्यात पडला.पण पंधरा वीस मिनिटात येतो म्हणाले आणि अर्धा तास एक तास होऊन गेला तरी ते आमच्यापर्यंत पोहचले नाहीत. आम्ही काळजीत पडलो आणि ती माऊली सारखी विचारायची मला घ्यायला कोण येतयं.एवढ्या खटाटोपात दोन अडीच तास गेले. तरीही कुणी आमच्याजवळ आले नाही. आम्ही त्या माऊलीला म्हटलं तुला घ्यायला कोण आलंच नाहीतर आमच्या सोबत तुला आमच्या दिंडीत घेऊन जातो.आणि पंढरपूरमधून तुझ्या गावच्या बसमधून गावाला पाठवू काळजी करु नको. म्हातारी घाबरलेली गोंधळलेली.
करता करता अकरा वाजता ती व्यक्ती आमच्यापर्यंत पोहचली तब्बल तीन तासांनंतर. माऊलीला त्यांच्या हवाली केलं.आम्ही निश्चिंत झालो.पण अजून आम्ही जेवलो नव्हतो आणि दूधपंढरीपासून आमच्या दिंडीचा मुक्काम सात किलोमीटर पुढे होता.पण माऊलीचा प्रसाद आम्हाला मिळाला तिथून पुढे आल्यावर एका ठिकाणी अन्नदानसेवा सुरू होती.आम्ही वरणभात खाऊन चालू लागलो.
रात्री एक दीड वाजता आमच्या मुक्कामावर पोहचलो.

    सकाळी लवकरच नगरप्रदक्षिणा आणि चंद्रभागेच्या स्नानासाठी आम्ही विठुरायाच्या नामगजरात चालू लागलो.चंद्रभागेचं स्नान झालं.प्रदक्षिणा झाली. दिंडी पुन्हा मुक्कामाच्या ठिकाणी गेली.

    मी आणि बालाजी दोघे मागे थांबलो.मला काही ग्रंथ तसेच प्रसाद घ्यायचा होता.दुपारचे बारा वाजले होते.मी पंढरपूरचे आमचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी बंधू तुकारामदादा चिंचणीकर यांना संपर्क केला.ते थोड्याचवेळात भेटले. मग आम्ही दुसरे धारकरी बंधू वीर महाराज यांच्या दुकानवर गेलो काही ग्रंथ खरेदी केले.

     तुकाराम दादा म्हणाले गुरुजी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येत आहेत. थोड्याच वेळात पोहचतील तुम्ही थांबा इथं, मी मंदिराकडे जातो गुरुजी आले की तुम्हाला बोलवतो.दोन वाजता गुरुजी आले .गुरुजी मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आले.आणि आम्ही आमच्या विठ्ठलाचे दर्शन घेतले. गुरुजींचा आशिर्वाद घेतला. पुढे आलो माझ्यासोबत असणारा बालाजी म्हणाला मला गुरुजींच्या हातून तुळशी माळ घालायची आहे. गुरुजींनी बालाजीला माळ घातली.अजूनही काही धारकरी बंधूंनी गुरुजींकडून माळ घातली.गुरुजींचा निरोप घेऊन  आम्ही आमच्या तंबूकडे आलो.

     एकादशीला कीर्तन झालं.पाऊस पडत होता तरी आमचं कीर्तन चालू होतं.दुसऱ्या दिवशी सकाळी मला महाराज म्हणाले प्रवचन कर मला पंढरपूरात प्रवचन सेवा करण्याचं भाग्यं लाभलं.

    दुपारी जेवणानंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. शिरवळला एकत्र आलो.तिथून वाईला रात्री नऊ वाजता घरी पोहोचलो.

    घरी आलो पण करमतच नव्हतं मन वारीतच होतं.वारीतील भजनात, वारकरी बंधूंच्या आठवणीत मन गुंतलं होतं.रात्री झोप लागत नव्हती तंबूतील सोबत्यांची आठवण होत होती.

    अशारीतीने माऊलीच्या कृपाशीर्वादाने वारी सुफल,सफळ संपन्न झाली.

    मन अजूनही वारीतच आहे. तो आनंद ,तो सोहळा,तो विठूनामाचा गजर यातच गुंतलं आहे.
जन्माला येऊन एकदा तरी पायी वारी नक्की करावी‌.
आता पुढच्या वर्षीच्या वारीची आस मनाला लागली आहे‌.पुन्हा तोच आनंद मनमुराद घ्यायचा आहे.पण त्यासाठी वर्षभराची प्रतिक्षा करावी लागणार.

राम कृष्ण हरि 🙏🏻🚩

✍🏻© वारकरी-धारकरी
       हिंदुराव गोळे

https://hinduraogole.blogspot.com/

👆🏻
 कृपया आपल्या ब्लॉगला अवश्य भेट द्या ही विनंती.🙏🏻

🙏🏻🍁🙏🏻🍁🙏🏻🍁🙏🏻🍁🙏🏻

Post a Comment

0 Comments